निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार श्रीमती रुक्मीनबाई बाबाराव येडले, रा. वाघनाळवाडी ता. देवणी जि. लातुर येथील रहिवासी आहे. अर्जदाराच्या मुलाचे नाव शिवाजी बाबाराव येडले, वय - 35 वर्षे धंदा मजुरी होता. अर्जदाराचा मुलगा शिवाजी बाबाराव येडले याने गैरअर्जदाराकडे व्यक्तीगत जनता अपघात पॉलीसी काढली असून, त्याचा विमा दि. 09/01/2009 रोजी भरलेला आहे. सदरील विम्याचा कालावधी दि. 09/01/2009 ते 08/01/2014 पर्यंतचा आहे. सदर विमा पॉलीसीने अर्जदाराची एक लाखाची हमी घेतली आहे. व त्याचा पॉलीसी क्र. 230603/47/08/51/00000678 असा आहे. दिनांक 12/08/2009 रोजी सकाळी 10.30 वाजता शिवाजी बाबाराव येडले हा मौजे वाघनाळवाडी येथील स्वत:च्या घरावरील छतावर धान्याचे वाळवण काढण्यासाठी गेला असता त्याचा तोल जावून छतावरुन तो खाली पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मौजे वाघनाळवाडी या गावातुन वाहतुकीची सोय नसल्यामुळे त्यास वेळेवर देवणी येथे उपचारार्थ दाखल करता आले नाही. त्याच्या मृत्यूनंतर महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती मौजे जवळगा, धनगरवाडी, वाघनाळवाडी ता. देवणी या सर्व गावातील पंचानी, अध्यक्ष, सचिव यांनी मृत्यूबाबतचा पंचनामा लेटरपॅडवर ठेवला आहे त्याचे प्रेत पोलीस स्टेशनला कळविलेले नाही. त्याच्या मृत्यूनंतर अर्जदारानी कागदपत्रासह क्लेम फॉर्म दाखल केला. त्यानंतर अर्जदारास दि. 20/05/2011, 17/10/2011 व 09/11/2011 रोजी गैरअर्जदारानी पत्र पाठवून कागदपत्रे दाखल करण्या बाबत कळविले होते. त्यानुसार दि. 17/03/2012 रोजी त्रुटीची पुर्तता केलेली आहे. परंतु गैरअर्जदारानी अर्जदारास, अर्जदाराच्या मुलाना व्यक्तीगत जनता अपघात काढुन देखील त्यास रु. 1,00,000/- चा विमा दिला नाही. ही गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत केलेली त्रुटी आहे. म्हणून गैरअर्जदारानी अर्जदारास रु. 1,00,000/- अपघात तारखेपासुन 12 टक्के व्याजासह दयावेत. तसेच अर्जदार ही स्त्री असून तिचे वय 70 वर्षापेक्षा जास्त आहे तिला आपल्या मुलाचा मोबदला न देवून जो शारिरीक व मानसिक त्रास झाला त्याबद्दल रु. 10,000/- व दाव्याचा खर्च रु. 7,000/- देण्यात यावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत विमा कंपनीचे पत्र, तंटामुक्त समितीचे पंचनामा, शिधा पत्रिकेची प्रत, मृत्यू प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, क्लेम मिळणे बाबतचे पत्र (03 प्रती), विमा कंपनीचे पत्र, विमा कंपनीला दिलेले पत्र, नोटीसची प्रत, आर.पी.ए.डी ची पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदारानी शवविच्छेदन अहवाल, तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र असा महत्वाचा त्याच्या मृत्यूबाबतचा कागदपत्र दिलेला नाही. तसेच सदरचा अर्ज हा वेळेच्या बाहेर दिलेला असल्यामुळे त्याचा विलंब माफीचा अर्ज सुध्दा नामंजुर करावा. तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराला कागदपत्र पाठविले. परंतु महत्वाचे कागदपत्र पाठविले नाही म्हणून त्याच्या विरुध्द नो-क्लेम करण्यात आलेला आहे. शेतकरी जनता अपघात विम्याचा लाभ व्हावा म्हणून अर्जदार खोटे बोलत आहे. तसेच गैरअर्जदाराने असेही म्हटले आहे की, अर्जदाराचा जो पॉलीसी कालावधी 5 वर्षाचा होता हे देखील त्यांना अमान्य आहे.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होतो. त्याने गैरअर्जदाराकडे पॉलीसी दि. 09/01/2009 रोजी काढली होती. व त्याचा कालावधी दि. 09/01/2009 ते 08/01/2014 पर्यंत होता असे कागदोपत्री पुराव्याने सिध्द केले आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार ही स्त्री असून ती 70 वर्षाची वृध्द आई आहे. तिच्या उदरनिर्वाहाचा एकमेव शिवाजी बाबाराव येडले हा मुलगा दि. 12/08/2009 रोजी सकाळी 10.30 मौजे वाघनाळवाडी त्याच्या गच्चीवरुन पडुन मृत्यू झाल्याचे कळविले वरुन मौजे जवळगा येथून तंटामुक्तीचे अध्यक्ष, सचिव, सदस्य व वाघनाळवाडी येथील ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी पाहणी केली असता शिवाजी बाबाराव येडले वय 32 वर्षे हे स्वत:च्या गच्चीवरुन धान्याचे वाळवण काढण्यासाठी गेले असता छतावरुन खाली पडलेले दिसुन आले. गावामध्ये वाहतुकीची सोय नसल्यामुळे जखमीस नेण्याची अडचण झाल्यामुळे, गावामध्ये वैदयकीय दवाखाना नसल्यामुळे उपचार होवू शकला नाही. जागीच मृत्यू झाल्याचे दिसुन आले. गावातील प्रतिष्ठित नागरीक, त्यांचे नातेवाईक यांची कोणतीही तक्रार नसल्यामुळे सामंजस्याने त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. अर्जदाराचे मृत्यू प्रमाणपत्र तसेच रहिवाशी प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालय जवळगा यांनी दिलेले दिसुन येते. अर्जदार स्त्रीने विमा कंपनीस सुध्दा सदरचा क्लेम मिळण्याबाबत पत्र व नोटीस दिलेली आहे. परंतु अर्जदार कंपनीने योग्य कागदपत्र न आल्यामुळे अर्जदाराचा अर्ज फेटाळावा असे म्हटलेले आहे. सदर सर्व कागदपत्रांची पाहणी करता महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीची कागदपत्र पाहुन हे न्यायमंच त्याने व्यक्तीगत पॉलीसी घेवून प्रिमियम भरलेली असल्यामुळे त्याच्या नातेवाईकास सदरचा लाभ देणे गरजेचे आहे, वृध्द स्त्री आहे म्हणून हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज मंजुर करत आहे. अर्जदारास गैरअर्जदाराने रु. 1,00,000/- तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 3,000/- दयावेत.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 1,00,000/-(अक्षरी
एक लाख रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/-(अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.