::निकालपत्र ::
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारित दिनांक-15 फेब्रुवारी, 2018)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित या बिज निर्मिती कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे विक्रेता यांचे विरुध्द सदोष बियाण्या संबधाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याची मौजा खराळा, तहसिल नरखेड, जिल्हा नागपूर येथे शेती असून त्याचा सर्व्हे क्रं-185/2, क्षेत्रफळ-1.21 हेक्टर आर तसेच सर्व्हे क्रं-15, एकूण क्षेत्रफळ-1.21 हेक्टर आर असून यामध्ये 0.81 क्षेत्र हे जिरायती खाली आणि 0.40 क्षेत्र हे बागायतीचे आहे. त्याच बरोबर मौजा खराळा येथील सर्व्हे नं.-186/2, एकूण क्षेत्र 1 हेक्टर जिरायत आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे विक्रेता यांचे कडून दिनांक-12/06/2013 रोजी, विरुध्दपक्ष क्रं-1) महाबिज निर्मित जे.एस.-9305 सोयाबिनचे बियाणे वजन अंदाजे 30 किलोग्रॅम अशा एकूण-11 बॅग्स प्रत्येकी किम्मत रुपये-1380/- प्रमाणे एकूण किम्मत रुपये-15,180/- मध्ये खरेदी केल्यात. या 11 बॅग्स पैकी 08 बॅग्स हया लॉट क्रं-680 च्या तर 01 बॅग लॉट क्रं-681 ची तसेच 02 बॅग हया लॉट क्रं-685 च्या होत्या.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, बियाण्याची खरेदी केल्या नंतर त्या बियाण्याच्या पेरणीसाठी त्याला नांगरणी, पेरणी, रासायनिक खते, कल्टीव्हेटर, बैलजोडी, मजूरी इत्यादीसाठी खर्च करावा लागला परंतु बियाण्याची उगवण ही कमी क्षमतेची झाल्याने त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचेकडे बरेचदा मौखीक तक्रारी करुन नुकसान भरपाईची मागणी केली. तक्रारकर्त्याने कृषी विभाग, जिल्हा परिषद यांचेकडे दिनाक-04/07/2013 रोजी लेखी तक्रार केली, त्यानुसार दिनांक-06/07/2013 रोजी तालुका कृषी अधिकारी, नरखेड तसेच श्री व्ही.सी.पाटल व अन्य शेतकरी यांचे उपस्थितीत मोक्यावर पंचनामा करण्यात आला, सदर पंचनाम्या नुसार बियाण्यांची उगवण क्षमता ही फक्त 20 ते 25 टक्के एवढीच आढळून आली.
तक्रारकर्त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, त्याची शेती ही उत्कृष्ट दर्जाची असून त्याने शेतीच्या मशागतीवर भरपूर खर्च केलेला असल्याने बियाण्याची उगवण चांगली होणे अभिप्रेत होते. परंतु कृषी विकास अधिकारी यांनी केलेल्या पंचनाम्या नुसार विरुध्दपक्ष क्रं 1 महाबिज निर्मित सोयाबिन बियाण्याची उगवणशक्ती ही अत्यंत कमी होती. विरुध्दपक्ष क्रं-1) महाबिज निर्मित बियाणे हे दोषपूर्ण असल्याने तक्रारकर्त्याची फसवणूक झाली व संपूर्ण कुटूंबावर आर्थिक संकट कोसळल्याने तो निराश झालेला आहे. त्याने पिक लागवडीसाठी केलेला खर्च आणि अपेक्षीत उत्पन्नाचे नुकसान झालेले असल्याने तो प्रती एकर रुपये-70,000/- प्रमाणे एकूण शेतजमीन 8.5 एकरसाठी अंदाजे रुपये-5,95,000/- त्याच बरोबर मनःस्तापापोटी रुपये-50,000/-, शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि ट्रॅक्टरने नांगरणी, गांडूळखत, शेणखत, मजूरी, औषधी, रासायनिक खते, कल्टीव्हेशन यासाठी एकूण खर्च रुपये-1,66,170/- असे मिळून एकूण रुपये-8,61,170/- नुकसान भरपाई मिळण्यास तो पात्र आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने दोन्ही विरुध्दपक्षानां दिनांक-09/04/2014 रोजी कायदेशीर नोटीस नोंदणीकृत डाकेने पाठविली होती, सदर नोटीस विरुध्दपक्षांना प्राप्त होऊनही प्रतिसाद मिळाला नाही वा उत्तरही देण्यात आले नाही. म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन खालील प्रमाणे विरुध्दपक्षां विरुध्द मागणी केली-
(1) उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे त्याला विरुध्दपक्षां कडून एकूण रुपये-8,61,170/- नुकसान भरपाई दाखल मिळावेत.
(2) तसेच या तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-20,000/- मिळावेत.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) महाबिज बियाणे निर्माता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे विक्रेता यांनी नि.क्रं-11 वर एकत्रित लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी उत्तरात नमुद केले की, तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने ग्राहक मंचा समक्ष् अलेला नाही. लॉट क्रं-Oct-12-13-3101-680 आणि लॉट क्रं-Oct-12-13-3101-681 तसेच लॉट क्रं- Oct-12-13-3101-685 JS-9305 चे सोयाबिन बियाणे महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणिकरण यंत्रणा, आकोला यांचे कडून प्रमाणित करण्यात येऊन नंतरच ते विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले, बिज प्रमाणिकरण यंत्रणा आकोला यांनी दिनांक-15/02/2013 रोजी जारी केलेल्या रिलीज ऑर्डर क्रं-62920, क्रं-62921 आणि क्रं-62924 अनुसार सदर लॉटच्या सोयाबिन बियाण्यांची उगवण क्षमता ही अनुक्रमे-70% आणि 74% तसेच 80% एवढी होती, महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणिकरण यंत्रणे व्दारे उगवण क्षमते बद्दल दिलेले प्रमाणपत्र ते पुराव्या दाखल सादर करीत आहेत. तक्रारकर्त्याने बिज प्रमाणिकरण यंत्रणा अकोला यांना प्रतिपक्ष केलेले नसल्याने सुध्दा तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) निर्मित बियाणे विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांचे कडून विकत घेतल्याची बाब नाकबुल करुन बियाण्याचे बिल हे ओव्हर रायटींग केले असल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या सोयाबिन बियाण्याच्या 11 बॅग्स पैकी 08 बॅग्स हया लॉट क्रं-680 च्या तर 01 बॅग लॉट क्रं-681 ची तसेच 02 बॅग हया लॉट क्रं-685 च्या असल्याची बाब नाकबुल केली. तक्रारकर्त्याने दोषपूर्ण बियाण्या संबधी विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचेकडे मौखीक तक्रारी केल्याची बाब सुध्दा नाकबुल केली. कृषी विकास अधिकारी यांनी दिनांक-06/07/2013 रोजी तक्रारकर्त्याचे शेतात जो पंचनामा केला होता, त्याची लेखी सुचनावजा नोटीस विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 ला देण्यात आली नव्हती, त्यांना कोणतीही संधी न देता त्यांचे अनुपस्थितीत करण्यात आलेला पंचनामा हा कायदेशीरदृष्टया योग्य नसून तो बेकायदेशीर आहे. बियाणे कायद्दातील तरतुदी प्रमाणे बियाणे निर्माता आणि विक्रेता यांचे समक्ष पंचनामा होणे आवश्यक आहे. बियाण्याची उगवणशक्ती ही शेतातील जमीन, बियाण्याची पेरणी करताना घ्यावयाची योग्य काळजी, हवामान इत्यादीवर अवलंबून असते, त्यासाठी विरुध्दपक्षांना जबाबदार धरल्या जाऊ शकत नाही. त्यांनी जे.एस.-9305 सोयाबिन बियाणे हे आसपास लगत अनेक शेतक-यांना विकलेले असून त्यांची या लॉटच्या बियाण्या बद्दल तक्रार नाही. फक्त तक्रारकर्त्याची तक्रार ही बियाण्याच्या उगवण क्षमते बद्दलची आहे, यावरुन तक्रार खोटी व चुकीची असल्याचे सिध्द होते. कृषी विकास अधिकारी यांनी केलेल्या पंचनाम्या मध्ये बियाण्यात नेमका काय दोष आहे हे उल्लेखित केलेले नाही.
तक्रारकर्त्याने कृषी अधिकारी यांचे कडे दिनांक-03/07/2013 रोजी तक्रार केली, त्यामध्ये त्याने स्वतःच कबुल केले आहे की,त्यातील एक बॅग बियाणे चांगल्या प्रतीचे होते, यावरुन असे दिसून येते की, त्या लॉट मधील बियाणे हे जर दोषपूर्ण होते तर सर्वच बियाण्याच्या बॅग्स मधील बियाणे हे दोषपूर्ण असावयास हवे होते. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजा वरुन त्याने शेतात कापूस, तुर आणि मोसम्बीचे पिक सुध्दा घेतलेले दिसून येते, त्यामुळे त्याचेच म्हणण्या प्रमाणे त्याची उपासमार होत असल्याचे दिसून येत नाही. अन्य शेतक-यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 महाबिज निर्मित बियाणे खरेदी करुन पेरणी केलेले आहे, त्यांचे शेतात दर्जेदार उत्पादन आलेले आहे. तक्रारकर्त्याने मागितलेली नुकसान भरपाई ही योग्य त्या पुराव्या शिवाय अतिशय जास्त प्रमाणात वाढवून मागीतलेली आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेलया दस्तऐवजा वरुन असे दिसून येते की, त्याने सोयाबिन पिक हे .95 हेक्टर आर म्हणजे 2.34 एकर मध्ये पेरल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याने दिनांक-24.06.2013 रोजी बियाण्याची परेणी केली आणि पेरणी केल्या नंतर दिनांक-24/06/2013 ते दिनांक-15/07/2013 या कालावधीत नरखेड तहसिल मध्ये 167 मिलीमीटर पाऊस पडल्याचे दिसून येते, त्यामुळे सदर पाऊसामुळे सुध्दा सोयाबिनची कमी उगवण होऊ शकते. वरील सर्व वस्तुस्थिती वरुन दिसून येते की,
विरुध्दपक्ष क्रं-1) महाबिज निर्मित सोयाबिन बियाणे हे चांगल्या व उच्च दर्जाच्या प्रतीचे असून विरुध्दपक्षांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्याला दिलेली नसल्याने तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून सोबत नि.क्रं-3 यादी दस्तऐवजा नुसार शेतीच्या 7/12 उता-याच्या प्रती, लॉट क्रमांक रसीद, ट्रॅक्टर बिल, बियाणे खरेदी बिल, पेरणीची पावती, ग्राम पंचायतीचे प्रमाणपत्र, कृषी अधिकारी यांचेकडे केलेली तक्रार, शेतातील पंचनामा, जिल्हा अधिक्षक यांचे कडे केलेली तक्रार, तालुक तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय अहवल, ग्राम अधिकारी यांचे प्रमाणपत्र, कायदेशीर नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोच अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने नि.क्रं-19 वर प्रतीउत्तर प्रतिज्ञालेखावर तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याने त्याचे शेतीला लागून असलेल्या अन्य शेतक-यांचे प्रतिज्ञालेख दाखल केलेत, ज्यामध्ये अन्य शेतक-यांनी त्यांचे शेतात विरुध्दपक्ष क्रं -1 महाबिज निर्मित सोयाबिन बियाण्यांची पेरणी न करता, अन्य सोयाबिन बियाण्याची पेरणी केल्याने त्यांना सन-2013-2014 या वर्षात भरपूर उत्पादन झाल्या बाबत नमुद केलेले असून पुराव्या दाखल 7/12 च्या प्रती सुध्दा दाखल केलेल्या आहेत, त्या अन्य शेतक-यां मध्ये सर्वश्री धनराज शंकरराव ठाकरे, अमोल बापूरावजी चौधरी, रामभाऊ श्यामरावजी चौधरी, रामदास अमृतराव खोडे, भूषण उत्तमरावजी चौधरी यांचा समावेश आहे.
तक्रारकर्त्याने नि.क्रं-20 वरील यादी नुसार शासन निर्णय, शासन परिपत्रक, मुक्तता अहवाल (Release Order), मान्यता प्रमाणपत्र, महाबिजव्दारे प्रकाशित सोयाबिन पिकाचे माहितीपत्रक अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
05. विरुध्दपक्षां तर्फे उत्तरा सोबत विविध न्यायनिवाडयांच्या प्रती दाखल केल्यात. तसेच नागपूर जिल्हा रेनफॉल डाटा आणि सोयाबिन बियाणे लॉट क्रं-680,क्रं-681 आणि क्रं-685 चे महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणिकरण यंत्रणा आकोला यांचे दिनांक-15/02/2013 रोजीचे मुक्तता अहवालाच्या (Release Order) प्रती दाखल केलेल्या आहेत, मुक्तता अहवाला नुसार सदर बियाण्यांची उगवण अनुक्रमे ही 70%, 74% आणि 80% असल्याचे प्रमाणित केलेले आहे.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज, लेखी युक्तीवाद, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर आणि सादर केलेल्या न्यायनिवाडयांच्या प्रतींचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री चिचबनकर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
07. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या 7/12 उता-यांच्या प्रतीं वरुन मौजा खराळा, तालुका नरखेड, जिल्हा नागपूर येथे त्याची गट क्रं-186/2 क्षेत्र 1.00 हेक्टर आर, गट क्रं-185/2 क्षेत्र-1 हेक्टर 21 आर, गट क्रं-15 क्षेत्र 1 हेक्टर 21 आर एवढी शेती त्याचे मालकीची दिसून येते. सदर उता-या मध्ये गट क्रं-186/2 मध्ये सन-2012-13 खरीप हंगामात त्याने 0.95 हेक्टर आर क्षेत्रात सोयाबिन पेरल्याची नोंद आहे. तर गट क्रं-185/2 मध्ये सन-2012-13 खरीप हंगामात 1.00 क्षेत्रात कापूस व 0.20 क्षेत्रात तुर पिकाची नोंद आहे. तर गट क्रं-15 मध्ये सन-2012-13 वर्षात 1.20 क्षेत्रात कापूस आणि 1.20 क्षेत्रत मोसंबी पिकाची नोंद आहे.
08. तक्रारकर्त्याने सन-2013-2014 या वर्षात एकूण 8.50 एकर क्षेतात महाबिज सोयाबिन नं.-9305 वाणाचे बियाणे परेले परंतु ते उगवले नसल्या बाबत ग्राम पंचायत खराळा यांनी दिनांक-30/06/2012 रोजी दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने कृषी अधिकारी, पंचायत समिती नरखेड यांचे कडे दिनांक-03/07/2013 रोजी केलेल्या तक्रारीची प्रत दाखल केली, त्यामध्ये त्याने एकूण 8.50 एकरा मध्ये महाबिज निर्मित सोयाबिन एकूण 11 बॅग्स बियाण्याची पेरणी दिनांक-24/06/2013 रोजी केली परंतु एक बॅग बियाणे चांगले असून उर्वरीत बियाण्याची पेरणी झालेली नसलयाने लागवडीचा खर्च अंदाजे -35,000/- बियाणे, खत, मजूरी साठी आलेला असल्याचे नमुद केलेले आहे.
09. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) महाबिज निर्मित सोयाबिन जे.एस.-9305 एकूण 11 बॅग्स एकूण रुपये-15,180/- एवढया किमतीत विरुध्दपक्ष क्रं-2) कृषी धन काटोल यंचे कडून दिनांक-12/06/2013 रोजी खरेदी केल्या बाबत बिलाची प्रत दाखल केली. तसेच डि.ए.जी गोदावरी कंपनीचे 50 किलोचे पॅकींग खरेदी बाबत दिनांक-15/06/2013 रोजीचे बिल रक्कम रुपये-15,340/- दाखल केले.तसेच 8.50 एकर शेतातसोयाबिन पिकाची पेरणी केल्या बाबत मजूरी दाखल रुपये-6000/-मिळाल्या बाबत भगवान तुकाराम डोंगरे याने दिनांक-24/06/2013 रोजी दिलेल्या पावतीची प्रत दाखल केली.
10. तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने तक्रारकर्त्याचे शेतात दिनांक-06/07/2013 रोजी प्रत्यक्ष्य मोका पाहणी करुन त्याच दिवशी अहवाल दिला, सदर अहवाला वरुन समिती मध्ये सर्वश्री एम.एस.गुडधे, तालुका कृषी अधिकारी, नरखेड, एस.व्ही.सरोदय, मंडळ कृषी अधिकारी, भारसिंगी, व्ही.सी.पाटील, जिल्हा व्यवस्थापक, महाबिज नागपूर, ओ.एस.राखोंडे सहा.प्राध्यापक, काटेल, एस.के.गोरटे, कृषी अधिकारी, पंचायत समिती नरखेड, एस.जे.पाटील, कृषी अधिकारी, पंचायत समिती नरखेड, तक्रारकर्ता तेजराम शामराव चौधरी, अन्य शेतकरी अमोल बापूराव चौधरी, रामदास खोडे आणि एस.बी. दिवे, जिल्हा व्यवस्थापक महाबिज नागपूर हे उपस्थित असून त्यांच्या सदर अहवालावर स्वाक्ष-या आहेत.
11. विरुध्दपक्ष क्रं-1) महाबिज बियाणे निर्मिती आणि विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे विक्रेता यांनी लेखी उत्तरात असा आक्षेप घेतलेला आहे की, तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने तक्रारकर्त्याचे शेतात दिनांक-06/07/2013 रोजी प्रत्यक्ष्य मोका पाहणी करुन जो अहवाल दिलेला आहे, त्या मोका पाहणीची लेखी नोटीस त्यांना देण्यात आलेली नव्हती व त्यांचे अनुपस्थितीत केलेल्या मोका पाहणी अहवालाला कायदेशीरदृष्टया काहीही महत्व उरत नाही.
या आक्षेपा संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, विरुध्दपक्षांचे या आक्षेपा मध्ये काहीही तथ्य दिसून येत नाही याचे कारण तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवालावर विरुध्दपक्ष क्रं-1) महाबिज या बियाणे निर्माता कंपनीचे जबाबदार अधिकारी श्री व्ही.सी.पाटील, जिल्हा व्यवस्थापक, महाबिज नागपूर आणि श्री एस.बी. दिवे, जिल्हा व्यवस्थापक महाबिज नागपूर यांच्या सदर अहवालावर स्वाक्ष-या आहेत.
12. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी उत्तरात असाही आक्षेप घेतलेला आहे की, तक्रारकर्त्याने दिनांक-24.06.2013 रोजी बियाण्याची परेणी केली आणि पेरणी केल्या नंतर दिनांक-24/06/2013 ते दिनांक-15/07/2013 या कालावधीत नरखेड तहसिल मध्ये 167 मिलीमीटर पाऊस पडल्याचे दिसून येते, त्यामुळे सदर पाऊसामुळे सुध्दा सोयाबिनची कमी उगवण होऊ शकते. तसेच बियाण्याची उगवणशक्ती ही शेतातील जमीन, बियाण्याची पेरणी करताना घ्यावयाची योग्य काळजी, हवामान इत्यादीवर अवलंबून असते, त्यासाठी विरुध्दपक्षांना जबाबदार धरल्या जाऊ शकत नाही.
या आक्षेपा संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारकर्त्याने त्याचे शेतीला लागून असलेल्या अन्य शेतक-यांचे प्रतिज्ञालेख दाखल केलेत, ज्यामध्ये अन्य शेतक-यांनी त्यांचे शेतात विरुध्दपक्ष क्रं -1 महाबिज निर्मित सोयाबिन बियाण्यांची पेरणी न करता, अन्य सोयाबिन बियाण्याची पेरणी केल्याने त्यांना सन-2013-2014 या वर्षात भरपूर उत्पादन झाल्या बाबत प्रतिज्ञालेखांवर कथन केलेले आहे तसेच पुराव्या दाखल 7/12 च्या प्रती सुध्दा दाखल केलेल्या आहेत, त्या अन्य शेतक-यां मध्ये सर्वश्री धनराज शंकरराव ठाकरे, अमोल बापूरावजी चौधरी, रामभाऊ श्यामरावजी चौधरी, रामदास अमृतराव खोडे, भूषण उत्तमरावजी चौधरी यांचा समावेश आहे. विरुध्दपक्षांचे कथना प्रमाणे तक्रारकर्त्याचे शेतात सोयाबिन बियाण्याची उगवणक्षमता कमी आल्याचे कारण हे त्याचे शेतातील जमीन, हवामान, पाऊस या घटकांमुळे गृहीत धरले तर तक्रारकर्त्याच्या शेताचे आसपास भागातील शेतक-यांचे शेतावर सुध्दा जमीन, हवामान, पाऊस या घटकांचा परिणाम व्हावयास हवा होता परंतु आसपासचे भागातील शेतक-यांना त्यांनी महाबिज व्यतिरिक्त अन्य सोयाबिन बियाणे वापरल्याने सोयाबिन पिकाचे चांगले उत्पादन आल्याचे त्यांचे कथन आहे, त्यामुळे विरुध्दपक्षांचे याही आक्षेपा मध्ये अतिरिक्त ग्राहक मंचास कोणतेही तथ्य दिसून येते नाही.
13. तक्रारकर्त्याने खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवली-
1) 2004-CTJ-697 (SC) “H. N.Shankara Shastry-
Versus- The Asstt. Director of Agriculture”
2) I (2004) –CPJ (NC) “National Seeds Corporation
Ltd.- Versus-M.Madhusudan Reddy”
3) I (1999) CPJ-451 Maharashtra State Commission
Mumbai “National Forum for Consumer Education
– Versus-Sanjay Krishi Seva Kendra”
4) 2008 (3) CPJ-96 (NC) “India Seed House-Versus-
Ramjilal Sharma”
5) AIR-2012) SC-1160 “National Seeds Coropration-
Versus- M.Madhusudan Reddy”
6) IV (2013) CPJ-241 (NC) “Maharashtra State Seeds
Corporation-Versus-Arvind Borkar”
7) II (2014) CPJ-703 (NC) “Dharam Pal & Sons-Versus-
Son Prakash”
8) IV (2008) CPJ-119 (NC) “Pratham Biotech Pvt.Ltd.-
Verus-Sayed Javed Sayed Amir”
9) I (2009) CPJ-99 (NC) “National Seeds Corporation-
Versus-P.V.Krishna Reddy”
10) II (2015) CPJ-587 (NC) “Seeds Works International
Pvt.Ltd.-Versus-Nampelly Sudhakar & others”
11) I (2015) CPJ-658 (NC) “Mahodaya Hybrid
Seeds Pvt.- Versus-Kishor Murumkar & others”
12) III (2003) CPJ-14 (NC) “Shri Rama Enterprises–
Versus-Venkat Reddy”
13) III (2009) CPJ-379 (NC) “Mahyco Monsanto Bio
Tech (I) Ltd.-Versus-Bodduluri Jeevan Kumar
& Anr.”
14) I (2015) CPJ-47 (Chha.) “C.G.State Seed &
Agriculture Dev.Corporation-Versus-Mohanlal Sahu
& Anr.”
15) II(2015) CPJ-23 (B) (CN) (Punj) “Nuziveedu Seeds
Ltd.-Versus-Mukaund Singh & others”
16) Revision Petition No.-3772/2009, Decided
on-08th Oct.2015 (NC) “Leadbetter Seeds Pvt.Ltd.-
Versus-Tanneru Rangaiah & others.
17) I (2002) CPJ-13 (NC) “N.S.C.Ltd.-Versus-
Guruswamy & Anr.”
18) I (2009) CPJ-225 (NC) “National Seeds Corportation
Ltd.-Versus-Abdul Aziz Fakir Mohd.Inamdar & Anr.”
19) II (2016) CPJ-224 (NC)”Ajeet Seeds Pvt.Ltd.-
Versus-Arjun Singh &Anr.”
20) (2017) CJ-782 (NC) “Shri Ram Bioseed
Genetics India Ltd.-Versus-Badri Prasad & Others”
आम्ही या मा.वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयांचे आम्ही काळजीपूर्वक वाचन केले, त्या मध्ये चौकशी अहवाला अंतर्गत बियाणे तक्रार निवारण समितीने पंचनाम्या नुसार केलेली तपासणी ही योग्य असल्याचे नमुद केलेले आहे. तसेच बियाणे दोषपूर्ण नसल्या बद्दल बियाणे कायद्दातील तरतुदी प्रमाणे त्या लॉटच्या बियाण्याची प्रयोग शाळेतून चाचणी करुन ते सिध्द करण्याची जबाबदारी सर्वस्वी बियाणे निर्माता कंपनीची आहे, तक्रारकर्त्याने सदर बियाण्याचे सॅम्पल जपून ठेवणे अपेक्षीत नाही. तसेच बियाणे कायदा हा स्वतंत्र कायदा असून तो बियाण्याच्या गुणवत्ते संबधी आहे, त्यामध्ये शेतक-यांसाठी नुकसान भरपाई देण्याची तरतुद नाही, ग्राहक संरक्षण कायदा हा एक वेगळा स्वतंत्र कायदा आहे अशी मते नोंदविलेली आहेत.
14. तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने तक्रारकर्त्याचे शेतात दिनांक-06/07/2013 रोजी प्रत्यक्ष्य मोका पाहणी करुन जो अहवाल दिलेला आहे, तो शासना मार्फतीने कृषी विभागातील तज्ञांचे उपस्थितीत दिलेला आहे तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) महाबिज या बियाणे निर्माता कंपनीचे श्री व्ही.सी.पाटील, जिल्हा व्यवस्थापक, महाबिज, नागपूर यांची सुध्दा त्यावेळी उपस्थिती होती त्यामुळे तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल या प्रकरणात अत्यंत महत्वाचा असून त्यावर अविश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण दिसून येत नाही.
तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीच्या दिनांक-06/07/2013 रोजी प्रत्यक्ष्य मोका पाहणी अहवाला मध्ये खालील प्रमाणे निरिक्षण नोंदविण्यात आलेले आहे-
सदर पेरीव क्षेत्रात जमीनीची मशागत, नांगरणी व वखरणी करण्यात आली होती व त्यात सदर विकत घेतलेले बियाणे दिनांक-24/06/2013 रोजी पेरले. पाहणीत जवळपास 06 एकर क्षेत्रातील बियाण्याची उगवण 20% ते 25% आढळली. सदर शेताचा सर्व्हे क्रं-185/2 व 186/2 आहे, सदर क्षेत्रात 07 बॅग्स बियाण्याची पेरणी केली तर सर्व्हे क्रं-15 मध्ये 04 बॅग्सची पेरणी केलेली असून पेरीव क्षेत्रातील उगवणक्षमता 50% आढळली. शेतात मिळालेल्या टॅग नुसार लॉट क्रं-680 ची उगवण क्षमता 20% ते 25% आढळते तर लॉट क्रं-681 व 685 ची उगवण क्षमता 50% पर्यंत आढळते. तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवाला मध्ये बिलाचे प्रतीवरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे विक्रेता यांचे कडून दिनांक-12/06/2013 रोजी सोयाबिन 9305 (प्रत्येकी 30 किलो पॅकींग) एकूण 11 बॅग्स खरेदी केलेल्या असून त्या नुसार लॉट क्रं-Oct-12-13-3101-680 च्या 08 बॅग्स आणि लॉट क्रं-Oct-12-13-3101-681 ची 01 बॅग तसेच लॉट क्रं- Oct-12-13-3101-685 च्या 02 बॅग्स आहेत.
15. तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवाला वरुन असा निष्कर्ष काढता येईल की, लॉट क्रं-680 च्या 08 बॅग्स असून त्याची उगवण क्षमता ही 20% ते 25% आढळून आल्यामुळे या बियाण्याच्या लॉट मुळे तक्रारकर्त्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तर लॉट क्रं-Oct-12-13-3101-681 ची 01 बॅग आणि लॉट क्रं- Oct-12-13-3101-685 च्या 02 बॅग्स असे मिळून एकूण 03 बॅग्स असून या बियाण्यांची उगवण क्षमता 50% पर्यंत आढळून आलेली आहे परंतु या लॉटचे खरेदी केलेले बियाणे कमी प्रमाणात होते. पाहणीत शेत सर्व्हे क्रं-185/2 व 186/2 मध्ये 07 बॅग्स बियाण्याची पेरणी जवळपास 06 एकर क्षेत्रात केलेली असून बियाण्याची उगवण 20% ते 25% आढळून आली. तर सर्व्हे क्रं-15 मध्ये 04 बॅग्सची पेरणी केलेली असून पेरीव क्षेत्रातील उगवणक्षमता 50% आढळून आली. याचाच निष्कर्ष असा निघतो की, 06 एकर क्षेत्रात दोषपूर्ण सोयाबिन बियाण्यामुळे तक्रारकर्त्याच्या उत्पादनाचे 75% एवढे नुकसान झाले तर उर्वरीत अडीच एकर क्षेत्रात दोषपूर्ण सोयाबिन बियाण्यामुळे तक्रारकर्त्याच्या उत्पादनाचे 50% एवढे नुकसान झाले असा निष्कर्ष निघतो. तसेच तक्रारकर्त्याने कृषी अधिकारी, पंचायत समिती, नरखेड, जिल्हा नागपूर यांना जे दिनांक-03/07/2013 रोजीचे पत्र बियाण्याचे तक्रारी संदर्भात दिलेले आहे, त्यामध्ये तक्रारकर्त्याने स्वतःच कबुली दिलेली आहे की, फक्त एक बॅग बियाणे चांगले निघालेले आहे. या व्यतिरिक्त तक्ररकर्त्याने सन-2012-13 या वर्षीचा जो 7/12 उतारा दाखल केलेला आहे, त्यामध्ये 0.95 हेक्टर आर क्षेत्रात सोयाबिनचे पिक दर्शविलेले आहे, याचाच अर्थ असा होतो की, दोषपूर्ण बियाणे जरी असले तरी काही अंशी तक्रारकर्त्याला त्याचे उत्पादन आलेले आहे.
16. विरुध्दपक्ष क्रं-1) महाबिज बियाणे निर्माता कंपनीच्या सोयाबिन बियाण्याच्या माहितीपत्रका नुसार जे तक्रारकर्त्याने दाखल केलेले आहे, सोयाबिन जे.एस-93-05 या वाणाच्या बियाण्यामुळे शेतक-याला एकरी प्रतीहेक्टर 20 ते 25 क्विंटल उत्पादन येऊ शकते असे नमुद केलेले आहे. सर्वसाधारण परिस्थितीत एकरी 12 क्विंटल सोयाबिनचे अपेक्षीत उत्पादन येते. तक्रारकर्त्याच्या 06 एकर क्षेत्रा मध्ये एकूण 72 क्विंटल उत्पादन अपेक्षीत आहे परंतु त्याचे शेतात काही प्रमाणात 25% सोयाबिन उगवण झाल्याचे तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीचे अहवालात नमुद आहे म्हणजेच 06 एकर करीता त्याचे 75% नुकसान हिशोबात घेतल्यास 06 एकरा मध्ये त्याचे 54 क्विंटल सोयाबिन उत्पादनाचे नुकसान झालेले आहे. उर्वरीत अडीच एकरा मध्ये एकूण-30 क्विंटल सोयाबिनचे उत्पादन अपेक्षीत आहे परंतु उर्वरीत अडीच एकर शेतात 50% सोयाबिनची उगवण झाल्याचे नमुद असल्याने 15 क्विंटल सोयाबिन उत्पादनाचे नुकसान झालेले आहे. अशाप्रकारे दोषपूर्ण बियाण्यामुळे तक्रारकर्त्याचे एकूण 69 क्विंटल सोयाबिन उत्पादनाचे नुकसान झालेले असून सोयबिनचा दर प्रतीक्विंटल रुपये-3000/- प्रमाणे दर हिशोबात घेतल्यास नुकसान झालेल्या अपेक्षीत सोयाबिन एकूण 69 क्विंटल उत्पादनासाठी येणारे एकूण नुकसान हे रुपये-2,07,000/- एवढे येते व तेवढी नुकसान भरपाई मिळण्यास विरुध्दपक्ष क्रं-1) महाबिज निर्माता कंपनी कडून मिळण्यास तो पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
17. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत शेतीची मशागत, नांगरणी, खते इत्यादीसाठी वेगवेगळा खर्च झाल्याने वेगवेगळी नुकसान भरपाई मागितलेली आहे परंतु आम्ही अपेक्षीत उत्पादनाची झालेली नुकसान भरपाई मंजूर करीत असल्याने, शेतीची मशागत, नांगरणी, खते अशी वेगवेगळी नुकसान भरपाई मंजूर करण्याची आवश्यकता नाही.
18. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता श्री तेजराम श्यामराव चौधरी यांची तक्रार, (1) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला या बियाणे निर्माता तर्फे वितरक आणि व्यवस्थापक यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित आकोला बियाणे निर्माता यांना आदेशित करण्यात येते की, त्यांचे व्दारा निर्मित सोयाबिन जे.एस-93-05 दोषपूर्ण बियाण्यामुळे तक्रारकर्त्याला अपेक्षीत उत्पन्नाचे नुकसानी दाखल एकूण रुपये-2,07,000/-(अक्षरी रुपये दोन लक्ष सात हजार फक्त) द्दावेत.
(03) तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-15,000/-(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित आकोला बियाणे निर्माता यांनी तक्रारकर्त्याला द्दावेत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-(2) कृषीधन, कृषी सेवा केंद्र, काटोल, जिल्हा नागपूर या बियाणे विक्रेता याचे विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) तर्फे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला या बियाणे निर्माता तर्फे संबधितानी प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे, विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्यास सदर नुकसान भरपाईची रक्कम रुपये-2,07,000/- निकाल पारीत दिनांक-15 फेब्रुवारी, 2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6% दराने व्याजासह तक्रारकर्त्याला देण्यास विरुध्दपक्ष क्रं-1 महाबिज अकोला बियाणे निर्माता जबाबदार राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.