जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 80/2011 तक्रार दाखल तारीख –01/07/2011
दशरथ पि.धोंडीबा कटारे
वय 55 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.साबला ता.केज जि.बीड
विरुध्द
1. महाराष्ट्र शासन मार्फत
जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय,
नगर रोड, बीड ता.जि.बीड सामनेवाला
2. तहसीलदार,
तहसील कार्यालय, केज
ता.केज जि.बीड.
3. अध्यक्ष, कबाल इन्शुरन्स कंपनी लि.
राज अपार्टमेट, जी सेक्टर, प्लॉट नं.29
रिलायन्स फ्रेशच्या मागे,टाऊन सेंटर,सिडको,औरंगाबाद.
4. विभागीय व्यवस्थापक,
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.फोर्ट, मुंबई
विभागीय व्यवस्थापक,
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
हजारी चेंबर्स, स्टेशन रोड, औरंगाबाद
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.आर.राजपूत
सामनेवाला क्र.1 व 2 तर्फे :- स्वतः
सामनेवाला क्र.3 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.4 तर्फे ः- अँड.दिलीप कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांनी सदरची तक्रार शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत शासनाच्या योजनेप्रमाणे मयत सोनाबाई भ्र.धोडीबा कटारे या सदर योजनेच्या लाभार्थी असल्याने त्यांचे मृत्यूनंतर मिळणा-या विम्याच्या रक्कमेसाठी सदरची तक्रार दाखल केली आहे.
दि.13.8.2006 रोजी सोनाबाई या घरात बसलेले असताना रात्री 11 वाजेचे दरम्यान तिच्या गळयाजवळ साप चावला. त्यामुळे त्यांना रात्रीच जिपमध्ये टाकून स्वामी रामानंद तिर्थ दवाखाना अबाजोगाई येथे शरीक केले व औषधोउपचार चालू असताना त्या दि.17.8.2006 रोजी मरण पावल्या. त्या बाबत सबंधीत पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. पोलिसांनी जवाब फिर्याद नोंदविला आहे. सोनाबाई यांचे पोस्ट मार्टेम झालेले आहे.
त्यानंतर तक्रारदारांनी विम्याची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव सामनेवाला क्र.2 कडे दाखल केला. सामनेवाला क्र.2 ने सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.3 कडे पाठविला व सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदाराकडे दि.10.8.2006 रोजी काही कागदपत्राची मागणी केली. तक्रारदाराने पूर्तता केली. सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारास कळविले की, मयताचे वय 80 वर्ष असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाल्याने नूकसान भरपाईस पात्र नाहीत म्हणून नामंजूर केला.
त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांना भेटून प्रकरण पूर्नअवलोकन कामी विमा कंपनीला पाठविले म्हणून तोंडी कळविले असता त्यांनी केवळ आश्वासन दिले. शेवटी दि.1.2.2011 रोजी सामनेवाला क्र.2 ची भेट घेतली असता त्यांनी योग्य त्या न्यायालयात दाद मागावी म्हणून सांगितले. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा मंजूर न करुन दयावयाचे सेवेत कसूर केलेला आहे.
विनंती की, विमा रक्कम रु.1,00,000/- तक्रारदारांना सामनेवालाकडे तक्रार दाखल केल्यापासून प्रचलित व्याजासह देण्या बाबत आदेश व्हावेत. मानसिक शारीरिक त्रास, प्रवास खर्च देण्याचा आदेश व्हावा. तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश व्हावा. तक्रारदारांनी विलंब माफीचा अर्ज शपथपत्रासह दाखल केलेला आहे.
सामनेवाला क्र.1 व2 यांनी त्यांचा खुलासा दि.29.8.2011 रोजी दाखल केला.खुलाशातील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. सामनेवाला क्र.4 कडे पाठविलेला दावा सामनेवाला क्र.4 ने अपूर्ण कागदपत्रामूळे नामंजूर केलेला आहे. तक्रार सामनेवाला क्र.1 व 2 चे विरुध्द खारीज करण्यात यावी.
सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचा खुलासा दि.29.7.2011 रोजी दाखल केला. खुलाशात सोनाबाई रा.साबला ता.केज यांचा अपघात दि.17.8.2006 रोजी झाला. त्यांचा दावा दि.2.12.2006 रोजी मिळाला तो विमा कंपनीकडे पाठविला. सदर दावा नामंजूर केला व त्या बाबतचे सूचनापत्र दि.21.7.2007 रोजीचे दिलेले आहे.
सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचा खुलासा दि.11.1.2012 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. सामनेवाला क्र.3 यांनी प्रकरणातील कागदपत्रे दि.2.10.2006 रोजी मिळाले ती त्यांनी सामनेवाला क्र.4 कडे पाठविले. पडताळणी केली असता निदर्शनास आले की, मयताचे वय 80 वर्षाचे होते.विमा कंपनीचे नियमाप्रमाणे अपघात विमा हा मयताचे वर्ष 75 वयापर्यत लागू आहे. सदरील मयताचे नांवे 7/12 उता-यावर शेती नसल्याने ते शेतकरी होऊ शकत नाहीत. वरील दोन्ही विमा पत्रात बसत नसल्याने विमा कंपनीने तक्रारदारास दि.21.7.2007 रोजी लेखी पत्राद्वारे कळविले. फाईल बंद केली. तक्रार 2011 मध्ये दाखल केल्यामूळे ती मूदतीत नाही. तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 ते 4 चा खुलासा,सामनेवाला क्र.4 यांचे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.राजपूत व सामनेवाला क्र.4 यांचे विद्वान वकील श्री.डी.बी.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारानीच सामनेवाला क्र.4 यांना तक्रारदाराचा दावा दि.21.7.2007 रोजी चौकशी अहवालानुसार 7/12 उता-यावर मयताचे नांव नाही आणि मयताचे मृत्यू समयी वय 80 वर्षाचे असल्याने दावा नाकारला आहे. सदरचे पत्र तक्रारदारांनी दाखल केलेले आहे.दि.21.7.2007 रोजीचे पत्र तक्रारदारांना मिळाल्यानंतर सदरची तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबाचे संदर्भात तक्रारीतील विधाने पाहता तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 तहसीलदार यांचेकडे दाव्याच्या पूर्नविलोकनाची मागणी केली व तहसीलदार यांनी दि.1.2.2011 रोजी न्यायालयात जाण्या संबंधी सांगितले.
या संदर्भात तक्रारदारांना पत्र मिळाल्यावरुनच तक्रारदारांनी पूर्नविलोकनाची मागणी केली आहे. त्यांचा दावा नामंजूर झाल्याचे त्यांना जूलै 2007 मध्येच माहीती झाले. त्यानंतर दि.1.7.2011 रोजी किंवा दि.1.2.2011 रोजी पर्यत त्यांनी केवळ तहसीलदार यांचेकडे पूर्नविलोकनासाठी तोंडी विनंती केली आहे या संदर्भात विमा कंपनीकडे कागदपत्रे पाठवून पूर्नविलोकनाची मागणी केल्याचे रेकार्डवरुन दिसत नाही. तक्रारदाराचे सदरचे कारण विलंब माफ करण्याचे दिशेने योग्य व सबळ नाही. त्यामूळे तक्रारीचा विलंब माफ करणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदाराचा दावा हा सामनेवाला विमा कंपनीने 7/12 ला नांव नाही व वय 80 वर्षाचे असल्याने नाकारला आहे. त्या संदर्भात जरी पोलिस स्टेशनच्या फिर्यादीत व पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये मयत सोनाबाईचे वय75 दाखविण्यातआले असले तरी मयताचे मतदान ओळखकार्डावर, 1994 साली वय 31 दाखविण्यात आलेले आहे. तकारदार हे मयत सोनाबाईचा मूलगा असून, सन 2011 मध्ये त्यांचे वय 55 वर्ष व बाबूराव या दूस-या मूलाने विमा कंपनीला दि.6.9.2006 रोजी शपथपत्र करुन दिलेले आहे त्यांचे वय त्यावेळी 48 वर्षाचे होते. यासर्व वयावरुन मयताचे वय निश्चित 75 असल्या बाबतचा पूरावा नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदाराचा दावा योग्य रितीने नाकारला. त्यामुळे त्यात तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड