जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –30/2011 तक्रार दाखल तारीख –03/02/2011
सत्यभामा भ्र.पंढरीनाथ वनवे
वय 55 वर्षे,धंदा शेती .तक्रारदार
रा. सारुकवाडी पो.चिंचोली ता.केज जि.बीड
विरुध्द
1. महाराष्ट्र शासन,
मार्फत जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय, नगर रोड,बीड.
2. मा.तहसिलदार
तहसिल कार्यालय,केज
ता.केज जि.बीड
3. व्यवस्थापक,
कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीस प्रा.लि.
भास्करायण, एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्स,
टाऊन सेंटर जवळ, राजमाता जिजाऊ मिशनच्या खाली,
सिडको, औरंगाबाद. ..सामनेवाला
4. विभागीय व्यवस्थापक,
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.फोर्ट मुंबई,
विभागीय व्यवस्थापक,
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
हजारी चेंबर्स, स्टेशन रोड, औरंगाबाद.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.आर.राजपूत
सामनेवाले क्र. 1 व 2 तर्फे :- स्वतः
सामनेवाले क्र.3 तर्फे ः- स्वतः
सामनेवाले क्र.4 तर्फे ः- अँड.आर.एस.थिंगळे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार ही मयत पंढरीनाथ वनवे यांची धर्मपत्नी आहे. मयत पंढरीनाथ वनवे हे शेतकरी होते. त्यांचे नांवे शेत जमिन मौजे सारुकवाडी ता.केज येथे शेत गट नंबर 188 /1ब व 183/3 मध्ये आहे.
दि.15.3.2007 रोजी पंढरीनाथ वनवे हे बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांचे हयातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी गेले होते तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय समोर रोड पायी ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने ते खाली रोडवर पडले. त्यामुळे डोक्याला, दोन्ही पायाला मार लागला. म्हणून त्यांना प्रथम जिल्हा रुग्णालय बीड येथे शरीक केले व नंतर डॉक्टराचे सल्ल्याने त्यांना अँपेक्स रुग्णालय औरंगाबाद येथे पूढील उपचारासाठी शरीक केले असता दि.25.3.2007 रोजी त्यांचा मृत्यू झाला. अपघाता बाबतची फिर्याद दि.23.3.3007 रोजी आनंद पढरीनाथ वनवे यांनी दिली त्यानुसार पोलिस स्टेशन बीड शहर यांनी दि.2.4.2007 रोजी प्रथम खबरी अहवाल क्र.103/2007 कलम 279, 304 (अ) भा.द.वि. नुसार अज्ञात वाहनाविरुध्द गून्हा नोंदवला. मयताचे शवविच्छेदन अहवाल,घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. मयताचे मृत्यूची नोंद ही ग्रामपंचायत चिंचोली (माळी ) ता.केज येथे करण्यात आली.
तक्रारदारांनी शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव मूदतीमध्ये दि.12.06.2007 रोजी सामनेवाला क्र.2 कडे दाखल केला असता त्यांनी योग्य त्या कार्यवाहीस्तव वर्ग केला असून सामनेवाला क्र.3 चे पत्र दि.11.7.2007 व 25.7.2007 रोजीचे तक्रारदाराला आले. त्यांनी त्रूटीची पूर्तता करण्याकामी कळवले असता तक्रारदारांनी पूर्तता केली. सदर प्रकरण सामनेवाला क्र.4 कडे पाठविले. सामनेवाला क्र.4 यांनी दि.23.3.2009रोजी सदर दावा नामंजूर केल्या बाबतचे पत्र तक्रारदारांना पाठविले.
त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांना प्रकरण पून्हा अवलोकनासाठी पाठवावे म्हणून तोंडी कळवले असता त्यांनी आश्वासन दिले.
सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केला म्हणून विमा रक्कम रु.1,00,000/-सामनेवाला यांनी तक्रारदारांना व्याजासह देण्या बाबत आदेश व्हावेत, मानसिक, शारीरिक त्रास, प्रवास खर्च , तक्रारीचा खर्च देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांचा खुलासा नि.10 दि.10.3.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील बहूतेक बाबी त्यांनी मान्य केलेल्या आहेत. शासन निर्णयाप्रमाणे तक्रारदारांनी दाखल केलेला विमा दावा सामनेवाला क्र.2 ने सामनेवाला क्र.3 मार्फत सामनेवाला क्र.4 कडे मूदतीत पाठविला आहे. सामनेवाला क्र.1 व 2 विरुध्दची तक्रार खारीज करावी.
सामनेवाला क्र.3 ने त्यांचा खुलासा दि.10.03.2011 रोजी दाखल केला. सदर खुलाशात पंढरीनाथ वनवे यांचा अपघात दि.15.3.2007 रोजी झाला. त्यांचा दावा दि.9.7.2007 रोजी अपूर्ण कागदपत्रासह मिळाला.त्यानंतर त्यांची पूर्तता करुन घेण्यात आली व सदरचा दावा हा सामनेवाला क्र.4 कडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला. सदरचा दावा हा नामंजूर करण्यात आलेला आहे.
सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचा खुलासा दि.12.07.2007 रोजी दाखल केला. सामनेवाला यांनी मयताचा अपघात किंवा मयत शेतकरी असल्याबददलचे फारसे वादातीत नाही. परंतु सदर अपघातामुळे मयताचा मृत्यू झालेला नसून तो नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. त्यामुळे नैसर्गिक मृत्यूचा दावा हा विमा पत्रातील शर्ती व अटीनुसार देय होत नाही.सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत कोणताही कसूर केलेला नाही योग्य त-हेने दावा नाकारलेला आहे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र, सामनेवाला क्र.1 व2 यांचा खुलासा, शपथपत्र,सामनेवाला क्र.3 चा खुलासा,सामनेवाला क्र.4 चा खुलासा, शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराने विद्वान वकील श्री.एस.आर.राजपूत व सामनेवाला क्र.4 चे विद्वान वकील श्री.थिंगळे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता विमेदार पंढरीनाथ वनवे यांचा मृत्यू दि.25.3.2007 रोजी झालेला आहे.तक्रारदाराने सदरची तक्रार दि.3.2.2011 रोजी दाखल केलेला आहे. सदर तक्रारीत विलंबाचा तांत्रिक मूददा येऊ नये म्हणून विलंब माफ होण्याचा अर्ज दाखल केलेला आहे. सदर अर्जातील सामनेवाला क्र.4 यांनी खुलाशात दिलेला आहे.
कागदपत्रावरुन स्पष्ट होते की, विमा कंपनीने तक्रारदारांना दि.23.02.2009 रोजी विमा दावा नाकारल्याचे पत्र दिलेले आहे. सदर पत्रापासून दोन वर्षाचे आंतच म्हणजे दि.3.2.2011 रोजी तक्रारदाराने तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीस विलंबाचा तांत्रिक दोष दिसत नाही.
सदर प्रकरणात मयत पंढरीनाथ वनवे हे शेतकरी असल्याची बाब 7/12 उता-यावरुन स्पष्ट होते.पंढरीनाथ वनवे यांचा रस्ता अपघातात दि.15.3.2007 रोजी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे झालेला आहे व या संदर्भात पोलिस पेपर वरुन त्यांचा अपघात झालेला आहे ही बाब स्पष्ट होते. तसेच अपघाताची बाब सामनेवाला यांनाही फारशी वादातीत नाही.
पंढरीनाथ वनवे यांचा मृत्यू अपघाताने झाला नसून त्यांचा मृत्यू दिर्घकाळ आजाराने नैसर्गिकरित्या झाला असल्याचे सामनेवाला क्र.4 च्या चौकशीत निष्पन्न झाले व त्यानुसार त्यांनी सदरचा दावा नाकारला आहे. सदरचा दावा सामनेवाला क्र.4 यांनी योग्य त-हेने नाकारला का ? हा एकच प्रश्न समोर आहे. या संदर्भात पोलिस पेपर व तसेच दवाखान्यात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे शवविच्छेदन करण्यात आलेले आहे. शवविच्छेदन अहवालावरुन हेड इंज्यूरि मूळे त्यांचा मृत्यू झाला.
या सर्वाचा सरळ संबंध लक्षात घेता अपघातामूळे त्यांना बीड मधील सरकारी दवाखान्यात भरती केले, व तेथून त्यांना औरंगाबाद येथे दवाखान्यात भरती केले व त्यानंतर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे ही बाब स्पष्ट होते. तथापि, विमा कंपनीने केलेल्या चौकशीत ते दिर्घ काळ आजारी असल्याने त्यांचा मृत्यू नैसर्गिक झालेला आहे या संदर्भात विमा कंपनीचा कोणताही पुरावा नाही. दि.15.3.2007 रोजीला अपघात झाला व मृत्यू दि.25.3.2007 रोजी झालेला आहे. 10 दिवसांचे कालावधीत झालेला मृत्यू हा अपघातातील जखमामुळे झाला असल्याने सदरचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू आहे असे म्हणणे वावगे ठरेल. त्यामुळे सामनेवाला यांचे विधान पुराव्याने स्पष्ट केलेले नसल्याने सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा नाकारुन तक्रारदाराना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते. सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारांना मयत पंढरीनाथ वनवे यांच्या अपघाती मृत्यूची रक्कम रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी सदरचा दावा योग्य वेळेत सामनेवाला क्र.4 कडे पाठविले आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे सेवेत कसूरीची बाब स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.3,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
1.
2. सामनेवाला क्र.4 यांना आदेश देण्यात येतो की, मयत पंढरीनाथ वनवे यांचे अपघाती मृत्यूची विम्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रु.एक लाख फक्त) तक्रारदारांना आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत दयावी.
2.
3. सामनेवाला क्र.4 यांना आदेश देण्यात येतो की, वरील रक्कम 30 दिवसाचे आंत न दिल्यास त्यावर तक्रार नाकारल्याचा दि.23.02.2009 रोजी पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज देण्यास सामनेवाला जबाबदार राहतील.
3.
4. सामनेवाला क्र.4 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व दाव्याचा खर्च रु.3,000/- (अक्षरी रु.तिन हजार फक्त) आदेश प्राप्ती पासून 30 दिवसाचे आंत तक्रारदारांना दयावा.
4.
5. सामनेवाला क्र. 1 ते 3 यांचे विरुध्दची तक्रार रदद करण्यात येते.
5.
6. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड