(निकालपत्र प्रेरणा रा.काळुंखे-कुलकर्णी यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.स.कायदा’) च्या कलम 12 नुसार प्रस्तूत तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांचे पती शांताराम कचरु हिरे यांचा दि.18/5/2013 रोजी रस्ता अपघातात मृत्यु झाला. मृत्युसमयी ते शेतकरी होते. मयताच्या नावावर पंचाळे येथे गट क्र.722 ही शेतजमीन होती. त्यांनी तालुका कृषी अधिकारी, सिन्नर यांच्यामार्फत दि.20/9/2013 रोजी सामनेवाल्यांकडे विमा प्रस्ताव पाठविला होता. मात्र सामनेवाल्यांनी विमा दाव्याची रक्कम न देवून सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावी. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- अर्जाचा खर्च रु.5000/- सह मिळावेत, अशा विनंती त्यांनी मंचाकडे केलेली आहे.
3. तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि.5 लगत क्लेम फॉर्म, विमा प्रस्तावाच्या पुर्ततेचे पत्र, पुर्तता केल्याची तालुका कृषी अधिकारी यांची पाहोच, 7/12 उतारा, गाव नमुना नं.6 क, फेरफार नोंद, प्रतिज्ञापत्र, मृत्यु दाखला, ड्रायव्हींग लायसन्स इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाला यांनी जबाब नि.11 दाखल करुन प्रस्तूत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, तक्रारदार यांना दि.3/2/2014 रोजी पत्र देवून मयताच्या मृत्यु पुर्वीचे फेरफार पत्र व 7/12 उतारा यातील भुमापन क्रमांक एकच आहे किंवा नाही, याची शहानिषा होण्यासाठी त्या कागदपत्रांची मागणी केली. ज्या व्यक्तीबद्दल क्लेम केला जातो त्या व्यक्तीचे नाव 7/12 उता-यावर असले पाहीजे. मात्र मृत्युच्या वेळी मयताच्या नावावर शेतीला नाव लागलेले दिसत नव्हते. मागणी करुनही तक्रारदारांनी कागदपत्रांची कोणतीही पुर्तता केली नाही. परिणामी सामनेवाला यांनी सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
5. तक्रारदार यांचे वकील अॅड.थेटे व सामनेवाला यांचे वकील अॅड.सुराणा यांचे युक्तीवाद विचारात घेण्यात आलेत.
6. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा
देण्यात कमतरता केली काय? होय.
2. आदेशाबाबत काय? अंतीम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
7. तक्रारदाराच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यु झाला ही बाब विवादीत नाही. सामनेवाला यांचे वकील अॅड.सुराणा यांचा असा युक्तीवाद आहे की, तक्रारदारांनी विमा प्रस्तावासोबत दिलेल्या कागदपत्रांवरुन मयताच्या मृत्यु पुर्वीचे फेरफार पत्र व 7/12 उतारा यातील भुमापन क्रमांक एकच आहे किंवा नाही, याची शहानिशा होण्यासाठी सामनेवाल्यांनी तक्रारदारांकडे त्या कागदपत्रांची मागणी केली. तक्रारदारांनी त्या कागदपत्रांची पुर्तता केली नाही, त्यामुळे विमा प्रस्तावासोबत दिलेल्या कागदपत्रांवरुन मयताचे शेतीला नाव लागलेले दिसत नव्हते. त्यामुळे मयत शेतकरी असल्याचे स्पष्ट होत नसल्याने तक्रारदारास क्लेम देता आला नाही. परिणामी सामनेवाला यांनी सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. मात्र त्यांच्या युक्तीवादाशी आम्ही सहमत नाहीत. सामनेवाल्यांना विमा प्रस्तावासोबत मिळालेल्या 7/12 उतारा व फेरफार पत्रकावरुन सामनेवाले त्यांच्या सर्व्हेयरमार्फत भुमापन क्रमांकाची शहानिशा करु शकत असतांनाही त्यांनी ती जबाबदारी पार पाडलेली नाही. तक्रारदारांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांवरुन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारदारांनी सामनेवाल्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे कागदपत्रांची पुर्तता केल्याचे स्पष्ट होते. तसेच मयताच्या नावाने पंचाळे शिवारातील भुमापन क्र.722 ही शेतजमीन असून मयत शेतकरी असल्याचे सादर पुराव्यांवरुन स्पष्ट होते. परिणामी सामनेवाल्यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम न देवून सेवा देण्यात कमतरता केलेली आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
8. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम न देवून सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- तक्रार दाखल तारखेपासून म्हणजेच दि.9/1/2015 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्ज खर्चापोटी रु.3000/- मिळण्यास देखील तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/-, दि.9/1/2015 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह परत करावेत.
2. सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांने तक्रारदारास मानसिक व आर्थीक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.3000/- अदा करावेत.
3. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षास विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक
दिनांकः24/03/2015