// नि का ल प त्र //
(1) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांनी आपल्याकडून बयाना रक्कम स्विकारल्यानंतर ठरल्या प्रमाणे फर्निचर तयार केले नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार श्री पिटर गोम्स यांनी जाबदार डिसप्लेस यांच्याकडून सोफा घेण्याचे ठरविले होते. या सोप-याची किंमर रु 33,500/- मात्र ठरलेली असून यापैकी रु 10,000/- मात्र तक्रारदारांनी जाबदारांनी दिनांक 08/10/2011 रोजी अदा केले होते. उर्वरित रक्कम फर्निचर मिळताना तक्रारदारांनी जाबदारांना अदा करण्याची होती. तक्रारदारांनी काही कालावधी नंतर जाऊन त्यांचे तयार झालेल्या फर्निचरची पाहणी केली असता आपण सांगितलेल्या प्रमाणे हे फर्निचर तयार करण्यात आलेले नाही ही वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली. या संदर्भात जाबदारांकडे तक्रारदारांनी तक्रार केली. यावेळी तक्रारदारांनी सांगितल्या प्रमाणे फर्निचर करुन देण्याचे आश्वासन जाबदारांनी त्यांना दिले. यानंतर तक्रारदारांनी वारंवार जाबदारांशी संपर्क साधला मात्र त्यांनी तक्रारदारांना फर्निचर दिले नाही. तक्रारदारांच्या घरात असलेल्या समारंभामुळे त्यांनी नविन फर्निचर विकत घेतले व जाबदारांना अदा केलेली बयाना रक्कम त्यांचे कडून परत मागितली. मात्र जाबदारांनी तक्रारदारांना ही रक्कम परत केली नाही. सबब आपण अदा केलेली रक्कम रु 10,000/- व्याज व इतर अनुषंगीक रकमासह देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, निशाणी 6 अन्वये एकुण 3 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
(2) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांवरती नोटिस बजावल्याची पोहच पावती निशाणी 8 अन्वये या कामी दाखल आहे. या नंतर नेमलेल्या तारखेला जाबदारांनी पोस्टाने एक लेखी निवेदन मंचाकडे पाठवून दिले. हे निवेदन प्राप्त झाल्यानंतर योग्य पध्दती मध्ये आपले म्हणणे व प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे जाबदारांना निर्देश देण्यात आले होते. मात्र त्यांनी या आदेशाची पुर्तता केली नाही तसेच नेमलेल्या एकाही तारखेला जाबदार अथवा त्यांचे प्रतिनिधी मंचापुढे हजर राहीले नाहीत. सबब तक्रारदारांच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले.
(3) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रारीच्या अनुषंगे त्यांनी निशाणी 6/1 अन्वये दाखल केलेल्या पावतीचे अवलोकन केले असता दिनांक 8/10/11 रोजी तक्रारदारांनी जाबदारांना सोप-याच्या किंमतीपोटी आगावू रक्कम म्हणून रु 10,000/- मात्र अदा केले होते ही बाब सिध्द होते. जाबदारांनी आपण सांगितल्या प्रमाणे फर्निचर तयार केले नाही ही तक्रारदारांनी वस्तुस्थिती बाबत शपथेवर केलेली तक्रार जाबदारांनी हजर होऊन नाकारलेली नाही. सबब जाबदारां विरुध्द प्रतिकूल निष्कर्ष निघतो. अशा प्रकारे ऑर्डर प्रमाणे फर्निचर तयार न करणे ही बाब जाबदारांच्या सेवेत त्रूटी उत्पन्न करते असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब तक्रारदारांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे. तक्रारदारांनी जाबदारांना दिनांक 08/10/2011 रोजी रु 10,000/- अदा केले होते ही बाब पुराव्याचे आधारे सिध्द होत असल्यामुळे ही रक्कम वर नमूद तारखे पासून 9 % व्याजासह अदा करण्याचे जाबदारांना निर्देश देण्यात येत आहेत. तसेच तक्रारदारां सारख्या जेष्ठ नागरिकाला स्वत:च्या न्याय्य हक्कासाठी मंचात तक्रार दाखल करणे भाग पाडले याचा विचार करुन तक्रारदारांना शारिरीक व मानिसक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रु. 3000/- व सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रु 2,000/- मंजूर करण्यात येत आहेत.
वर नमूद सर्व निष्कर्ष व विवेचनांच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
सबब मंचाचा आदेश की,
// आदेश //
(1) तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
(2) यातील जाबदारांनी तक्रारदारांना रक्कम रु 10,000/-
(2) (रु दहा हजार) मात्र दि 08/10/2011 पासून संपूर्ण रक्कम
(2) प्राप्त होई पर्यन्त 9 % व्याजासह अदा करावी.
(3) यातील जाबदारांनी तक्रारदारांना शारीरिक व मानसिक
त्रासापोटी नुकसानभरपाई रक्कम रु.3,000/- (रु.तीन
हजार) मात्र अदा करावेत.
(4) वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदारांनी 30
दिवसांचे आत न केल्यास तक्रारदार त्याचे विरुध्द ग्राहक
संरक्षण कायदयाच्या तरतूदी अंतर्गत प्रकरण दाखल करु
शकतील.
(5) निकालपत्राची प्रत उभयपक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
यावी.