निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदारांच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार क्र 2 यांच्याकडून फोर्ड फियेस्टा कार खरेदी करण्यासाठी दिनांक 14/12/2006 रोजी रु 2,00,000/- देऊन नोंदणी (बुकींग) केली. कारची नोंदणी केल्यानंतर गैरअर्जदारांनी त्यास लवकरात लवकर कार देण्याचे कबुल केले. परंतु गैरअर्जदारांनी त्यानंतर दोन वर्ष उलटल्यावरही कार दिली नाही. दरम्यान त्याने गैरअर्जदारांकडे कार बाबत अनेकवेळा चैकशी केली परंतु गैरअर्जदारानी वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगुन कार देण्यास टाळाटाळ केली. म्हणून शेवटी त्याने दिनांक 7/10/2008 रोजी गैरअर्जदारांना लेखी सुचना देऊन कारची मागणी केली. त्याने पाठविलेले सुचनापत्र मिळाल्यानंतर गैरअर्जदारांनी 7 दिवसात कार देण्याचे किंवा रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यानंतरही गैरअर्जदारांनी आश्वासन पाळले नाही. अशाप्रकारे गैरअर्जदारांनी नोंदणी केलेली कार दिली नाही किंवा रक्कमही परत केली नाही व त्रुटीची सेवा दिली म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदारांकडून रक्कम रु 2,11,000/- व्याजासह देण्यात यावेत आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदारांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार खोटी आहे. तक्रारदार दिनांक 3/11/2006 रोजी फोर्ड फियेस्टा कार खरेदी करण्यासाठी शोरुममध्ये आला होता. त्यादिवशी तक्रारदाराने नोंदणी रक्कम रु 11,000/- दिले होते व त्याच दिवशी त्याने कार ताब्यात घेतली. तक्रारदाराच्या ताब्यात दिलेल्या कारचा चेसीस क्रमांक MAJBXXMRTB 6MB 3412 असा असुन इंजिन क्रमांक 6 MB 3412 असा होता. सदर कार तक्रारदाराचा मुलगा श्री अभिषेक जुगलकिशोर तापडिया यांनी तक्रारदाराच्या वतीने ताब्यात घेतली होती. तक्रारदाराने दिनांक 3/11/2006 रोजी रु 11,000/- , दिनांक 14/12/2006 रोजी श्री महेश झवेरी यांच्या हस्ते रु 5,01,503/- आणि रु 2,00,000/- चा धनादेश दिला होता. तक्रारदाराने कारचा ताबा घेताना त्याचा पत्ता आठवडी बाजार, नगरपालीकेजवळ, गेवराई जि.बीड असा दिला होता. तक्रारदाराने कारचा बजाज अलियांन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीकडे त्याच दिवशी विमा देखील उतरविला होता. तक्रारदाराने कार खरेदीची नोंदणी दिनांक 6/11/2006 रोजी केली होती व दिनांक 14/12/2006 रोजी उर्वरीत रक्कम दिली होती. त्याने कारची नोंदणी दिनांक 14/12/2006 रोजी केलेली नव्हती. तक्रारदाराने कधीही कोणतीही नोटीस पाठविली नाही. तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय आहे. तक्रारदाराची तक्रार खोटी असुन त्याने कारचा ताबा दिनांक 6/11/2006 रोजीच घेतलेला आहे म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय? नाही. 2. तक्रारदाराची तक्रार या मंचात चालण्यास योग्य आहे काय? मुद्दा उरत नाही. 3. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 ते 3 :- दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड किशोर नाडे आणि गैरअर्जदारांच्या वतीने अड एस.एच.नावंदर यांनी बाजू मांडली. सर्वप्रथम प्रस्तुत तक्रार मुदतीत आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. तक्रारदाराने त्याच्या म्हणण्याप्रमणे कार खरेदीबाबत गैरअर्जदारांकडे रु 2,00,000/- दिनांक 14/12/2006 रोजी दिले होते. परंतु गैरअर्जदाराने आजपर्यंत त्यास कार दिली नाही. तक्रारदाराच्या सदर म्हणण्यानुसार तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कारण दिनांक 14/12/2006 रोजीच घडलेले आहे. तक्रारदाराने त्यानंतर दिनांक 7/12/2008 रोजी गैरअर्जदारास नोटीस पाठविली म्हणून त्याला ही तक्रार दाखल करण्याचे कारण दिनांक 7/10/2008 रोजी घडल्याचे म्हणता येणार नाही. विशेष म्हणजे तक्रारदाराने पाठविलेली नोटीस गैरअर्जदारास मिळाल्याचा काहीही पुरावा नाही. तक्रारदाराने दिनांक 14/12/2006 रोजी कार खरेदीबाबत गैरअर्जदारास रु 2,00,000/- दिल्यानंतर जर गैरअर्जदाराने कार दिली नसेल तर तक्रारदाराने ही तक्रार दिनांक 13/12/2008 पुर्वीच दाखल करणे आवश्यक होते. परंतु त्याने ही तक्रार दिनांक 20/2/2009 रोजी म्हणजे तक्रार दाखल करण्याचे कारण घडल्यापासुन 2 वर्ष 2 महिन्यानंतर दाखल केली. ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 24-अ नुसार तक्रार दाखल करण्याचे कारण घडल्यापासुन 2 वर्षाच्या आतच तक्रार दाखल करणे आवश्यक असते आणि जर तक्रार दाखल करण्यास विलंब झाला असेल तर योग्य कारणासह विलंब माफीचा अर्ज दाखल करणे आवश्यक असते. त्यानुसार तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्याबाबत अर्ज देणे आवश्यक होते परंतु त्याने विलंब माफीबाबत कोणताही अर्ज दिला नाही किंवा विलंबाबाबत काहीही खुलासा केला नाही. आमच्या मतानुसार तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कारण त्याने गैरअर्जदाराला दिनांक 7/10/2008 रोजी नोटीस पाठविली तेव्हा घडलेले नसुन दिनांक 14/12/2006 रोजीच घडलेले आहे त्यामुळे ही तक्रार दिनांक 13/12/2008 पूर्वीच दाखल होणे आवश्यक होते. परंतु ही तक्रार 2 महिने विलंबाने दाखल झालेली असुन सदर तक्रार मुदतबाहय आहे. तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय असण्याशिवाय या तक्रारीमधील मुद्दे अत्यंत गुंतागुंतीचे असल्यामुळे ही तक्रार या मंचात चालण्यास योग्य नाही असे आम्हाला वाटते. तक्रारदार त्यास गैरअर्जदारांकडून नोंदणी केलेली कार मिळाली नसल्याचे सांगत असताना गैरअर्जदारांनी तक्रारदाराच्या मुलाला कारचा ताबा दिल्याचे कागदपत्र सादर केले आहेत ते कागदपत्र खोटे असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदारांना त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची सत्यता पटविण्यासाठी सखोल पुरावा देण्याची संधी देणे आवश्यक ठरते. परंतु या मंचात चालणा-या संक्षिप्त चौकशीमध्ये सखोल पुरावा देण्याची संधी देणे योग्य ठरत नसुन प्रकरणातील गुंतागुंत पाहता तक्रारदाराने दिवाणी न्यायालयात दाद मागणे योग्य राहील. म्हणून मुद्दा क्र 1 ते 3 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2. तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा. 3. संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |