(घोषित दि. 29.12.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तो शेतकरी असुन, दिनांक 13.02.2008 रोजी तो मित्राच्या गच्चीवर असतांना मित्राच्या घरावरुन जाणा-या विजेच्या तारांचा त्यास स्पर्श झाल्यामुळे तो जवळ जवळ 54 टक्के भाजला आणि त्यास अपगत्व आले. त्याचा सदर अपघात झाला त्यावेळी महाराष्ट्र शासनाने सर्व शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे शेतकरी अपघात विमा पॉलीसी अंतर्गत विमा उतरविलेला होता. सदर पॉलीसीच्या कालावधीमध्येच अपघात झाल्यामुळे त्याने गैरअर्जदार रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. परंतू गैरअर्जदार विमा कंपनीने त्याचा विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवून त्यास त्रुटीची सेवा दिली. म्हणून त्याने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदार विमा कंपनीकडून विमा रक्कम रुपये 50,000/- द्यावेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचा विमा दावा त्यांच्याकडे दिनांक 22.05.2008 रोजी प्राप्त झाला होता. परंतू विमा दाव्यासोबत आवश्यक कागदपत्र नव्हते. म्हणून तक्रारदाराकडे वारंवार पत्र देवून कागदपत्रांची मागणी करण्यात आली. तरी देखील तक्रारदारानी एम.एस.ई.बी. चा अहवाल व अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखल केले नाही. म्हणून तक्रारदाराचा अपूर्ण असलेला विमा दावा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविण्यात आला व अद्याप विमा कंपनीने त्याबाबत निर्णय कळविलेला नाही.
गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने त्यास अपघातामध्ये अपंगत्व आल्याचे सिध्द् करण्यासाठी आवश्यक कागदपत्र दिलेले नाहीत. तक्रारदाराने परिपूर्ण विमा दावा दाखल केलेला नव्हता. तक्रारदाराने त्यास अपंगत्व आल्याबाबतचे प्रमाणपत्र व एम.एस.ई.बी. चा पंचनामा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्याचा विमा दावा निकाली काढलेला नसून तक्रारदाराला त्रुटीची सेवा दिलेली नसल्यामुळे हि तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार विमा कंपनीने केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात
मुद्दे उत्तर
1.गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही
2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.आर.व्ही.जाधव आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड.पी.एम.परिहार यांनी युक्तीवाद केला.
तक्रारदाराने त्याचा दिनांक 13.02.2008 रोजी अपघात झाल्याचे दर्शविण्यासाठी त्याने पोलीसांना दिनांक 18.02.2008 रोजी दिलेला जवाब तसेच घटनास्थळ पंचनामा व हॉस्पीटलचे डिस्चार्ज कार्ड दाखल केले आहे. परंतू तक्रारदाराने त्यास सदर अपघातामध्ये अपंगत्व आल्याचे सिध्द् करण्यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदारास विजेचा धक्का लागल्याने तो 54 टक्के जळाला होता. ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्या डिस्चार्ज कार्डमध्ये नमूद केलेली आहे. परंतू तक्रारदार 54 टक्के जळाला होता म्हणून त्यास अपंगत्व आले होते असा अर्थ काढला जावू शकत नाही. तक्रारदारास अपंगत्व आल्याबाबत त्याने स्वतंत्र प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक होते. परंतू त्याने तसे प्रमाणपत्र दाखल केलेले नाही. म्हणून तक्रारदाराला शेतकरी अपघात विमा योजनेनुसार लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारास विमा रक्कम न देवून कोणतीही चूक केलेली नाही व त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.