निकालपत्र :- (दि.10/08/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला ही विमा व्यवसाय करणारी वित्तीय संस्था असून यातील तक्रारदाराचे वडील मयत रमेश आप्पासो शिंदे हे टू व्हिलर पॅकेज पॉलीसीचे सामनेवालांचे पॉलीसीधारक ग्राहक होते. तक्रारदार क्र.1 व 2 हे नमुद पॉलीसीचे बेनिफिशरी आहेत. ब) तक्रारदारचे मयत वडीलांनी स्वत:च्या मालकीच्या बजाज प्लॅटीना मोटर सायकल क्र.MH-09-AZ-8774 चा पीए फॉर ओनर कम ड्रायव्हरचा रक्कम रु.1,00,000/- चा विमा उतरविला होता. त्याचा पॉलीसी क्र.जी-08-2005-1802-0001380 असून कालावधी दि.31/10/2007 ते 30/10/2008 असा होता. क) दि.05/04/2007 रोजी पॉलीसीधारक रमेश शिंदे यांचे पत्नी सौ.अरुणा सोबत नमुद वाहनावरुन कोल्हापूर ते ढेबेवाडी असा प्रवास करत असताना वींग ता.कराड जि.सातारा या गावानजीक समोरुन भरधाव वेगाने येणा-या ट्रकने धडक दिल्याने नमुद अपघातात सदर पती-पत्नी मयत झाले. तक्रारदार ही त्यांची मुले असून त्यांनी सामनेवालांकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन रक्कम रु.1,00,000/-ची क्लेम मागणी केली असता दि.19/11/2008 रोजी मयत रमेश शिंदे यांचे ड्रायव्हींग लायसन्स हजर केले नसलेने क्लेम देता येणार नाही असे खोटे व चुकीचे कारण देऊन तक्रारदारास न्याययोग्य पारदर्शी क्लेम नाकारला आहे. वास्तविक मयत रमेश शिंदे यांचेकडे नेहमी लायसन्स असायचे ते अपघातावेळीही होते. मात्र सदर अपघातात गहाळ झाले ते तक्रारदारांना मिळालेले नाही. आर.टी.ओ. ऑफिसकडे लायसन्स मागणी केली. मात्र रेकॉर्ड उपलब्ध झाले नाही. प्रस्तुतची पॉलीसी ही लायसन्स बघुनच उतरविलेली आहे. ससबब सामनेवाला यांनी क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेमुळे प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल करणे भाग पडले. ड) सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करावी व तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/-दि.05/04/2007 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्के व्याज,मानसिक त्रासापोटी रु.15,000/-, तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000 /- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत पॉलीसी, क्लेम नाकारलेचे पत्र, खबरी जबाब, स्पॉट पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. (4) सामनेवालांनी 'नो से' चा हुकूम रद्द व्हावा म्हणून दिलेला अर्ज दि.03/03/2010 रोजी मंजूर होऊन सामनेवाला यांचे लेखी म्हणणे दाखल करुन घेणेस परवानगी दिली. (5) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार- अ) तक्रारदाराची तक्रार मान्य केलेला मजकूर वगळता परिच्छेद निहाय नाकारली आहे. सामनेवाला आपल्या म्हणणेत पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराच्या तक्रार अर्जातील कलम 2 बाबत बजाज प्लॅटीना वाहन क्र.MH-09-AZ-8774 चा पॉलीसी क्र.जी-08-2001-1802-0001380 असून कालावधी दि.31/10/2007चे 15.58 पासून ते 30/10/2008च्या मध्यरात्री पर्यंत असा आहे. मात्र सामनेवालांची जबाबदारी ही नमुद पॉलीसीच्या अटी व शर्ती एक्सेप्शन व अनेक्श्चरला अधीन राहून असेल. कलम 3 मधील मजकूर तक्रारदाराने क्लेम दाखल करुन मयत रमेश आप्पासो शिंदे यांचा मृत्यू दाव्याची मागणी केली होती. मात्र दावा नाकारले तारखेपासून ते आजपर्यंत त्यांनी मयत शिंदे यांचे लायसन्स हजर केलेले नाही. सबब सामनेवालांनी योग्य कारणास्तव दावा नाकारला आहे. सबब कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. ब) सामनेवाला पुढे असे सांगतात की, व्यक्तीगत अपघात विमा दावा ओनर ड्रायव्हरबाबत नमुद पॉलीसीच्या अट क्र.8 नुसार तसेच विमा पॉलीसीचा कलम 3(1) नुसार अपघातावेळी ड्रायव्हर ओनरकडे सेंट्रल मोटर व्हेईकल अॅक्ट1989आर-3नुसार वैध चालक पारवाना असणे आवश्यक आहे. सबब मयत शिंदे यांचेकडे अपघातावेळी वैध चालक परवाना असलेचेसिध्द करणेच जबाबदारी तक्रारदारावर येते. दि.04/09/2008 रोजी RPADने पत्र पाठवून परवान्याची मागणी केलेली होती. सदर कागदपत्राची पूर्तता तक्रारदाराने केलेली नसलेने सामनेवालांनी दि.19/11/2008 रोजी क्लेम नाकारला आहे व ते योग्य व बरोबर आहे. क) सबब पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तसेच मोटर वाहन कायदयाच्या तरतुदीप्रमाणे मयत विमाधारक रमेश शिंदे यांचा वैध परवाना नसलेने व मागणी करुन तो न दिलेने तक्रारदाराचा विमा दावा नाकारला आहे. सबब सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी ठेवलेली नसलेमुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (6) सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेसोबत शपथपत्राबरोबरच इन्शुरन्स पॉलीसीपेपर, क्लेम फॉर्म, सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.04/09/2008 व दि.19/11/2008 रोजी पाठविलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (7) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षाच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2) तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? --- होय. 3) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदार क्र. 1 व 2 चे वडील मयत रमेश आप्पासो शिंदे यांचे नांवे सामनेवालांकडे विमा उतरविलेला होता हे सामनेवाला यांनी मान्य केले आहे. तक्रारदाराने तसेच सामनेवालांनी दाखल केलेल्या पॉलीसीच्या सत्यप्रतीवरुन नमुद विमा पॉलीसी क्र.0जी-08-2005-1802-00001390 असून कालावधी दि.31/10/2007 ची वेळ 15.58 पासून ते 30/120/2008 च्या मध्यरात्रीपर्यंत आहे. प्रस्तुत पॉलीसी टू व्हिलर पॅकेज पॉलीसी असून नमुद पॉलीसीतील वाहन हे बजाज ऑटो फायनान्स कोल्हापूर यांचेकडून कर्ज घेऊन खरेदी घेतली आहे. नमुद वाहन क्र.MH-09-AZ-8774 Bajaj-N1OLG AND SARIC PLATINA 100 CC Manufacture year 2007 Chassis No.WF52481 Engine No.F33029 नोंद असून एकूण विमा रक्कम रु.29,055/- आहे. तसेच PA Cover for Owner of Rs.1,00,000/- ची नोंद दिसून येते. तक्रारदाराचे वडीलांचा दि.05/04/2008 रोजी सकाळी11.30 चे सुमारास कराड ढेबेवाडी रोडवर विंग गावचे हद्दीत कराडकडे जाताना ट्रक क्र.MH-11-M-5707 वरील चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता निष्काळजीपणाने व बेदरकारपणे गाडी चालवून समोरुन कराड बाजूकडून येणारे मोटर सायकल क्र.MH-09-AZ-8774 यास जोरदार धडकून त्यावरील स्वार रमेश आप्पासो शिंदे व त्यांची पत्नी सौ.अरुणा यांचा जखमी होऊन मृत्यू झाला. त्याबाबत खबरी जबाब, जागेचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा इत्यादीवरुन स्पष्ट होते. तक्रारदाराने योग्य त्या कागदपत्रांसहीत मृत्यू दावा रक्कमेची मागणी केली असता दि.04/09/2008 रोजी मयत रमेश आप्पासो शिंदे यांच्या लायसेन्सची सत्यप्रतीची मागणी सामनेवालांनी तक्रारदारास पत्र पाठवून केली होती. मात्र सदर लायसन्सची प्रत तक्रारदाराने न पाठवल्याने सामनेवालांनी नमुद टू व्हिलर पॅकेज पॉलीसी कलम III मधील Clause I(c) प्रमाणे तसेच क्रेंद्रीय मोटर अपघात कायदा नियम प्रमाणे अपघातावेळी मयत रमेश शिंदे यांचेकडे वैध चालक परवाना नव्हता व मागणी करुनही त्याची सत्यप्रत तक्रारदाराने पाठविलेली नाही या कारणास्तव मृत्यू दावा नाकारला आहे याचा विचार करता पॉलीसीवर ड्रायव्हर या शिर्षाखाली वरील अट नमुद केलेली आहे. याचा विचार करता तक्रारदाराचे वडीलांनी नमुद वाहन हे कर्जप्रकरण करुन खरेदी केले होते. तक्रारदाराने त्यांचे वडील मयत रमेश शिंदे यांचेकडे वैध लायसन्स होते. मात्र अपघातात गहाळ झालेने ते तक्रारदारास मिळालेले नाही त्यासाठी आर.टी.ओ. यांचेकडे मागणी केली होती. मात्र रेकॉर्ड उपलब्ध नाही. त्याबाबत आर.टी.ओ. कडे दि.05206/2008 रोजी लेखी मागणी केली होती. त्यास दि.18/06/2008 रोजी आर.टी.ओ. चे लेखी उत्तर आले की, '' अनुज्ञाप्ती क्रमांक कळवलेस माहिती देणे सोयीचे होईल.'' वरील वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदाराचे विमाधारक वडील व आईही नमुद अपघातात मृत्यूमुखी पडलेले आहेत. नमुद मुले ही तक्रार दाखल करतेवेळी तक्रारदार क्र.1 व 2 यांचे अनुक्रमे वय वर्षे 21 व 19 आहेत. त्यांना त्यांचे वडीलांकडे लायसन्स आहे एवढे माहित आहे मात्र अनुज्ञाप्ती/लायसन्स क्रमांक त्यांना माहिती असलेच असे नाही. मयत रमेश शिंदे यांचे वय 51 दिसून येते. तसेच कर्जप्रकरण करुन वाहन घेतले आहे व पॉलीसी उतरवतेवेळी त्यांचेकडे वैध लायसन्स होते व त्यांचेकडे वैध लायसेन्स असलेची खात्री करुनच सदरची पॉलीसी अदा केलेली आहे. असे तक्रारदाराने शपथेवर प्रतिपादन केले आहे. सबब मयत विमधारक रमेश शिंदे यांचेकडे वैध लायसेन्स होते. मात्र अपघातावेळी ते गहाळ झालेने ते सामनेवाला विमा कंपनीकडे देता आले नाही.अथवा त्यांचा अनुज्ञाप्ती क्रमांक तक्रारदाराकडे नसलेने सदर माहिती आर.टी.ओ. कडून उपलब्ध होऊ शकली नाही. Lex non cogit act impossibilia means The Law does not compel any one to do impossible things सदर तत्वाचा विचार करता तक्रारदाराने प्रस्तुत लायसन्स बाबत कागदपत्रे देणे अशा परिस्थितीत अशक्य आहे. त्या कागदपत्रांची/ लायसेन्सची मागणी सामनेवाला करीत आहे. उपरोक्त परिस्थितीचा व पॉलीसीचा मूळ हेतूचा विचार करता तक्रारदार क्र.1 व 2 ज्यांचे मातृपितृ छत्र अपघातावेळी हरवलेले आहे त्यांनी नमुद लायसन्सचे कागदपत्र उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. अनुज्ञाप्ती नंबर नसलेने त्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. Utmost Good faith चा विचार करता विश्वास हा दोन्ही बाजूंकडे ठेवणे आवश्यक आहे. तसेच General Transaction सर्वसाधारण व्यवहाराचा विचार सामनेवालांनी केलेला नाही. मयत विमाधारकाचे वय 51 होते. जो माणूस कर्ज काढून गाडी घेतो त्याचेकडे लायसन्स नसेल का? व्यावहारीक दृष्टीकोनातून व उदभवलेल्या परिस्थितीचा विचार करता सामनेवालांनी सदर मृत्यू दावा मंजूर करावयास हवा होता. तो न केलेने सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेली आहे. सामनेवाला यांनी उपरोक्त परिस्थितीचा विचार न करता केवळ तांत्रिक बाबींचा आधार घेऊन लायसेन्स नसलेमुळे दावा नाकारलेला आहे. सबब सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- तक्रारदार विमा पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/- दावा नाकारले तारखेपासून व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3 :- आई-वडीलांच्या अपघाती मृत्यूनंतर नमुद तक्रारदार क्र. 1 व2 ही मुले उघडयावर पडलेली आहेत. त्यांच्या आईवडीलांच्या मृत्यूनंतर सदर विमा रक्कमेचा त्यांना आधार होता ती सामनेवालांनी न दिलेने तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे रक्कम रु;1,00,000/-(रु.एक लाख फक्त) मिळणेस पात्र आहेत. सदर रक्कमेवर दि.19/11/2008 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |