(घोषित दि. 24.11.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचे पती गणेश हे शेतकरी होते आणि त्यांचे दिनांक 13.04.2010 रोजी शेतामध्ये काम करीत असतांना विळा लागल्यामुळे निधन झाले. तिच्या पतीचे निधन झाले त्या वेळी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शेतक-यांचा शेतकरी अपघात विमा पॉलीसी अंतर्गत प्रत्येकी रुपये 1,00,000/- चा विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसी कालावधीमध्येच तिच्या पतीचे अपघाती निधन झाल्यामुळे तिने आवश्यक कागदपत्रासह तालूका कृषी अधिकारी यांच्या मार्फत दिनांक 30.04.2010 रोजी विमा दावा दाखल केला. परंतू गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने तिच्या विमा दाव्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि तिचा विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवून तिला त्रुटीची सेवा दिली. म्हणून तिने अशी मागणी केली आहे की, तिला विमा कंपनीकडून रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई देण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स कंपनी सर्व्हीसेस प्रा.लि. यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने दाखल केलेला विमा दावा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने दिनांक 31.12.2010 रोजी फेटाळलेला आहे व त्यांचा सदर निर्णयाशी कोणताही संबंध नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, शेतकरी अपघात विमा पॉलीसी संदर्भातील करार शासनासोबत झालेला आहे. परंतू तक्रारदाराने शासनाला या प्रकरणात पक्षकार केलेले नाही. म्हणून ही तक्रार आवश्यक पक्षकारा अभावी अयोग्य असल्यामुळे फेटाळावी. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, शेतकरी अपघात विमा पॉलीसी नुसार ज्या शेतक-यांचे नाव पॉलीसी सुरु झाली त्या दिवशी 7/12 मध्ये नमूद केलेले आहे, फक्त त्यांनाच पॉलीसीचे सरक्षण लागू आहे. तक्रारदाराच्या पतीचे नांव पॉलीसी सुरु झाल्यानंतर 7/12 मध्ये नमूद केलेले आहे. म्हणून तिला पॉलीसीचे संरक्षण नव्हते. त्यामुळे तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्यात आलेला असुन सदर निर्णय योग्य आहे. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात
मुद्दे उत्तर
1.गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीच्या सेवेत
त्रुटी आहे काय ? नाही
2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.आर.व्ही.जाधव आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड. देशपांडे यांनी युक्तीवाद केला.
शेतकरी अपघात विमा पॉलीसी बाबत महाराष्ट्र शासनाने गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीसोबत केलेला करार नि.16/2 मधील अट क्रमांक 8 (II) नुसार सदर पॉलीसीचे संरक्षण पॉलीसी सुरु झाली त्यादिवशी ज्या शेतक-याचे नांव 7/12 मध्ये आहे त्यांनाच लागू होते. शेतकरी अपघात विमा पॉलीसी दिनांक 15.08.2009 रोजी सुरु झाली होती. त्यामुळे ज्या शेतक-यांचे नाव दिनांक 15.08.2009 रोजी 7/12 मध्ये होते, त्यांनाच सदर पॉलीसीचे संरक्षण लागू होते. तक्रारदाराचे पती गणेश खोजे यांचे नाव 7/12 मध्ये दिनांक 25.11.2009 रोजी नमूद करण्यात आले. याबाबत तक्रारदाराने कोणतेही म्हणणे मांडलेले नाही किंवा तिच्या पतीचे दिनांक 15.08.2009 रोजी किंवा त्यापुर्वीच 7/12 मध्ये नोंदविण्यात आले होते अशा प्रकारचा कोणताही पुरावा तक्रारदाराने दिलेला नाही. शेतकरी अपघात विमा पॉलीसी सुरु झाली त्यावेळी तक्रारदाराच्या पतीचे नाव 7/12 मध्ये नव्हते. त्यामुळे शेतकरी अपघात विमा पॉलीसीचे संरक्षण त्यांना लागू नव्हते. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने मयत गणेश खोजे यांचे नांव 7/12 मध्ये पॉलीसी जारी केल्यानंतर टाकण्यात आल्याचे कारण देवून तक्रारदाराचा विमा दावा फेटाळला. विमा कंपनीचा सदर निर्णय पॉलीसीच्या अटी व शर्ती नुसार योग्यच आहे आणि विमा कंपनीच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही, असे आमचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.