(घोषित दि. 30.12.2011 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे
तक्रारदारांचे पती श्री. लक्ष्मणे शामराव मुकणे हे शेतकरी असून त्यांचा वाहन अपघातात दिनांक 20.12.2009 रोजी मृत्यू झाला. सदर अपघाताची संबंधित पोलीस स्टेशन गेवराई यांनी तपास करुन गुन्हा नोंदविलेला असून एफ.आय.आर, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा केला. पोलीसांनी मयत व्यक्तीचे प्रेत शासकीय रुग्णालय औरंगाबाद येथे शवविच्छेदनसाठी पाठवले. संबंधित वैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदन अहवाल दिला.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यू नंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव गैरअर्जदार 1 व 2 यांचेकडे आवश्यक कागदपत्रासह दिनांक 17.04.2010 रोजी दाखल केला. गैरअर्जदार 1 यांनी दिनांक 06.12.2010 रोजीच्या स्मरणपत्रान्वये तक्रारदारांना कागदपत्राची पूर्तता करण्याबाबत कळवले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी दावा अर्ज, तक्रारदाराचे तालूका दंडाधिकारी यांचेकडे केलेले शपथपत्र, रेशनकार्ड, 6 क, 6 ड, मृत्यू प्रमाणपत्र वगैरे कागदपत्र दिनांक 24.05.2011 रोजी कृषी अधिकारी, धनसावंगी यांच्याकडे जमा केले आहे. परंतू तक्रारदारांना अद्याप पर्यंत विमा लाभ रक्कम मिळाली नाही. अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार 1 यांनी लेखी म्हणणे पोस्टाद्वारे दिनांक 30.07.2011 रोजी पाठवले आहे. गैरअर्जदार 1 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचा विमा प्रस्ताव दिनांक 06.09.2010 प्राप्त झालेला असून सदर प्रस्ताव विमा दावा, बॅंकेचे पासबूक, तक्रारदारांचे रक्कम रुपये 20/- चे बॉंड पेपरवर शपथपत्र, वयाचा दाखला, 6 क चा उतारा मुळप्रत, मृत्यू प्रमाणपत्र, फेरफार मूळप्रत वगैरे कादपत्रांची पूर्तता करण्यासाठी तक्रारदारांना दिनांक 29.09.2010, 03.11.2010, 06.12.2010 रोजी स्मरणपत्रे पाठवली. तक्रारदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यामूळे विमा प्रस्ताव गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे दिनांक 21.12.2010 रोजी अपूर्ण शे-यासह पाठवला. गैरअर्जदार 2 विमा कंपनीने दिनांक 31.12.2010 रोजीच्या पत्रान्वये सदर प्रस्तावाची फाईल बंद केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार 2 हजर झालेले असून लेखी म्हणणे दिनांक 29.12.2011 रोजी दाखल केले. गैरअर्जदार 2 यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांनी फेरफार नं.268 विहीत मूदतीत दाखल न केल्यामूळे विमा प्रस्ताव नामंजूर केला आहे. तक्रारदारांना सदर प्रकरणात 7/12 उतारा, फेरफार नं. 824, 268 दाखल केलेली नाही. सदर विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 15.08.2009 ते 14.08.2010 असून विमाधारकाचे नाव 7/12 उता-यावर पॉलीसी इश्यू केलेल्या तारखेस नोंद केले असणे आवश्यक आहे.
तक्रारदारांची तक्रार दाखल कागदपत्र, गैरअर्जदार 1 व 2 यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री आर.व्ही.जाधव व गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विद्वान वकील श्री संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पती श्री.लक्ष्मण शामराव मुकणे हे शेतकरी असून वाहन अपघातात दिनांक 20.12.2009 रोजी मृत्यू पावले. तक्रारदारांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात योजने अंतर्गत विमा प्रस्ताव गैरअर्जदार यांचेकडे विहीत मूदतीत व आवश्यक कागदपत्रासहीत दाखल केला. अद्याप पर्यंत तक्रारदारांना विमा प्रस्तावा बाबत काहीही माहीती गैरअर्जदार यांनी दिलेली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार 1 कबाल इन्शुरन्सच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव काही कागदपत्रांची त्रुटी असल्यामूळे सदर कागदपत्रांची मागणी केली. तक्रारदारांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामूळे अपूर्ण विमा प्रस्ताव गैरअर्जदार 2 यांचेकडे दिनांक 21.12.2010 रोजी पाठवला. गैरअर्जदार 2 विमा कंपनीने दिनांक 31.12.2010 रोजी प्रस्तावाची फाईल बंद केली.
गैरअर्जदार 2 विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार फेरफार नं. 268 विहीत मूदतीत दाखल न केल्यामूळे प्रस्ताव दिनांक 31.12.2009 रोजी नामंजूर केला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता गैरअर्जदार 1 यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे कागदपत्रांची पूर्तता करण्याकरीता दिनांक 06.12.2010 रोजी पत्र पाठवल्याचे दिसून येते. सदर स्मरण पत्रानूसार तक्रारदारांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे दिसून येते. तक्रारदारांना वरील त्रूटी बाबत गैरअर्जदार यांनी माहिती दिल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन दिसून येत नाही. सदरची योजना शासनाने शेतक-यांकरीता कल्याणकारी योजना राबवलेली आहे. गैरअर्जदार यांनी सदर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तक्रारदारांचा विमा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली काढणे आवश्यक आहे. गैरअर्जदार 2 विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 15.08.2009 ते 14.08.2010 असा असून विमा धारकाचे पॉलीसी इश्यू केलेल्या तारखेस 7/12 उता-यावर नोंद केले असणे आवश्यक आहे. या कारणास्तव तक्रारदारांनी फेरफार नं. 268 दाखल करणे आवश्यक आहे. तक्रारीतील कागदपत्रे पाहता विमाधारक लक्ष्मण शामराव मूकणे यांचे नावावर शेत जमीन कोणत्या तारखेला 7/12 उता-यावर नोंद केली या बाबतचा खूलासा फेरफार नं.268 नूसार होवू शकतो. सदरील फेरफार नं. 268 गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे प्राप्त न झाल्यामूळे तक्रारदारांचा विमा नामंजूर झाला आहे. तक्रारदारांनी फेरफार नं. 268 सदर प्रकरणात दाखल केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी फेरफार नं.268 गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे दाखल करणे योग्य होईल. तसेच सदर फेरफार नं. 268 प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार 2 विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली करणे उचित होईल. असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- तक्रारदारांना आदेश देण्यात येतो की, गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे फेरफार नंबर 268 मूळप्रत आदेश मिळाल्या पासून 1 महिन्यात दाखल करावा.
- गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांचा फेरफार नंबर 268 प्राप्त झाल्यानंतर तिचा विमा प्रस्ताव 1 महिन्यात गुणवत्तेवर निकाली काढावा.
- खर्चा बाबत आदेश नाही