जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –32/2011 तक्रार दाखल तारीख –03/02/2011
सुमनबाई भ्र.बाळासाहेब औताडे
वय 40 वर्षे,धंदा घरकाम .तक्रारदार
रा.मु.सेलुअंबा ता.अंबाजोगाई जि.बीड
विरुध्द
1. महाराष्ट्र शासन मार्फत
जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय,नगर रोड,बीड
2. तहसिलदार,
तहसिल कार्यालय,अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड
3. आयुक्त (कृषी)
कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,पुणे-411 001
4. व्यवस्थापक, ..सामनेवाला कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि.
भास्करायण एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्स
टाऊन सेंटर जवळ, राजमाता जिजाऊ मिशनच्या खाली,
सिडको,औरंगाबाद
5. विभागीय व्यवस्थापक
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. फोर्ट मुंबई
विभागीय व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
हजारी चेंबर्स, स्टेशन रोड, औरंगाबाद.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.आर.राजपुत
सामनेवाले क्र. 1 व 2 तर्फे :- स्वतः
सामनेवाले क्र.3 तर्फे ः- स्वतः
सामनेवाले क्र.4 तर्फे ः- स्वतः
सामनेवाले क्र.5 तर्फे ः- अँड.एन.पी.वाघमारे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
मयत बाळासाहेब औताडे हे शेतकरी होते. तक्रारदार त्यांची पत्नी आहे. मयत बाळासाहेब यांचे नांवे मौजे सेलुअंबा ता.अंबाजोगाई शिवारात गट नंबर 219,220,221,224,225 मध्ये शेत जमिन आहेत. बाळासाहेब औताडे हे त्यांचे नौकरासह मोटार सायकलवर बसून कारखान्याकडून अंबाजोगाईस येत असताना समोरुन ट्रव्हल्स बस भरधाव वेगात आली व मयताचे मोटार सायकलव रस्त्याच्या बाजूला उभे असलेले रामराव बापूराव औताडे धडक लागून जखमी केले व त्यांच दिवशी बाळासाहेब मयत झाले. त्यांचे शवविच्छेदन झाले.
मयताचा नौकर धोडीराम भोसले यांनी ट्रव्हल्स चालका विरुध्द दि.06.02.2007 रोजी एस.आर.टी.आर दवाखाना अंबाजोगाई येथे फिर्याद दिली.त्या बाबत गु.र.नं.46/2007 कलम 279,338,304 (अ) भा.द.वि. प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन करण्यात आला.
मृत्यूनंतर तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 कडे योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करुन विमा रक्कम मिळण्यासाठी दि.14.08.2007 रोजी प्रस्ताव दाखल केला. सामनेवाला क्र.2 यांचेकडे प्रस्तावा बाबत चौकशी केली असताना त्यांनी नुकसान भरपाई दिली नाही.
सामनेवाला क्र.2 कडे दि.06.01.2011 रोजी जाऊन चौकशी केली असता,तूम्हास काय कार्यवाही करावयाची आहे, ती करा असे त्यांनी सांगितले. सामनेवाला यांनी तक्रारदारांना विम्याची रक्कम न देऊन दयावयाचे सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रासही झालेला आहे.
विनंती की, विमा दावा रक्कम रु.1,00,000/- तक्रारदारांना 12 टक्के व्याजासह, इतर खर्चासह देण्या बाबतचा सामनेवाला यांना आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांचा खुलासा दि.15.04.2011 रोजी नि.17 दाखल केला आहे. तक्रारीतील सर्व विधाने सामनेवाला यांना मान्य आहेत. प्रस्ताव उशिरा पाठविल्याने कबाल कंपनीने परत केला. ही बाब तक्रारदाराला कळविण्यात आली.
तक्रारदारांनी दि.14.08.2007 रोजी प्रस्ताव सादर केला. त्यानंतर आवश्यक त्या उर्वरित कागदपत्राची पूर्तता करुन घेऊन प्रस्ताव दि.10.10.2007 रोजी गांव नंबर 1258 कबाल विमा कंपनीकडे सादर केला. यांच तारखेस दिलेले श्री जाधव रामकिसन भोगीराम रा.कोद्री यांचा ना.क्र.1259 दि.10.10.2007 चा विमा मंजूर होऊन वाटप झाला आहे. यांच तारखेचे एक अन्य प्रस्ताव श्रीमती औताडे रुक्मीनबाई रामराव रा. सेलुअंबा यांचा प्रस्ताव उशिराने प्राप्त झाला हे कबाल विमा कंपनीचे म्हणणे कार्यालयास पटण्याजोगे नाही. तसेच तक्रारदारास नूकसान भरपाई मंजूर करण्याची जबाबदारी विमा रक्कम स्विकारणा-या सामनेवाला क्र.5 यांची आहे. त्यांचेशी या कार्यालयाचा संबंध हा पत्रव्यवहार पाठपुरावा करण्यापूरता मर्यादित आहे.
सामनेवाला क्र.3 चा खुलासा दि.30.05.2011 रोजी सादर केला. शासनाने तक्रारदाराकडून कोणताही विमा हप्ता घेतलेला नाही अथवा तक्रारदार सुमनबाई बाळासाहेब औताडे यांचे पती मयत बाळासाहेब औताडे यांनी शासनाकडे कोणताही विमा हप्ता भरलेला नाही. उलटपक्षी शासनानेच राज्यातील शेतक-याचे वतीने विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीला अदा केली असल्याने तक्रारदार हे शासनाचे ग्राहक नाहीत. शासन म्हणजे विमा कंपनी नसून राज्यातील शेतक-याच्या हीताचे दृष्टीने शासनाने एक कल्याणकारी योजना म्हणून विमा योजना सूरु केली आहे. सामनेवाला क्र.3 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी.
सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचा खुलासा दि.10.03.2011 रोजी दाखल केला. श्री. बाळासाहेब औताडे रा. सेलुअंबा ता. अंबाजोगाई यांचा अपघात दि.06.02.2007 रोजी झाला, त्यांचा दावा दि.16.11.2007 रोजी मिळाली. सदरचा दावा हा विमा कालावधीत दि.15.7.2006 ते 14.07.2007 मधील होता. सदरचा दावा विमा पत्राच्या शेवटच्या दिनांकाच्या म्हणजेच दि.14.10.2007 रोजी नंतर म्हणजेच दि.16.11.2007 रोजी प्राप्त झाला. त्यामुळे सदरचा प्रस्ताव पूढे न पाठविता तो तहसीलदार अंबाजोगाई यांना दि.19.11.2007 रोजी परत पाठविला आहे.
सामनेवाला क्र.5 यांनी त्यांचा खुलासा नि.23 दि.19.11.2011 रोजी दाखल केला. तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवाला यांनी नाकारलेले आहेत.तक्रारदारांनी मृत्यू झाल्या बाबतची केवळ सुचना दिली त्या सोबत कोणताही कागदपत्र दाखल केलेली नाहीत. तसेच तक्रारदारांनी सदरची तक्रार मुदतीत दाखल केली नाही. या संदर्भात विलंबाचे कारण स्विकार्य नाही. तक्रारदारांनी हेतूतः विलंब केलेला आहे. सरकारी अधिका-यांनी येथे सामनेवाला यांना वेळेत सुचना दिलेली नाही. त्यासाठी सामनेवाले जबाबदार नाहीत.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 व 2 चा खुलासा, शपथपत्र, सामनेवाला क्र.3 ते 5चा खुलासा यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.राजपूत यांचा यूक्तीवाद ऐकला, सामनेवाले नं.1 ते 4 यूक्तीवादाचे वेळी हजर नाही. सामनेवालेचे विद्वान वकिल श्री.वाघमारे यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारीतील कागदपत्रे पाहता मयत बाळासाहेब औताडे हे शेतकरी असल्याची बाब 7/12 उता-यावरुन स्पष्ट होते. बाळासाहेब औताडे हे दि.06.02.2007 रोजी बाळासाहेब औताडे हे त्यांचे नौकरासह मोटार सायकलवर बसून कारखानाकडून अंबाजोगाईस येत असताना समोरुन ट्रॅव्हल्स बस भरधाव वेगात आली व मयताचे मोटार सायकल व रस्त्याच्या बाजूला उभे असलेले रामराव बापूराव औताडे धडक लागून जखमी केले. त्यांच दिवशी बाळसाहेब मरण पावलेले आहेत.
या बाबत पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल झालेली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा केलेला आहे. तसेच मयत बाळासाहेब औताडे यांचे शवविच्छेदन करण्यात आलेले आहे. त्यानुसार मयत बाळसाहेब औताडे यांचा मृत्यू अपघातातील जखमामुळे झाल्याची बाब स्पष्ट होते. तक्रारदारांनी त्यांचा प्रस्ताव सामनेवाला क्र.2 कडे दाखल केला. सामनेवाला क्र.2 यांनी सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.4 कडे पाठविला आहे परंतु सामनेवाला क्र.4 चा खुलासा पाहता सदरचा प्रस्ताव हा विमा पत्रातील कालावधी संपल्यानंतर म्हणजे दि.14.10.2007 नंतर म्हणजे 16.11.2007 रोजी त्यांना प्राप्त झालेला आहे व त्यामुळे त्यांनी सदरचा प्रस्तावाची त्यांना परिपत्रकात नेमून दिल्यानंतर छाननी न करता तहसील अंबाजोगाई यांना दि.19.11.2007 रोजी परत पाठविले आहे. या संदर्भात सामनेवाला क्र.2 चा खुलासा विचारात घेता तक्रारदाराच्या प्रस्तावा सोबतच दि.10.10.2007 रोजी श्री जाधव रामकिसन भोगीराम रा. कोद्री यांचा विमा मंजूर होऊन वाटप झालेला आहे व तक्रारदाराचा विमा विलंबाचे कारणाने सामनेवाला यांनी नाकारला आहे.
परिपत्रकाप्रमाणे सामनेवाला क्र.4 ही ब्रोकींग एजन्सी आहे व त्यांचे काम प्रस्तावाची संपूर्ण तपासणी करुन पूर्तता करुन सामनेवाला क्र.5 यांचेकडे पाठविण्याची आहे.
या संदर्भातील सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचेकडे सदरचा प्रस्ताव दि.16.11.2007 रोजी मिळाल्या बाबतचे कोणतेही कागदपत्र त्यांचे खुलाशासोबत दाखल केलेले नाही. त्यामुळे दि.10.10.2007 रोजी तहसीलदार यांना पाठविलेला प्रस्ताव दि.16.11.2007 ला सामनेवाला क्र.4 ला विलंबाने कसा मिळाला या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत राहते. सामनेवाला क्र.4 चे त्यांचे खुलासासोबत कोणताही पुरावा नसल्याकारणाने सामनेवाला क्र.4 चे सदरचे विधान पुराव्या अभावी याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही. निश्चितच सदरचा प्रस्ताव हा सामनेवाला क्र.4 कडून परत गेलेला आहे व तो सामनेवाला क्र.5 कडे गेलेला नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.5 चा दावा नाकारल्याचा किंवा नामंजूर करण्याचा प्रश्नच येत नाही. वरील सर्व परिस्थितीवरुन सामनेवाला क्र.4 ने त्यांचे स्तरावरुन कारवाई केलेली आहे. त्यामुळे सदर प्रकरणात सामनेवाला क्र.5 च्या सेवेत कसूर दिसत नाही तरी श्री. बाळासाहेब औताडे यांचा मृत्यू विमा कालावधीत झालेला असल्याने व तो अपघाती मृत्यू असल्याने व तसेच बाळासाहेब हे शेतकरी आहेत, त्यांचे मृत्यू पश्चात त्यांचे विम्याची रक्कम सामनेवाला क्र.5 यांनी तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे विरुध्द सदर प्रकरणात सेवेत कसूरीचा कोणताही पुरावा नाही त्यामुळे त्यांची विरुध्दची तक्रार रदद करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.5 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मयत बाळासाहेब औताडे यांचे मृत्यूची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रु.एक लाख फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.5 यांना आदेश देण्यात येतो की, वरील रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास सामनेवाला क्र.5 हे तक्रारदारांना तक्रार दाखल दि.03.02.2011 पासून द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज देण्यास जबाबदार राहतील.
4. सामनेवाला क्र.1 ते 3 विरुध्दची तक्रार रदद करण्यात येते.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड