(घोषित दि. 29.07.2011 व्दारा सौ.माधूरी विश्वरुपे, सदस्या) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की, तक्रारदाराने दिनांक 21.05.2010 रोजी गैरअर्जदार 2 यांच्याकडे मुलाच्या लग्नासाठी औरंगाबाद येथे जाणे व तेथून परत येणे यासाठी बसची मागणी केली होती. गैरअर्जदार 2 यांच्या सुचनेप्रमाणे पावती क्रमांक 090720 नुसार रुपये 8,000/- भरणा केले. तेव्हा साधारण 6,000/- एवढा खर्च लागेल व उर्वरीत रक्कम एक महिन्याचे कलावधीनंतर परत मिळेल असे सांगितले. परंतू सदरचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द झाल्यामुळे दंड स्वरुपात रक्कम रुपये 500/- पावती क्रमांक 024567 नुसार भरणा केले. त्यानंतर तक्रारदाराने बस दिनांक 27.06.2010 व 28.06.2010 रोजी मिळावी म्हणून गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 01.06.2010 रोजी विनंती अर्ज केला. तक्रारदारास बस दिनांक 27.06.2010 रोजी पुरविण्यात येणार असल्यामुळे तक्रारदाराने पावती क्रमांक 090720 नुसार भरणा केलेली रक्कम रुपये 8,000/- परत घेतली नाही. तक्रारदाराने आरक्षित केलेली बस क्रमांक 8571 दिनांक 27.06.2010 रोजी औरंगाबाद येथे कार्यालयात लग्नासाठी कुटूंबियांना घेवून गेले. दिनांक 28.06.2010 रोजी बस क्रमाक 6368 मध्ये कुटूंबियांना जालना येथे नेऊन सोडले. सदरची बस क्रमांक 8571 तक्रारदाराकडे मुक्कामी ठेवली नव्हती. त्यानंतर तक्रारदाराने दिनांक 02.10.2010 रोजी अतिरिक्त रक्कम वापस द्यावी म्हणून अर्ज केला. दीड महिन्यानंतर सदर अर्जास गैरअर्जदार यांनी उत्तर पाठवून तक्रारदाराकडे रक्कम रुपये 3474/- बाकी असल्याचे सांगितले. गैरअर्जदार यांच्या दोन्ही बसच्या लॉकसीटचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांनी सदर बसचा वापर केलेला असूनही तक्रारदारास आकर लावलेला आहे. अशा प्रकारे जास्त रकमेची मागणी करुन गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी केल्याबाबत तक्रारदाराची तक्रार आहे. गैरअर्जदार 1 व 2 यांनी सदर प्रकरणात दिनांक 25.03.2011 रोजी लेखी म्हणणे दाखल केले आहे. गैरअर्जदार 1 व 2 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदाराने रक्कम रुपये 2,000/- भरणा करुन दिनांक 21.05.2010 रोजी मुलाच्या लग्नाकरीता बस मिळावी म्हणून नोंदणी केली होती. परंतू बसच्या भाडयापोटी रक्कम रुपये 6,000/- खर्च येईल असे सांगितले नव्हते. तक्रारदाराने सदर बसगाडी देण्याबाबतच्या सर्व अटी व शर्ती लेखी स्वरुपात मान्य केल्या आहेत. तक्रारदाराने दिनांक 14.06.2010 रोजी रक्कम रुपये 500/- सेवा शुल्क भरुन गैरअर्जदार यांचेकडे मुलाच्या लग्नासाठी दिनांक 27.06.2010 रोजी जालना येथून औरंगाबाद व जालना येथे परत येण्यासाठी बस ठरविली. गैरअर्जदार यांच्या रोजनाम्यातील नोंदीनुसार गैरअर्जदार यांची बस तक्रारदार 17.00 वाजता घेऊन गेले व दुसरे दिवशी दिनांक 28.06.2010 रोजी बस 12.45 वाजता तक्रारदाराकडे औरंगाबाद येथे पोहचली. परंतू बस जालना येथे लॉकशिट प्रमाणे 21.45 वाजता पोहचली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियमाप्रमाणे प्रासंगिक कराराच्या बस गाडयांचा करार सदर बस आगारातून निघत असलेल्या वेळेपासून सुरु होऊन सदर बस परत आगारात पोहोचण्याच्या वेळेपर्यंत असतो. तक्रारदाराकडे सदर बस 28 तास 45 मिनीट होती असे गृहीत धरण्यात येते. परंतू महामंडळाच्या नियामानुसार बसचे प्रतिदिन भाडे 5,400/- असल्यामुळे दोन दिवसाचे भाडे 10,800/- होतात. गैरअर्जदार यांची बस तक्रारादाराच्या ताब्यात दोन्ही दिवस मिळून 7 तास होती. परंतू गैरअर्जदार यांनी फक्त दोन तासाचा विलंब आकार प्रति तास 110/- रुपये प्रमाणे एकूण आकार 220/- लावला तसेच नियमाप्रमाणे सेवा कर रुपये 454/- लावण्यात आला. 10,800 + 220 + 454 = 11,474 रुपये एकूण आकारणी करण्यात आली. तक्रारदाराने रक्कम रुपये 2,000/- आधीच्या करारानुसार भरले असल्यामुळे उर्वरीत रक्कम रुपये 3,474/- ची मागणी तक्रारदाराकडे केली आहे. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्र साक्षीदाराचे शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.विपुल देशपांडे व गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री. एम.जी.सोनोने यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारीतील कागदपत्रे पाहता म्हणजेच गैरअर्जदार यांचे दिनांक 11.12.2008 चे प्रत्राचे अवलोकन केले असता नैमित्तीक करार सुरु होण्याच्या 2 दिवस अगोदर पुर्वसुचना देऊन करार रद्द न करता त्या ऐवजी तारीख बदलून मिळते. याकरीता रक्कम रुपये 500/- सेवा शुल्काची आकारणी करुन नविन तारखेच्या बसची नोंदणी करता येते. त्या प्रमाणे तक्रारदारास दिनांक 14.06.2010 रोजी “प्रासंगिक करार” केल्याची तारीख बदलणे बाबत” रक्कम रुपये 500/- भरणा केल्याचे दिसुन येते. तसेच दिनांक 21.05.2010 रोजीच्या रक्कम रुपये 8,000/- भरणा केलेल्या पावती वरुन प्रवास 150 कि.मी. जालना औरंगाबाद परत दुहेरी फेरी लग्नासाठी करीता भरणा केल्याचे दिसुन येते. तसेच गैरअर्जदार यांचे साक्षीदार बसचे ड्रायव्हर असलखान नियाजखान यांचे शपथपत्राचे अवलोकन केले असता सदरील बस दिनांक 27.06.2010 रोजी औरंगाबादला प्रवासी नेऊन सोडल्यानंतर जालना आगारात परत आली व दिनांक 28.06.2010 रोजी औरंगाबादहून प्रवासी घेऊन जालना आगारात परत आली. अशा प्रकारे तक्रारदाराने सदर बसचा वापर एकूण सात तास केला आहे. यावरुन सदरची बस तक्रारदाराकडे औरंगाबाद येथे मुक्कामी नव्हती हे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी दोन तास विलंब आकार रुपये 220/- कोणत्या आधारे आकारला हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे सदरचा विलंब आकार चुकीचा आकारण्यात आल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांचे दिनांक 07.05.2010 चे परिपत्रक क्र.13/2010 नुसार 50 आसनापर्यंत दुहेरी फेरी गर्दीचा हंगाम प्रति कि.मी. 33 रुपये आकारणी करण्याबाबत नमूद केल्याचे दिसुन येते. तक्रारदाराने दुहेरी फेरी बसची 150 कि.मी. अंतरासाठी वापरलेली असल्यामुळे 150 * 3 = 4950/- रुपये एवढी बसची आकारणी करणे परिपत्रानुसार बंधनकारक असूनही गैरअर्जदार यांनी जास्तीची रक्कम तक्रारदाराकडे मागणी केल्याचे स्पष्ट होते. एस.टी.महामंडळाच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने दिनांक 27.06.2010 व 28.06.2010 असे दोन दिवस बसचा वापर केल्यामुळे त्यास प्रतिदिन रुपये 5,400/- या प्रमाणे रुपये 10,800/- आकारण्यात आले आहे. गैरअर्जदार एस.टी.महामंडळाचे म्हणणे चुकीचे आहे. कारण तक्रारदाराने दिनांक 27.06.2010 रोजी जालना औरंगाबाद प्रवासासाठी बस घेतली असली तरी प्रत्यक्षात तक्रारदाराने दिनांक 27.06.2010 व 28.06.2010 असे दोन्ही दिवस मिळून फक्त सात तास बस वापरली. तक्रारदाराच्या व-हाडाला दिनांक 27.06.2010 रोजी गैरअर्जदाराने औरंगाबादला बसने सोडल्यानंतर गैरअर्जदार एस.टी.महामंडळाने त्या बसचा इतर प्रवाशांसाठी वापर केला होता आणि त्याद्वारे एस.टी.महामंडळाने नफा कमावला. एस.टी.महामंडळाची बस दिनांक 27.06.2010 व 28.06.2010 रोजी तक्रारदारास औरंगाबाद येथे सोडल्यापासून दुस-या दिवशी बस औरंगाबादहून जालना येथे जाण्यासाठी निघण्याच्या दरम्यान एस.टी.महामंडळाने तक्रारदारास दिलेल्या बसचा वापर इतर प्रवाशांना ने-आण करण्यासाठी वारलेली आहे आणि त्याद्वारे नफा कमाविला आहे. असे असूनही एस.टी.महामंडळाने तक्रारदारास पुर्ण दिवसाचे भाडे आकारणे योग्य ठरत नाही. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, एस.टी.महामंडळाच्या म्हणण्यानुसार “नैमीत्तीक करारा” बाबत प्रवासाचे अंतर 300 कि.मी. पेक्षा कमी असेल तर संपूर्ण दिवसाचे करीता कमी भाडे रुपये 5,000/- आकारण्यात येते व दिवसाची गणना 00 वाजेपासून 24.00 वाजेपर्यंत अशी केली जाते. एस.टी.महामंडळाने दिवसाच्या गणनेबाबत तक्रारदारास नैमित्तीक करार करताना कोणतीही माहीती दिलेली नव्हती. तक्रारदाराने जरी करार करत असताना अटी व शर्ती मान्य असल्याचे नमूद केले असले तरी एस.टी. महामंडळाने तक्रारदाराला दिवसाच्या गणनेबाबत पूर्ण माहिती दिल्याचे दिसून येत नाही. एस.टी.महामंडळाने तक्रारदारास काराराचेवेळी त्याचे प्रवासाचे अंतर 300 कि.मी. पेक्षा कमी असल्यामुळे त्यास प्रतिदिन रुपये 5,400/- आकारण्यात येतील. याबाबत स्पष्टीकरण दिलेले नव्हते व तक्रारदाराला एस.टी.महामंडळाने त्यांच्या परिपत्रकाबाबत तक्रारदारास कोणतीही माहीती दिली नव्हती. प्रवासाचे अंतर 300 कि.मी. पेक्षा कमी असेल तर प्रति कि.मी. प्रमाणे भाडयाची आकारणी न करता प्रतिदिन भाडे आकारले जात असे एस.टी.महामंडळाचे म्हणणे आहे. सदर म्हणणे एस.टी.महामंडळाने त्यांच्या मुख्य कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकाच्या आधारे मांडले आहे. परंतू केवळ परिपत्रकात काही नियम आहेत म्हणून ते ग्राहकावर बंधनकारक ठरतील असे नाही. एस.टी.महामंडळा सोबत ज्यावेळी ग्राहक करार करतो त्यावेळी त्या ग्राहकाला एस.टी.भाडयाबाबत परिपत्रकात असलेल्या बाबी अवगत करुन देण्याची जबाबदारी एस.टी.महामंडळाची असुन ग्राहका सोबत केलेल्या करारामध्ये प्रवास भाडयाविषयी पुरेसे स्पष्टीकरण असणे जरुरी असते. परंतू तक्रारदारासोबत जो करार करण्यात आला तो एस.टी.महामंडळाने सादर केलेला नाही व तक्रारदारासोबत केलेल्या करारामध्ये तक्रारदाराला भाडयाबाबत पुर्ण माहिती दिली होती व ती तक्रारदाराने मान्य केली होती अशा प्रकारचा पुरावा एस.टी.महामंडळाने दिलेला नाही. त्यामुळे केवळ परिपत्रकात काही बाबी नमुद केल्या आहेत म्हणून त्या ग्राहकावर बंधनकारक आहेत असे म्हणता येणार नाही. दोन व्यक्तींमध्ये ज्यावेळी करार केला जातो त्यावेळी करारातील सर्व अटी व शर्ती स्पष्ट असाव्या लागतात व ज्या अटी व शर्ती करारात असतात फक्त त्याच अटी व शर्ती दोन्ही पक्षावर बंधनकारक असतात. कराराव्यतीरिक्त इतर नियम किंवा अटी दोन्ही पक्षांवर बंधनकारक ठरत नाहीत. त्यामुळे महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकात नमुद केलेले नियम जोपर्यंत ग्राहकासोबत केलेल्या करारामध्ये नमुद केले जात नाहीत तोपर्यंत ते नियम ग्राहकावर बंधनकारक ठरत नाहीत. महामंडळाने प्रवास भाडया विषयी तक्रारदाराला पूर्ण माहीती न देता प्रवास संपल्यानंतर अचानक त्याच्याकडे त्यास माहिती नसलेल्या परिपत्रकांच्या आधारे जास्त रकमेची मागणी करुन एस.टी.महामंडळाने निश्चितपणे अनुचित व्यापार केला आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास परिपत्रकातील नियमानुसार रक्कम रुपये 4,950/- एवढी दुहेरी बस फेरी करता आकारणी करणे बंधनकारक असूनही करारात ठरल्यापेक्षा जास्त रकमेची मागणी करुन सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट होते असे न्याय मंचाचे मत आहे. सेवेत त्रुटी केल्याची बाब स्पष्ट झाल्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारदाराकडून रुपये 3,050/- भरणा करुन घेतलेली रक्कम तक्रारदारास परत द्यावी असे न्याय मंचाचे मत आहे. सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश - गैरअर्जदार 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास रक्कम रुपये 3,050/- वैयक्तिक व संयुक्तरित्या आदेश मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत द्यावी.
- वरील रक्कम विहित मुदतीत अदा न केल्यास तक्रार दाखल केल्याच्या तारखे पासून वरील रकमेवर द.सा.द.शे. 8 % व्याज पुर्ण रक्कम देई पर्यंत द्यावे लागेल.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |