(घोषित दि. 26.04.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया,सदस्या)
अर्जदाराच्या पतीच्या अपघाती मृत्यूनंतर शासनाच्या शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम न मिळाल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती मोटर-सायकल वरुन येत असताना पाठीमागून येणा-या गाडीने त्यांना धडक दिली व डोक्याला मार लागून त्यांचे दिनांक 29.05.2010 रोजी निधन झाले. या अपघाताची नोंद बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून घटनास्थळ पंचनामा करण्यात आला आहे. अर्जदाराने विमा रक्कम मिळण्यासाठी दिनांक 15.09.2010 रोजी विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 म्हणजे तालुका कृषी अधिका-याकडे दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदरील प्रस्ताव दिनांक 20.10.2010 रोजी विमा सल्लागार कंपनीकडे पाठविला. गैरअर्जदार क्रमांक 3 म्हणजे विमा सल्लागार कंपनीने दिनांक 06.12.2010 रोजी त्रुटींची पूर्तता करण्या संबंधी पत्र पाठविले. त्यानुसार त्रुटींची पूर्तता करुन गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 3 यांना कागदपत्रे पाठविली. परंतू गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 31.12.2010 रोजी विमा प्रस्ताव नाकारल्याचे कळविले. त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन विमा रक्कम व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, प्रपत्र ई, विमा सल्लागार कंपनीचे पत्र, प्रतिवादी 1 यांनी पूर्तता केलेले पत्र, विमा प्रस्ताव नाकारल्याचे विमा कंपनीचे पत्र इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 तालुका कृषी अधिकारी बदनापूर यांनी मंचात जवाब दाखल केला असून त्यामध्ये निर्मलाबाई अंकूश भडंगे यांनी त्यांच्या कार्यालयात दिनांक 15.09.2010 रोजी प्रस्ताव सादर केल्याचे मान्य केले आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना यांनी दिनांक 20.12.2010 रोजी 7/12, 8अ, 6 क, एफ.आय.आर, वाहन परवाना इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले त्यानुसार वरील सर्व कागदपत्रे अर्जदाराने स्वत: जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना यांना सादर केले असल्याचे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी जवाबात म्हटले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 जिल्हा कृषी अधिकारी जालना यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराचा विमा प्रस्ताव त्यांच्या कार्यालयास दिनांक 16.09.2010 रोजी प्राप्त झाला. तो त्यांनी दिनांक 20.10.2010 रोजी पुढील कार्यवाहीसाठी कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांना पाठविला. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांनी 7/12, 8अ, 6 क, एफ.आय.आर, मोटर वाहन परवाना या कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी दिनांक 20.12.2010 रोजी तालुका कृषी अधिकारी, बदनापूर यांना कळविले. कृषी अधिका-यांनी सदरील माहिती वारसदाराला कळविली. वारसदाराने स्वत: सर्व कागदपत्रे त्यांच्या कार्यालयात सादर केली व ही कागदपत्रे म्हणजेच 7/12 उतारा, 8 अ, 6 क, एफ.आय.आर, वाहन परवाना व कार्यालयाचे पत्र क्रमांक 1309/11, दिनांक 22.03.2011 रोजी कबाल ब्रोकींग सर्व्हिसेसला पाठविले.
गैरअर्जदार क्रमांक 3 म्हणजेच कबाल ब्रोकींग सर्व्हिसेस यांनी त्यांचा जवाब पाठविला असून त्यांना सदरील प्रस्ताव दिनांक 27.10.2010 रोजी मिळाला असल्याचे म्हटले आहे. सदरील प्रस्ताव अपूर्ण असल्यामुळे त्यांनी 6 क चा मूळ उतारा, पोलीस प्रमाणित एफ.आय.आर, पोलीस प्रमाणित वाहन परवाना इत्यादी कागदपत्रांची दिनांक 02.11.2010 रोजी पत्र पाठवून मागणी केली व दिनांक 06.12.2010 रोजी स्मरणपत्र पाठविले. सदरील कागदपत्रे न मिळाल्यामुळे अपूर्ण कागदपत्रासह सदरील प्रस्ताव युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, नागपूर यांच्याकडे पाठविला. विमा कंपनीने दिनांक 31.12.2010 रोजी पत्र पाठवून सदरील प्रस्ताव नामंजूर करुन प्रकरण बंद केल्याचे कळविले.
गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार एफ.आय.आर, पोस्ट मार्टम अहवाल, चार्जशिट, वाहन परवाना इत्यादी कागदपत्रे त्यांना विहीत मुदतीत न मिळाल्यामुळे त्यांनी प्रस्ताव नामंजूर केला.
अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1,2,3 व 4 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराचे पती अंकुश काशिनाथ भडंगे यांचा बदनापूर येथे मोटर सायकल चालवित असताना अपघात होऊन दिनांक 29.05.2010 रोजी मृत्यू झाला. त्याची बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद घेण्यात आली असून घटनास्थळ पंचनामा करण्यात आला, त्यानंतर अर्जदाराने शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी विमा प्रस्ताव दिनांक 15.09.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 म्हणजे बदनापूर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केला. बदनापूर तालुका कृषी अधिकारी यांनी सदरील प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना पाठविला. जिल्हा कृषी अधिकारी यांनी सदरील प्रस्ताव दिनांक 20.10.2010 रोजी कबाल ब्रोकींग सर्व्हिसेस यांना पाठविला. कबाल ब्रोकिंग सर्व्हिसेस यांनी दिनांक 06.12.2010 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना यांना पत्र पाठविले व 7/12, 8 अ, 6 क, एफ.आय.आर, व मोटर वाहन परवाना या कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिनांक 20.12.2010 रोजी तालुका कृषी अधिकारी बदनापूर यांना कळविले (नि.क्र.7) कृषी अधिकारी जालना यांच्या जवाबानुसार वारसदार यांनी वरील सर्व कागदपत्रे स्वत:च्या कार्यालयात सादर केले व या कार्यालयाने दिनांक 22.03.2011 रोजी पत्र क्रमांक 1309/2011 द्वारे मे. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांना सर्व कागदपत्रे पाठविली.
गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी दिनांक 31.12.2010 रोजी कागदपत्रे मिळाली नसल्यामुळे सदरील प्रकरण नामंजूर केले. परंतू गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी सादर केलेल्या पत्रानुसार त्यांनी दिनांक 22.03.2011 रोजी सर्व कागदपत्रे पाठविल्याचे दिसून येते. परंतू ही कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीला क्लेम नामंजूर झाल्यानंतर मिळाल्याचे दिसून येते. परंतू यामध्ये अर्जदाराची चूक नसल्याचे दिसून येते. सदरील पत्रव्यवहार गैरअर्जदार क्रमांक 1 नंतर गैरअर्जदार क्रमांक 2 नंतर गैरअर्जदार क्रमांक 3 व नंतर गैरअर्जदार क्रमांक 4 यांच्याकडे क्रमाक्रमाने झालेला आहे. त्यानंतर कागदपत्रे मिळाली नसल्याचा पत्रव्यवहार गैरअर्जदार क्रमांक 4 नंतर 3 नंतर 2 व नंतर 1 नंतर तक्रारदार असा उलटया क्रमाने झालेला आहे. या सर्वासाठी शासनाने जरीवेळ ठरवून दिला असला तरी शासकीय कार्यालयातच वेळेचे उल्लघंन झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदाराची यात चूक नाही. तक्रारदार विमा रक्कम 1,00,000/- रुपये मिळण्यास पात्र आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास 1,00,000/- रुपये (एक लाख रुपये) 30 दिवसात द्यावे.
- खर्चाबद्दल आदेश नाही.