जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 98/2011 तक्रार दाखल तारीख –02/07/2011
रुक्मीणीबाई भ्र. गोरख बारगजे
वय 55 वर्षे धंदा घरकाम .तक्रारदार
रा.गोमळवाडा ता.शिरुर (का.) जि.बीड
विरुध्द
1. महाराष्ट्र शासन मार्फत
जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय,
नगर रोड, बीड ता.जि.बीड सामनेवाला
2. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
मंडल कार्यालय क्र.2 अंबिका हाऊस
शंकर नगर चौक,नागपूर -440 010
3. व्यवस्थापक, कबाल इन्शुरन्स कंपनी लि.
एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्स, टाऊन सेंटर
राजमा जिजाऊ मिशनच्या खाली,सिडको,औरंगाबाद.
4. तालुका कृषी अधिकारी,
कृषी अधिकारी कार्यालय, शिरुर कासार
ता.शिरुर कासार जि.बीड
5. तहसीलदार,
तहसील कार्यालय, शिरुर (का.)
ता.शिरुर (का.)जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.बी.ई.येळे
सामनेवाला क्र.1 तर्फे स्वतः
सामनेवाला क्र.3 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.4 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.5 तर्फे ः- अँड.ए.पी.कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती नामे गोरख कारभारी बारगजे शेतकरी होते.त्यांची गोमळवाडा येथे गट नंबर 103 व 442 मध्ये 18 आर जमिन होती. दि.17.4.2010 रोजी तक्रारदाराचे पतीचे उष्माघाताने दहिवंडी शिवार (फॉरेस्टमध्ये ) मृत्यू झाला. त्यांचा प्रस्ताव तक्रारदाराने तालूका कृषी अधिकारी शिरुर कासार यांचेकडे सर्व कागदपत्राची पूर्तता करुन दि.3.6.2010 रोजी दाखल केला.
सदर कार्यालयाने सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.3 कडे पाठविला. सामनेवाला क्र.3 ने विमा कंपनीने दि.31.12.2010 रोजी तक्रारदाराचे पती उन्हामूळे हदयाच्या धक्क्याने मरण पावले, अपघाताने नाही. म्हणून दावा देता येत नाही असे कळविले व तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला आहे.
तक्रारदार खालील प्रमाणे नूकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
1. विम्याची रक्कम रु.1,00,000/-
2. मानसिक त्रासापोटी रु. 10,000/-
3. तक्रारीचा खर्च व इतर रु. 5,000/-
एकूण रु.1,15,000/-
विनंती की, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे नूकसान भरपाई रु.1,15,000/- व्याजासह देण्यात यावेत.
सामनेवाला क्र.1 हे प्रकरणात नोटीस मिळूनही हजर नाही म्हणून त्यांचे विरुध्द दि.3.11.2011 रोजी एकतर्फा प्रकरण चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.4.10.2011 रोजी दाखल केला.खुलाशात तक्रारीत सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. जेव्हा आयूक्त शेती महाराष्ट्र शासन यांचेशी येथे सामनेवाला यांचा करार झालेला असल्याने संबंधीत शेतकरी यांनी या सामनेवालाकडे विमा रक्कमेचा हप्ता भरला नाही. सामनेवाला मध्ये व शेतक-यामध्ये करार नाही. त्यामूळे शेतकरी या जिल्हा मंचात दाद मागण्यास पात्र नाहीत. दावा दाखल करण्यासाठी कागदपत्र अपूरे होते. ते दि.14.10.2010 पर्यत दाखल केलेला नव्हते.
तक्रारीत आयूक्त शेती महाराष्ट्र शासन यांना समाविष्ट न केल्याने तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू हा उन्हामुळे हदयविकाराचे झटक्याने झालेला असल्याने तो अपघात नाही. म्हणून सामनेवाला यांनी दावा नाकारला आहे. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.3यांनी त्यांचा खुलासा दि.29.8.2011 रोजी पोस्टाद्वारे दाखल केला आहे. श्री.गोरख कारभारी बारगजे रा. गोमळवाडा ता.शिरुर कासार यांचा अपघात दि.17.4.2010 रोजी झाला. त्यांचा दावा दि.7.7.2010 रोजी मिळाला तो यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नागपूर कडे दि.1.9.2010 रोजी पाठविला. विमा कंपनीने दाव्याचा दि.21.12.2010 रोजीचे पत्राने नामंजूर केला.
सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचा खुलासा दि.3.11.2011 रोजी दाखल केला. खुलाशात त्याचे विरुध्दचे सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. मा.जिल्हाधिकारी बीड ,जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी बीड हे तक्रारीस अनुसरुन मंजूर करणे हे या कार्यालयाचे अधिकार कक्षेत येत नाही. प्रस्ताव पाठविण्याचे कामी या कार्यालयाने चोखपणे बजावले आहे. त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी.
सामनेवाला क्र.5 यांचा खुलासा दाखल नाही.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 ते 5 चा खुलासा,सामनेवाला क्र.2 यांचे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.येळे व सामनेवाला क्र.2 यांचे विद्वान वकील श्री.जाधव यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदाराचे पती शेतकरी असल्याची बाब दाखल कागदपत्र 7/12 उतारा, 8-अ,6-क यावरुन स्पष्ट होते.
तक्रारदाराचे पतीचा मृत्यूहा उष्माघातामूळे झालेला आहे व त्या बबतचा प्रस्ताव तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह सामनेवाला क्र.2 कडे पाठविला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सदरचा प्रस्ताव हा मयत बारगजे यांचे मृत्यू उन्हामूळे हदयविकाराने झालेला आहे व तो अपघात नाही असे पत्र देऊन कळविले आहे.
या बाबत शवविच्छेदन अहवाल दाखल आहे. त्यात मृत्यूचे कारण उष्माघात (Cardio-respiratory failure due to sun stroke) मूळे हदयक्रिया बंद पडली आहे. उष्माघातामूळे हदयक्रिया बंद पडली. सदरची बाब ही अपघात या सदरात येत नाही काय या बाबत विचार करता अपघात या शब्दाची व्याख्या लक्षात घेता बाहेरील घटकामूळे शरीरास इजा झाली किंवा सदर झटक्यामूळे मृत्यू आल्यास तो अपघात होतो यात हदयक्रिया ही आपोआप बंद पडली नाही किंवा त्यांचे शरीरातील बिघाडामूळे किंवा आजारामूळे बंद पडली नाही तर ती उष्माघातामूळे बंद पडले आहे.त्यामुळे सदरची बाब निश्चितच अपघात मृत्यूमध्ये असे या न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचा दावा योग्य रितीने नाकारला असे याठिकाणी म्हणता येत नाही. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांचा दावा नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते. त्यामूळे सामनेवाला क्र.2 यांनी मयत गोरख बारगजे यांचे मृत्यूची रक्कम रु.1,00,000/- तसेच मानसिक त्रासाची रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मयत
गोरख बारगजे यांचे अपघाती मृत्यू दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून
एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.02.07.2011 पासून देण्यास सामनेवाला क्र.2 जबाबदार
राहतील.
4. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.5,000/-(अक्षरी रु. पाच हजार फक्त) आदेश
प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड