निकाल
दिनांक- 13.09.2013
(द्वारा- श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्या)
तक्रारदार श्रीमती कांताबाई लिंबाजी सालुगडे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत लाभ व नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदाराचे पती कै.लिंबाजी हे जवाहर साखर कारखाना हुपरी ता.हातकणंगले येथे ऊस तोडणीसाठी गेलेले होते, दि.7.3.2010 रोजी काम करत असताना ते ऊसाने भरलेल्या बैलगाडीपुढे बैल धरुन जात असताना बैलगाडीच्या दांडयाचा पुढील टोक त्यांच्या मानेवर लागून ते खाली पडून बेशुध्द झाले. त्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर दि.07.03.2010 रोजीच मृत्यू झाला.तक्रारदाराच्या पतीच्या नांवे भंडारवाडी येथे शेत जमिन आहे. तक्रारदाराने पतीच्या अपघाती मृत्यूबददल विमा प्रस्ताव सामनेवाले क्र.3 कडे आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह (मृत्यू प्रमाणपत्र, पोलिस स्टेशनचा पंचनामा, फिर्याद, पोस्ट मार्टम रिपोर्ट, 7/12 चा उतारा, 8-अ उतारा, 6-क प्रमाणपत्र इत्यादी दि.4.6.2010 रोजी दाखल केले. सामनेवाले क्र.3 कडे प्रस्ताव दाखल केल्यापासून सामनेवाले क्र.1 ते 5 यांनी विमा रक्कम देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी ती दिली नाही. तक्रार दाखल करण्यास कारण दि.15.02.2011 रोजी घडले.तक्रारदाराची मागणी आहे की, विम्याची रक्कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासाची रककम रु.10,000/- प्रवास खर्चापोटी रु.1,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- एकूण रक्कम रु.1,16,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.2यांनी त्यांचा जवाब दाखल केला आहे. तक्रारदाराचे पतीचे अपघाती निधन दि.7.3.2010 रोजी झाले. दावा तालुका कृषी अधिकारी बीड यांचेकडे सादर करणे आवश्यक होते. त्यांना विमा दाव्या बाबत काहीही कळविले नाही.सामनेवाले क्र.2 यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.4 यांनी त्यांचा जवाब दाखल केला आहे.तक्रारदाराने विमा दावा संपूर्ण कागदपत्रासह दाखल केलेला नाही. त्यांचे काम कागदपत्र दाखल झाल्यानंतर त्यांची तपासणी करणे व पूर्ण कागदपत्र असल्यास तो दावा इन्शुरन्स कंपनीकडे दाखल करणे. त्यांचे सेवेत कोणतीही त्रुटी नाही.
सामनेवाले क्र.5 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदाराने योग्य पुरावा दाखल केला नाही. तक्रारदाराने हे सिध्द करावे की, त्यांचे पती शेतकरी होते तसेच त्यांचा मृत्यू हा अपघाताने झाला आहे.शर्ती व अटीप्रमाणे तक्रारदाराने सर्व कागदपत्रासह दावा दाखल करणे आवश्यक आहे.तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही.तक्रारदाराने दावा योग्य एजन्सी मार्फत दाखल केलेला नाही.दावा प्रिमॅच्यूअर आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराचा दावा खारीज केलेला नाही.सामनेवाले यांचे सेवेत कोणतीही त्रूटी नाही.तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रार ही वेळेमध्ये दाखल केलेली नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र, कागदपत्राची अवलोकन केले. सामनेवाले क्र.1,2 व 3 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व सामनेवाले क्र.1 व 3 यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्र यांचे अवलोकन केले. न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे कागदाची परिपुर्तता
केली आहे ही बाब सिध्द केली आहे काय ? नाही.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये
कसूर केला आहे काय ? नाही.
3. तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 4 ः-
तक्रारदार व त्यांचे वकील सुनावणीच्या वेळी गैरहजर होते. तक्रारदारांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र दाखल केले. तसेच तक्रारदारांनी तहसीलदाराकडे दाखल केलेले अर्ज, 8-अ चा उतारा, 7/12 चा उतारा मृत्यू प्रमाणपत्र, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल दाखल केले आहेत.
सामनेवाले क्र.1 व 3 हे हाजीर झाले. त्यांने आपण लेखी म्हणणे दाखल केले. त्यांच्या कथनेनुसार तक्रारदारांनी जो प्रस्ताव दाखल केला होता. त्यामध्ये क्लेम फॉर्म 1,2,3,4 हे सादर करण्यात आले नाही व सदर त्रूटी बददल तक्रारदार यांना कळविण्यात आले होते. तरी देखील तक्रारदारांनी अद्यापपावेतो मुळ दावा अर्ज सादर न केल्याने पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला नाही.
सामनेवाले क्र.2 यांचे कथन असे की, तक्रारदार यांने सदर प्रस्ताव हे तालुका कृषी अधिकारी बीड यांच्याकडे पाठविणे गरजेचे आहे.
सामनेवाले क्र.4 हे हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्यांच्या कथनेनुसार त्यांना सदर प्रस्ताव मिळालेला नाही. म्हणून त्यांना प्रस्तावाबददल काहीही सांगता येणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
सामनेवाले क्र.5 हे युनायटेड इन्शुरंन्स कंपनी हे हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्यांच्या कथनेनुसार तक्रारदार यांनी सदर प्रस्ताव ही रितसर दाखल केला नाही व त्यांना सामनेवाले क्र.4 मार्फत प्रस्ताव मिळाला नाही. प्रस्ताव जोपर्यत मिळत नाही तोपर्यत सदर प्रस्ताव हे मंजूर करण्यात येत नाही. म्हणून आम्ही तक्रारदारास कोणतीही सेवा देण्यास कसूर केला नाही.म्हणून तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
वर नमुद केलेला सामनेवाले क्र.1,2,3,4 व 5 यांचे कथन व सामनेवाले क्र.5 विमा कंपनी यांचे वकील श्री.जाधव यांनी केलेला युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, तक्रारदार श्रीमती कांताबाई लिंबाजी सालगुडे यांनी सामनेवाले क्र. 1 व 3 यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सदरील प्रस्तावात कागदपत्राची त्रुटी असल्याबाबल तक्रारदारास कळविले आहे. तक्रारदार यांना कळवूनही त्यांनी आजपर्यत संबंधीत कागदपत्र दाखल केले नाहीत. त्यामुळे सदरील प्रस्ताव पुढे पाठवता आला नाही. सामनेवाले क्र.4 यांचा पुरावा पाहता त्यांना तक्रारदार यांचा प्रस्ताव मिळाला नाही असे निदर्शनास येते. सामनेवाले क्र.4 यांच्याकडे तो प्रसताव प्राप्त न झाल्यामुळे तो पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित केला नाही. सामनेवाले क्र.5 यांचा पुरावा पाहता त्यांना तक्रारदारांचा प्रस्ताव मिळालेला नाही.
वर नमुद केलेल्या पुराव्याची विचार करता तक्रारदार यांना आवश्यक त्या कागदपत्रांची परिपूर्तता न केल्यामुळे तालुका कृषी अधिकारी यांनी तो प्रस्ताव पुढे पाठविला नाही. तसेच तक्रारदार यांनी कागदपत्रांची पुर्तता करणे कामी कळवूनही त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केली नाही. सबब, सामनेवाला यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी ठेवली आहे काय ही बाब सिध्द होत नाही. तसेच तक्रारदार यांचेही कायदे अंतर्गत कर्तव्य आहे की, प्रस्तावासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडणे व मागणी केले असता त्यांची पुर्तता करणे परंतु तक्रारदार यांनी कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे प्रस्ताव पुढे पाठवता आला नाही.
वर नमुद केलेला पुरावा व संपूर्ण कागदपत्रांचे अवलोकन केले असता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यास त्रूटी केली आहे. ही बाब सिध्द होत नाही. तक्रारदार यांना कळवूनही कागदपत्रांची परिपूर्तता न केल्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही असे मंचाचे मत आहे.
सबब, मुददा क्र.1 ते 4 चे उत्तर नकारार्थी देण्यात आले.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
जयंत पारवेकर
लघुलेखक