जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक :46/2011
तक्रार दाखल दिनांक:09/02/2011
तक्रार आदेश दिनांक :12/07/2013
निकाल कालावधी:02वर्षे05महिने03दिवस
श्री.रामचंद्र शाहूराव भोसले
वय 52 वर्षे, धंदा- शेती,
रा.तांदूळवाडी ता.माढा जि.सोलापूर. ......तक्रारदार
विरुध्द
डिव्हीजनल मॅनेजर
बजाज अलाईन्झ जनरल इन्शुरन्स
कंपनी लि., सिटी प्राईड, 2 रा मजला,
ऑफिस नं.4 व 8 सिटी हॉस्पीटल जवळ,
जुना एम्प्लॉयमेंट चौक, 162, रेल्वे लाईन्स, सोलापूर. .....सामनेवाला
गणपुर्ती :- श्री.दिनेश रा.महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारतर्फेअभियोक्ता: श्री.आर.व्ही.पाटील
सामनेवाला तर्फे अभियोक्ता:श्री.जी.एच.कुलकर्णी
निकालपत्र
श्री.दिनेश रा.महाजन, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, कलम 12 प्रमाणे त्याच्या मयत गाईच्या विम्याची रक्कम रु.35,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाने मिळावेत व तक्रारीचा खर्च मिळावा यासाठी दाखल केला आहे.
2. तक्रारदाराचे अर्जातील थोडक्यात कथन असे की, ते शेतकरी असून त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी जर्सी गाय खरेदी केली होती. सामनेवाला ही कंपनी विम्याचा व्यवसाय करते व त्यांचे कडून तक्रारदार यांने त्याच्या गाईची विमा पॉलीसी नं.ओजी-11-2004-5002-00000034 व त्याचा टॅग नं.बीडीएजी आयसीएल 52563 असा होता. सदरचा विमा 35,000/- रुपये किंमतीचा होता.
3. तक्रारदार यांची गाय आजारी पडल्यानंतर तिच्यावर डॉ.सातव यांचेकडून उपचार सुरु असतांना दि.19/10/2010 रोजी मयत झाली, त्याबाबत तक्रारदार याने विमा कंपनीस
(2) 46/2011
फोनव्दारे कळविले. तसेच त्यानंतर गाईचा शव विच्छेदन अहवाल इतर कागदपत्रांसह विम्याची रक्कम मागणीसाठी अर्जासोबत (क्लेम फॉर्म) सामनेवाला विमा कंपनीकडे पाठविले. परंतू दि.17/11/2010 रोजी पत्र पाठवून विमा कंपनीने विम्याची रक्कम देण्यास नकार दिला व त्रुटीयुक्त सेवा दिली. म्हणून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
4. सामनेवाला विमा कंपनी यांनी तक्रारदार यांच्याकडे जर्सी गाय होती व तीचा सामनेवालांनी 35,000/- रुपयाचा विमा उतरविला होता, व दि.19/10/2010 रोजी सदरची गाय मयत झाली, त्याबाबत तक्रारदाराने विम्याची रक्कम मागितली होती व ती नामंजूर करण्यात आली याबाबत विवाद उपस्थित केलेले नाहीत. परंतू सामनेवाला यांचे म्हणण्याप्रामणे विमा पॉलीसी काढल्यापासून 15 दिवसांचे आत सदरची गाय आजारी पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे व विमा पॉलीसीच्या अटी शर्तीनुसार अशा प्रकारे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम देता येत नाही. म्हणून तक्रारदाराचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता व त्यामुळे सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली नाही. म्हणून सदरची तक्रार रद्द करावी अशी विनंती केलेली आहे.
5. तक्रारदाराचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, सामनेवाला यांची कैफियत, सामनेवाला कंपनीच्या अधिका-याचे अॅफीडेव्हीट व उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता त्याचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाला यांनी त्रुटीयुक्त सेवा दिली आहे का ? नाही
2. तक्रारदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे का ? नाही
3. काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे
निष्कर्ष
6. मुद्दा क्र. 1 व 2:- सामनेवाला विमा कंपनी यांनी तक्रारदार यांच्याकडे जर्सी गाय होती व तीचा सामनेवालांनी 35,000/- रुपयाचा विमा उतरविला होता, व दि.19/10/2010 रोजी सदरची गाय मयत झाली, त्याबाबत तक्रारदाराने विम्याची रक्कम मागितली होती व ती नामंजूर करण्यात आली याबाबत विवाद उपस्थित केलेले नाहीत. परंतू सामनेवाला यांचे म्हणण्याप्रमाणे विमा पॉलीसी काढल्यापासून 15 दिवसांचे आत सदरची गाय आजारी पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे व विमा पॉलीसीच्या अटी शर्तीनुसार अशा प्रकारे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम देता येत नाही.
(3) 46/2011
7. सदरच्या गाईच्या विमा पॉलीसीचा कालावधी दि.04/10/2010 रात्री 12 ते दि.03/10/2011 मध्यरात्री पर्यंतचा होता. तक्रारदाराची गाय दि.19/10/2010 रोजी आजारी पडली व त्वरीत त्यांनी पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.सातव यांच्याकडून गाईवर उपचार सुरु केले. परंतू त्याच दिवशी गाय मयत झाली. डॉ.सातव यांनी दिलेल्या दाखल्यात गाईचे मृत्यूचे कारण Babesiosis या आजारामुळे झाल्याचा उल्लेख केला आहे. वैद्यकिय शब्दकोषाप्रमाणे सदरचा आजार विशिष्ट प्रकारचा किडा चावल्यामुळे होतो. विमा पॉलीसीतील परिच्छेद 3.11 नुसार विमा पॉलीसी काढल्यानंतर 15 दिवसांचे आत एखादया आजारामुळे पशूचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम देता येत नाही. अभिलेखावर दाखल केलेला वैद्यकिय अहवाल व इतर कागदपत्र व विमा पॉलीसी यांचे अवलोकन केले असता तक्रारदाराच्या गाईस विमा पॉलीसी घेतल्यानंतर 15 दिवसांचे आत आजारी होऊन तिचा मृत्यू झाला. त्यामुळे विमा कंपनीने तक्रारदाराची मागणी नामंजूर केली आहे व ती कायदेशीर आहे. सामनेवाला विमा कंपनीने सेवा देतांना त्रुटीची सेवा दिलेली नाही. विमा काढल्यानंतर 15 दिवसाचे आत तक्रारदाराची गाय आजारी पडून मृत्यू पावली. त्यामुळे तक्रारदारास नुकसान भरपाई मिळू शकत नाही. सबब सदरची तक्रार नामंजूर करावी लागत आहे. सबब मुद्दा क्र.1 व 2 ची उत्तरे नकारार्थी देऊन आम्ही पुढील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. उभयपक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
3. उभय पक्षकारांना या निकालाची साक्षांकिंत प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री.दिनेश रा.महाजन)
सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
--0DPSO1207130----