निकालपत्र मिलिंद सा.सोनवणे,अध्यक्ष यांनी पारीत केले
नि का ल प त्र
पारित दिनांकः30/3/2015
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.स.कायदा’) च्या कलम 12 नुसार प्रस्तूत तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांचे वडील वसंत पांडुरंग माळी हे शेतकरी होते. त्यांच्या नावावर पालखेड येथे गट क्र.1138 ही शेतजमीन होती. दि.17/1/2013 रोजी रस्ता अपघातात त्यांचा मृत्यु झाला. अंबड पोलीस ठाण्यात त्याबाबत गु.र.नं.17/13 अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यांचा शासन निर्णयाप्रमाणे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रु.1,00,000/- चा विमा होता. त्यांनी तालुका कृषी अधिकारी, निफाड यांच्यामार्फत सामनेवाल्यांकडे विमा दावा केला. मात्र सामनेवाला क्र.1 यांनी दि.23/9/2014 रोजी मुदत बाह्य व अपुर्ण कागदपत्र असे कारण देवून विमा दावा परत देवून सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावी. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- अर्जाचा खर्च रु.5000/- सह मिळावेत, अशा विनंती त्यांनी मंचाकडे केलेली आहे.
3. तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि.5 लगत तालुका कृषी अधिकारी यांचे पत्र, क्लेम फॉर्म नं.1 व 2, खाते उतारा, 7/12 उतारा, फेरफार पत्रक, प्रतिज्ञा प्रपत्र, मृत्यु प्रमाणपत्र, फिर्याद, पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पी.एम.रिपोर्ट इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाला क्र.1 यांनी जबाब नि.11 दाखल करुन प्रस्तूत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, विमा पॉलिसीच्या अटी शर्तीनुसार विमा दावा घटनेपासून 90 दिवसांच्या आत संबधीत खात्याकडे करणे आवश्यक आहे. तक्रारदार यांचा दावा मुदतबाह्य होता व तक्रारदार यांनी आवश्यक ती कागदपत्रे दिलेली नाहीत. तसेच मयताकडे मोटारसायकल चालविण्याचे व्हॅलीड व इफेक्टीव्ह ड्रायव्हींग लायसन्स नव्हते. या कारणाने विमा पॉलिसीच्या अटी शर्तीनुसार नाकारलेला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
5. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या बचावापुष्टयर्थ नि.18 लगत विमापॉलिसी सर्टिफाईड नक्कल, अॅग्रीमेंटची कॉपी इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6. सामनेवाला क्र.2 नोटीस मिळूनही हजर न झाल्याने प्रस्तूत तक्रार अर्ज त्यांच्या विरुध्द एकतर्फा चालविण्यात आला.
7. सामनेवाला क्र.3 यांनी जबाब/पत्र नि.12 अ दाखल करुन प्रस्तूत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, तक्रारदार यांच्या प्रस्तावाची छाननी केली असता त्यासोबत 7/12 व इतर कागदपत्रे जोडण्यात आलेली नव्हती. मृत्यु झाल्यापासून 90 दिवसांचे आत विहीत नमुन्यात मुळ कागदपत्रांसह तीन प्रतीत प्रस्ताव दाखल करणे आवश्यक असतांना 8 महिने उशीराने सदर प्रस्ताव सादर केलेला आहे. अपुर्ण कागदपत्रे व मुदतबाह्य विमा प्रस्ताव असल्याने तो कंपनी स्विकारत नसल्याने तक्रारदार यांना दि.25/9/2014 रोजीच्या पत्रान्वये परत करण्यात आलेला आहे.
8. सामनेवाला क्र.3 यांनी त्यांच्या बचाव/पत्रासोबत कार्यालयाचे पत्र, शेतकरी अपघात विमा योजनेची मार्गदर्शक सुचना इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
9. तक्रारदार यांचे वकील अॅड.थेटे व सामनेवाला क्र.1 यांचे वकील अॅड.अभ्यंकर यांचे युक्तीवाद ऐकण्यात आलेत.
10. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा
देण्यात कमतरता केली काय? सामनेवाला क्र.1 बाबत
होय.
2. आदेशाबाबत काय? अंतीम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
11. सामनेवाला क्र.1 यांचा असा युक्तीवाद आहे की, विमा पॉलिसीच्या अटी शर्तीनुसार विमा दावा घटनेपासून 90 दिवसांच्या आत संबधीत खात्याकडे करणे आवश्यक आहे. तक्रारदार यांचा दावा मुदतबाह्य होता व तक्रारदार यांनी आवश्यक ती कागदपत्रे दिलेली नाहीत. या कारणाने विमा पॉलिसीच्या अटी शर्तीनुसार नाकारलेला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. मात्र त्यांच्या युक्तीवादाशी आम्ही सहमत नाहीत. शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र.8 मध्ये ‘समर्थनीय कारणांसह 90 दिवसांनतर प्राप्त होणारे विमा प्रस्ताव विमा कंपनीने स्विकारावेत. प्रस्ताव विहीत मुदतीत सादर केले नाहीत, या कारणास्तव विमा कंपन्यांना प्रस्ताव नाकारता येणार नाहीत’, असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तसेच मा.राज्य आयोगाने वेळोवेळी दिलेल्या न्यायनिर्णयात सदर 90 दिवसांचा कालावधी हा मॅंडेटरी नसल्याबाबतचा निर्वाळा दिलेला आहे. तसेच सामनेवाला क्र.1 यांचा असाही बचाव आहे की, मयताकडे मोटारसायकल चालविण्याचे व्हॅलीड व इफेक्टीव्ह ड्रायव्हींग लायसन्स नव्हते. मात्र तक्रारदार यांनी नि.5 लगत दाखल केलेले फिर्याद, क्राईम डिटेल्स फॉर्म, पंचनामा ही कागदपत्रे स्पष्ट करतात की, तक्रारदार यांच्या पतीच्या मोटारसायकलला पाठी मागून येणा-या ट्रकने ठोस दिल्याने सदरचा अपघात झालेला आहे. सदर अपघातास तक्रारदार यांचे वडील हे कारणीभूत नाहीत. त्यामुळे सामनेवाला यांचा सदरचा बचाव सुध्दा स्विकारार्ह वाटत नाही. परिणामी तक्रारदारांचा विमा दावा तांत्रीक कारणाने न देवून सामनेवाला क्र.1यांनी सेवा देण्यात कमतरता केलेली आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही सामनेवाला क्र.2 व 3 यांच्या बाबत नकारार्थी व सामनेवाला क्र.1 यांच्याबाबत होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
8. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांचा विमा दावा तांत्रीक कारणास्तव न देवून सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- तक्रारदाराचा विमा दावा परत केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.25/8/2014 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.7000/- व अर्ज खर्चापोटी रु.3000/- मिळण्यास देखील तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे. सामनेवाला क्र.2 व 3 यांची भुमिका विनामुल्य असल्याने त्यांच्या विरुध्द कोणतेही आदेश पारीत केले जावू शकत नाहीत त्यामुळे सामनेवाला क्र.2 व 3 विरुध्दची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाला क्र.1 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/-, दि.25/8/2014 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह परत करावेत.
2. सामनेवाला क्र.1 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांने तक्रारदारास मानसिक व आर्थीक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रु.7000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.3000/- अदा करावेत.
3. सामनेवाला क्र.2 व 3 यांच्या विरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते.
4. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षास विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक
दिनांकः30/03/2015