(मंचाचे निर्णयान्वये, श्री मनोहर गो. चिलबुले, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 30 सप्टेंबर 2013)
अर्जदार श्रीमती माया चंद्रशेखर डोंगरे यांनी सदरचा अर्ज ग्राहक हक्क संरक्षण अधिनियमाच्या कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
1. अर्जदाराची संक्षिप्त तक्रार अशी की,
अर्जदाराचे पती चंद्रशेखर उध्दव डोंगरे शेतकरी होते. दि.7.10.2010 रोजी विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेले असता, विहीरीत पडले आणि बुडून मरण पावले. सदर अपघात मृत्युसंबंधाने अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याबाबत गैरअर्जदार क्र.3 यांचे मार्फतीने दि.28.3.2011 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडे अर्ज केला. गैरअर्जदार क्र.1 ने सदरचा विमा दावा अपघाताचे वेळे मृतक दारुच्या नशेत होता असे खोटे कारण देवून दिनांक 12.12.2011 रोजी नामंजूर केला. विमा दावा नामंजूरीचे कारण संयुक्तीक नसून पोस्ट मार्टेम रिपोर्टच्या विरुध्द केवळ तोंडी रिपोर्ट मधील उल्लेखावर अवलंबून आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी अर्जदाराचा विमा दावा बेकायदेशीर नाकारला असून ही शेतकरी विमा योजनेच्या लाभार्थी असलेल्या अर्जदाराप्रती सेवेतील न्युनता आहे. म्हणून विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.28.3.2011 ते 16.1.2012 पर्यंत द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे व्याज रुपये 10,000/-, शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 25,000/-, विमा दावा दाखल करण्यासाठी लागलेला खर्च रुपये 10,000/- आणि सदर तक्रारीचा खर्च रुपये 5000/- अशी एकुण रुपये 1,50,000/- देण्याबाबत गैरअर्जदाराविरुध्द आदेश व्हावा, अशी मागणी अर्जदाराने केलेली आहे.
2. गैरअर्जदार क्र.1 युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनीने आपल लेखी जबाब नि.क्र.15 प्रमाणे दाखल करुन अर्जदाराची मागणी फेटाळून लावली आहे. त्यांचे म्हणणे असे कि, मृतक चंद्रशेखरच्या अपघाती मृत्युबद्दल गैरअर्जदार क्र.1 तर्फे श्री लक्ष्मण बालपांडे यांना इन्व्हेस्टिगेटर म्हणून नियुक्त केले होते व त्यांनी दि.27.11.2011 रोजी रिपोर्ट सादर केला असून मृतक हा दारुच्या नशेत असतांना विहीरीत बुडून मृत्यु झाला असा स्पष्ट अभिप्राय दिलेला आहे. सदरहू इन्व्हेस्टिगेटर यांनी मृतकाची पत्नी अर्जदार माया चंद्रशेखर डोंगरे हिचे बयाण तिच्या राहत्या घरी दि.26.11.2011 रोजी घेतले असून त्यात मृतक चंद्रशेखर दारु पिऊन असल्यामुळे त्याचा तोल जावून विहीरीत पडला व बुडून मरण पावला हे मान्य केले आहे. चंद्रशेखर यांचा मृत्यु दारुच्या नशेत विहीरीत पडून बुडाल्यामुळे झाला असल्याने पॉलिसीच्या शर्ती व अटी प्रमाणे त्याच्या मृत्युबाबत कोणतीही विमा रक्कम अर्जदारास मिळू शकत नाही. गैरअर्जदार क्र. 1 ने सदर दावा नियमाप्रमाणे नामंजूर केला असल्याने सेवेत कोणताही ञुटीपूर्ण व्यवहार केलेला नाही. म्हणून तक्रार अर्ज खारीज करावा अशी विनंती केली आहे.
3. गैरअर्जदार क्र.2 ने त्यांचा लेखी जबाब नि.क्र.17 प्रमाणे दाखल केला असून, त्यांनी शासनाकडून विम्याची कोणतीही राशी स्विकारली नसल्याने अर्जदारास विमा लाभ देण्याची त्यांची जबाबदारी नसल्याने त्यांचे विरुध्द अर्ज खारीज करावा अशी मागणी केली आहे.
4. गैरअर्जदार क्र.3 ने आपला लेखी जबाब नि.क्र.18 प्रमाणे दाखल केला आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराकडून प्राप्त विमा दावा त्यांनी दि.28.03.2011 रोजी पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्द अर्जदाराचा आक्षेप खारीज करण्यांत यावा.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांच्या परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचापुढे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील, मंचाने निष्कर्ष व त्याबाबतची कारण मिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) गैरअर्जदार क्र.1 ने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला : होय.
आहे काय ?
2) अर्जदार विमा रक्कम रु. 1,00,000/- मिळण्यास : होय.
पाञ आहे काय ?
3) अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
अर्ज अंशतः मंजूर.
- कारण मिमांसा -
6. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 यांनी शपथपञावर केलेले कथन नि.क्र.1 आणि 15, तसेच अर्जदाराचा लेखी युक्तिवाद नि.क्र.28 व गैरअर्जदार क्र.1 चा लेखी युक्तिवाद नि.क्रि.25, अर्जदाराने दाखल केलेले दस्तऐवजाची यादी नि.क्र.4 सोबत दाखल केलेले 14 दस्तऐवज, गैरअर्जदाराने यादी नि.क्र.16 सोबत दाखल केलेले 3 दस्तऐवज, तसेच अर्जदाराचे जोड पुरावा प्रतिज्ञालेख नि.क्र.12 आणि गैरअर्जदारातर्फे साक्षिदार लक्ष्मण बालपांडे यांचा पुरवा प्रतिज्ञालेख नि.क्र.21 हे सदर प्रकरणाच्या निर्णीतीसाठी विचारात घेण्यांत आले आहेत.
मुद्दा क्र.1 व 2 बाबत :-
7. सदरच्या प्रकरणात अर्जदार माया चंद्रशेखर डोंगरे हिचे पती मय्यत चंद्रशेखर उध्दव डोंगरे हे शेतकरी होते हे दर्शविणारा पुरावा म्हणून गैरअर्जदाराने दस्तऐवजाची यादी नि.क्र.4 सोबत अनुक्रमे दस्त क्र.8 आणि 9 वर मौजा निमगांव, प.ह.नं.14 ता.धानोरा, जि. गडचिरोली येथील भू.क्र.115/2 क्षेञ 1.21 हे.आर. चा 7/12 चा उतारा आणि गांव नमुना आठ ‘अ’ ची प्रत दाखल केली आहे. सदर दस्तात मय्यत चंद्रशेखर यांच्या मालकीची भू.क्र.115/2 क्षेञ 1.21 हे.आर. आणि 115/3 क्षेञ 0.40 हे.आर. शेतजमीन असल्याचे नमुद आहे, म्हणून चंद्रशेखर डोंगरे यांना शेतकरी अपघात विमा योजना लागू होती.
8. अर्जदाराचे पती चंद्रशेखर उध्दव डोंगरे दिनांक 7.10.2010 रोजी सरकारी विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेले आणि विहीरीत पडल्याने मृत्यु पावले याबाबत वाद नाही. माञ, गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, चंद्रशेखर घटनेच्या वेळी दारु पिऊन असल्याने दारुच्या नशेत तोल गेल्याने विहीरीत पडून मरण पावल्याने पॉलिसीच्या Exclusion Clause प्रमाणे अशा मृत्युसाठी अपघात विम्याची राशी देय होत नाही. याबाबत त्यांनी नि.क्र.25 सोबत विमा करारातील अटी व शर्तीची प्रत दाखल केली आहे. त्यांत खालीलप्रमाणे Exclusion Clause आहे.
iii) Exclusions :-
- Suicide or attempt of suicide.
- Self-inflicted injury
11) Under any influence at alcohol or Drugs.
12) Arising out of any breach of law or misfeasance.
9. गैरअर्जदार क्र.1 चे अधिवक्ता श्री के.डी.देशपांडे यांनी असा युक्तिवाद केला की, सदरच्या घटनेचा रिपोर्ट अर्जदार माया हिचे वडील व मय्यत चंद्रशेखर डोंगरे याचे सासरे वसंत भानुजी खोब्रागडे यांनी दि.8.10.2010 रोजी सकाळी 8.15 वाजता पोलीस स्टेशन एटापल्ली येथे दिली व त्यावरुन अकस्मात मृत्यु खबरी क्र.19/2010 कलम 174 जा.फौ.स. प्रमाणे नोंदविण्यात आली. सदर खबरीची प्रत अर्जदाराने दस्त क्र.अ-3 वर दाखल केली असून त्यांत वसंत खोब्रागडे यांनी दिलेली तोंडी रिपोर्ट नमुद करण्यांत आली आहे. रिपोर्टमध्ये वसंत खोब्रागडे याने सांगितले की,
‘’जावई चंद्रशेखर हा नेहमी दारु पित होता. काल दि.7.10.2010 ला सुध्दा दारु पिला होता.
मृतक चंद्रशेखर हा दारुचे नशेत काल दि.7.10.2010 चे 15.30 वाजता घराजवळील विहीरीत पाणी आणण्याकरीता गेला असता तो विहीरीत बुडून मरण पावला आहे. त्याचे मरणाबाबत माझा कोणावरही संशय किंवा तक्रार नाही.’’
10. घटनास्थळ पंचनामा दस्त क्र.अ-5 मध्ये सुध्दा घटनास्थळ असलेली विहीर दाखवितांना ‘‘वसंत खोब्रागडे याने मृतक चंद्रशेखर डोंगरे हा पाणी काढण्यास गेला होता व तो दारुच्या नशेत असल्यामुळे तो याच ठिकाणावरुन विहीरीचे पाण्यात पडून बुडून मरण पावला.’’ असे नमुद आहे.
11. सदर प्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 या विमा कंपनीने लक्ष्मण बालपांडे, रा. नागपूर यांची इन्व्हेस्टिगेटर म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी दि.26.11.2011 रोजी अर्जदार माया चंद्रशेखर डोंगरे हिच्या निमगांव येथील घरी जावून तिचे बयाण नोंदविले, सदर बयाण गैरअर्जदार क्र.1 ने यादी नि.क्र.16 सोबत दस्त क्र.ब-2 वर दाखल केले आहे. त्यांत अर्जदार हिने सांगितले होते की, ‘‘तिचे पती दि.7.10.2011 ला सायंकाळी 5.30 वाजता घराजवळील सरकारी विहीरीवर पाणी काढण्याकरीता गेले होते. पाणी काढतांना त्यांचा तोल गेला व ते विहीरीत पडले आणि बुडून गेले. ते दारु पिऊन असल्यामुळे त्यांचा तोल गेला असावा.’’
12. सदर बयाणावर अर्जदार माया हिची इंगजीत सही, तसेच तिची आई विमल वसंत खोब्रागडे हिची साक्षिदार म्हणून अंगठा आहे. सदर सही आणि अंगठा अर्जदाराने तिच्या पुराव्याच्या शपथपञात मान्य केलेला आहे.
13. इन्व्हेस्टिगेटर लक्ष्मण बालपांडे यांना चौकशीमध्ये जी वस्तुस्थिती दिसून आली त्यावरुन त्यांनी गैरअर्जदाराकडे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट दस्त क्र.ब-1 प्रमाण सादर केला व त्यांत मय्यत चंद्रशेखर हा दारुच्या नशेत असल्याने विहीरीत पडला व त्यांत त्याचा बुडून मृत्यु झाला असे नमुद केले आहे.
14. गैरअर्जदाराने सदर ईन्व्हेस्टिगेटर लक्ष्मण बालपांडे यांची साक्ष शपथपञ नि.क्र.21 प्रमाणे नोंदली आहे. त्यात त्यांनी स्वतः अर्जदार माया डोंगरे हिचे बयाण घेतले असून सदर बयाणात तिचे पती चंद्रशेखर डोंगरे विहीरीचे पाणी काढण्यास गेले व दारुच्या नशेत तोल जावून विहीरीत पडल्याने बुडून मरण पावले असे सांगितले होते आणि बयाणावर सही केली असल्याचे म्हटले आहे.
15. गैरअर्जदाराने दिलेल्या पुराव्यावरुन चंद्रशेखर डोंगरे याचा मृत्यु दारुच्या नशेत तोल जावून विहीरीत पडल्याने झाला हे सिध्द होत असल्याने आपल्याला विमा क्लेम मिळणार नाही याची अर्जदारास खाञी झाल्याने, तिने हेतूपुरस्पर अधिकच्या पुराव्याचे खोटे शपथपञ नि.क्र.23 प्रमाणे दाखल केले व इन्व्हेस्टिगेटर लक्ष्मण बालपांडे यांनी तिचे बयाण लिहून घेतले नव्हते, परंतु विमा क्लेम रक्कम देण्यासाठी म्हणून तिची व तिच्या आईची साक्षिदार म्हणून को-या कागदावर सह्या घेतल्याचे धादांत खोटे कथन केले आहे. अर्जदार इंग्रजीत सही करणारी साक्षर महिला असल्याने इन्व्हेस्टिगेटरच्या सांगण्यावरुन को-या कागदावर किंवा लिहीलेल्या कागदातील मजकूर न वाचता सही करील व साक्षिदार म्हणून तिच्या आईचा अंगठा सदर कागदावर देईल हे अनैसर्गिक व अविश्वासार्ह्य आहे. अर्जदारासारख्या सुशिक्षीत बाईने इन्व्हेस्टिगेटर समजून उमजून बयाण दिले असल्याने ते खरे आहे हे गृहीत धरणे कायद्यास धरुन आहे. अर्जदाराचे बयाण तिचे वडीलांनी दिलेला रिपोर्ट यावरुन मय्यत चंद्रशेखर हा दारुच्या नशेत असल्याने तोल जावून विहीरीत पडला व बुडून मरण पावला असल्याने पॉलिसीच्या शर्ती व अटीप्रमाणे सदर प्रकरण Exclusion Clause मध्ये येते व म्हणून सदर मृत्युबाबत विम्याची रक्कम देण्याची कोणतीही जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 वर नसल्याने त्यांची विमा क्लेम नाकारण्याची कृती सेवेतील न्युनतापूर्ण व्यवहार ठरत नाही.
16. याउलट, अर्जदाराचे अधिवक्ता श्री समद्दार यांनी आपले युक्तिवादात असे प्रतिवादन केले की, अर्जदाराचे पती चंद्रशेखर डोंगरे यांचा विहीरीत पडून मृत्यु झाल्या याबद्दल दोन्ही पक्षात वाद नाही. सदरचा मृत्यु चंद्रशेखरने स्वतःहून ओढवून घेतला काय ? हाच वादाचा मुद्दा आहे. या प्रकरणात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देणार वसंत खोब्रागडे हे अर्जदाराचे वडील व मय्यत चंद्रशेखर यांचे सासरे होते. चंद्रशेखर विहीरीत पडला तेंव्हा ते मौक्यावर हजर नव्हते. त्यामुळे, घटनेच्या वेळी दारुच्या नशेमुळे चंद्रशेखरचा तोल जावून तो विहीरीत पडला किंवा कसे हे त्यांस वैयक्तीक माहीत नाही व म्हणून फिर्यादीमध्ये जरी त्याने चंद्रशेखर नेहमी दारु पित होता. घटनेच्या दिवशीही दारु पिला होता व दारुच्या नशेत तो विहीरीत पडला या कथनाला कोणताही आधार नाही आणि केवळ या कारणाने चंद्रशेखर घटनेच्या वेळी दारुच्या नेशत होता, हे सिध्द होऊ शकत नाही.
17. चंद्रशेखर विहीरीत पडला असा लोकांचा ओरडा झाल्यावर वसंत खोब्रागडे चंद्रशेखरच्या घरी आला, तेंव्हा अर्जदार माया हिने त्यास सांगितले की, ‘‘चंद्रशेखर घरासमोरील सरकारी विहीरीवर पाणी आणण्याकरीता गेला असता पाणी काढतांना विहीरीत पडला.’’ तो पाणी आणण्यासाठी गेला तेंव्हा दारुच्या नशेत होता असे रिपोर्ट देणार वसंत खोब्रागडे यांस अर्जदाराने सांगितले नव्हते. म्हणून घटनेच्या वेळी चंद्रशेखर दारुच्या नशेत होता हे रिपोर्ट मधील विधान निराधार असल्याने अग्राह्य आहे.
18. त्यांनी आपल्या युक्तिवादात पुढे सांगितले की, गैरअर्जदार ही विमा कंपनी आहे. मृत्यु झालेल्या व्यक्तिंच्या वारसानांना मृत्यु दाव्याची रक्कम तांञीक कारण दाखवून नाकारल्यास या प्रकरणांत सदर कंपनीचा किमान रुपये 1 लाखाचा फायदा होणार आहे, म्हणून असे तांञीक कारण निर्माण करण्यासाठी कंपनीने स्वतःचे इन्व्हेस्टिगेटर नेमलेले आहेत. गैरअर्जदार क्र.1 चा साक्षिदार लक्ष्मण बालपांडे हा असाच गैरअर्जदार क्र.1 ने आपल्या फायद्यासाठी नेमलेला इन्व्हेस्टिगेटर असून, त्याकामाचे त्याला गैरअर्जदाराकडून रक्कम मिळत असल्याने गैरअर्जदारास फायदेशिर होईल असा पुरावा निर्माण करणे हे त्याचे काम आहे. सदर इन्व्हेस्टिगेटर हा सरकारी व्यक्ती नसल्याने व त्यास बयाण नोंदून घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याने त्याने नोंदलेल्या तथा कथीत बयाणाचे पुरावा मुल्य शुन्य आहे.
19. सदर इन्व्हेस्टिगेटर यांनी आपले शपथपञ नि.क्र.21 मध्ये ‘‘माया डोंगरे यांनी स्वतः हस्ताक्षरात बयाण लिहून दिले व त्यावर इंग्रजीत माझ्या व साक्षिदारांच्या समक्ष सही केली’’ असे खोटे नमुद केले आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या हस्ताक्षरांनी हन्व्हेस्टिगेटरला लिहून दिलेले म्हणून जे तथाकथीत बयाण नि.क्र.16 सोबत दस्त क्र.2-ब वर दाखल केले आहे, त्याची आणि अर्जदार माया हिने स्वहस्ताक्षरात अर्जदाराचे जोड पुरावा प्रतिज्ञालेख म्हणून दाखल केलेला दस्त नि.क्र.22 ची उघड्या डोळ्यांनी तुलना केल्यास दोन्ही दस्तऐवजातील मजकूर भिन्न व्यक्तिच्या हस्ताक्षरांत असल्याचे स्पष्ट होते. केवळ दोन्ही दस्तांवरील अर्जदार माया डोंगरे हिची सही एकाच व्यक्तिने केलेली व म्हणून सारखी आहे. याचाच अर्थ असा की, दस्त क्र.ब-2 मधील मजकूर अर्जदार माया डोंगरे हिने स्वहस्ताक्षरात लिहून दिला हे गैरअर्जदाराचा साक्षिदार हन्व्हेस्टिगेटर लक्ष्मण बालपांडे याची शपथेवरील साक्ष केवळ खोटी आणि खोटीच ठरते. म्हणून दस्त क्र.ब-2 वर गैरअर्जदाराचा इन्व्हेस्टिगेटर याने विम्याचे पैसे मिळण्यासाठी अर्जदार व साक्षिदार यांच्या सह्या आवश्यक आहेत असे सांगितल्याने त्याच्यावर भरोसा ठेवून लवकर पैसे मिळावे म्हणून अर्जदार माया हिने स्वतःची सही व तिची आई विमला वसंत खोब्रागडे हिचा नि.आ. को-या कागदावर दिला. पुरवणी पुराव्याचे शपथपञातील कथन अधिक विश्वासार्ह्य व पुराव्या कामी ग्राह्य ठरते.
20. अर्जदार माया हिने आपल्या पुरवणी पुराव्याचे शपथपञात असे स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘’मी बालपांडे सर्व्हेअर यांना बयान दिले नाही. माझे पती घटनेच्या दिवशी दारु पिऊन नसल्याने तसे बयाण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’’ गैरअर्जदाराचे वरील बाबीवरुन हे स्पष्ट होते की, अर्जदाराने इन्व्हेस्टिगेटर लक्ष्मण बालपांडे यांना अगर तिचे वडील घटनेची रिपोर्ट देणार वसंत खोब्रागडे यांना घटनेच्या वेळी मय्यत चंद्रशेखर दारुच्या नशेत तोल जावून विहीरीत पडला हे सांगितले नव्हते.
21. अर्जदाराचे अधिवक्ता यांनी मंचाचे लक्ष मय्यत चंद्रशेखर डोंगरे याच्या शवविच्छेदन अहवाल दस्त क्र. अ-6 मधील नमुद मरणाच्या कारणाकडे वेधले आणि असे निदर्शनास आणून दिले की, सदर अहवालात चंद्रशेखरच्या पोटात दारुचा अंश आढळल्याचे कुठेही नमुद नाही. सदर शवविच्छेदन अहवालात मृत्युचे कारण -
“The cause of death was asphyxia due to fresh water drowning.
Manner of Death accidental.”
‘’पाण्यात बुडून अपघाती मृत्यु ‘’ असे नमुद केले आहे.
सदरचा मृत्यु चंद्रशेखर याने दारु पिल्याने किंवा इतर अंमली पध्दार्थाचे सेवन केल्यामुळे झाला याबाबत शवविच्छेदन अहवालात शंका देखील व्यक्त केलेली नाही. म्हणून चंद्रशेखर याचा विहीरीच्या पाण्यात पडून बुडाल्याने अपघाती मृत्यु झाला याशिवाय अन्य कोणताही निष्कर्ष निघू शकत नाही व शवविच्छेदन अहवालातील नोंदीप्रमाणे त्या विपरीत निष्कर्ष काढताही येत नाही.
22. चंद्रशेखर याचा विहीरीत बुडून अपघाती मृत्यु झाल्याबाबत शवविच्छेदन अहवालाच्या स्वरुपात निर्णायक पुरावा सादर करुन देखील गैरअर्जदाराने अर्जदाराचा न्याय विमा दावा नाकारण्याचे उद्देशाने इन्व्हेस्टिगेटर मार्फत खोटा पुरावा निर्माण केला आणि त्यावरुन अर्जदाराचा विमा दावा बेकायदेशीरपणे नाकारला हा विमा पॉलिसीच्या लाभ धारक अर्जदाराप्रती सेवेतील ञृटीपूर्ण व्यवहार असल्याने अर्जदाराची फिर्याद मंजूर होण्यास पाञ आहे.
23. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तऐवजांच्या सर्वकक्ष विचार केला असता असे दिसून येते की, ज्याने घटनेचा रिपोर्ट दिला तो वसंत खोब्रागडे घटनेच्या वेळी हजर नसल्याने दारुच्या नशेमुळे तोल गेल्याने चंद्रशेखर विहीरीत पडला हे त्याचे फिर्यादीतील कथन चंद्रशेखरचा मृत्यु दारु पिल्यामुळे ओढवला, हे सिध्द करण्यास पुरेसे नाही.
24. माया हिने तिचे वडील वसंत खोब्रागडे यांस घटनेबाबत अर्जदार माया हिने जी माहिती दिली त्यांत ‘’चंद्रशेखर विहीरीवर पाणी काढण्यास गेला असता पाणी काढतांना विहीरीत पडला.’’ एवढेच सांगितले असून तो विहीरीवर गेला तेंव्हा दारु प्यालेला होता व दारुच्या नशेत त्याचा तोल गेला अशी कोणतीही माहिती दिली नव्हती. घटनेच्या वेळी घरी हजर नसलेल्या वसंत खोब्रागडे याने अंदाजाने दारुच्या नशेत चंद्रशेखर विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेला असे जरी रिपोर्टमध्ये नमुद केले असले तरी शवविच्छेदन अहवाल चंद्रशेखरच्या पोटात दारुचा अंश सापडल्याचा कोणताही उल्लेख नसल्याने तो विहीरीवर पाणी काढण्यासाठी गेला तेंव्हा दारुच्या नशेत होता, हे सिध्द होत नाही.
25. गैरअर्जदार क्र.1 चे साक्षिदार इन्व्हेस्टिगेटर लक्ष्मण बालपांडे यांनी साक्षीत जरी अर्जदार माया हिने तिच्या स्वहस्ताक्षरात घटनेच्या वेळी चंद्रशेखर दारुच्या नशेत पाणी काढण्यासाठी गेला व तोल जावून विहीरीत पडला असे बयाण व अधिकच्या पुराव्याचे शपथपञ यांची उघड्या डोळ्यांनी तुलना केल्यास सदर बयाण अर्जदार माया हिचे हस्ताक्षरात नाही, हे स्पष्ट होते. तिने सदर बयाणातील मजकूर लिहून दिल्याचे नाकबूल केले असून, इन्व्हेस्टिगेटर बालपांडे यांनी विम्याची रक्कम लवकर मिळण्यासाठी सहीची आवश्यकता असल्याचे सांगितल्याने को-या कागदावर स्वतःची सही व साक्षिदार म्हणून आईचा अंगठा दिल्याचे म्हटले आहे. एकंदरीत, वस्तुस्थिती लक्षात घेता अर्जदाराने सांगितलेली वस्तुस्थिती खरी धरण्या लायक परिस्थिती असल्याने तथा कथीत बयाण हे मय्यत चंद्रशेखर घटनेच्या वेळी दारुच्या नशेत असल्याने तोल जावून विहीरीत पडला व त्याने घेतलेली दारु ही त्याच्या अपघाती मृत्युस कारण झाली हा गैरअर्जदाराचा युक्तिवाद सिध्द करण्यास अपयोगी नाही.
26. चंद्रशेखर घटनेच्या वेळी दारु प्यालेला होता व दारुच्या अंमलामुळे त्याचा तोल गेला असा निष्कर्ष काढण्यासाठी शवविच्छेदन अहवालात त्याच्या पोटात दारुचा अंश आढळून आल्याचा उल्लेख असणे आवश्यक होते. परंतु, तसा कोणताही उल्लेख शवविच्छेदन अहवालात नसल्याने चंद्रशेखर घटनेच्या वेळी दारु प्यालेला होता व दारु हीच त्याच्या मृत्युस कारण ठरली हा गैरअर्जदाराचा युक्तिवाद स्विकारणे अशक्य आहे. म्हणून चंद्रशेखर घटनेच्या वेळी दारुच्या अंमलाखाली होता व त्यामुळे त्याचा तोल जावून विहीरीत पडल्याने त्याने पिलेली दारु त्याच्या मृत्युस कारण ठरली असे म्हणून Exclusion Clause मधील तरतुदीचा आधार घेवून चंद्रशेखरच्या विहीरीत पडून झालेल्या निव्वळ अपघाती मृत्युबाबत अर्जदाराचा शेतकरी अपघात विम्याचा न्याय दावा तांञीक कारण पुढे करुन नामंजूर करणे ही गैरअर्जदार क्र.1 ने विमा ग्राहकाप्रती अनुसरलेली सेवेतील न्युनता आहे, या निष्कर्षाप्रत मंच आल्याने मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
27. अर्जदाराचे पती मय्यत चंद्रशेखर डोंगरे यांचा विहीरीत पडल्याने बुडून मृत्यु झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन निर्णायकरित्या सिध्द होत असल्याने अर्जदार शेतकरी अपघात विम्याची रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्यास पाञ आहे.
28. अर्जदाराचा वाजवी विमा दावा तांञीक कारण दाखवून गैरअर्जदार क्र.1 ने नाकारल्यामुळे अर्जदारास जे मानसिक व शारीरीक ञास झाला त्याबद्दल नुकसान भरपाई रुपये 5,000/- आणि या तक्रार अर्जाचा खर्च रुपये 2,000/- मंजूर करणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत झाल्याने मुद्दा क्र.2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
अर्जदाराचा तक्रार अर्ज खालीलप्रमाणे अंशतः मंजूर.
(1) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास चंद्रशेखर उध्दव डोंगरे याच्या अपघाती मृत्युबाबत शेतकरी अपघात विम्याची राशी रुपये 1,00,000/- अर्जाच्या तारखेपासून म्हणजे दि.24.1.2012 पासून रक्कम अर्जदाराच्या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 % व्याजासह अदा करावी.
(2) अर्जदारास झालेल्या शारीरीक व मानसिक ञासाबाबत नुकसान भरपाई रुपये 5000/- आणि या तक्रार अर्जाच्या खर्चाबाबत रुपये 2000/- गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावी.
(3) वरील आदेशाची पूर्तता आदेशाच्या तारखेपासून 1 महिन्याचे आंत करावी. मुदतीचे आंत रक्कम देण्यास कसूर केल्यास 1 महिन्यानंतर वरील देय रकमेवर गैरअर्जदारास द.सा.द.शे. 12 % प्रमाणे व्याज देण्यास पाञ राहील.
(4) सदर आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.
गडचिरोली.
दिनांक :- 30/9/2013