(घोषित दि. 24.01.2012 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचा मुलगा राजेंद्र तेलूरे यांचे दिनांक 11.03.2010 रोजी वाहन अपघातामध्ये निधन झाले. तिचा मुलगा राजेंद्र हा शेतकरी होता आणि त्याचे निधन झाले त्यावेळी महाराष्ट्र शासनाने शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 2 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे अपघात विमा पॉलीसी अंतर्गत विमा उतरविलेला होता. म्हणून तिने गैरअर्जदारांकडे विमा दावा दाखल केला. परंतू गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 12.08.2010 रोजी तिचा विमा दावा फेटाळला. विमा कंपनीने विमा दावा फेटाळण्याबाबत असे कारण दिले की, पॉलीसी सुरु झाली त्यावेळी तिच्या मुलाचे नाव 7/12 मध्ये नव्हते. विमा कंपनीने विमा दावा फेटाळण्याबाबत दिलेले कारण चुकीचे असुन विमा कंपनीने त्रुटीची सेवा दिली म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिला विमा कंपनीकडून रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई देण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचा विमा दावा त्यांचेकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तो युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला होता. परंतू विमा कंपनीने तो विमा दावा फेटाळलेला आहे. सदर निर्णयाशी त्यांचा काहीही संबंध नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार क्रमांक 1 ने केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचा मुलगा मयत राजेंद्र तेलूरे यांच्या अपघाती मृत्यूबाबत तक्रारदाराने दाखल केलेला विमा दावा त्यांच्याकडे प्राप्त झाला होता. तक्रारदाराच्या विमा दाव्याबाबत चौकशी केली असता शेतकरी अपघात विमा पॉलीसी ज्यावेळी सुरु झाली त्यावेळी तिच्या मुलाचे नाव 7/12 मध्ये नसल्याचे दिसुन आले. पॉलीसी मधील अटीनुसार शेतकरी अपघात विमा पॉलीसीचे संरक्षण केवळ त्याच शेतक-यांना लागू आहे ज्यांचे नाव पॉलीसी सुरु झाली त्या दिवशी 7/12 वर नमूद होते. शेतकरी अपघात विमा पॉलीसी दिनांक 15.08.2009 रोजी सुरु झाली आणि तक्रारदाराच्या मुलाचे नाव 7/12 मध्ये दिनांक 18.12.2009 रोजी नमूद करण्यात आलेले होते. त्यामुळे तक्रारदाराच्या मुलाला शेतकरी अपघात विमा पॉलीसीचे संरक्षण लागू नव्हते. म्हणून तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्यात आला. तक्रारदाराला त्रुटीची सेवा दिलेली नसुन ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात
मुद्दे उत्तर
1.गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही
2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.आर.व्ही.जाधव आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड.संदीप देशपांडे यांनी युक्तीवाद केला.
तक्रारदाराचा मुलगा राजेंद्र याचे दिनांक 11.03.2010 रोजी अपघाती निधन झाल्यानंतर तक्रारदाराने शेतकरी अपघात विमा पॉलीसी मधील तरतूदी नुसार विमा रक्कम मिळावी म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे दाखल केलेला विमा दावा विमा कंपनीने फेटाळला. तक्रारदाराच्या मुलाचे नाव पॉलीसी सुरु झाली त्यावेळी 7/12 नव्हते, म्हणून त्यास पॉलीसीचे संरक्षण लागू नव्हते, असे कारण विमा कंपनीने विमा दावा फेटाळण्याबाबत दिलेले आहे.
विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा पॉलीसी आणि पॉलीसीतील अटी व शर्ती दाखल केलेल्या आहेत. सदर पॉलीसी मधील अट क्रमांक 2 मध्ये ज्या शेतक-याचे नाव पॉलीसी सुरु झाली, त्यादिवशी 7/12 मध्ये नमूद केलेले आहे. तेच सदर पॉलीसीचे संरक्षण मिळण्यास पात्र आहेत असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. शेतकरी अपघात विमा पॉलीसी दिनांक 15.08.2009 रोजी सुरु झालेली असुन तक्रारदाराच्या मुलाचे नाव 7/12 मध्ये पॉलीसी सुरु झाल्यानंतर म्हणजे दिनांक 18.12.2009 रोजी नोंदविण्यात आलेले आहे. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्याबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे आणि विमा कंपनीने तक्रारदाराला कोणत्याही प्रकारे त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.