निकालपत्र :- (दि.12/10/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले.त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार नुकसान भरपाई रक्कमेतील उर्वरित रक्कम देणेचे सामनेवाला कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) यातील सामनेवाला ही विमा व्यवसाय करणारी वित्तीय संस्था असून तक्रारदार हे सामनेवाला यांचे पॉलीसीधारक ग्राहक आहेत. यातील तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे त्यांचे MH-09-BC 9192 या टाटा 909 गाडीचा जुलै-2008 मध्ये मे. चेतन मोटर्स,उचगांव, कोल्हापूर यांचेमार्फत विमा उतरविला होता. त्याचा पॉलीसी कव्हरनोट क्र.36641924 असा असून विमा पॉलीसी कालावधी हा दि.28/0/2008 ते 27/07/2009 असा आहे. ब) सदर पॉलीसीच्या कालावधीतच दि.09/09/2008 रोजी रात्री 12.30 वाजताचे दरम्यान शिरोली एम.आय.डी.सी. एरियामध्ये अपघात झाला. सदरचा अपघात हा मोटरसायकलस्वार चुकीच्या दिशेने आलेने झाला आहे. सदर अपघातामध्ये तक्रारदार यांच्या इन्शुरन्स उतरविलेल्या टाटा गाडीचे खूप नुकसान झालेने त्यांनी त्वरीत सदर गाडी दुरुस्तीसाठी मे.चेतन मोटर्स, उचगांव, कोल्हापूर यांच्याकडे सोपवली होती. सदर दुरुस्तीस तक्रारदार यांना रक्कम रु.45,000/- इतका खर्च आलेला आहे. परंतु सामनेवाला कंपनीकडून तक्रारदार यांना सदर इन्शुरन्सचे क्लेमपोटी फक्त रक्कम रु.33,000/- इतकीच रक्कम मिळाली. तक्रारदारांना सदर वाहनाच्या दुरुस्तीच्या बिलाप्रमाणे रक्कम रु.12,000/- कमी मिळाले. सदरची कमी मिळालेली रक्कम तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे तोंडी व लेखी वारंवार मागणी करुनही मिळालेली नाही. सदरची उर्वरित रक्कम सामनेवाला यांनी न दिलेने तक्रारदारास मे; मंचात सामनेवाला यांचेविरुध्द तक्रार करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदाराची क्लेमची उर्वरित रक्कम रु.12,000/- दि.09/09/08 पासून 18 टक्के व्याजाने तसेच नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.15,000/-‘ व तक्रारीचा खर्च रु.2,000/- असे सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांना तक्रारदाराने पाठविलेले पत्र तसेच सदर पत्राची पोच इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, प्रस्तुतची तक्रार कायदयाने मे. मंचात चालणेस पात्र नाही. प्रस्तुत तक्रारीतील आरोप, कथने, मजकूर खोटी चुकीची असल्याने सामनेवाला यांनी परिच्छेद निहाय तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. तक्रार अर्ज कलम 3 मधील तक्रारदाराच्या वाहनाचा अपघात होऊन मे.चेतन मोटर्स यांचेकडे वाहन दुरुसतीसाठी तक्रारदारास रक्कम रु.45,000/- इतका खर्च आला व त्यापोटी सामनेवाला कंपनीने रक्कम रु.33,000/- अदा केले व उर्वरित रक्कम रु.12,000/- दिलेले नाहीत याबाबत वाद नाही. मात्र प्रस्तुत रक्कमेची तक्रारदाराने तोंडी व लेखी मागणी केलेचे नाकारले आहे. तक्रारदाराचे नमुद वाहन MH-09-BC 9192 या टाटा 909 चा विमा सामनेवाला कंपनीकडे उतरविला होता. सदर विमा कालावधी दि.27/07/2008 ते 27/07/2009 अखेर होता. तक्रारदाराने प्रस्तुत वाहनावर रक्कम रु.45,000/- खर्च केला. सदर दुरुस्तीच्या खर्चाची तपासणी अनुषंगीक अहवाल व बीले इत्यादीच्या आधारे करुन पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदारास रक्कम रु.33,000/- दिलेले आहेत व सदरच्या नुकसानीची रक्कम ही योग्य व कायदेशीर आहे. सबब सामनेवाला यांनी कोणतीही कायदेशीर त्रुटी केली नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत नमुद वाहनाच्या पॉलीसीचा मूळ दस्त तसेच सर्व्हे रिपोर्टस, बीले व अनुषंगिक कागदपत्रे दाखल केली आहेत. (6) तक्रारदाराची तक्रार,दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे व उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2. तक्रारदार उर्वरित रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? --- होय. 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे त्यांचे MH-09-BC 9192 या टाटा 909 गाडीचा जुलै-2008 मध्ये मे. चेतन मोटर्स,उचगांव, कोल्हापूर यांचेमार्फत विमा उतरविला होता. त्याचा पॉलीसी कव्हरनोट क्र.36641924 असा असून विमा पॉलीसी कालावधी हा दि.28/0/2008 ते 27/07/2009 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीतच दि.09/09/2008 रोजी रात्री 12.30 वाजताचे दरम्यान शिरोली एम.आय.डी.सी. एरियामध्ये अपघात झाला. सदरचा अपघात हा मोटरसायकलस्वार चुकीच्या दिशेने आलेने झाला आहे. सदर अपघातामध्ये तक्रारदार यांच्या इन्शुरन्स उतरविलेल्या टाटा गाडीचे खूप नुकसान झालेने त्यांनी त्वरीत सदर गाडी दुरुस्तीसाठी मे.चेतन मोटर्स, उचगांव, कोल्हापूर यांच्याकडे सोपवली होती. सदर दुरुस्तीस तक्रारदार यांना रक्कम रु.45,000/- इतका खर्च आलेला आहे हे दाखल कागदपत्रावरुन निर्विवाद आहे तसेच सामनेवालांनी ही बाब मान्य केली आहे. वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो रक्कम रु.45,000/- इतका वाहन दुरुस्तीसाठी खर्च आला असताना सामनेवाला विमा कंपनीने रक्कम रु.33,000/- दिलेले आहेत व उर्वरित रक्कम रु.12,000/- दिलेले नाहीत. सामनेवालांच्या म्हणणेप्रमाणे सर्व्हेअर यांनी निर्धारित केलेल्या नुकसानीची रक्कम पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरुन दिलेली असलेने कोणतीही सेवात्रुटी नाही. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या पॉलीसीच्या अस्सल प्रतीचे अवलोकन केले असता सेक्शन क्र.1 Loss of Or Damage of Vehicle Insured,--- Subject to a deduction for depreciation Clause 1 to 4 चे अवलोकन केले असता क्र.1 प्रमाणे रबर, नायलॉन, प्लास्टीक पार्टस, टायर्स, टयुब आणि बॅटरीसाठी 50 टक्के तर फायबर ग्लास कपोंनन्टसाठी 30 टक्के, काचेपासून बनलेल्या पार्टससाठी काही नाही, तसेच क्लॉज 4 प्रमाणे व इतर पार्ट लाकडासहीत त्याचे शेडयुल दिलेले आहे. मधील क्लॉज क्र.3 चे अवलोकन केले असता व सवर्हेरअच्या रिपोर्टचे अवलोकन केले असता सर्व्हेअरने पार्टस वर्णनातील अनुक्रमांक 25 Side View Mirror Ih2 Damage – Broken Estimated Rs.1520/- Less 50% Depreciation वजा करुन रक्कम रु.745/- इतकी रक्कम धरलेली आहे. तसेच सदर रक्कमेतून पुन्हा 50 टक्के घसारा करुन रक्कम रु.372/- धरलेली आहे. वस्तुत: काचेपासून बनलेल्या वस्तुवर कोणताही घसारा वजावट करणेचा नाही तरीही केलेला दिसून येतो. तसेच Cabin Door Glass Rs.850/- खर्च दर्शविलेला आहे व व्हॅल्यअरने त्यासाठी रक्कम रु.0.00 नुकसानी धरलेली आहे. तसेच नमुद सेक्शन क्र.1 च्या क्लॉज क्र.1 व 2 प्रमाणे Wiper Blade 2, Wiper Arm 2, Rubber Mould इत्यादी सारख्या पार्टसंना 50 टक्के घसारा वजावट करणेचा होता. अनुक्रमांक 4, 6, 7, 9, 11, 12, 14 ते 24 कॅटॅगरीतील पार्टची नुकसानी मात्र रक्कम रु.0.00 निश्चित केलेली आहे. तसेच पार्ट बी लेबर चार्जेस मध्येही अनुक्रमांक 5, 9, 12, 13 नुकसानी रक्कम रु.0.00 निश्चित केलेली आहे. सर्व्हेअरने नुकसानीची रक्कम निर्धारित करताना पॉलीसीच्या अटी व शर्तीचे तंतोतंत पालन केलेचे सदर मंचास आढळून आलेले नाही. सबब केवळ सर्व्हेअर यांनी नुकसानीची रक्कम निश्चित केली आहे म्हणून ती योग्य आहे असे म्हणता येणार नाही यासाठी हे मंच खालील पूर्वाधारचा विचार घेत आहे. 2009 ACJ 1729 IN THE SUPREME COURT OF INDIA AT NEW DELHI (C.A. No.3253 of 2002; decided on 09/04/2009) New India Assurance Co. Ltd. Vs Pradeep Kumar- Insurance Act,1938, Section 64-UM(2) – Motor insurance –Claim for damage to truck-Surveyor’s report-Truck fell into khud and was damaged-Owner of the truck filed claim duly supported by original vouchers, bills and receipts for the parts purchased and the labour charges paid for repairs-Insurance company appointed surveyor who estimated damages at Rs.63,771/- which was not accepted by the owner-Owner filed complaint and District Forum directed insurance company to pay Rs.1,58,409/- which was confirmed by State Commission and National Commission-Contention that loss assessed by approved surveyors was binding-Whether the report of the approved surveyor is binding upon the insurance company and the insured-Held: no; it may be the basis or foundation for settlement of a claim; loss assessed by consumer for a affirmed. 2006 ACJ 2547 IN THE SUPREME COURT OF INDIA AT NEW DELHI (C.A. No.2066 of 2006; decided on 15/09/2006)Shobika Attire Vs New India Assurance Co. Ltd. And anothers- Insurance-Fire Insurance-Claim for damage to stock in showroom-Showroom was covered by an insurance policy covering all the stock of textile items and garments for damage due to riots, strike, malicious and terrorist activities-Conseqent upon series of bomb blasts which rocked the city, a group of armed rioters are alleged to have looted the showroom and set it on fire-According to claimants the entire stock of goods was either looted or reduced to ashes-Bank informed the insurance company that stock insured were for Rs.2,00,00,000/- and average stock at any point of time in the insured premises was more than Rs.2,00,00,000/- Another insurance company which had insured fixtures, fittings and furniture in the showroom, had on the basis of report of its surveyor, approved the claim for Rs.20,43,605/-Showroom consists of one elevated ground floor and two basement floors-Insurance company settled the claim covering the damage excluding the stock in two levels of basement and paid Rs.1,02,16,173/- Claimant complainant filed complaint with the Commission under Consumer Protection Act for the balance which was dismissed on the ground that only point of entry from elevated ground floor was blocked by fire, heat and smoke and there was remote possibility of riotous mob having entered there-Claimants had discharged the initial burden regarding destruction, damage of showroom and stock therein by fire and riot in support of their claim and it was for the insurance company to disprove the claim-Held: yes; despite report of the investigator, insurance company failed to establish that claim was not justified and was not covered by the policy; insurance company directed to pay Rs.97,83,827/- but claimants are not entitled to any compensation towards hardship, mental agony and harassment. वस्तुत: सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसार इस्टीमेटेड व्हॅल्यू, मोटार क्लेम फॉर्मवरुन रक्कम रु.64,678/-ची नोंद दिसून येते. तसेच चेतन मोटर्स यांनी रक्कम रु.23,375/-लेबर चार्जेस व स्पेअर पार्टचे रक्कम रु.42,663/- अशी एकूण रक्कम रु.66,038/- अंदाजे खर्चाची रक्कम दिलेली आहे. मात्र प्रत्यक्षात रक्कम रु.45,000/- इतक्याच रक्कमेचा खर्च आलेने तक्रारदाराने तेवढयाच रक्कमेची मागणी केलेली आहे व तेवढी रक्कम तक्रारदाराने सिक्युरिटीपोटी मे. चेतन मोटर्स यांना अदा केलेली आहे व अशी वस्तुस्थिती असतानाही सामनेवालांनी तक्रारदारास रक्कम रु.33,000/- पाठवलेले आहे. उर्वरित रक्कम रु.12,000/- देणेबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे लेखी मागणी केलेली आहे व त्याबाबत पोष्टाची पोच प्रस्तुत कामी दाखल आहे. असे असतानाही सामनेवाला तक्रारदार यांनी अशी तोंडी अथवा लेखी मागणी केली नसलेचे आपल्या लेखी म्हणणेत नाकारतात. याचा विचार करता सामनेवाला कंपनीने केवळ सर्व्हेअरने रक्कम निश्चित केलेली रक्कम योग्य आहे. या आधारावर तक्रारदारास प्रत्यक्ष आलेला दुरुस्तीचा खर्च रक्कम रु.45,000/- न देता रक्कम रु;33,000/- देऊन उर्वरित रक्कम रु.12,000/- न दिलेने सेवा त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार उर्वरित रक्कम रु.12,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर जेव्हा सामनेवाला कंपनीने रक्कम रु.33,000/-तक्रारदाराला अदा केले आहे त्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. वर नमुद पूर्वाधाराचा विचार करता तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र नाही, मात्र तक्रारीचा खर्च मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास नुकसानीची उर्वरित रक्कम रु.12,000/- (रु. बारा हजार फक्त) सदर रक्कमेवर जेव्हा सामनेवाला कंपनीने रक्कम रु.33,000/-तक्रारदाराला अदा केले आहे त्या तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % दराने व्याज अदा करावेत. (3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |