(निकालपत्र मिलिंद सा.सोनवणे, अध्यक्ष यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.स.कायदा’) च्या कलम 12 नुसार प्रस्तूत तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांचे पती राजेंद्र/राजु पुंजाराम रहाणे हे शेतकरी होते. त्यांच्या नावावर येथे गट क्र.266/2अ ही शेतजमीन होती. दि.19/3/2013 रोजी रस्ता अपघातात त्यांचा मृत्यु झाला. नांदगाव पोलीस ठाण्यात त्याबाबत गु.र.नं.34/2013 अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यांचा शासन निर्णयाप्रमाणे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रु.1,00,000/- चा विमा होता. दि.7/7/2013 रोजी त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत सामनेवाल्यांकडे विमा दावा केला. मात्र अद्यापपावेतो सामनेवाला यांनी योजनेअंतर्गत देय असलेली रक्कम दिलेली नाही. मुळात कोणतेही कारण नसतांना सामनेवाल्यांनी त्यांचा विमा दावा न देवून सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावी. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- अर्जाचा खर्च रु.5000/- सह मिळावेत, अशा विनंती त्यांनी मंचाकडे केलेली आहे.
3. तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि.5 लगत कृषी अधिका-यांकडे केलेला अर्ज, 7/12 उतारा, हक्क पत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, मृत्यु प्रमाणपत्र, एफ.आय.आर., घटना स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पी.एम.रिपोर्ट इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाला यांनी जबाब नि.11 दाखल करुन प्रस्तूत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, तक्रारदारांनी दाखल केलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मयताचे नाव राजेंद्र पुंजाराम रहाणे ऐवजी राजु पुंजाराम रहाणे असे दिसून आल्यामुळे दि.27/2/2014 रोजी त्यांनी तक्रारदारांना नावातील फरकाबाबत खुलासा देण्याचे सांगितले होते. तक्रारदारांनी तो न केलेला नाही. त्यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
5. तक्रारदार यांचे वकील अॅड.थेटे व सामनेवाला यांच्या वकील अॅड.सुराणा यांचे युक्तीवाद ऐकण्यात व विचारात घेण्यात आलेत.
6. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा
देण्यात कमतरता केली काय? होय.
2. आदेशाबाबत काय? अंतीम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
7. तक्रारदारांनी दस्तऐवज यादी नि.5/4 ला त्यांच्या पतीचा शाळा सोडल्याचा दाखला दाखल केलेला आहे. त्यात त्याचे नाव राजु पुंजाराम रहाणे असे नमूद करण्यात आलेले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या मृत्यु प्रमाणपत्र नि.5/5 एफ.आय.आर. नि.5/6 व इतर अपघाताच्या संदर्भातील कागदपत्रांमध्ये त्यांच्या पतीचे नाव राजेंद्र पुंजाराम रहाणे असे लिहीण्यात आलेले आहे. सामनेवाल्यांनी तक्रारदारांना त्याबाबत खुलासा करायला सांगितला व तक्रारदारांनी तो न केल्यामुळे त्यांच्या विमा दाव्यावर काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे सादर कागदपत्रांवरुन दिसून येते. आमच्या मते, सामनेवाल्यांनी घेतलेला पवित्रा अतीशय तांत्रीक स्वरुपाचा आहे. सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन राजु व राजेंद्र ही एकाच व्यक्तीचे नाव असल्याचे स्पष्ट दिसत असल्यावर देखील सामनेवाल्यांनी तक्रारदारांच्या विमा दाव्यावर कोणताही निर्णय न घेणे ही सेवेतील कमतरता आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
8. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, सामनेवाला यांनी तक्रारदारांचा विमा दावा तांत्रीक कारणास्तव काहीही निर्णय न घेता प्रलंबीत ठेवून सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- प्रस्ताव केल्याच्या 1 महिन्यानंतरची तारीख म्हणजेच दि.7/8/2013 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.7000/- व अर्ज खर्चापोटी रु.3000/- मिळण्यास देखील तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/-, दि.7/3/2013 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह परत करावेत.
2. सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांने तक्रारदारास मानसिक व आर्थीक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रु.7000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.3000/- अदा करावेत.
3. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षास विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक
दिनांकः24/03/2015