निकालपत्र
(द्वारा- मा.अध्यक्षा - सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार क्र.१ यांचे पती आणि तक्रारदार क्र.२ यांचा मुलगा, मयत अशोक हनुमंत पाटील यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने त्यांच्या विमा पॉलिसीची रक्कम तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रक्कम आणि तक्रार अर्जाचा खर्च सामनेवाले विमा कंपनीकडून मिळावा म्हणून तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केला आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, सामनेवाले क्र.१ हे विभागीय मुख्य कार्यालयाचे व्यवस्थापक आहेत व सामनेवाले क्र.२ हे दोंडाईचा शाखेचे शाखाधिकारी आहेत. अशोक हमुनंत पाटील यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून “जिवन सरल” विमा पॉलिसी क्र.९६४३५६०००० दि ०९-०१-२००९ रोजी रक्कम रु.१,२५,०००/- ची घेतली असून पॉलिसीचा वार्षिक हप्ता रु.३,०३२/- सामनेवाले क्र.२ कडे भरला आहे. पॉलिसी रक्कम रु.१,४०,८००/- कराराप्रमाणे ठरले असून पॉलिसीस नॉमिनी म्हणून कु.मिताली हिस नेमले आहे. दि.३०-०३-२००९ रोजी पॉलिसीचा वार्षिक हप्ता रक्कम रु.३,०३२/- भरला आहे. पॉलिसीची मुदत २० वर्षाची आहे व पुढील हप्ता दि.०९-०१-२०१० रोजी भरावयाचा होता. सदर हप्ता भरण्याचा ग्रेस पिरीयड दि.०९-०२-२०१० पर्यंत असल्याचे सामनेवालेंनी विमाधारकास कळविले होते.
सदर हप्ता ग्रेस पिरीयड पर्यंत भरता आला नाही व दि.२१-०२-२०१० रोजी विमाधारकास नैसर्गिक मरण आले. मयताचा पॉलिसी क्लेम मिळावा म्हणून तक्रारदारांनी दि.२६-०३-२०१० रोजी सामनेवालेंना लेखी कळविले, परंतु पॉलिसीचा हप्ता भरणा केला नाही त्यामुळे पॉलिसी बंद स्थितीत आहे असे सामनेवाले यांनी तक्रारदारास कळविले. तक्रारदारांनी दि.२९-१०-२०१० रोजी सामनेवालेंना वकिलामार्फत नोटीस देऊन संबंधीत पॉलिसी दि.०५-०३-२०१० पर्यंत जिवंत स्थितीत असल्याचा पुरावा देऊन कराराप्रमाणे रक्कम व फायदे मिळण्याचे कळविले. परंतु सामनेवाले यांनी बेकायदेशीरपणे विमा पॉलिसीतील रक्कम व फायदे देण्याचे टाळले.
विमेधारकास काही कारणाने मृत्यू आल्यास, पॉलिसीप्रमाणे रक्कम रु.१,२५,०००/- व इतर फायदे अदा करण्याची सामनेवालेंची जबाबदारी आहे. मात्र सामनेवालेंनी दि.१३-११-२०१० रोजी खोटे उत्तर पाठवून मयत विमेधारकाच्या क्लेमची रक्कम दिलेली नाही. तसेच रक्कम न देता तक्रारदारांना मानसिक, शारीरिक त्रास दिला आहे. म्हणून विमा पॉलिसीची रक्कम रु.१,२५,०००/- तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रक्कम रु.१०,०००/- आणि तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.५,०००/- सामनेवाले विमा कंपनीकडून मिळावेत अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे.
(३) तक्रारदार क्र.१ यांनी त्यांच्या कथनाच्या पुष्टयर्थ नि.नं.५ वर शपथपत्र, नि.नं.१८ वर पुराव्याचे शपथपत्र, नि.नं.२० वर लेखी युक्तिवाद तसेच नि.नं.४ वरील दस्तऐवज यादीसोबत एकूण ६ कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. यात नोटीसची प्रत, पोचपावती, पोलिसांचा स्टेटस रिपोर्ट, सामनेवाले यांचे पत्र या कागदपत्रांचा समावेश आहे.
(४) सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्यांचा संयुक्त खुलासा नि.नं.८ वर दाखल केला आहे. त्यात त्यांनी सदर अर्ज व त्यातील म्हणणे, मागणे नाकारले आहे. सामनेवाले यांचे असे कथन आहे की, तक्रारदार क्र.१ चे पती कै.अशोक हनमंत पाटील यांनी त्यांचे नांवे सामनेवाले यांचेकडून पॉलिसी नं.९६४३५६००० हि टेबल नं.१६५-२१ दि.०९-०१-२००९ रोजी रु.१,२५,०००/- ची तक्रारदार क्र.१ यांचे नांव नॉमिनी लावून घेतली होती. पॉलिसीची सुरुवात दि.०९-०१-२००९ पासून झाली होती.
सदर पॉलिसीचा पुढील हप्ता दि.०९-०१-२०१० रोजी देय होता, तो भरण्यात आलेला नाही. हप्ता भरण्यासाठीचा वाढीव कालावधी (ग्रेस पिरीयड) हा देखील दि.०९-०२-२०१० रोजी संपला आहे, या काळातही पॉलिसीचा हप्ता भरण्यात आलेला नाही. पॉलिसीधारक दि.२१-०२-२०१० रोजी देवज्ञा झाले. पॉलिसीच्या शर्ती, अटी व नियमानुसार देय हप्ता मुदतीत तसेच वाढीव मुदतीत न भरल्यामुळे सदर पॉलिसी बंद (लॅप्स) आहे. अशा परिस्थितीत पॉलिसीत नमूद रक्कम किंवा फायदे हे पॉलिसीच्या शर्ती व अटीप्रमाणे तक्रारदारांना मिळू शकत नाहीत. याबाबत सविस्तर कारणांसह लेखी पत्र तक्रारदारांना दि.१३-११-२०१० रोजी दिलेले आहे. विमा पॉलिसीचा हप्ता न भरण्याच्या चुकीसाठी सामनेवाले यांना जबाबदार धरता येणार नाही, तसेच पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या बाहेर जावून सामनेवालेंना काम करता येणार नाही. अशा परिस्थितीत सामनेवाले हे कोणतीही रक्कम सदर पॉलिसी अंतर्गत देय लागत नाहीत. म्हणून तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा अशी सामनेवाले यांनी विनंती केली आहे.
(५) सामनेवाले यांनी त्यांच्या कथनाच्या पुष्टयर्थ नि.नं.९ वर शपथपत्र तसेच नि.नं.११ सोबत सामनेवाले यांच्या दि.०३-०९-२०१२ रोजीच्या पत्राची छायांकीत प्रत दाखल केली आहे.
(६) तक्रारदारांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र, दाखल कागदपत्रे आणि लेखी युक्तिवाद पाहता, तसेच सामनेवाले यांचा खुलासा व शपथपत्र पाहता व त्यांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत
आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय ? | : नाही |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – मयत अशोक हनुमंत पाटील यांनी सामनेवाले यांचेकडे विमा पॉलिसी घेतली आहे, ही बाब उभयपक्षास मान्य असून याबाबत कोणताही वाद नाही. तसेच तक्रारदार क्र.१ या मयत विमेधारकाच्या कायदेशीर वारस पत्नी व तक्रारदार क्र.२ या मयत विमेधारकाच्या कायदेशीर वारस आई आहेत याबाबतही उभयपक्षात कोणताही वाद नाही. त्यामुळे मयताचे कायदेशीर वारसदार म्हणून तक्रारदार हे सामनेवाले यांचे संबंधीत पॉलिसीबाबत “ग्राहक” असल्याचे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ : मयत विमेधारक अशोक हनुमंत पाटील यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून “जिवन सरल” विमा पॉलिसी क्र.९६४३५६०००० दि ०९-०१-२००९ रोजी रक्कम रु.१,२५,०००/- ची घेतली घेतली आहे व पॉलिसीचा प्रथम वार्षिक हप्ता रक्कम रु.३,०३२/- भरला आहे. तथापि पॉलिसीचा पुढील हप्ता दि.०९-०१-२०१० रोजी भरावयाचा असल्याचे आणि सदर हप्ता भरण्याचा ग्रेस पिरीयड दि.०९-०२-२०१० पर्यंत असल्याचे सामनेवालेंनी तक्रारदारास कळविल्याचे सामनेवालेंनी कथन केले आहे आणि तक्रारदारांनीही आपल्या तक्रार अर्जात ते मान्य केले आहे. मात्र सदरचा हप्ता वेळेत अथवा वाढीव वेळेत मयत विमेधारक हे भरु शकले नाहीत हेही तक्रारदारांनी मान्य केले आहे.
असे असतांना दि.२१-०२-२०१० रोजी विमेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर, दि.२६-०३-२०१० रोजी पत्र व दि.२९-१०-२०१० रोजी नोटीस सामनेवालेंना पाठवून तक्रारदारांनी विमा क्लेमची मागणी केली आहे आणि दि.०५-०३-२०१० पर्यंत सदर पॉलिसी जिवंत स्थितीत असल्याचे तक्रारदारांचे कथन आहे.
सामनेवाले यांनी तक्रारदारांची विमा दावा मागणी, सदर पॉलिसी हप्ता न भरल्याचे कारणास्तव बंद स्थितीत असल्याचे कारणाने, नाकारली असून दि.१३-११-२०१० रोजीचे पत्राने तक्रारदारास सविस्तर कळविले आहे. सदरचे पत्र नि.नं.१०/६ वर दाखल आहे. या पत्राचा विचार होता सामनेवाले यांनी, तक्रारदारांची पॉलिसी ही बंद स्थितीत असल्याने देवू शकत नाही हे तक्रारदारांना लेखी कळविलेले आहे. याबाबत आमच्यामते सदर पॉलिसीचा विचार करता, विमेधारकाने सदर पॉलिसी ही दि.०९-०१-२००९ रोजी घेतलेली आहे. त्याचा पुढील हप्ता हा दि.०९-०१-२०१० असा असून, दि.०९-०२-२०१० अशी सदर हप्ता भरण्याची वाढीव मुदत दिलेली आहे. परंतु या कालावधीत विमेधारकाने त्यांचा सदरचा हप्ता भरलेला नाही. याचाच अर्थ दि.०९-०२-२०१० रोजी सदर पॉलिसी ही हप्ता न भरल्याने बंद झाली आहे व त्यानंतर विमेधारकाचे दि.२१-०२-२०१० रोजी निधन झाले आहे. म्हणजेच विमेधारकाचा मृत्यु होण्यापुर्वीच सदर पॉलिसी ही बंद स्थितीत होती, त्यामुळे पॉलिसीच्या अटी-शर्ती प्रमाणे ती देय होत नाही असे स्पष्ट होते. याबाबत सामनेवाले यांनी विमा पॉलिसीचा पुढील हप्ता भरण्याबाबत व वाढीव कालावधी बाबत विमेधारकास लेखी पूर्व सूचना देऊन कळविले आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले यांच्या सेवेत कोणतीही त्रृटी अथवा कमतरता आढळून येत नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी सदर पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार योग्य कारणानेच तक्रारदारांचा विमा दावा नाकारला आहे, असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. “क” : उपरोक्त सर्व विवेचनाचा विचार करता, न्यायाचे दृष्टीने खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.