जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 58/2011 तक्रार दाखल तारीख- 05/04/2011
श्रीमती कावेरी भ्र. विठ्ठल जागडे,
वय – 25 वर्ष, धंदा – शेती व घरकाम
रा.वायभटवाडी,ता.जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
1. जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
2. जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी,
कृषि कार्यालय, धानोरा रोड, बीड
3. व्यवस्थापक,
कबाल इश्युंरन्स ब्रोकिंग सर्व्हिस प्रा.लि.
भास्करायण, एचडीएफसी लाई इंश्युरन्स,
टाऊन सेंटर जवळ, राजमाता जिजाऊ मिशनच्या खाली,
सिडको, औरंगाबाद ता.जि.औरंगाबाद
जुना मोंढा रोड, बीड
4. युनायटेड इंडिया इंश्युरन्स कं.लि.
मंडल कार्यालय क्रं.2, अंबिका हाऊस,
शंकर नगर चौक, नागपूर – 10 ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – डी.एम.डबडे,
सामनेवाले1,2तर्फे – वकील – प्रतिनिधी,
सामनेवाले 3तर्फे – वकील – स्वत:,
सामनेवाले 4तर्फे – वकिल – व्ही.एस.जाधव
।। निकालपत्र ।।
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराचे पती विठठल आश्रूबा जागड हे शेतकरी होते. त्यांची मौजे वायभटवाडी शिवारात गट नं.148,167,221 मध्ये शेत जमीन आहे.
तारीख 10.12.2009 रोजी विठ्ठल आश्रूबा जागडे सोलापूर हायवेवर मांजरसुबाकडील शेती कामा निमित मोटार सायकलवरुन जात होते. त्यांना कन्हयालाल धाब्याच्या पूढे समोर येणा-या वाहनाने जोरात धडक देवून गंभीर जखमी केले. अपघातात त्यांचे डोक्याला गंभीर मार लागुन जागीच मयत झाले. त्यांचे बीड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले.
तक्रारदाराने पतीच्या मृत्यूचा दावा प्रस्ताव सामनेवाले नं.2 यांचेकडे ता.10.2.2010 रोजी तक्रारीत नमुद केलेल्या सर्व कागदपत्रासह मुदतीत दाखल केला. सामनेवाले नं.1 ते 4 यांनी तक्रारदाराना 30 दिवसाचे आत विमा दाव्याची रक्कम देणे आवश्यक असताना रक्कम दिली नाही. ता.31.12.2010 रोजी सामनेवाले नं.4 यांनी तक्रारदाराना पत्र पाठवून कळविण्यात आले की, वाहनावर मर्यादेपेक्षा जास्त पॅसेंजर बसवून ( टिब्बल सिट ) मयत वाहन चालवत होते. जो मोटार वाहन कायदयानुसार गुन्हा आहे असे कारण देवून दावा ना मंजूर केला.
तक्रारदार सामनेवाले नं.1 ते 4 यांचेकडून खालील प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास हक्कदार व पात्र आहेत.
1. विम्याची रक्कम :- रु.1,00,000/-
2. मानसिक त्रासापोटी :- रु. 25,000/-
3. प्रवास खर्चापोटी :- रु. 5,000/-
4. तक्रारीचे खर्चापोटी :- रु. 10,000/-
एकुण :- रु. 1,40,000/-
विनंती की, तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे सामनेवाले नं. 1 ते 4 यांनी तक्रारदाराना नुकसान भरपाईची रक्कम रु.1,40,000/- वैयक्तीक अथवा संयुक्तीक देण्याचा आदेश व्हावा. सदर रक्कमेवर सामनेवाले यांना प्रस्ताव मिळाल्या तारेखपासुन द.सा.द.शे.18 टक्के व्याज देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाले नं.1 यांनी त्यांचा खुलासा दाखल केला नाही म्हणुन त्यांचे खुलाशा शिवाय प्रकरण चालविण्याचा निर्णय दि.12.8.2011 रोजी न्यायमंचाने घेतला आहे.
सामनेवाले नं.2 यांनी त्यांचे लेखी खुलासा ता.12.8.2011 रोजी दाखल केला. तक्रारदार अथवा त्यांचे पती शासनाचे ग्राहक नाहीत, त्यामुळे तक्रार खारीज करावी.
सामनेवाले नं.3 यांनी त्यांचा खुलासा पोष्टाद्वारे दि.27.6.2011 रोजी दाखल केला. श्री. विठ्ठल आश्रूबा जागडे यांचा अपघात ता.10.12.2009 रोजी झाला. दावा दि.25.2.2010 रोजी मिळाला. सदरचा दावा सामनेवाले नं.4 कडे ता.4.6.2010 रोजी पाठविण्यात आला. विमा कंपनी दावा, अपघाताच्या वेळी मयत चालवत असलेल्या वाहनावर 3 व्यक्ती होते या कारणाने नाकरला आहे.
सामनेवाले नं.4 यांनी त्यांचा खुलासा ता.27.6.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. मयत शेतकरी नाही. शेत जमीन ही त्यांचा मुलगा जयरामचे नांवे आहे. त्याची अज्ञानपालन कर्ती त्याची आई तक्रारदार आहे. त्यामुळे मयत शेतकरी या कक्षेत बसत नाही. विम्याची जोखीम सुरु झाली त्यावेळी मयताचे नावे 7/12 नव्हता, म्हणून नुकसान भरपाई देता येणार नाही.
मृतक हा मर्यादेपक्षा वाहनावर जास्त पॅसेंजर बसुन ( टीब्बल सीट ) चालवत होता. जे कायदयानुसार गुन्हा आहे, त्यामुळे तक्रारदार हा नुकसान भरपाई मागणास हक्कदार नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी.
तक्रारदाराची तक्रार, सोबतची कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाले नं.2 ते 4 यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व सामनेवाले नं.4 यांनी दाखल केलेले शपथपत्र, कागदपत्रे, याचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान वकिल डी.एम.डबडे सामनेवाले नं.4 यांचे विद्वान वकिल व्ही.एस.जाधव यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता मयत विठ्ठल आश्रूबा जागडेचा विमा दावा सामनेवाले नं.4 यांनी नाकारल्याचे पत्र ता.31.12.2010 रोजीचे तक्रारदारांनी दाखल केले आहे. त्यातील कलम 7 ‘‘ मृतक हा मर्यादेपेक्षा वाहनावर जास्त पॅसेंजर बसवुन ( टिब्बल सीट) चालवत होता जे की, कायदयानुसार गुन्हा आहे. ’’ या एकमेव कारणाने सामनेवाले नं.4 यांनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारलेला आहे.
यासंदर्भात तक्रारीतील कागदपत्राचे आवलोकन केले असता, फिर्याद, घटनास्थळ पंचनामा यावर स्पष्टपणे विठ्ठल जागडे व मारुती ग्यानदेव रोमण हे दोघेच अपघाताच्या वेळी वाहनावरुन जात असल्याचे स्पष्ट होते. या संबंधी विमा कंपनीने चौकशी अहवाल दाखल केला आहे. सदरचा चौकशी अहवाल इन्व्हेस्टीगेशन अधिकारी श्री. सुर्यकांत आर शिवणकर वकिल समिर आर दुर्गकर याचे नाव चौकशी अहवालावर आहे. चौकशी अहवालात मयत विठ्ठलचा भाऊ भारत आश्रूबा जागडे यांचे जवाब आहे व त्यावर अपघाताच्या वेळी मोटारसायकलवर विठ्ठल जागडे सोबत दोन व्यक्ती मारोती रोमन, व विक्रम गिरधार हे पाठीमागे बसले होते असे चौकशी अहवालात नमुद आहे. परंतु पोलीस पेपरमध्ये विक्रम गिरधर यांचे नांव कोठेही आढळून येत नाही. तसेच चौकशी अहवाला संबंधात चौकशी अधिका-यांचे शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे अपघाताच्यावेळी वाहनावर 3 व्यक्ती प्रवास करीत होते ही स्पष्ट होत नाही. सामनेवाले नं.4 या तक्रारदाराचा दावा कुठल्याही योग्य कारणाशिवाय नामंजूर करुन तक्रारदाराना द्यावयाचे सेवेत कसूरी केली आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाले नं.4 यांनी तक्रारदाराना मयत विठ्ठल जागडे याचे विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने तक्रारदारांना निश्चितच मानसिकत्रास झाला आहे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले नं.4 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराना त्यांचे मयत पतीचा मृत्यूच्या दाव्याची रक्कम रु.1,00,000/- ( अक्षरी रुपये एक लाख फक्त ) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
3. सामनेवाले नं.4 यांना आदेश देण्यात येतो की, वरील रक्कम विहित मुदतीत अदा न केल्यास त्यावर तक्रार दाखल तारीख दि.5.4.2011 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याज देण्यास सामनेवलो नं.4 जबाबदार राहतील.
4. सामनेवाले नं.4 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड