निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदाराने कार क्रमांक एम.एच. 26 व्ही 2340 हुंडाई कंपनीची कार दिनांक 20/07/2009 रोजी खरेदी केलेली आहे. अर्जदाराने सदर कारचा विमा गैरअर्जदार यांच्याकडून ‘खाजगी कार पॅकेज पॉलीसी’ खाली काढला होता. पॉलिसीचा कालावधी हा दिनांक 04/05/2010 च्या दुपारी 3.55 पासून ते दिनांक 03/05/2011 च्या रात्री 11.59 पर्यंत होता. दिनांक 03/05/2011 रोजी दुपारी 1.00 वाजताच्या सुमारास अर्जदाराचा मुलगा नामे आशिष जाजू व त्याचा मित्र योगेश संगानी हे दोघे सदर कार घेवून व्यापाराची वसूली करण्याकामी नरसी, धर्माबाद, उमरी असे करुन नांदेडकडे परत येत असतांना सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास उमरी-मुदखेड रस्त्यावर डोणगांव शिवाराजवळ असतांना अचानक कारचे समोरचे चाक फुटल्याने कार रस्त्याचे खाली खडयात पडून पल्टी झाली व त्यात कारचे नुकसान झाले. सदर घटनास्थळ हे मुदखेड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असल्या कारणाने मुदखेड पोलीसांनी सदर अपघाताचा घटनास्थळ पंचनामा पंचासमक्ष तयार केला व अपघाताची नोंद गुन्हा क्रं. 2/2011 दिनांक 05/05/2011 रोजी केली. दिनांक 03/05/2011 रोजी रात्री 11.00 वाजता कार वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी आणण्यात आली. दिनांक 03/05/2011 रोजी रात्री 9.00 वाजताच्या सुमारास अर्जदाराचा मुलगा आशिष यास डॉ. तुंगेनवार हॉस्पीटल नांदेड येथे उपचारार्थ दाखल केले होते. दिनांक 04/05/2011 रोजी अर्जदाराने सदर अपघाताची माहिती गैरअर्जदारास दिली व त्याप्रमाणे गैरअर्जदाराने त्याची नोंद घेवून अर्जदारास क्लेम फॉर्म दिला. त्यानंतर दिनांक 07/10/2011 ला गैरअर्जदाराने पत्र पाठविल्याची नमूद केलेली नोटीस दिनांक 07/12/2011 रोजी दिली व सर्व कागदपत्रासह मागणी दावा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदाराकडे मागणी दावा दाखल केला. दिनांक 19/09/2012 रोजी गैरअर्जदाराने पत्राद्वारे अर्जदारास कळविले की, अर्जदाराच्या कारचा अपघात हा दिनांक 05/05/2011 रोजी झालेला असल्याचे कागदपत्रावरुन दिसून येते व सदर दिवशी अर्जदाराच्या कारचा विमा संपलेला होता त्यामुळे गैरअर्जदार हा अर्जदाराच्या मागणी पूर्ततेस बांधील नाही व अर्जदाराचा मागणी दावा फेटाळण्यात आल्याचे सांगितले. अर्जदाराने दिनांक 0/11/2012 रोजी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस पाठवली व दाव्याचा पुनर्विचार करण्यात यावा म्हणून विनंती केली. कारण अर्जदाराच्या कारचा अपघात हा दिनांक 03/05/2011 रोजी घडलेला असल्याने सदर अपघात हा विमा कालावधीत घडलेला आहे परंतू गैरअर्जदाराने अर्जदाराची मागणी फेटाळून लावलेली आहे. अर्जदारास सदर वाहन दुरुस्तीकरीता रक्कम रु. 3,49,000/- एवढा खर्च आलेला आहे. गैरअर्जदार यांनी चुकीच्या कारणामुळे अर्जदाराचा मागणी दावा फेटाळलेला असल्याने अर्जदाराने सदर तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांच्याकडून अर्जदाराच्या वाहनाचे अपघातामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 3,07,137/- 12 टक्के व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- इतक्या रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांच्याकडून तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदाराची तक्रार ही वस्तुस्थितीला सोडून ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदी विरुध्द आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेमध्ये कुठलीही त्रुटी दिलेली नाही. कथीत वाहन कार क्रमांक एम.एच. 26 व्ही 2340 हुंडाई ला गैरअर्जदार यांनी जी विमा पॉलिसी दिली आहे त्याचा कालावधी दिनांक 04/05/2010 ते 03/05/2011 असा आहे आणि सदर पॉलीसी रेकॉर्डवर दाखल केलेली आहे. अर्जदाराची कथीत घटना ही त्यांनी विमा कंपनीला दिलेल्या माहितीमध्ये घटना ही दिनांक 04/05/2011 रोजी अशी दाखविलेली आहे, म्हणजेच घटनेच्या दिवशी कथीत वाहन हे प्रतिवादीकडे विमाकृत नव्हते. सदर पॉलिसीही नियम, अटी आणि अपवाद यांना बांधील आहे. सदर पॉलिसीची महत्वाची अट ही आहे की, विमाधारकावरती विमा कंपनीचा UT- MOST GOOD FAITH असतो आणि विमाधारक यांनी सुध्दा स्वच्छ हाताने समोर यावयास पाहिजे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या वाहनाचे किती नुकसान झाले याबद्दल पाहणी करण्याकरिता सर्व्हेअरची नेमणूक केली. सर्व्हेअरने अर्जदाराच्या वाहनाचे नुकसान हे रक्कम रु. 2,24,042/- एवढे झाल्याचे सांगितले. सदर रिपोर्ट हा विमा पॉलिसीतील अटी व नियमांच्या आधिन आहे. अपघात घडला त्या दिवशी त्या वाहनास गैरअर्जदार यांनी विमा संरक्षण दिलेले नसल्याने गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा दावा योग्य कारणामुळे नाकारलेला आहे त्यामुळे अर्जदाराची तक्रार ही नामजूर करावी अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
3. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून कार क्रमांक एम.एच. 26 व्ही 2340 हुंडाई या वाहनाची ‘खाजगी कार पॅकेज पॉलीसी’ घेतलेली असून पॉलिसीचा कालावधी हा दिनांक 04/05/2010 3.55 pm to दिनांक 03/05/2011 11.59 pm असा असल्याचे दाखल पॉलिसीवरुन दिसून येते व ही बाब दोन्ही बाजुस मान्य आहे. अर्जदाराची प्रमुख तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या वाहनाचा अपघात दिनांक 03/05/2011 रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास झालेला आहे व सदर अपघात हा विमा पॉलिसीच्या कालावधीत येत असल्याने वाहनाच्या झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम गैरअर्जदार यांनी देणे बंधनकारक असतांनाही गैरअर्जदार यांनी अपघात झाला त्यादिवशी अर्जदाराच्या वाहनाला विमा संरक्षण दिलेले नव्हते अशा चुकीच्या कारणामुळे अर्जदाराचा विमा दावा नामंजूर केलेला आहे. अर्जदार यांनी वाहनाचा अपघात हा दिनांक 03/05/2011 रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडला यासाठी एफ.आय.आर. दिनांक 05/05/2011 रोजीचा दाखल केलेला आहे. तसेच दिनांक 08/04/2013 रोजी सुजय एंटरप्रायजेस यांनी अर्जदाराचे वाहन दिनांक 03/05/2011 रोजी वर्कशॉपला आणल्याबद्दलचे प्रमाणपत्र तसेच तुंगेनवार हॉस्पीटल, नांदेड यांनी दिनांक 03/05/2011 रोजी 9.00 वाजता अशिष पुरुषोत्तम जाजू यास तपासल्याबद्दलचे प्रमाणपत्र दिलेले असल्याबद्दलची कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदाराने दाखल केलेल्या एफ.आय.आर. चे अवलोकन केले असता सदर एफ.आय. आर. मध्ये घटनास्थळी खबर देणारे हजर असून त्यांनी कळविले की, मी दिनांक 03/05/2010 रोजी दुपारी 1.00 वाजताच्या दरम्यान मी व माझा मित्र योगेश माझे कारमध्ये बसून व्यापारी वसुलीसाठी नरसी, धर्माबाद, उमरी असे सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास डोणगांव शिवारात आलो असता अचानक गाडीच्या समोरचा टायर बस्ट झाल्याने कार रस्त्याच्या खाली खडयात पल्टी होवून अपघात झाला. सदर अपघातात मी व माझा मित्र जखमी झालो नाही मात्र आमची हुंडाई कार पल्टी झाली असे नमूद केलेले आहे. अर्जदाराने सदर एफ.आय.आर.ची प्रमाणीत प्रत दाखल केलेली नाही तसेच दिनांक 08/04/2013 रोजी सुजया एन्टरप्रायजेस यांनी वाहन दिनांक 03/05/2011 रोजी 11.00 वाजता वर्कशॉपमध्ये आणण्यात आले असे प्रमाणपत्र दिलेले आहे परंतू सदर प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता दिनांक 03/05/2011 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता अपघात झालेला आहे व 11.00 वाजता वाहन दुरुस्तीसाठी कसे आणण्यात आले याचा अर्थबोध होत नाही. यावरुन अर्जदाराच्या वाहनाचा अपघात हा दिनांक 03/05/2011 रोजी झालेला असल्याचे निष्पन्न होत नाही. अर्जदाराने अपघाताच्या वेळी वाहनामध्ये प्रवास करीत असलेले योगेश व आशिष जाजू यांचे शपथपत्रही मंचासमोर दाखल केलेले नाही. याउलट गैरअर्जदार यांनी पोलीस स्टेशन मुदखेड जि. नांदेड यांचे मोटार अपघाताची माहिती दर्शविणा-या रजिस्टरची प्रमाणीत प्रत मंचासमोर दाखल केलेली आहे. सदर रजिस्टरच्या प्रमाणीत प्रतीचे अवलोकन केले असता त्यामध्ये अपघात तारीख व वेळ या कॉलममध्ये 2/2011 व 05/05/2011 असे नमूद केलेले आहे. यावरुन अर्जदाराच्या वाहनाचा अपघात हा दिनांक 05/05/2011 रोजी झालेला असून एफ.आय.आर. नंबर हा 2/2011 असल्याचे दिसून येते. अर्जदाराने दाखल केलेल्या एफ.आय.आर. वरुन क्रमांक हा 2/2011 असल्याचे दिसते. अर्जदाराने एफ.आय.आर.ची प्रमाणीत प्रत दाखल केलेली नसल्याने मंच गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या मोटार अपघाताची माहिती दाखविणा-या रजिस्टरचा आधार घेवून अर्जदाराच्या वाहनाचा अपघात हा दिनांक 05/05/2011 रोजी झालेला असल्याचा निष्कर्ष काढत आहे त्यामुळे अर्जदाराचा अपघात हा पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर झालेला असल्याने गैरअर्जदार यांनी योग्यरित्या अर्जदाराचा दावा नामंजूर केलेला असल्याचे स्पष्ट होते.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.