(घोषित द्वारा- श्रीमती अंजली देशमुख) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराची बियाणाबद्दलचे रिसर्च, डेव्हलपमेंट व मार्केटिंगची कंपनी आहे. ते गैरअर्जदारातर्फे त्यांचे कन्साईनमेंट नेहमीच इतर ठिकाणी पाठवित असतात. दिनांक 30/5/2008 , 28/7/2008, 7/1/2009, 10/5/2009 रोजी ते वेगवेगळया पार्टींजना उडीद, हायब्रिड मका, बाजरी, हयाचे बियाणे गैरअर्जदारातर्फे पाठविले होते. परंतु ते, समोरच्या पार्टीस प्राप्त झाले नाहीत. हया कन्साइनमेंटस तक्रारदारांच्या ग्राहकास प्राप्त झाल्या नसल्यामुळे, त्यांचे मार्केटिंगमध्ये गुडविल आणि रेप्युटेशन कमी झाले. तक्रारदारानी गैरअर्जदाराकडून हया कन्साइनमेंटस मिळविण्यासाठी,बराच प्रयत्न केला. गैरअर्जदाराच्या चुकीमुळे,निष्काळजीपणामुळे तक्रारदाराच्या कन्साईनमेंटस त्यांच्या क्लायन्टकडे पोहोचल्या नाहीत. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून कन्साईनमेंटची किंमत रु 16,427/- 18 टक्के व्याजदराने, 25,000/- नुकसान भरपाई, 1000/- नोटीस चार्जेस, असे एकूण 42,427/- तक्रारीच्या खर्चासहित मागतात. तक्रारदारानी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली. गैरअर्जदारास नोटीस प्राप्त होऊनाही मंचात गैरहजर म्हणून त्यांच्याविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश मंचानी पारित केला. तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. कन्साईनमेंट नोटची पाहणी करता, तक्रारदारानी वरील तारखांना बियाणे निरनिराळया ठिकाणी पाठविल्याचे दिसून येते.परंतू,बियाणांचे पार्सल ज्यांना मिळावयाचे होते त्यांना प्राप्त झाले नसल्याचे त्या त्या क्लायन्टसच्या पत्रावरुन दिसून येते.तसेच ही बियाणाची पार्सले पाठविताना इन्व्हाईस दिले होते,तेही तक्रारदारानी दाखल केले,त्यावरुन त्या त्या मालाची किंमत कळून येते.बियाणांची पार्सले तक्रारदारानी गैरअर्जदारामार्फत त्यांच्या क्लायन्टकडे पाठविले होते. गैरअर्जदारानी ती पाठविली नाहीत, गहाळ झाली किंवा त्याचे काय झाले याबद्दल कांहीच माहिती देत नाहीत.ती पार्सले तक्रारदाराच्या क्लायन्टला मिळालीच नाहीत ही त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. म्हणूनच मंच गैरअर्जदारास असा आदेश देतो की, त्यांनी रु 16,427/- 9 टक्के व्याजदराने दिनांक 15/6/2008 पासून रक्कम देईपर्यंत 6 आठवडयाच्या आत व तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावा.तक्रारदार रु 25,000/- नुकसान भरपाई मागतात. परंतू त्याबद्दल पुरावा दिलेला नाही म्हणून मंच ती मागणी नामंजूर करते. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदारानी या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास रक्कम रु 16,427/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने द्यावेत तसेच तक्रारीचा खर्च रु 1000/- द्यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |