-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
( पारित दिनांक-09 ऑगस्ट, 2016)
01. अज्ञान तक्रारकर्ती तर्फे तिचे पालनकर्ता वडील यांनी ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष खाजगी शिकवणी संस्थेनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला या कारणास्तव दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती ही दहावी परिक्षा उत्तीर्ण असून पुढील उच्च शिक्षण तिने नागपूर येथे घेण्याचे ठरवले. विरुध्दपक्ष ही एक शिकवणी संस्था असून ती दहावी पास विद्दार्थ्यांना निवासी सोयी-सुविधांसह पुढील दोन वर्षासाठी अभियांत्रिकी आणि आय.आय.टी. सारख्या संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी घेण्यात येणा-या परिक्षेच्या तयारीचे शिकवणी वर्ग घेते. विरुध्दपक्ष संस्थेच्या जाहिराती नुसार तक्रारकर्तीचे पालकांनी विरुध्दपक्ष शिकवणी वर्गात संपर्क साधला. विरुध्दपक्ष संस्थेने तिचे माहितीपत्रका मध्ये शैक्षणिक आणि निवासी व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रतीची आहे अशी हमी दिली होती. माहितीपत्रक आणि जाहिरातीवर विश्वास ठेऊन तक्रारकर्तीचा विरुध्दपक्ष संस्थेमध्ये सन-2012-13 या शैक्षणिक वर्षासाठी शिकवणी वर्गात निवासी व्यवस्थेसह प्रवेश घेण्यात आला. त्यासाठी तक्रारकर्ती तर्फे तिचे पालकांनी शैक्षणिक शुल्क रुपये-10,000/- दिनांक-08.04.2012 रोजी नगदी भरले तसेच स्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा रेलताली, गोंदीयाचा धनादेश क्रं-541756 धनादेश दिनांक-29/04/2012 रोजीचा रक्कम रुपये-1,00,000/- चा विरुध्दपक्ष संस्थेस देण्यात आला. दोन्ही रकमांच्या पावत्या विरुध्दपक्ष शिकवणी संस्थे तर्फे देण्यात आल्यात.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष संस्थेच्या शिकवणी वर्गात तिने प्रवेश निश्चीत केल्या नंतर दिनांक-03/06/2012 पासून संस्थेच्या शिकवणी वर्गात जाणे आणि वसतिगृहात राहणे सुरु केले. त्यानंतर तक्रारकर्तीचे लक्षात आले की, विरुध्दपक्ष संस्थेच्या माहितीपत्रकात आणि प्रत्यक्ष्य वस्तुस्थिती मध्ये यामध्ये फार मोठया प्रमाणावर विरोधाभास आहे. मुलींच्या वसतिगृहात केवळ 100 चौरसफूट एवढया खोलीत एका वेळेस चार पेक्षा जास्त मुलींना ठेवण्यात आले होते. अशा एकूण दहा खोल्यांसाठी केवळ एक बाथरुम/टायलेटची व्यवस्था होती. वसतिगृहातील जेवणाचा दर्जा अत्यंत निम्न स्वरुपाचा असून तेथे जेवण करणे अवघड होते. तसेच वसतिगृहात सिनिअर्सव्दारा नियमित रॅगिंग इत्यादी प्रकार होत होते. या सर्व बाबी घरापासून दुर राहणा-या विद्दार्थ्यांसाठी त्रास दायक होत्या. राहत्या खोलीतील जागेच्या अडचणीमुळे अभ्यासात लक्ष केंद्रीत होत नव्हते. या सर्व प्रकारामुळे तक्रारकर्तीचे प्रकृतीवर परिणाम झाला. विरुध्दपक्ष शिकवणी संस्थेतील शिक्षणाचा स्तर
निम्न पातळीचा होता, त्यामुळे तक्रारकर्तीस शिकवणी वर्गात शिकवलेले काही समजत नसल्याने तिचा आत्मविश्वास कमी झाला होता, विरुध्दपक्ष संस्थेच्या दोषपूर्ण सेवेमुळे व होत असलेल्या मानसिक कुंचबणेमुळे तिने विरुध्दपक्ष संस्थेच्या शिकवणी वर्गात न राहण्याचा निर्णय घेऊन दिनांक-09/06/2012 रोजी संस्था सोडली. त्यामुळे तिने विरुध्दपक्ष संस्थेकडे शिकवणी वर्गापोटी भरलेली एकूण रक्कम रुपये-1,10,000/- परत करण्याची विनती केली असता, त्यांनी रक्कम परत करण्यास नकार दिला, त्यावेळी विरुध्दपक्ष संस्थेनी कारण दिले की, संस्थेच्या पावतीवरील अटी मध्ये स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, एकदा भरलेले पैसे कोणत्याही परिस्थितीत परत केल्या जाणार नाहीत. अशाप्रकारे तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष संस्थेच्या शिकवणी वर्गातील तसेच मुलींचे वसतिगृहातील त्रृटी व उणिवांमुळे संस्था सोडणे भाग पडले परंतु कोणतीही सेवा न घेता भरलेली रक्कम परत न करणे ही विरुध्दपक्ष शिकवणी संस्थेची एक अनुचित व्यापारी प्रथा आहे. विरुध्दपक्ष संस्थेनी चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचे आश्वासनांवर तक्रारकर्ती अवलंबून रहिल्याने व नंतर विरुध्दपक्ष संस्थेच्या उणिवांमुळे संस्था सोडून द्दावी लागल्याने दरम्यानचे काळात इतर शैक्षणिक संस्थां मध्ये प्रवेश घेण्याची वेळ निघुन गेली तसेच प्रवेश शुल्काची सोय न झाल्यामुळे ती अन्य शिकवणी संस्थेत प्रवेश घेऊ शकली नाही, या सर्व गोष्टींचा परिणाम तक्रारकर्तीच्या पुढील शैक्षणिक भवितव्यावर निश्चीतच झाला, परिणामी तक्रारकर्ती व तिचे पालकांना शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
म्हणून तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष संस्थे विरुध्द ग्राहक मंचात प्रस्तुत तक्रार दाखल करुन खालील प्रकारच्या मागण्या केल्यात-
(1) तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष संस्थेमध्ये प्रवेशशुल्क तसेच वसतिगृहासाठी भरलेली रक्कम रुपये-1,10,000/- द.सा.द.शे.9% दराने व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे.
(2) विरुध्दपक्ष शिकवणी संस्थेच्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला शिकवणी वर्ग सोडून द्दावा लागल्याने व अन्य शिकवणी संस्थे मध्ये प्रवेशाची वेळ निघून गेल्याने झालेल्या शैक्षणिक नुकसानी संबधाने भरपाई म्हणून रुपये-50,000/- विरुध्दपक्षास देण्याचे आदेशित व्हवे.
(3) प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-20,000/- विरुध्दपक्षा कडून मिळावेत.
03. विरुध्दपक्ष संचालक, FOUND IIT-FUTURE VISTA कार्यालय-46, सेंट्रल बजार रोड, व्ही.एन.आय.टी.गेट जवळ, बजाज नगर, नागपूर या नाव आणि पत्त्यावर मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस पोस्टाचे नॉट क्लेम्ड या शे-यासह मंचात आली, ती नि.क्रं-8 प्रमाणे अभिलेखावर दाखल आहे. विरुध्दपक्षाची नोटीस नॉट क्लेम्ड या पोस्टाचे शे-यासह परत आल्याने विरुध्दपक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक-07 मे, 2015 रोजी प्रकरणात पारीत केला.
04. तक्रारकर्ती तर्फे तिचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारकर्ती तर्फे दाखल दस्तऐवज तसेच लेखी युक्तीवाद आणि दाखल मा.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
05. अज्ञान तक्रारकर्ती कु.विद्दा देबीलाल पटले हिचे तर्फे तिचे पालनकर्ता वडील श्री देबीलाल पटले यांनी ही तक्रार विरुध्दपक्ष FOUND IIT-FUTURE VISTA NAGPUR (“विरुध्दपक्ष म्हणजे FOUND IIT-FUTURE VISTA NAGPUR” असे समजण्यात यावे.) या आय.आय.टी./अभियांत्रिकी प्रवेश परिक्षेची तयारी करवून घेणा-या शिकवणी वर्गा विरुध्द प्रतिज्ञालेखावर मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
06. तक्रारकर्तीचे म्हणण्या प्रमाणे विरुध्दपक्ष संस्थेनी दिलेल्या माहितीपत्रक तसेच जाहिराती नुसार संस्थे तर्फे उच्च दर्जाचे शिक्षणाची हमी आणि निवासी व्यवस्थेमध्ये चांगल्या सोयी-सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते, या आश्वासनांवर विश्वास ठेऊन तिने विरुध्दपक्ष संस्थेमध्ये सन-2012-13 या शैक्षणिक वर्षासाठी शिकवणी वर्गात निवासी व्यवस्थेसह प्रवेश घेतला होता. त्यासाठी तिचे तर्फे तिचे पालकांनी शैक्षणिक शुल्क रुपये-10,000/- दिनांक-08.04.2012 रोजी नगदी भरले तसेच स्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा रेलताली, गोंदीयाचा धनादेश क्रं-541756 धनादेश दिनांक-29/04/2012 रोजीचा रक्कम रुपये-1,00,000/- चा विरुध्दपक्ष संस्थेस दिला. विरुध्दपक्ष संस्थे तर्फे निर्गमित दोन्ही रकमांच्या पावत्यांच्या प्रती तक्रारकर्तीने पुराव्या दाखल अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत. तसेच तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष शिकवणी संस्थेचे माहितीपत्रक पुराव्या दाखल अभिलेखावर दाखल केलेले आहे, ज्यामध्ये विरुध्दपक्ष संस्थेनी उच्च दर्जाचे शिक्षण देण्याची हमी दिल्याचे दिसून येते.
07. तक्रारकर्ती तर्फे विरुध्दपक्ष संस्थेच्या शिकवणी वर्गा विरुध्द काही आरोप केलेत, ज्यामध्ये प्रवेश निश्चीत केल्या नंतर दिनांक-03/06/2012 पासून तिने संस्थेच्या शिकवणी वर्गात जाणे आणि वसतिगृहात राहणे सुरु केले परंतु विरुध्दपक्ष संस्थेच्या माहितीपत्रकातील माहिती आणि प्रत्यक्ष्य वस्तुस्थिती मध्ये यामध्ये फार मोठया प्रमाणावर तफावत होती. मुलींच्या वसतिगृहात लहानश्या खोलीत दाटीदाटीने मुलींची राहण्याची व्यवस्था केलेली होती, दहा खोल्यांसाठी एकच बाथरुम व टॉयलेटची व्यवस्था होती, वसतिगृहातील जेवणाचा दर्जा निकृष्ट होता तसेच वसतिगृहात नियमित रॅगिंग हे प्रकार होत होते, हा सर्व प्रकार घरापासून दुर राहणा-या तिचेसाठी त्रासदायक होता, या सर्व प्रकारामुळे शिक्षणावर मन केंद्रीत होत नव्हते, शिक्षणाचा स्तर निम्न पातळीचा असल्याने शिकवलेले तिला काही समजत नसल्याने तिचा आत्मविश्वास कमी झाला होता, विरुध्दपक्ष संस्थेच्या दोषपूर्ण सेवेमुळे व होत असलेल्या मानसिक कुंचबणेमुळे नाईलाजाने तिने विरुध्दपक्ष संस्थेच्या शिकवणी वर्गात न राहण्याचा निर्णय घेऊन दिनांक-09/06/2012 रोजी संस्था सोडली.
08. तक्रारकर्तीने पुढे असा आरोप केला की, तिने संस्था सोडल्या नंतर विरुध्दपक्ष संस्थेकडे भरलेली रक्कम परत करण्याची विनंती केली असता त्यांनी परत करण्यास नकार देऊन एकदा भरलेले पैसे कोणत्याही परिस्थितीत परत केल्या जाणार नाहीत असे पावतीवर नमुद असल्याचे सांगितले. तक्रारकर्ती ही फक्त 06 दिवस विरुध्दपक्ष संस्थेत असल्याने तिने भरलेल्या रकमेपैकी रुपये-4000/- एवढी रक्कम कपात करुन उर्वरीत रक्कम देण्याची तोंडी विनंती केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तिने विरुध्दपक्षाला दिनांक-23/06/2012 रोजी लिखित विनंती अर्ज पाठवून रक्कम परत करावी अशी मागणी केली तसेच दुरध्वनीवरुन विरुध्दपक्ष संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी भरलेली रक्कम परत मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.
09. तक्रारकर्तीची तक्रार मंचात दाखल झाल्या नंतर मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने विरुध्दपक्ष शिकवणी संस्थेला नोटीस पाठविण्यात आली व त्यात त्यांनी उत्तराव्दारे आपली बाजू मंचा समक्ष मांडावी असे निर्देशित केले होते परंतु विरुध्दपक्ष संस्थेनी मंचाची रजिस्टर पोस्टाव्दारे पाठविलेली नोटीस स्विकारली नसल्याने ती “नॉट क्लेम्ड” या पोस्टाचे शे-यासह मंचात परत आली. अशाप्रकारे विरुध्दपक्ष संस्थेस मंचा तर्फे त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देऊनही त्यांनी मंचाची रजिस्टर नोटीस स्विकारली नसल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फी आदेश मंचा तर्फे दिनांक-07 मे, 2015 रोजी पारीत करण्यात आला. थोडक्यात तक्रारकर्ती तर्फे विरुध्दपक्ष संस्थेवर करण्यात आलेले आरोप, विरुध्दपक्ष संस्थेस मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवूनही त्यांनी ती न स्विकारल्यामुळे, खोडून काढल्या गेलेले नाहीत. अज्ञान तक्रारकर्ती तर्फे तिचे वडीलांनी ही तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे, अशा परिस्थितीत तक्रारकर्ती तर्फे विरुध्दपक्षांवर केलेले आरोप मान्य करण्या शिवाय पर्याय उरत नाही.
10. तक्रारकर्तीचे म्हणण्या प्रमाणे विरुध्दपक्ष संस्थेच्या शिकवणी वर्गातील निम्न दर्जाचे शिक्षणामुळे तसेच मुलींचे वसतिगृहातील त्रृटी व उणिवांमुळे तिला संस्था सोडणे भाग पडले. मंचाचे मते कोणतीही सेवा न घेता भरलेली रक्कम परत न करणे ही विरुध्दपक्ष शिकवणी संस्थेची एक अनुचित व्यापारी प्रथा आहे. वस्तुतः तक्रारकर्तीने शिकवणी संस्था सोडल्या नंतर तिने भरलेली रक्कम परत करण्याची नैतिक जबाबदारी विरुध्दपक्ष शिकवणी संस्थेवर होती. विरुध्दपक्ष संस्थेनी चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचे आश्वासनांवर तक्रारकर्ती अवलंबून रहिल्याने व नंतर विरुध्दपक्ष संस्थेच्या उणिवांमुळे संस्था सोडून द्दावी लागल्याने दरम्यानचे काळात इतर शैक्षणिक संस्थां मध्ये प्रवेश घेण्याची वेळ निघुन गेली तसेच विरुध्दपक्ष संस्थेनी भरलेले प्रवेश शुल्क परत न केल्यामुळे ती अन्य शिकवणी संस्थेत प्रवेश घेऊ शकली नाही व तिचे संपूर्ण वर्ष वाया गले या सर्व गोष्टींचा परिणाम तक्रारकर्तीच्या पुढील शैक्षणिक भवितव्यावर निश्चीतच झाला, परिणामी तक्रारकर्ती व तिचे पालकांना शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागला व लागत आहे.
11. तक्रारकर्ती तर्फे खालील नमुद मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निकालपत्रांवर आपली भिस्त ठेवण्यात आली-
(1) “Sehgal School of Competition-Versus-Dalbir Singh”
-III (2009) CPJ-33 (NC)
(2) “Fiit Jee Ltd.-Versus-Dr.Minathi Rath
- I (2012) CPJ-194(NC)
उपरोक्त मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिलेल्या न्यायानिवाडयांचे आम्ही काळजीपूर्वक वाचन केले. उपरोक्त नमुद निवाडा क्रं-2) मध्ये संबधित विद्दार्थ्याने खाजगी शिकवणी संस्थेमधील शैक्षणिक दर्जा खालावलेला असल्याने तसेच योग्य त्या सोयी सुविधा न पुरविल्यामुळे त्याचा प्रवेश रद्द केला होता व भरलेली रक्कम परत मागितली असता खाजगी शिकवणी संस्थेनी ती परत करण्यास नकार दिला होता. मा.राष्ट्रीय आयोगा समोरील अपिलामध्ये मा.आयोगाने अपिलार्थी शैक्षणिक संस्थेस
विद्दार्थ्याने त्याचे प्रवेशापोटी भरलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेशित केले होते. आमचे समोरील प्रकरणात सुध्दा तशीच परिस्थिती असल्याने सदरचा निवाडा पूर्णपणे हाताचे प्रकरणात लागू होतो.
12. तक्रारकर्ती ही 10 वी परिक्षा उत्तीर्ण विद्दार्थीनी असून तिने पुढील उच्च शिक्षण घेण्या करीता विरुध्दपक्ष संस्थेच्या आय.आय.टी./अभियांत्रिकी परिक्षेच्या पूर्व तयारी शिकवणी संस्थेत प्रवेश घेतला होता परंतु विरुध्दपक्ष संस्थेतील निम्न शिक्षणाचा दर्जा तसेच मुलींचे वसतिगृहात योग्य त्या सोयी सुविधांचा अभाव यामुळे तिला विरुध्दपक्ष संस्था सोडावी लागली. विरुध्दपक्ष संस्थेनी तिचे भरलेले पैसे परत न केल्याने तिला दुस-या शिकवणी वर्गात प्रवेश घेता आला नाही, परिणामी तिचे शैक्षणिक वर्ष वाया गेले, या सर्व प्रकारामुळे तिला त्या वर्षात उच्च शिक्षणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे तक्रारकर्ती ही तिने विरुध्दपक्ष शिकवणी संस्थेत प्रवेश आणि निवासी सुविधेसाठी भरलेली एकूण रक्कम रुपये-1,10,000/- मधून रक्कम रुपये-5000/- वजा करुन उर्वरीत रक्कम रुपये-1,05,000/- द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह परत मिळण्यास तसेच झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- व तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष संस्थे कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश ::
(01) तक्रारकर्तीची विरुध्दपक्ष संस्थे विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष संस्थेस निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ती कडून शिकवणी संस्थेच्या प्रवेश आणि निवासी सुविधेसाठी स्विकारलेली एकूण रक्कम रुपये-1,10,000/- मधून रक्कम रुपये-5000/- वजा करुन उर्वरीत रक्कम रुपये-1,05,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष पाच हजार फक्त) दिनांक-29/04/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला परत करावी.
(03) तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/-(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष संस्थेनी तक्रारकर्तीला द्दावेत.
(04) प्रस्तुत आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष संस्थेनी निकालपत्राची प्रमाणित प्रत
प्राप्त झाल्या पासून तीस दिवसांचे आत करावे.
(05) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.