नि. 18
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1985/2009
-------------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 17/07/2009
तक्रार दाखल तारीख : 21/07/2009
निकाल तारीख : 22/03/2012
----------------------------------------------------------------
श्री श्रीकांत किसनराव शिंदे
वय वर्षे 29, धंदा – शेती
रा.मु.पो. शिंदेवाडी (मांगरुळ) ता.शिराळा
जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
डिव्हीजनल मॅनेजर
दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि.
ब्रँच इस्लामपूर, सि.स.नं.3524/25/26
मेन रोड, इस्लामपूर 415 409
ता.वाळवा जि. सांगली .....जाबदार
तक्रारदारतर्फे : अॅड श्री.एस.एम.पोतदार
जाबदार तर्फे : अॅड श्री.एस.एस.पाटील
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
1. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या वाहनाच्या विमादाव्याबाबत दाखल केला आहे.
2. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीचे महिंद्रा मॅक्स जीप MH 09 -A 6631 या वाहनाचा विमा जाबदार यांचेकडे उतरविला होता. सदर विम्याचा कालावधी हा दि.31/1/2007 ते 30/1/2008 असा होता. सदर वाहनास विमा कालावधीमध्ये दि.22/12/2007 रोजी अपघात झाला. सदर अपघातामध्ये तक्रारदार यांचे वाहनाचे रक्कम रु.1,50,000/- चे नुकसान झाले. सदर अपघातानंतर तक्रारदार यांनी जाबदार यांचे सर्व्हेनंतर रक्कम रु.1,50,000/- खर्च करुन वाहन दुरुस्त करुन घेतले व जाबदार यांचेकडे विमाप्रस्ताव दाखल केला. जाबदार यांनी दि.20/6/2008 रोजीच्या पत्राने तक्रारदारचा विमादावा लिमिटेशन अॅज टू यूज या तांत्रिक कारणास्तव नाकारला. जाबदार यांनी दिलेल्या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज विमा दाव्याची रक्कम रु.1,50,000/- मिळावी या प्रमुख मागणीसाठी व इतर तदानुषंगिक मागणीसाठी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.5 चे यादीने 2 कागद दाखल केले आहेत.
3. जाबदार यांनी याकामी हजर होवून नि.12 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये पॉलिसीबाबतचा मजकूर मान्य केला आहे. तक्रारदार यांनी त्यांचे वाहनाचा विमा स्वत:च्या वापराकरिता उतरविला होता. पॉलिसीमधील अटी व शर्तीनुसार वाहन हे निनाई देवी सहकारी साखर कारखाना कोकरुड यांना भाडेतत्त्वावर दिले होते. वाहनाचा विमा खाजगी कारणासाठी उतरविला असताना सदरचे वाहन भाडेतत्तवावर दिल्यामुळे पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग होतो त्यामुळे तक्रारदार यांचा विमादावा मंजूर होणेस पात्र नाही. जाबदार यांनी अपघाताबाबतचा मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा योग्य त्या कारणाने नाकारला असल्यामुळे तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी नमूद केले आहे.
4. तक्रारदार यांनी तक्रारअर्ज दाखल केलेनंतर तक्रारदार हे अनेक तारखांना गैरहजर राहिले. तसेच तक्रारदार यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही अथवा लेखी युक्तिवादही दाखल केला नाही. जाबदार यांनी नि.14 ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व नि.16 च्या यादीने पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. जाबदार यांनी नि.17 च्या अर्जाने एक कागद दाखल केला आहे. तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादाचे दरम्यान उपस्थित राहिले नाहीत. जाबदार यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला.
5. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व जाबदार यांचे विधिज्ञांचा लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे का हे ठरविणे गरजेचे ठरते. जाबदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये तसेच म्हणण्यामध्ये पॉलिसीबाबतचा मजकूर मान्य केला आहे. तथापि अपघाताबाबतचा मजकूर अमान्य केला आहे. सदर वाहनास अपघात झाला नाही असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जासोबत अपघाताबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही अथवा सदर वाहनाच्या दुरुस्तीसाठी रक्कम रु.1,50,000/- खर्च आला हे दर्शविण्यासाठीही कोणताही पुरावा दाखल केला नाही. जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांचे वाहन त्यांनी निनाईदेवी साखर कारखान्यास भाडयाने दिले होते असे आपल्या म्हणण्यामध्ये कथन केले आहे व जाबदार यांनी त्यासोबत नि.13 ला स्वत:चे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच जाबदार यांनी नि.17 च्या अर्जाने वर्दी जबाबाची प्रत दाखल केली आहे. सदर वर्दी जबाबामध्ये तक्रारदार यांचे ड्रायव्हर शिवाजी रघुनाथ शिंदे यांनी सदर वाहनास अपघात झाल्याचे कोकरुड पोलीस स्टेशनला कळविले आहे व सदर वर्दी जबाबामध्ये सदर वाहन हे निनाईदेवी सहकारी साखर कारखाना या कारखान्यास भाडयाने दिल्याचे नमूद केले आहे. सदर वर्दी जबाबाचे अवलोकन करता सदर वर्दी जबाबामध्ये वाहनाचा नंबर MH-09-AB-6631 असा नमूद आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारअर्जातील वाहनाच्या क्रमांकामध्ये व वर्दी जबाबातील वाहनाच्या क्रमांकामध्ये तफावत दिसून येते. तसेच सदरचा वर्दी जबाब ही झेरॉक्सप्रत आहे त्यामुळे सदरचे वाहन भाडयाने दिलेले होते हे ठरविण्यासाठी वर्दी जबाब ग्राहय मानता येणार नाही. जाबदार यांनी नि.16/1 वर पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. सदर पॉलिसीवर वाहनाचा क्रमांक हा MH 10-9- 6631 असा नमूद आहे. तक्रारदार यांनी प्रस्तुत प्रकरणी पॉलिसीकव्हरनोटची झेरॉक्सप्रत दाखल केली आहे. त्यामध्ये वाहनाचा क्रमांक MH-09-A-6631 असा नमूद आहे. दोन्ही दाखल पॉलिसीमधील वाहनाच्या क्रमांकामध्ये तफावत आढळून येते. तक्रारदार यांनी पॉलिसीमध्ये व तक्रारअर्जामध्ये दिलेल्या स्वतच्या पत्त्यामध्येही साम्य दिसून येत नाही. पॉलिसीमध्ये तक्रारदार यांचा पत्ता कोल्हापूर जिल्हयातील नमूद करण्यात आला आहे व तक्रारअर्जामध्ये तक्रारदार यांचा पत्ता सांगली जिल्हयातील नमूद करण्यात आला आहे. या सर्व बाबी विचारात घेता तक्रारदार यांनी आपल्या वाहनाच्या अपघाताच्या संदर्भाने योग्य तो कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणलेला नाही. मंचासमोर दाखल असलेल्या कागदोपत्री पुराव्यावरुन वाहनाच्या क्रमांकामध्ये व पत्त्यामध्ये अनेक तफावती आहेत. तक्रारदार हे कोणताही पुरावा सादर करण्यासाठी मंचासमोर उपस्थित राहिलेले नाहीत. अपूर्ण व त्रुटीयुक्त कागदपत्रांच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढणे संयुक्तिक ठरणार नाही. सबब तक्रारअर्ज काढून टाकणे संयुक्तिक ठरेल या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहेत.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांक: 22/03/2012
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.