(घोषित दि. 23.09.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचे पती शामराव ज्ञानदेव घाडगे हे शेतकरी होते. दिनांक 02.07.2009 रोजी तिचे पती आषाढी एकादशी निमित्त टेम्पोमधून पंढरपूरला जात असतांना टेम्पोचा अपघात झाला आणि अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचे पती शामराव यांचे निधन झाले. तिच्या पतीचे अपघाती निधन झाले त्यावेळी महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद विभागातील सर्व शेतक-यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा पॉलिसी अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे प्रत्येकी रुपये 1,00,000/- चा विमा उतरविलेला होता आणि सदर पॉलिसी नुसार शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास विमा कंपनीने शेतक-याच्या वारसास रुपये 1,00,000/- एक महिन्याच्या आत अदा करणे बंधनकारक आहे. तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तिने दिनांक 10.08.2009 आणि 01.02.2011 रोजी आवश्यक कागदपत्रांसह तालूका तहसील कार्यालय व तालूका कृषी अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात विमा दावा दाखल केला होता. परंतू तिच्या विमा दाव्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अद्याप कोणताही निर्णय कळविला नाही आणि तिला त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिला गैरअर्जदाराकडून रुपये 1,00,000/- विमा रक्कम देण्यात यावी. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, श्री.शामराव ज्ञानदेव घाडगे यांच्या मृत्यू संदर्भातील कोणताही विमा दावा त्यांच्याकडे प्राप्त झालेला नाही, म्हणून त्या विमा दाव्याबाबत ते काहीही सांगू शकत नाहीत. म्हणून ही तक्रार फेटाळावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचा विमा दावा त्यांच्याकडे प्राप्त झालेला नाही. तक्रारदाराने त्यांच्याकडे विमा दावा दाखल केलेला नसल्यामुळे तिच्या विमा दाव्याबाबत निर्णय करण्याचा प्रश्न उदभवत नाही आणि म्हणून सेवेत त्रुटी असण्याचा देखील प्रश्न नाही. तक्रारदाराची तक्रार त्यामुळे चालण्यास योग्य नाही व तक्रारदार कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात
मुद्दे उत्तर
1.गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही
2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.आर.व्ही.जाधव आणि गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीच्या वतीने अड.पी.एम.परिहार यांनी युक्तीवाद केला.
तक्रारदाराचे पती शामराव घाडगे यांचे दिनांक 02.07.2009 रोजी अपघाती निधन झाले तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तिच्या पतीच्या अपघाती निधन झाल्यानंतर तिने दिनांक 10.08.2009 रोजी तहसील कार्यालया मार्फत गैरअर्जदारांकडे शेतकरी अपघात विमा योजने नुसार नुकसान भरपाई मिळावी म्हणून विमा दावा दाखल केला होता व त्यानंतर दिनांक 01.02.2011 रोजी तालुका कृषी अधिका-या मार्फत विमा दावा दाखल केला होता. परंतू विमा कंपनीने तिच्या विमा दाव्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही व तिला त्रुटीची सेवा दिली.
तक्रारदाराने दाखल केलेला विमा दावा प्राप्त झाला नाही, तिच्या विमा दाव्याबाबत निर्णय करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही असे दोन्ही गैरअर्जदारांचे म्हणणे आहे.
तक्रारदाराने दिनांक 10.08.2009 रोजी तहसील कार्यालया मार्फत विमा दावा दाखल केल्याचे कोणतेही कागदपत्र तक्रारदाराने दाखल केलेले नाहीत. तक्रारदाराच्या वतीने असे निवेदन करण्यात आले की, तिने तहसीलदारा समोर शपथपत्र केले होते आणि तहसीलदाराने दिनांक 10.08.2009 रोजी प्रमाणपपत्र (नि.3/6) दिले होते, यावरुन तिने विमा दावा दाखल केल्याचे दिसून येते.
तक्रारदाराच्या सदर म्हणण्याशी आम्ही सहमत नाहीत. तहसीलदाराने दिनांक 10.08.2009 रोजी प्रमाणपत्र दिले किंवा तक्रारदाराने तहसीलदारा समोर अपघात विम्या संदर्भात शपथपत्र केले याचा अर्थ तक्रारदाराने विमा दावा दाखल केला होता असा होत नाही. तक्रारदाराने त्यानंतर दिनांक 01.02.2011 रोजी तालूका कृषी अधिकारी यांच्याकडे विमा दावा दाखल केल्याचे म्हटले आहे. परंतू तालूका कृषी अधिका-याने तो विमा दावा सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदारांकडे पाठविल्याचे दिसून येत नाही.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तिने स्वत: दिनांक 10.03.2011 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीला रजिष्टर्ड पोष्टाने अर्ज नि. 3/2 पाठवून विमा रकमेची मागणी केली होती. तक्रारदाराचा सदर अर्ज विमा कंपनीला मिळाल्याबाबतचा पुरावा नाही. तक्रारदाराने तिचा अर्ज विमा कंपनीला मिळाल्याचे दर्शविणारा पोष्ट कार्यालयाकडून प्राप्त झालेला अहवाल नि.14/1 वर दाखल केला आहे. परंतू हा अहवाल पाहता असे दिसून येते की, पोष्ट कार्यालयाने जे पत्र गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीला मिळाल्याचे नमूद केले आहे. ते पत्र दिनांक 05.02.2011 रोजी विमा कंपनीला मिळाले होते. तक्रारदाराने जर दिनांक 10.03.2011 रोजी विमा कंपनीकडे अर्ज नि.3/2 पाठविलेला असेल तर तो दिनांक 05.02.2011 रोजीच म्हणजे एक महिना आदी कसा काय मिळू शकतो ही बाब संभ्रमात टाकणारी आहे. त्यामुळे तक्रारदाराचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे मिळाल्याचे सिध्द् होत नाही. गैरअर्जदारांकडे तक्रारदाराचा विमा दावा मिळाल्याचे सिध्द् होत नसल्यामुळे गैरअर्जदारांच्या सेवेत त्रुटी असण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
तक्रारदाराने दिनांक 01.02.2011 रोजी तालूका कृषी अधिका-याकडे विमा दावा दाखल केलेला होता. परंतू तालूका कृषी अधिका-याने तिचा विमा दावा गैरअर्जदार विमा कंपनीकडे पाठविला नाही. शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा फटका मयत शेतक-याच्या विधवेस बसू नये आणि ती जर विमा रक्कम मिळण्यास पात्र असेल तर तिला विमा दावा दाखल करण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे आम्हाला वाटते व त्यासाठी तक्रारदाराने थेट गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विमा दावा आवश्यक कागदपत्रांसह दाखल करणे योग्य राहील आणि विमा कंपनीने तिच्या विमा दाव्याबाबत गुणवत्तेवर निर्णय करणे नैसर्गिक न्यायाच्या द्ष्टीने योग्य ठरते.
म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे तिच्या पतीच्या अपघाती मृत्यू संदर्भात आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल करावा आणि तक्रारदाराचा विमा दावा प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने तिच्या विमा दाव्याबाबत योग्य तो निर्णय विमा दावा प्राप्त झाल्यापासून दोन महिन्याच्या आत तक्रारदारास कळवावा.
- गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने विमा दाव्याबाबत घेतलेला निर्णय जर तक्रारदारास मान्य नसेल तर तिला पुन्हा या मंचाकडे दाद मागता येईल.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.