निकालपत्र :- (दि.09/09/2010) (व्दारा - श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोंद पोच डाकेने नोटीस पाठवली. सदरची नोटीस घेणेस सामनेवाला यांनी नकार दिलेला आहे व पोष्टाच्या शे-यासहीत सहीशिक्का असलेला लिफाफा परत आलेला आहे. आजरोजी तक्रारदारांनी स्वत: युक्तीवाद केलेला आहे. (2) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी :- सामनेवाला यांचा फ्रॅब्रिकेटर्सचा व्यवसाय आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांना तक्रारदारांच्या मालकीच्या प्लॉटवर बांधलेल्या इमारतीच्या लोखंडी खिडक्यांना लोखंडी दारे बसवण्याची ऑर्डर सप्टेंबर-09 मध्ये दिलेली होती व एकूण काम करणेस रक्कम रु.11,000/- इतकी रक्कम ठरलेली होती. त्यापैकी प्रथम रक्कम रु.1,000/- अॅडव्हान्सपोटी दिले. तसेच रक्कम रु.5,000/- चेकने दिले. रोख रक्कम रु.3,000/- अशी एकूण रक्कम रु.9,000/- सामनेवाला यांना दिलेली आहे व तशी पोचही सामनेवाला यांनी दिलेली आहे. तसेच तक्रारदारांनी दिलेला चेकही वटलेला आहे. परंतु दि.05/03/2010 पर्यंत काम पूर्ण करणेचे ठरलेले होते. परंतु आजअखेर सामनेवाला यांनी सदर कामाची कोणतीही पूर्तता केलेली नाही. सामनेवाला यांना तक्रारदारांनी प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईलवरुन 20 ते 25 वेळा चौकशी करुन काम पूर्ण करुन देणेची विनंती केली असता सामनेवाला यांनी कोणतेही काम केलेले नाही. तसेच दि.21/06/2010 रोजी लेखी नोटीस पाठवून 01/07/2010 पूर्वी सदर काम पूर्ण करुन दयावे अथवा अॅडव्हान्स रक्कम रु.9,000/- प्रचलीत व्याजदराने परत करावे अशी मागणी केली. परंतु सदर नोटीसला उत्तर दिले नाही व कामाची पूर्तताही केलेली नाही. त्यामुळे सामनेवालांनी रक्कम रु.9,000/- व्याजासह देणेचा आदेश व्हावा,त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केलेली आहे. (3) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत तक्रारदारांनी सामनेवाला यांना अॅडव्हान्स दिलेची पोच पावती व एकूण कामाचे वर्णन, सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, सामनेवाला यांना नोटीस पोहोचलेची पोष्टाची पोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) या मंचाने तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकलेला आहे. तसेच उपरोक्त कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांच्या घराला लोखंडी खिडक्या व फॅब्रिकेटर्सचे काम करणेसाठी अॅडव्हान्स पोटी चेकने रक्कम रु.5,000/- व रोख रु.4,000/- स्विकृत केलेबाबतची पावती सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेली आहे. सदर पावतीचे अवलोकन केले असता फॅब्रीकेटर्सचे एकूण कामाची रक्कम रु.11,024/- ठरले असलेचा उल्लेख आहे. तसेच सदर पावतीवर चेकने रक्कम रु.5,000/-व रोख रक्कम रु.4,000/-स्विकृत केलेले आहेत असे लिहून दिलेले आहे. तसेच ऑर्डरप्रमाणे 5 मार्च-2010 रोजी खिडक्या दारांचे फिटींग करणेचे आहे असा उल्लेख केलेला आहे. सदर वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारादारांचे घराला लोखंडी खिडक्या व फॅब्रिकेटर्सचे काम करणेसाठी सामनेवाला यांनी रक्कम रु.9,000/- स्विकृत केलेली आहे ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येत आहे. (5) तक्रारदारांनी त्यांचे युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला यांनी अॅडव्हान्स रक्कम स्विकारुनही त्यांचे घराला लोखंडी खिडक्या ऑर्डरप्रमाणे बसवण्याचे कोणतेही काम केले नसलेचे प्रतिपादन केलेले आहे. त्याअनुषंगाने तक्रारदारांनी दाखल केलेले शपथपत्र तसेच सदर काम पूर्ण करुन दयावे अथवा अॅडव्हान्स रक्कम व्याजासह परत करावी याबाबत सामनेवाला यांना दि.21/06/2010 रोजी पाठविलेल्या नोटीस व त्याची पोष्टाची सहीशिक्का असलेली पोच पावती इत्यादीचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी अॅडव्हान्स रक्कम स्विकारुनही तक्रारदारांचे घराला लोखंडी खिडक्या व फॅब्रिकेटर्सचे काम करुन दिलेले नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला यांनी तकारदारांना रक्कम रु.9,000/- दयावेत व सदर रक्कमेवर दि.08/01/2010पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज दयावे. 3. सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/- दयावेत. 4. सामनेवाला यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रकक्म रु.500/- दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |