(पारीत व्दारा श्री नितीन एम. घरडे, सदस्य)
(पारीत दिनांक– 26 नोव्हेंबर, 2019)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली असून तक्रारीचे थोडक्यात असे आहे की, तक्रारकर्तीचा मुलगा शेतकरी असून त्याची मौजा चंडकापूर, तालुका पावनी, जिल्हा भंडारा येथे भुमापन क्र. 238 ही शेत जमिन आहे व तक्रारकर्तीच्या मुलाचा मुख्य व्यवसाय हा शेती असून कुंटूंबाचे पालन पोषन शेतीवरच अवलबून होते.
02. तक्रारकर्तीने पुढे असे नमूद करते की, तक्रारकर्तीचा मुलगा श्री. राकेश राजु ऊरकुडकर यांचा दिनांक 06/01/2017 रोजी आपल्यचा मित्रासोबत मोटर सायकलवर मागे बसून जात असतानां एका ट्रकने धडक दिल्याने जागेवरच मृत्यु झाला. सदर बाबत पोलीस स्टेशन, पवनी जिल्हा भंडारा येथे दिनांक 06/01/2017 रोजी अपघाती मृत्युची एफ. आय. आर. नोंदविण्यात आली होती.
03. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद करते की, तक्रारकर्तीच्या अविवाहीत मुलाचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा शासनाने उचरविला असल्या करणास्तव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सन 2016-2017 अंतर्गत रुपये 2,00,000/- नुकसान भरपाई मिळण्याकरीता विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनी व विरुध्द पक्ष क्र. 3 तालुका कृषि अधिकारी, पवनी यांचेकडे रितसर अर्ज सादर केला व विरुध्द पक्ष 3 च्या मागणी नुसार संपूर्ण दस्ताऐवज दाखल केले. दिनांक 22/02/2017 नंतर बराच विलंब होवून सुध्दा विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीच्या अपघाती मुलाचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर याबाबत काहीही कळविले नाही. करीता तक्रारकर्तीच्या वकीलांनी दिनांक 28/02/2018 रोजी माहितीच्या अधिाकारा अंतर्गत सदरच्या विमा अर्जाबाबत माहिती विचारली असता, तक्रारकर्तीचा विमा दावा मृतक मुलाकडे वाहन परवाना नव्हता असे कारण दाखवून फेटाळण्यात आला अशी माहिती मिळाली. विरुध्द पक्षाची अशी कृती सेवेत त्रुटी देणारी असल्यामुळे तक्रारकर्तीला अतिशय मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागला. करीता तक्रारकर्तीची तक्रार मंचात दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.
1) विरुध्द पक्ष यांना आदेशीत करावे की, त्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा दाखल दिनांकपासून म्हणजे दिनांक 22/02/2017 पासून रुपये 2,00,000/- द.सा.द.शे 18 टक्के व्याजासह देण्यात आदेश व्हावे.
2) तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासाकरीता 30,000/- व सदर तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- देण्याचे आदेश व्हावे.
04. तक्रारकर्तीच्या तक्रारी अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी हजर होवून पृष्ठ क्र. 59 वर आपले लेखी उत्तर सादर करुन त्यात असे नमुद केले की, तक्रारकर्तीच्या मुलाचा मृत्यु हा दिनांक 06/01/2017 रोजी मोटर अपघातात झाला व श्री. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अपघाती कुंटूंबाला दोन लक्ष रुपये अपघाताबाबत मिळण्याची योजना आहे, परंतु तक्रारकर्तीचा मृतक मुलगा हा मोटर सायकल निष्काळण्जीपणाने चालवित होता व तसेच त्याच्या जवळ मोटर सायकल चालविण्याचा विहित परवाना नव्हता. तक्रारकर्तीने विमा दावा दाखल करतांना विमा दाव्या बरोबर आवश्यक दस्ताऐवज सुध्दा पुरविले नव्हते व तक्रारकर्तीच्या मृतक मुला जवळ वाहन चालविण्याचा विहित परवाना नसल्यामुळे विमा दावा हा पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे नसल्यामुळे फेटाळण्यात आला. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांच्याकडून कोणतीही सेवेत त्रुटी अथवा अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब झालेला नाही, करीता तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यात पात्र आहे.
05. विरुध्द पक्ष क्रं. 3 तालुका कृषि अधिकारी, पवनी जिल्हा भंडारा यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावे पाठविण्याचे काम निशुल्क करते. विरुध्द पक्ष क्रं. 3 यांनी सेवेतील कोणतीही त्रुटी केलेली नाही.
06. सदर प्रकरणांत तक्रारकर्ती हिने तक्रारी बरोबर दस्ताऐवज एकूण 01 ते 08 दाखल केलेले असून त्यात प्रामुख्याने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शासन निर्णय सन 2016-2017, तक्रारकर्तीच्या वकीलांनी माहितीच्या अधिकारात मागविलेली माहिती, विरुध्द पक्षाकडे सादर केलेला विमा दाव्याची प्रत, 7/12 उतारा व इतर शेतीचे कागदपत्रे, एफ. आय. आर. व ईतर पोलीस दस्ताऐवज, शव विच्छेदन अहवाल, मृत्यु प्रमाणपत्र व वयाचा पुरावा इत्यादी दस्ताऐवज प्रकरणांत दाखल केलेले आहे.
07. तक्रारकर्तीची तक्रार, दाखल केलेले दस्तऐवज तसेच विरुध्दपक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीचे लेखी उत्तर इत्यादीचे मंचातर्फे अवलोकन करण्यात आले. युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
01. | तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाची ग्राहक होते काय? | होय |
02. | तक्रारकर्तीला विरुध्द पक्षाने सेवेत त्रुटी दिल्याचे दिसून येते काय? | होय |
03. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
:: कारणे मिमांसा ::
08. मुद्या क्रं. 1 सदर तक्रारीसोबत तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन केले असता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन 2016-2017 या दरम्यान शेतक-यांचा शेतकरी अपघात विमा शासनाने उतरविला होता. तसेच तक्रारकर्तीच्या मुलाचा मृत्यु दिनांक 06/01/2017 रोजी झालेला आहे व तसेच तक्रारकर्तीचा मुलगा हा शेतकरी असून त्याचा मुख्य व्यवसाय शेती होता हे दाखल दस्ताऐवज पृष्ठ क्रं. 28 मधील 7/12 व गाव नमुना यावरुन सिध्द होते. सदरचा विमा दावा हा मृतक राकेश राजु ऊरकुडकर याच्या आईने केलेला आहे. करीता तक्रारकर्ती ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2(i)(d) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत मोडते. करीता मुद्या क्रं. 1 चे उत्तर होकारार्थी नमुद केलेले आहे.
09. मुद्या क्रं. 2 सदर प्रकरणांत तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीत स्पष्टपणे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीचा मृतक मुलगा हा दिनांक 06/01/2017 रोजी आपल्या मित्रासोबत मोटर सायकलवर मागे बसून जात असतानां एका ट्रकने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाला. परंतु विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी आपल्या लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्तीच्या मुला जवळ विहित वाहन परवाना नव्हता. तसेच दिनांक 22/02/2017 रोजी तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रं. 3 यांच्याकडे रितसर विमा दावा दाखल केलेला होता व तो विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांच्याकडे प्राप्त सुध्दा झाला होता. परंतु सदरचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर याबाबत कोणतीही सुचना तक्रारकर्तीला दिली नाही. याउलट तक्रारकर्तीने वकीलामार्फत माहितीच्या अधिकारा खाली सदर बाबत माहिती मागीतली. यावरुन ही बाब सिध्द होते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे तसेच मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, तक्रारकर्तीचा मृतक मुलगा हा त्याच्या मित्रासोबत मोटार सायकलवर मागे बसलेला असतांना त्याचा अपघात झाला. त्यामुळे विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा ज्या मुद्यावर खारीज केला तो मुद्या चूकीचा आहे. कारण तक्रारकर्तीचा मुलगा हा मोटर सायकल चालवित नव्हता. तसेच विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन सेवेत त्रुटी दिल्याची बाब सिध्द होते, त्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर होण्यास पात्र आहे. त्यामुळे तक्रारकर्तीला मानसिक व शारीरीक व आर्थिक त्रासापोटी तसेच तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे, करीता मुद्या क्रं. 2 चे उत्तर होकारार्थी नमुद केलेले आहे.
10. मुद्या क्रं. 3 विरुध्दपक्ष 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) विमा दावा दाखल दिनांक-22/02/2017 पासून द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह तक्रारकर्ती मिळण्यास पात्र आहे तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी कडून तिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-20,000/-(अक्षरी रुपये वीस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीकडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, पवनी, जिल्हा भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
11. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: आदेश ::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष 1 व 2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) विमा दावा दाखल दिनांक-22/02/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-20,000/-(अक्षरी रुपये वीस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावी.
(04) विरुध्दपक्ष -(3) तालुका कृषी अधिकारी, पवनी, जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.