निकाल
दिनांक- 23.09.2013
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार श्रीमती नंदाबाई भ्र.अशोक पोंढरे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी व सेवा देण्यास सामनेवाला यांनी कसूर केल्याबाबत नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे, तक्रारदार ही मौजे जामगांव ता.आष्टी जिल्हा बीड येथील कायमस्वरुपी रहिवाशी असून तिचे पती नामे अशोक साहेबराव उर्फ दासराव पोंढरे यांचे नावे सदर गावामध्ये गट क्र.259, 30/खा, 18/खा मध्ये शेतजमीन होती. त्याबाबत महसूल अभिलेख 7/12 चा उतारा व 8 अ चा दाखल अर्जासोबत दाखल करीत आहे. सदरची जमीन ही सध्या मयत अशोक साहेबराव उर्फ दासराव पोंढरे यांचे वारसांचे नावे झालेली आहे.
तक्रारदाराचे पती मयत अशोक साहेबराव उर्फ दासराव पोंढरे हे मोटार सायकल स्लीप होऊन दि.17.12.2005 रोजी झालेल्या रस्ता अपघातामध्ये जखमी होऊन उपचार चालू असताना दि.04.03.2006 रोजी मयत झालेले आहे. मयत अशोक साहेबराव उर्फ दासराव पोंढरे हे शेतकरी असल्याने व महाराष्ट्र शासनाने सन 2005-06 या वर्षामध्ये प्रत्येक शेतक-यांचा विमा काढलेला होता. त्यामुळे ते शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचा लाभधारक झालेला होता. तथापि, सदरचे विमा अपघाताबाबत रितसर अर्ज मयत अशोक साहेबराव उर्फ दासराव पोंढरे यांचे वारस म्हणून त्यांची पत्नी म्हणजे तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा अर्ज दाखल केला होता.
असे की, सामनेवाला क्र.1 ने महाराष्ट्रातील गाव नमुना नं.7/12 उता-याचे नोंदीमधील संपूर्ण शेतक-यांचे अपघातामध्ये कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास अथवा निधन झाल्यास अनुक्रमे रु.50,000/- व रु.1,00,000/-चा व्यक्तीगत शेतकरी अपघात योजनेअंतर्गत विमा काढलेला आहे व त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सामनेवाला क्र.2 कडे देण्यात आलेले असून सामनेवाला क्र.3 यांचेकडे दावा अर्ज प्राप्त झाल्यापासून एका महिन्यात आवश्यक कागदपत्राची पडताळणी करुन मंजूरीसाठी सामनेवाला क्र.4 कडे पाठविण्याचे कामकाज दिलेले आहे. तसेच सामनेवाला क्र.3 ने अपघात ग्रस्त शेतक-याचे खाते असलेल्या बँकेमध्ये सामनेवाला क्र.4 कडून नमूद केलेली रक्कम देणे आवश्यक आहे.
मयत अशोक साहेबराव उर्फ दासराव पोंढरे यांची पत्नी तक्रारदार हिने सदर शेतकरी व्यक्तीगत अपघात विम्याचा लाभ मिळण्यासाठी दि.15.05.2006 रोजी सामनेवाला क्र.2 कडे वारसा हक्काने आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रतीसह दावा अर्ज दाखल केला होता व सामनेवाला क्र. 2 कडे अपूर्ण कागदपत्राची वेळोवेळी पुर्तता केलेली आहे. अपघातात मयत झालेले शेतकरी अशोक साहेबराव उर्फ दासराव पोंढरे यांची पत्नी नंदाबाई यांनी वारसा हक्काने शेतकरी व्यक्तीगत अपघात विम्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. तथापि, सामनेवाला यांनी कार्यवाही चालू असल्याचे वेळोवेळी सांगितलेले आहे. त्यामुळे त्यांचेवर विश्वास ठेवून विमा लाभाची रक्कम मिळेल अशी आशा बाळगून होती. सामनेवाला यांनी तक्रारदारास अद्याप पर्यंत विमा मागणी अर्जावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याचे दिसून आल्यानंतर सदरचा दावा मागणी अर्ज मिळण्यासाठी दि.21.04.2010 रोजी कागदपत्रासह सामनेवाला क्र.2 कडे मागणी केली असता, सदरची कागदपत्रे तक्रारदारास परत देण्यात आलेली आहेत. सदर विमा लाभापासून सामनेवाला यांनी तक्रारदारास वंचित ठेवून रक्कम देण्यास जाणिवपूर्णक विलंब केलेला आहे व सेवा देण्यास कसूर केलेली आहे. त्यामुळे सदरची तक्रार मा.मंचात दाखल करण्यास कारण घडलेले आहे. सामनेवाला यांनी जाणिवपूर्णक तक्रारदारास त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्यामुळे, तक्रारदारास झालेल्या शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासामुळे तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे.
सामनेवाला क्र.1,2,3 हे मंचात हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तसेच सामनेवाला क्र.4 यांना नोटीस बजावण्यात आली असून ते मंचात हजर झाले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश झालेला आहे.
सामनेवाला क्र.1 व 2 यांचे कथन असे की, मयताचे वारस पत्नी म्हणून नंदाबाई अशोक पोंढरे यांनी दि.15.05.2006 रोजी प्रस्ताव हा सामनेवाला क्र.2 कडे दिल्यानंतर सदर प्रस्तावावर सामनेवाला क्र.2 यांनी विमा दावा रक्कम मिळण्याच्या शिफारशीसह दि.31.05.2006 रोजी आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणजेच सामनेवाला क्र.4 या विमा कंपनीकडे कारवाईसाठी देऊन माहितीस्तव प्रत सामनेवाला क्र.1 यांना दिलेली आहे. तक्रारदाराचे पती शेतकरी होते व त्यांनी सामनेवाला क्र.2 कडे शेतसारा भरलेला आहे. परंतू तक्रारदार शेतकरी हे विमा कंपनीचे ग्राहक आहेत, शासनाचे ग्राहक नाही. शासनाने पिमियम भरलेला आहे. त्यामुळे शेतकरी संबंधित विमा कंपनीचे ग्राहक आहे.
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी कोणत्याही प्रकारे जाणिवपूर्वक कसूर अथवा चालढकल केली नाही. म्हणून तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 1 व 2 बाबत केलेले आरोप फेटाळण्यात यावे.
सामनेवाला क्र.3 कबाल इन्शुरन्स कंपनी यांचे कथन असे की, त्यांची निवडणूक दि.15 जूलै 2006 पासून झालेली आहे. सदर प्रस्तावातील अपघात हा पॉलीसी पिरियड 10 जानेवारी 2005 ते 9 एप्रिल 2006 या काळात झालेला आहे. व ती पॉलीसी आय सी आय सी आय इन्शुरन्स कंपनी मुंबई मार्फत देण्यात आलेली आहे. म्हणून सदर प्रस्ताव हे आय सी आय सी आय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीकडे आहे. त्यामुळे प्रस्तावाबददल काही सांगता येणार नाही.
सामनेवाला क्र.4 यांना नोटीस बजावण्यात आली असून ते मंचात हजर झाले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश झालेला आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाला यांनी दाखल केलेला जवाब याचे अवलोकन केले. तक्रारदाराचे वकील श्री.काकडे यांचा युक्तीवाद ऐकला. त्यावरुन न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय? होय.
2) सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी ठेवली आहे काय? होय.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदाराने पुराव्याकामी आपले शपथपत्र व नमुद केलेले कागदपत्राच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत. तसेच तक्रारदाराने 7/12 चा उतारा, 8अ चा उतारा, फेरफार नक्कल, पोलीस स्टेशनचे प्रमाणपत्र, तसेच रुबी हॉल क्लिनीक पूणे येथे उपचार घेत असलेले पत्र व मृत्यूचे कारण असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र, दाखल केले. तसेच सामनेवाला यांच्याकडे दाखल केलेला प्रस्ताव यांचे कागदपत्र दाखल केले आहे.
तक्रारदार यांचे शपथपत्र याचे अवलोकन केले. तसेच दाखल केलेले 7/12 व 8अ चा नमुना व फेरफार नक्कल याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, मयत हा शेतकरी होता व त्याचे नावे जामगांव ता.आष्टी जि.बीड येथे शेतजमीन होती. पोलीस पेपरचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, मयत हयाचा मोटार सायकल स्लीप होऊन अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर मयत यास दि.29.12.2005 रोजी उपचारासाठी ग्रांट मेडिकल फाऊंडेशन, रुबी हॉल क्लिनीक पूणे येथे दाखल करण्यात आले होते. तेथे मयत हयाचा उपचार चालू होता वतेथे मयत हयाच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाली होती. नंतर दि.04.02.2006 रोजी मयतला डिस्चार्ज करण्यात आले होते. तेव्हा मयत यास उपचारासंबंधी सल्ला देण्यात आला होता. आष्टी येथील डॉ.एस.एम.पाथरकर हयांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार त्याचा मृत्यू डोक्याला मार लागल्यामुळे झाला आहे. वैद्यकीय कागदपत्राचे अवलोकन केले असता मयत यांचा अपघात झाला होता व त्याला डोक्याला गंभीर जखम झाली होती व त्यामुळे तो मयत झाला हे सिध्द होते.
तक्रारदार यांनीशपथपत्रामध्ये कथन केले आहे की,त्यांचे पती मयत झाल्यानंतर त्यांना सामनेवाला क्र.1 यांच्याकडे दि.15.05.2006रोजी शेतकरी वैयक्तीक विमा अपघात योजना अंतर्गत रु.1,00,000/- मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करुनही सामनेवाला यांनी तक्रारदाराचा प्रस्ताव व मागणी बददल विचार केला नाही व कोणत्याही कारणास्तव नाकारला नाही व त्याबददल कळविले सुध्दा नाही.
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यात तक्रारदार यांचेकडून प्रस्ताव मिळाल्याबाबत व तो प्रस्ताव सामनेवाला क्र.4 यांच्याकडे पाठविल्याबाबत म्हटले आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन करता त्यांनी सामनेवाला क्र.1 व 2 कडे प्रस्ताव दाखल केला व सदर प्रस्ताव हा सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सामनेवाला क्र.4 यांच्याकडे पाठविला ही बाब निष्पन्न होते. तक्रारदार यांनी वेळोवेळी प्रस्तावाबददल विचारले असता त्याबददल कोणतीही दखल घेतली नाही. शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजनाचा मुख्य उददेश असा की, शेतकरी अपघातात मयत झाल्यास त्याच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी हा आहे. परंतू सदर प्रकरणात सामनेवाला क्र.4 हे मंचात गैरहजर राहिले व त्यांनी कोणतेही स्पष्ट असे कारण दिले नाही. सदरील बाबतचा विचार करणे व योग्य तो निर्णय घेण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.4 वर होती.
तक्रारदार यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज दिला व तो अर्ज त्यांनी इन्शुरन्स कंपनीला पाठविला. त्यावर इन्शुरन्स कंपनीने दखल घेतली नाही. सबब या मंचाचे मत की, सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कसूर केला आहे. म्हणून तक्रारदार हे रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेचत क्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे. शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारास शेतकरी व्यक्तीगत विमा
योजना अंतर्गत मिळणारी रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रु.एक
लाख) 30 दिवसाच्या आत द्यावे.
3) सामनेवाला क्र.4 यांनी रक्कम रु.1,00,000/- विहीत मुदतीत न
दिल्यास त्यावर द.सा.द.शे.9 टक्के व्याजदराने तक्रार दाखल
झाल्यापासून रक्कम वसूल होईपर्यंत द्यावे. 4) सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरिक
त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- द्यावे.
5) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड