(घोषित दि. 22.09.2011 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराच्या एकत्र कुटुंबाच्या मालकीची मौजे वडीगोद्री ता.अंबड येथे जमीन गट नंबर 155 क्षेत्र 10 एकर बागायती जमीन असून कुटुंबकर्ता या नात्याने सदर जमीनीची वहीती करातात. तक्रारदारांनी रब्बी ज्वारीचे बी, सांकेतीक क्रमांक एम.एच.35-1 लॉट क्रमांक 53 हे गैरअर्जदार 1 व 2 यांनी उत्पादित केलेले त्यांचे अधिकृत विक्रेते गैरअर्जदार 3 यांचेकडून दिनांक 20.10.2010 रोजी पावती क्रमांक 1397 नुसार 20 बॅग दिनांक 28.10.2010 रोजी पावती क्रमांक 422 नुसार 4 बॅग अशा एकूण 32 बॅग प्रति बॅग 4 किलो वजनाच्या तक्रारदारांनी खरेदी केल्या. तक्रारदारांनी सदर ज्वारीचे बियाणे दिनांक 30.10.2010 ते 04.11.2010 या कालावधीमध्ये पेरणी केली. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये रासायनिक खत 10.26.26 च्या 20 बॅग व युरीयाच्या 10 बॅगचा वापर केला. गैरअर्जदार 3 यांचेकडून खरेदी केलेल्या रब्बी ज्वारीची बियाणे पेरल्यानंतर तक्रारदारांच्या शेतात 7 ते 8 फुटापर्यंत वाढ झालेले ज्वारीचे पीक आले. सदरील ज्वारीस कणसे चांगल्या प्रकारची आली. परंतू कणसामध्ये ज्वारीचे दाणे भरलेले नाही. या संदर्भात गैरअर्जदार 3 यांचेकडे तोंडी तक्रार केली असता गैरअर्जदार 1 व 2 यांना कळविण्याबाबत अश्वासन दिले. परंतू गैरअर्जदार यांनी तक्रारदारांच्या तक्रारीस कोणताही प्रतिसाद दिला नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. तक्रारदारांनी दिनांक 11.03.2011 रोजी कृषी अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांचेकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर कृषी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी दिनांक 23.03.2011 रोजी तक्रारदारांचे शेतात गट क्रमांक 155 मौजे वडीगोद्री येथे येवून पंचनामा केला. गैरअर्जदार 3 सदर पंचनाम्याचे वेळी हजर होते, पंचनामा करताना हजर असलेल्या अधिका-यांनी व गैरअर्जदार 3 यांनी पंचनाम्यावर सहया केल्या आहेत. गैरअर्जदार यांनी पंचनामा झाल्यानंतर अद्याप पर्यंत पिकाच्या नुकसानीची भरपाई दिलेली नाही. त्यामळे तक्रारदारांनी दिनांक 11.05.2011 रोजी गैरअर्जदार यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. गैरअर्जदार यांनी नोटीशीचे उत्तर पाठविलेले असून तक्रारदारांनी प्रमाणापेक्षा जास्त ज्वारीचे बियाणांची पेरणी केली आहे. तक्रारदारांना गुरांचा चारा उपलब्ध करायचा होता, असे नमूद केले आहे. सदर नोटीसचे उत्तर खोटे असून गैरअर्जदार यांचेकडून खरेदी केलेले रब्बी ज्वारीचे बियाणे पेरले असता ज्वारीच्या कणसात दाणे न भरल्याने सन 2011 चे हंगामात तक्रारदारांचे रुपये 1,00,000/- एवढया रकमेचे नुकसान झाले आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदार 1 ते 3 हजर झालेले असून गैरअर्जदार 1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे दिनांक 19.09.2011 रोजी न्यायमंचात दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांनी 4 किलो वजनाच्या 32 बॅग खरेदी केल्या म्हणजेच 128 किलो बियाणे विकत घेतले आहे. ज्वारी बियाणाची पेरणी जर एका एकरमध्ये करावयाची असेल तर 4 किलो बियाणे आवश्यक असते. त्यामुळे गैरअर्जदार यांनी 4 किलो ज्वारी बियाणाची पॅकींग केलेली आहे. कृषी विद्यापीठाने प्रति एकरी एक बॅग (4 किलो) पेरणी करण्याची शिफारस केलेली आहे. तक्रारदारांनी 10 एकर मध्ये 128 किलो बियाणाची पेरणी केलेली आहे. तक्रारदारांनी 10 एकरमध्ये फक्त 40 किलो बियाणे पेरणी करणे आवश्यक होते. म्हणजेच ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा 88 किलो बियाणे जास्त पेरलेले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम तक्रारदारांच्या उत्पन्नावर झाला असवा. कारण बियाणाची पेरणी करताना प्रमाणापेक्षा जास्त बियाणे वापरल्यास तो केवळ गुरांना चारा म्हणून उपयोगात येतो. कारण पंचनाम्यात नमूद केल्या प्रमाणे कडबा वगळून ज्वारी पिकाचे नूकसान झाले आहे. तक्रारदारांची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार यांचे म्हणणे, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री. ए.एम.तारडे यांचा, गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.प्रदीप कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे मौजे वडीगोद्री ता.अंबड येथे त्यांच्या एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या बागायती शेत जमीन गट नंबर 155 क्षेत्र 10 एकरमध्ये गैरअर्जदार 3 यांचेकडून खरेदी केलेले व गैरअर्जदार 1 व 2 यांनी उत्पादित केलेले ज्वारीचे बियाणे सांकेतिक क्रमांक एम.एच. 35-1 लॉट क्रमांक 53 ची दिनांक 30.10.2010 ते 04.11.2010 या कालावधीत पेरणी केली. तसेच बियाणाच्या पेरणीच्या वेळी 20 बॅग 10.26.26 व 10 बॅग युरीया पेरणी नंतर 30 दिवसांनी 10 बॅग युरीया असे खत पेरले होते. तसेच सदरील ज्वारीच्या पिकास एक वेळेस पाणी सुध्दा दिले होते. तक्रारदारांनी सदर बियाणे पेरल्यानंतर 7 ते 8 फूट पिकाची वाढ झाली, सदरील पिकास कणसे लागली. परंतू कणसामध्ये ज्वारीचे दाणे भरले नाहीत. तक्रारदारांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी दिनांक 23.03.2011 रोजी मौजे वडीगोद्री ता.अंबड येथील गट नंबर 155 मध्ये समक्ष पंचनामा केला. कृषी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी इतर अधिका-या सोबत केलेल्या दिनांक 23.03.2011 चे अवलोकन केले असता तक्रारदारांनी गट नंबर 155 मधील 10 एकर जमिनीत 32 बॅग ज्वारीच्या बियाणाची पेरली केल्याबाबत पंचासमक्ष सांगितले. तसेच तक्रारदारांच्या पिकाची सोगणी झालेली असून पिकाच्या पेंडया बांधून पिक शेतात आडवे दिसून आल्याचे नमूद केले आहे. पिकाची वाढ 7-8 फुटापर्यंत झालेली असल्याचे कापलेल्या पिकावरुन दिसून आले. त्याच प्रमाणे पिकास लागलेले कणीस लहान आकाराचे असून कणसात दाणे भरलेले नसल्याने कडबा वगळून ज्वारी पिकाची 100 % नूकसान झाल्याबाबत नमूद केले आहे. तक्रारदाराच्या पिकाला अल्प प्रमाणात मावा किडीचा प्रादूर्भाव झाल्याचे नमूद केले आहे. तक्रारदारांनी दिनांक 22.09.2011 रोजी दाखल केलेल्या शपथपत्रानूसार तक्रारदारांनी 32 बॅग बियाणे खरेदी केलेले होते. परंतू रब्बी हंगामात 25 एकर शेती ज्वारी पेरणीसाठी तयार नसल्यामुळे केवळ गट नंबर 155 मधील 10 एकरमध्ये एकरी 5 किलो बियाणे प्रमाणे एकूण 50 किलो बियाणेची पेरणी केली. सदरील जमीनीतील ज्वारीच्या पिकाची काढणी केल्यानंतर एकरी 600 ज्वारीच्या पेंडया अशा एकूण 6000 पेंडया निघाल्या. बागायती शेतीमध्ये शेकडा 2 क्विंटल असा ज्वारीचा उतारा निघतो. ज्वारीची दाणे भरले असते तर सदरील शेतात 120 ते 125 क्विंटल ज्वारी झाली असती. 2011 च्या रब्बी हंगामामध्ये ज्वारीचा बाजारभाव प्रति रुपये 3,000/- क्विंटल होता. अशा प्रकारे तक्रारदारांचे 18 लाख रुपयांचे नूकसान झाले. परंतू त्यामधून कडबा वजा जाता 10 लाख रुपयांचे नूकसान झाल्याबाबत तक्रारदारांनी तक्रारदारांनी शपथपत्रात नमूद केले आहे. तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेली विधाने नोटीसमध्ये लिहलेला मजकूर व दिनांक 22.09.2011 रोजीच्या तक्रारदारांच्या शपथपत्रात नमूद केलेल्या मजकूरामध्ये खूप विसंगती दिसून येते. तक्रारदारांनी तक्रारीत, दिनांक 09.05.2011 रोजीच्या नोटीसीत 32 बॅग ज्वारीचे बियाणे 10 एकर मध्ये पेरणी केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच तक्रारदारांनी सदरची बाब पंचासमक्ष सांगितल्या बाबत कृषी अधिका-यांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद केले आहे. तक्रारदारांनी एकरी 5 किलो प्रमाणे 10 एकरमध्ये 50 किलो ज्वारीचे बियाणाची पेरणी केल्याबाबत शपथपत्रात नमूद केले आहे. गैरअर्जदार 1 बियाणे उत्पादक कंपनीने उत्पादीत केलेले सांकेतीक क्रमांक एम.एच.35-1 या वाणाचे लॉट क्रमांक 53 मधील ज्वारीचे बियाणे सदोष असल्याबाबत सदरील तक्रार दाखल झालेली असून कृषी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी केलेल्या पंचनाम्या नूसार सदरच्या बियाणात कोणत्या प्रकारचा दोष आहे या बाबत खूलासा होत नाही. तक्रारदारांनी पेरलेल्या बियाणाची उगवण क्षमता चांगली होती हे पिकाची वाढ 7- 8 फूट पर्यंत झालेली असल्यामुळे स्पष्ट होते. गैरअर्जदार 1 यांनी उत्पादीत केलेले ज्वारीचे बियाणे कणसाच्या आकारावरुन व दाणे कमी लागल्या वरुन सदोष असल्याचे ठरवणे उचित होणार नाही. पिकाच्या बाहय निरीक्षणावरुन बियाणे सदोष असल्याबाबत निष्कर्ष काढता येत नाही, याबाबतचा निष्कर्ष बियाण्याची प्रयोगशाळेतील चाचणीवरुन ठरविता येतो. कणसाचा आकार हा पिकाच्या मशागतीवर हवामानावर, पाणी व्यवस्थापनावर, जमीनीच्या दर्जावर, खतांवर तसेच इतर नैसर्गिक घटकावर अवलंबून असतो. तसेच कणसात कमी दाणे लागणे ही बाब पिकास मिळालेल्या पोषक द्रव्यांवर व वातावरणावर अवलंबून असते. पंचनाम्यात नमूद केल्या प्रमाणे तक्रारदारांच्या पिकावर अल्प प्रमाणात मावा किडीचा प्रादूर्भाव झाल्याचे नमूद केले आहे. तसेच तक्रारदारांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रतिएकर 4 किलो बियाणे पेरलेले नसून 10 एकर मध्ये 128 किलो बियाणे पेरले आहेत. आवश्यकतेपेक्षा जास्त बियाणाची पेरणी झालेली असल्यामुळे कणसात कमी दाणे भरले असण्याची शक्यता दिसून येते. अशा परिस्थितीत पिकाच्या बाहय निरिक्षणावरुन बियाणे सदोष असल्याचा निष्कर्ष काढणे उचित होणार नाही असे न्याय मंचाचे मत आहे. बियाणाच्या दर्जाबाबत, सदोष पणा बाबतचा निष्कर्ष बियाणे प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतरच ठरवता येतो. सदर प्रकरणात बियाणे तपासणी अहवाल नाही. तसेच तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुनही बियाणे सदोष असल्याची बाब सिध्द् होत नाही. असे न्याय मंचाचे मत आहे. सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | |