जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा-श्रीमती.वी.वी.दाणी. मा.सदस्या-श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १२३/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २६/०७/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १५/०५/२०१३
श्री.अनिल बाळकृष्ण देशपांडे. ----- तक्रारदार.
उ.व.४८,धंदा-वकीली.
रा.ग.नं.६, देशपांडे कॉम्प्लेक्स,
धुळे.ता.जि.धुळे.
विरुध्द
(१)म.डीव्हीजनल मॅनेजर, ----- सामनेवाले.
सेन्ट्रल रेल्वे,छञपती शिवाजी टर्मिनस, मुंबई.
(२)म.स्टेशन मास्तर,
दौंड रेल्वे स्टेशन,दौंड,जिल्हा-पुणे. दौंड.
(३)म.स्टेशन मास्तर,
धुळे रेल्वे स्टेशन,धुळे.
(४)म.विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (रेल्वे)
सोलापुर विभाग,सोलापूर.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः श्रीमती.वी.वी.दाणी.)
(मा.सदस्याः श्रीमती.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – स्वत:)
(सामनेवाले तर्फे – वकील श्री.एम.एस.पाटील.)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा - श्रीमती.वी.वी.दाणी.)
(१) तक्रारदार यांनी, सामनेवाले यांनी सेवेत त्रृटी केली म्हणून सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांना त्यांच्या कुटूंबीयांसह सोलापूर येथे जावयाचे होते. त्यानुसार त्यांनी स्वत:साठी व कुटूंबीयांसाठी सोलापुर ते चाळीसगांव अशी प्रवासी आरक्षण तिकीटे सामनेवाले यांच्याकडून घेतली. सदर प्रवासाचे आरक्षण तिकीट गाडी क्र.२१०२८ या मुंबई मेलच्या दि.१५-०४-२०१२ रोजीच्या डब्बा क्र.एस-११ चे ४९ ते ५२ अशा बर्थ क्रमांकाचे होते. सदर गाडीची वेळ ही सायंकाळी ६.२० अशी होती. परंतु दि.१५-०४-२०१२ रोजी सोलापुर येथे मुसळधार पाऊस झाल्याने तक्रारदार हे कुटूंबीयांसह सोलापुर रेल्वे स्थानकात सायंकाळी ६.२० पर्यंत पोहोचू शकले नाहीत व ते ६.४५ मिनीटांपर्यंत रेल्वे स्थानकावर पोहोचले. परंतु त्यावेळी सदर मुंबई मेल सोलापूर स्थानकातून निघून गेल्याचे कळले. तक्रारदारांनी चौकशी केली असता, सदर एस-११ हा डब्बा दौंड रेल्वे स्थानकावर थांबतो व नंतर तो महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडीला जोडला जातो, तेव्हा दौंड येथून एस-११ या डब्ब्यात बसावयास जा असे सामनेवाले यांनी सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार हे दौंड येथील रेल्वे स्थानकात पोहोचले. परंतु सदर डब्ब्यातील टी.सी. ने तक्रारदारांच्या आरक्षण तिकीटावर “ रिपोर्ट अॅट दौंड ” असा शेरा मारुन तिकीट रद्द झाले असून इतर प्रवाशांना दिले आहे असे सांगितले. अशा प्रकारे डब्बा क्र.एच-११ ने प्रवास करण्यापासून टि.सी. ने तक्रारदारांना गैरकायदेशीर पध्दतीने प्रतिबंध केला. त्यामुळे तक्रारदार हे ठरल्याप्रमाणे प्रवास करु शकले नाहीत व तेथून पुढे शेगांव येथे जावू शकले नाहीत.
(३) प्रवासाची आरक्षण तिकीटे घेतल्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. परंतु सामनेवाले यांनी सेवा पुरविली नाही, सेवेत कमतरता आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या झालेल्या नुकसानीस सामनेवाले हे जबाबदार आहेत. या कामी तक्रारदारांनी सामनेवाले यांना नोटिस पाठविली. परंतु सामनेवाले यांनी त्याप्रमाणे पुर्तता केली नाही. सबब सदरचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे. तक्रारदारांची अशी विंनती आहे की, त्यांना नुकसान भरपाईकामी एकूण रु.२८,५४१/- व अर्जाचा खर्च रु.५,०००/- द.सा.द.शे.१८ टक्के व्याजासह सामनेवाले यांच्याकडून मिळावा.
(४) सामनेवाले नं. १ ते ४ यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी असे नमूद केले आहे की, सदर तक्रार अर्ज चालविण्यास जास्तीत जास्त पुराव्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज हा सिव्हील कोर्टात चालविण्यात यावा. तसेच रेल्वे क्लेम ट्रीब्युनल अॅक्ट १९८७ प्रमाणे सदर क्लेम स्पेशल ट्रीब्युनलमध्ये दाखल करणे आवश्यक होते, त्यामुळे सदर मंचास कार्यक्षेञ नाही. तसेच सामनेवाले यांचे टि.सी. हे तक्रारदाराशी उध्दटपणे वागलेले नाहीत व त्यांनी तक्रारदारास आरक्षण बर्थ देण्यास नकार दिलेला नाही. सदरचे आरक्षण हे वेटींग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना आर.ए.सी. च्या नियमा प्रमाणे, तक्रारदार वेळेत न पोहोचल्याने देण्यात आले आहे. त्यामुळे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार नाहीत. सबब तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करावा अशी सामनेवाले यांनी विनंती केली आहे.
(५) याकामी तक्रारदार यांनी शपथपञ आणि दस्तऐवजांच्या यादी प्रमाणे एकूण ३ कागदपञे दाखल केली आहेत.
याकामी सामनेवाले यांनी शपथपञ आणि रिझर्व्हेशन जनरल रुल्स ची छायांकीत प्रत दाखल केली आहे.
तक्रारदारांचा अर्ज, शपथपञ, सामनेवाले यांची कैफीयत आणि पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर विष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सदर तक्रार अर्ज चालविण्याचे, या मंचास कार्यक्षेञ आहे काय ? | : होय. |
(क)सामनेवाले यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत कमतरता केली आहे काय ? | : नाही. |
(ड)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार व त्यांच्या कुटूंबीयांना दि.१५-०४-२०१२ रोजी सोलापुर ते चाळीसगांव असा रेल्वेने प्रवास करावयाचा होता. त्याकामी त्यांनी प्रवासी आरक्षण तिकीट काढले होते. सदर तिकीट नि.नं.४/२ वर दाखल केले आहे. हे तिकीट पाहता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांच्या कुटूंबीयांसह चार सदस्यांना सोलापूर ते चाळीसगांव अशा रेल्वे प्रवासासाठी “जर्नी कम रिझर्व्हेशन” तिकीट दिले आहे या बाबत वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – सामनेवाले यांचे असे म्हणणे आहे की, रेल्वे ट्रीब्युनल अॅक्ट १९८७ प्रमाणे सदर तक्रार स्पेशल ट्रीब्युनलमध्ये चालणे आवश्यक आहे. परंतु आमच्या मते ग्राहक संरक्षण कायदा कलम ३ प्रमाणे सदर तक्रार अर्ज या मंचात चालण्याचे कार्यक्षेञ आहे. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘क’’ – सदर गाडी ही सोलापूर रेल्वे स्थानकातून सुटण्याची वेळ सायंकाळी ६.२० अशी होती. परंतु तक्रारदार हे गाडी निघण्याचे नियोजीत वेळी न पोहोचता सायंकाळी ६.४५ वाजता थोडे उशीराने पोहोचले हे तक्रारदार यांनी स्वत:च मान्य केले आहे. त्यानंतर तक्रारदार हे दौंड येथील रेल्वे स्थानकात गेले त्यावेळी सामनेवाले यांच्या टि.सी. ने त्यांचे आरक्षण इतर प्रवाशांना दिल्याचे त्यांना समजले आणि टि.सी. ने त्यांचे तिकीटावर “ Reported at Daund ” असे लिहिले. या कामी सामनेवाले यांचे असे म्हणणे आहे की तक्रारदार हे वेळेत पोहोचले नसल्याने सदरचे बर्थ हे नियमानुसार रिकामे ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे सामनेवाले यांनी सदर बर्थवर रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन च्या नियमाप्रमाणे वेटींग लिस्टवर असलेल्या इतर प्रवाशांचा हक्क तयार होतो. या नियमा प्रमाणे सामनेवाले यांनी सदरचे बर्थ रिकामे न ठेवता ते वेटींग लिस्टवर असलेल्या इतर प्रवाशांना दिले आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांचे आरक्षण हे कॅन्सल करुन वेटींग लिस्टवरील प्रवाशांना दिले आहे असे दिसते. या कामी सामनेवाले यांनी रिझर्व्हेशन जनरल रुल याची प्रत दाखल केली आहे. सदर नियमातील कलम १९ व २० प्रमाणे, प्रवाशांनी त्यांचे आरक्षण केलेले बर्थ हे गाडी सुटण्यापुर्वी कमीत कमी १० मिनिटे आधी ताब्यात घेणे आवश्यक आहे. तसेच त्या बाबतची इतर कोणतीही माहिती गाडी सुटण्यापुर्वी २४ तास आधी रेल्वे बोर्डाला देणे आवश्यक आहे. वरील नियम व कथन पाहता असे लक्षात येते की, तक्रारदार हे गाडी सुटण्याचे नियोजीत वेळी रेल्वे स्थानकात पोहोचले नाहीत व त्यांनी त्यांचे बर्थ त्या वेळेपुर्वी ताब्यात घेतलेले नाहीत. म्हणजेच तक्रारदार यांनी सोलापुर येथे त्यांचा ग्राहक असण्याचा हक्क गमावलेला आहे. दौंड रेल्वे स्थानकावर जावून सदर एस-११ या डब्यातील त्यांचे आरक्षण ताब्यात घेण्याचा तक्रारदारांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु सोलापुर येथे तक्रारदार यांनी सदर बर्थ ताब्यात न घेता त्यावरील हक्क सोडून दिला आहे. त्यामुळे त्यांचा बर्थवरील हक्क दौंड येथे अबाधीत राहत नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी नियमा प्रमाणे वेटींग लिस्टवर असलेल्या इतर प्रवाशांना सदर रिझर्व्हेशन कॅन्सल करुन आरक्षण दिले आहे, असे स्पष्ट होत आहे.
तक्रारदार हे वेळेत पोहोचले असते व तेथे पोहोचूनही जर सामनेवाले यांनी त्यांचे आरक्षीत केलेले बर्थ त्यांना दिले नसते तरच, सामनेवाले यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होत होती. परंतु सामनेवाले यांनी नियमा प्रमाणे तक्रारदारांचे बर्थ दुस-या व्यक्तीला दिलेले आहेत आणि तसा तिकीटावर शेरा मारलेला दिसत आहे. सदरचे बर्थ हे सोलापुर ते दौंड अशा १९० किलो मिटर अंतरापर्यंत रिकामे ठेवणे सामनेवाले यांना शक्य नाही. त्यामुळे या नियमा प्रमाणे वेटींग लिस्टवरील प्रवाशांना ते दिलेले आहे. सदर एस-११ या डब्यामध्ये इतर आरक्षणा व्यतिरिक्त प्रवाशांना थांबविणे सामनेवाले यांना शक्य नव्हते. याचा विचार होता सामनेवाले यांनी केलेली कार्यवाही ही योग्य आहे असे मंचाचे मत आहे.
या सर्व परिस्थितीत तक्रारदार यांना निश्चितच शारीरिक व मानसिक ञास सहन करावा लागलेला दिसत आहे. परंतु सदर बाबीचा विचार हा भावणीक दृष्टया करणे शक्य नाही. सदर परिस्थिती ही सामनेवाले यांच्या कामकाजातील बेपर्वाहीमुळे अथवा ञृटीमुळे निर्माण झालेली नाही. त्यामुळे सामनेवालेंच्या सेवेत कमतरता स्पष्ट होत नाही. सबब तक्रारदारांची मागणी योग्य व रास्त नाही. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) याकामी तक्रारदार यांनी खाली नमूद केलेला न्यायनिवाडा दाखल केला आहे.
II (2010) CPJ 612 (M.S.C.D.R.C.Mumbai,Circuit Bench at Aurangabad ) :
Divisional Railway Manager,Central Railway Bhusawal & Ors. Vs Ashok Kumar Gangaram Ranglani.
परंतु तक्रारदार यांनी दाखल केलेल्या उपरोक्त न्यायनिवाडयातील तथ्य या प्रकरणाशी मिळतेजुळते नसल्यामुळे, सदर निवाडा या प्रकरणी तंतोतंत लागू करता येणार नाही असे आमचे मत आहे.
वरील सर्व कारणांचा विचार होता सदरची तक्रार नामंजूर करणे योग्य आहे असे आमचे मत आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः १५/०५/२०१३
(श्रीमती.एस.एस.जैन.) (श्रीमती.वी.वी.दाणी.)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.