जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/12 प्रकरण दाखल तारीख - 15/01/2009 प्रकरण निकाल तारीख – 24/08/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य जिय ऊर रहेमानखॉन पि.महंमदखॉन, वय वर्षे 54, व्यवसाय व्यापार, अर्जदार. रा. साईनगर,नांदेड. विरुध्द. 1. व्यवस्थापक, जय श्रीराम फायनान्स कं.लि. उज्वल एन्टरप्राईजेस जवळ,नांदेड. गैरअर्जदार. 2. व्यवस्थापक, जय श्रीराम फायनान्स कं.लि, बसस्टॅण्ड समोर,अमरावती. 3. व्यवस्थापक, जय श्रीराम फायनान्स कं.लि. कार्यालय 101-105 शिव चेंबर्स, बी.विंग, सेक्टर-11,सीबीडी बेलापुर, नविन मुंबई 400 814. अर्जदारा तर्फे वकील - अड.शिवराज पाटील. गैरअर्जदारा क्र 1 व 2 तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड गैरअर्जदार क्र. 3 - एकतर्फा. निकालपञ (द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) अर्जदार यांची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा ट्रक क्र.एमच-29/एम-462 (नवीन) व जुना क्रमांक केए-01/एसी-5458 व ट्रक एपी—25/यु-7064 चे मालक आहेत. अर्जदार यांनी वरील ट्रकवर प्रत्येकी रु.7,00,000/-फायनान्स घेतले होते. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडुन वरील ट्रकवर प्रत्येकी रु.7,00,000/- फायनान्स घेतले. गैरअर्जदार यांनी वरील कंपनीने त्यांना फायनान्स दिल्यावर सदरील ट्रकच्या आर.सी.बुकवर तशा प्रकारच्या बोझाची (H.P) नोंद करुन घेतली. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे केलेल्या कराराच्या हप्त्याप्रमाणे कर्जाची परतफेड करण्याकरीता हप्ता भरले त्याची पावती गैरअर्जदार यांनी दिलेली आहे ते खालील प्रमाणे आहे. ट्रक क्र.एम.एच- 29/एम- 462 ( नविन) व जुना क्रमांक केए- 01/एसी-5458. अ.क्र. दिनांक हप्त्याची रक्कम. 1. 10/01/2007 24,580/- 2. 10/02/2007 24,850/- 3. 10/04/2007 24,850/- 4. 01/06/2007 19,000/- 5. 01/06/2007 05,800/- 6. 03/07/2007 19,000/- 7. 03/07/2007 05,800/- 8. 06/09/2007 20,000/- 9. 05/11/2008 28,000/- 10. 09/01/2008 50,000/- 11. 07/06/2008 25,000/- 12. 30/06/2008 25,000/- ट्रक्र क्र.एपी-25/यू-7064 अ.क्र. दिनांक हप्त्याची रक्कम. 1. 26/07/2007 31,000/- 2. 05/11/2007 31,000/- 3. 30/01/2008 40,000/- 4. 22/05/2008 28,000/- 5. 2008 1,25,000/- 6. /12/2008 30,000/- वरील प्रमाणे अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे नियमित रक्कम भरुन सुध्दा गैरअर्जदाराने जास्तीचे व्याज अर्जदारावर लावले. याबाबत अर्जदाराने विचारणा असता, अर्जदाराकडुन रक्कम घेण्याचे बंद केले. अर्जदाराकडे जास्तीची देय रक्कम दाखवुन अर्जदाराचे ट्रक ताब्यात घेण्याचे गैरकृत्य गैरअर्जदार यांनी केले. गैरअर्जदार यहे बॅकेकडुन भरलेली रक्कम उचलुन सुध्दा अर्जदाराचे वरील दोन ट्रक दि.12/01/2009 रोजी जप्त करण्याचा प्रयत्न केला आणि दि.18/01/2009 पर्यंत ट्रक जप्त करुन विक्री करतो अशी धमकी दिली आहे. म्हणुन अर्जदारानी ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली की, अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत आणि अर्जदाराचे ट्रक जप्ती किंवा विक्री गैरअर्जदाराने करु नये असा आदेश पारीत करावा. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वकीला मार्फत म्हणणे दाखल केले, त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार हे ट्रकचे मालक आहेत हे म्हणणे खोटे आहे. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, अर्जदाराने प्रत्येकी ट्रकवर रु.7,00,000/- इतके कर्ज घेतले आहे. या बाबत वाद नाही की, सदरच्या ट्रकवर आरसी बुकवर कंपनीच्या बोजाची नोंद करुन घेतली आहे. त्यांचे म्हणणे असे की, ट्रक क्र. एपी 25 यु 7064 यावर साडेसात लाख रुपये इतके लोन घेतले आहे. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, अर्जदाराने हप्ते नियमितपणे भरले व गैरअर्जदार याने अर्जदारास जास्तीचे व्याज आकारणी केली. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराला हिशोब न देता पैसे घेणे बंदे केले व जास्तीची रक्कम देय दाखवुन ट्रक ताब्यात घेण्याचे गैरकृत्य केले हे अमान्य केले आहे. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराचे खात्यात बँके मार्फत पैसे भरले आहेत. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन दोन ट्रक्स क्र.एमएच29- एम 462 व एपी 25 यु 7064 हे विकत घेण्या करीता कर्ज रु.7,00,000/- व ट्रक क्र.एमएच 29- एम 462 या करीता रु.7,50,000/- चे कर्ज घेतले. अर्जदारांनी 12.60 टक्के रु.7,00,000/- करीता आणि 13.66 टक्के रु.7,50,000/- करीता असे ठरले होते. अर्जदाराने ट्रक क्र.एमएच 29-एम 462 करीताचे कर्जाचे परत फेडीसाठी डिसेंबर 2008 पर्यंत रु.2,72,150/- एवढी रक्कम भरलेली आहे आणि बाकी रक्कम रु.3,24,178/- एवढी आहे, अर्जदारास सदरील ट्रकच्या कर्जा पोटी एकुण रु.5,96,328/- एवढी रक्कम भरावयाची होती. तसेच ट्रक क्र. 25 यु 7064 च्या कर्जाची रक्कम रु.7,50,000/- 13.66 टक्के व्याजाने एकुण रु.5,94,035/- एवढी भरावयाची होती. त्यापैकी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे रु.2,84,000/- भरलेले आहे, बाकी रक्कम रु.3,10,035/- एवढी आहे. अशा प्रकारे गैरअर्जदाराने व्याजाची आकारणी केलेली आहे. गैरअर्जदाराने त्यांच्या सेवेत कुठल्याही प्रकारची सेवेत त्रुटी केलेली नाही. करारनाम्याप्रमाणे अर्जदार आणि गैरअर्जदार यांच्यामध्ये कुठलाही वाद निर्माण झाल्यास सदरचे अधिकार क्षेत्र अमरावती असेल असे ठरलेले आहे. त्यामुळे ही तक्रार चालविण्याचा अधिकार मंचास नाही. अर्जदाराने डिसेंबर 2008 पर्यंत ट्रक क्र.एमएम 29 एम 462 मध्ये 24 किस्ती मासिक किस्त रु.24,847/- याप्रमाणे भरणा करावयाचा होता व ट्रक क्र. एपी 25 यु 7064 यामध्ये मासीक किस्त रुपये 31,265/- याप्रमाणे एकुण 19 किस्तीचा भरणा करावयाचा होता. परंतु वास्तविक त्यांनी कर्जाची परतफेड करण्यास टाळाटाळ करुन कर्जाचा भरणा केलेला नाही. गैरअर्जदार यांना अर्जदाराने किस्तीचा भरणा न केल्यास सदरचा ट्रक हा स्वतःच्या ताब्यात घ्यायचे नियमाप्रमाणे व ठरलेल्या करारानुसार पूर्ण हक्क आहे. कर्जाची परतफेड वारंवार मागणी करुन देखील अर्जदाराने कर्ज भरले नाही. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज खारीज करावा. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नाही. अर्जदार हा ग्राहक या व्याख्येत बसत नाही म्हणुन अर्जदाराचा अर्ज खारीज करावा. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामधील व्यवहार हा अमरावती येथे झाला आहे. म्हणज सदरील प्रकरण या न्यायमंचास चालविण्याचा अधिकार नाही. सदरील प्रकरण चालविण्या करीता नांदेड येथे कारण घडलेले नाही. म्हणुन अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा. अर्जदार मुख्य उद्येश कर्जाची रक्कम बुडविण्याचा आहे. अर्जदार स्वतः थकबाकीदार आहे. सदरील दोन्ही ट्रक्सची किंमत रु.15,00,000/- पेक्षा अधिक आहे. सदरच्या केसची नोटीस श्रीराम फायनान्स ट्रान्सपोर्ट कंपनी लि, ला तामील झाले आहे. सदरील ट्रक्सचा संबंध श्रीराम फायनान्स ट्रान्सपोर्ट कंपनी लि.शी आहे व म्हणुन सदरचा जबाब श्रीराम फायनान्स ट्रान्सपोर्ट कंपनी लि, च्या वतीने देण्यात आला आहे. सदरील तक्रार ही आवश्यक पार्टीचा समावेश न केल्यामुळे व गैरसंबंधीता विरुध्द दाखल केल्यामुळे चालु शकत नाही व या कारणांसाठी सुध्दा तक्रार खारीज करणे योग्य आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत कमतरता केलेली नाही. म्हणुन अर्जदाराचा तक्रारअर्ज रु.5,000/- खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे. सदरील प्रकरणांत गैरअर्जदार क्र. 3 यांना नोटीस पाठविण्यात आली. त्यांना नोटीस मिळुनही ते गैरहजर राहील्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरणांत एकतर्फा आदेश पारीत करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र याचा विचार होता, खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय 2. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे सेवेतील कमतरता सिध्द करतात काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र 1 अर्जदार यांनी गैरअर्जदार फायनान्स कंपनी यांचेकडुन ट्रक खेरदीसाठी कर्ज घेतलेले आहे. ही बाब गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्रामधे नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र व गैरअर्जदारांचा लेखी म्हणणे व शपथपत्र व त्यांनी दाखल केलेली कर्ज खात्यासंबंधी कागदपत्र याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडुन दोन ट्रक्स क्र. एम.एच.29 एम 462 व एपी 25 यु 7064 हे विकत घेण्या करीता कर्ज रक्कम रु.7,00,000/- व रक्कम रु.7,50,000/- असे कर्ज घेतलेले आहे. अर्जदार यांनी एम.एच.29 एम 462 हे ट्रक खरेदी करण्यासाठी रक्कम रु.7,00,000/- चे कर्ज दि.08/12/2006 रोजी घेतलेले आहे. सदर कर्जाची परतफेड रक्कम रु.29,847/- असे मासिक हप्त्याने परतफेड करण्याची होती. सदर कर्जाचे व्याज दर 12.60 टक्के ठरलेले होते व आहे. प्रस्तुत कर्जा बाबत अर्जदार यांनी दि.12/12/2008 पर्यंत रक्कम रु.2,72,150/- एवढी रक्कम भरलेली आहे व उर्वरित कर्जाची रक्कम थकबाकी पोटी रक्कम रु.3,24,178/- एवढी रक्कम अर्जदार यांचेकडुन येणे बाकी आहे. अर्जदाराने घेतलेल्या दुसरे ट्रक एपी.25 यु 7064 याचे खरेदीसाठी रक्कम रु.7,50,000/- एवढे कर्ज दि.16/05/2007 रोजी घेतलेले आहे. सदर कर्जाची मासिक हप्ता रक्कम रु.31,265/- एवढे ठरलेले होते व आहे. सदर कर्जाबाबत अर्जदार यांनी दि.12/12/2008 पर्यंत भरलेली रक्कम रु.2,84,000/- एवढी आहे. सदरचे कर्जाचे परतफेडी पोटी अर्जदाराकडुन रु.3,10,035/- एवढी रक्कम येणे बाकी आहे, ही बाब गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणणे मध्ये नमुद केलेले आहे. सदरची बाब अर्जदारांनी प्रतीउत्तर देऊन अगर इतर पुरावा शपथपत्र देऊन कोणत्याही प्रकारे नाकारलेले नाही. अर्जदार यांनी मुळ अर्ज दाखल करतांना मुळ अर्जासोबत तात्पुरता मनाई हुकूमेचा अर्ज दि.14/01/2009 रोजी दाखल केलेला आहे. सदर अर्जावर दि.15/01/2009 रोजी इशु शो कॉज नोटीसचा आदेश दिलेला आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना नोटीस लागल्यानंतर दि.24/03/2009 रोजी गाडी जप्त व विक्री करु नये, यासाठी अर्ज दिलेला आहे. सदर अर्जावर गैरअर्जदार यांनी नो ऑब्जक्शन असे त्यांचे म्हणणे दिलेले आहे. सद अर्जावर मा.मंचाने गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे वाहन जप्त वा विक्री पुढील तारखेपर्यंत करु नये असा आदेश केलेला आहे. दि.13/03/2009 रोजी गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेला आहे. त्याच दिवशी म्हणजेच दि.13/03/2009 रोजी अर्जदार यांनी पुन्हा गैरअर्जदार यांनी वाहन जप्त वा विक्री करु नये यासाठी अर्ज दिलेला आहे. सदर अर्जावर गैरअर्जदार यांनी त्यांचे म्हणणे दिलेले आहे. सदर अर्जावर अर्जदार यांनी आज रोजी नगदी रु.10,000/- भरण्यास तयार आहोत व पुढे दि.20/03/2009 ला रु.20,000/- भरणार असे लिहुन दिलेले आहे. परंतु आज अखेर अर्जदार यांनी या मंचामध्ये कोणतीही रक्कम जमा केलेली नाही अगर फायनान्स कंपनीकडे काही रक्कम जमा केले बाबत कोणतेही कागदोपत्री पुरावा शपथपत्र या मंचामध्ये दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडुन ट्रक खरेदी पोटी कर्ज घेतलेले आहे व सदर कर्जाची अर्जदार यांचेकडे थकबाकी आहे, अशा परिस्थितीमध्ये अर्जदार या मंचा समोर त्यांचे वाहनाचा गैरअर्जदार यांनी जप्ती वा विक्री करु नये यासाठी मनाई हुकूम मिळण्यासाठी या मंचामध्ये दि.15/01/2009 रोजी अर्ज दाखल केलेला आहे. परंतु आज अखेर थकीत रक्कम भरणे बाबत त्यांचे कोणतेही बोनाफाईड दिसुन येत नाहीत. सध्य स्थीतीमध्ये अर्जदार वाहन गैरअर्जदार यांना जप्तही केले नाही अगर त्याची विक्रीही केलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी दि.24/08/2009 रोजी III (2007) 161 (N.C.) C.P.J.राज्य आयोग, सिटीकार्प मारुती फायनान्स लि विरुध्द विजयालक्ष्मी, यांचे निकालपत्र दाखल केलेले आहे. प्रस्तुत प्रकरणांमध्ये अर्जदार यांचे वाहन जप्त केल्याचे दिसुन येत आहे. सदर निकालपत्रामध्ये अर्जदारांचे वाहन जप्त करुन विक्रीही केलेले आहे परंतु अर्जदारास प्रस्तुत केसमध्ये अर्जदाराचे वाहन जप्तही केलेले नाही अगर विक्रीही केलेले नाही. त्यामुळे सदर निकालपत्राचा या कामी विचार करता येणार नाही, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार याचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र याचा विचार होता, खलील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |