Dated the 05 Jan 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. प्रस्तुत तक्रार एकूण-10 तक्रारदारांनी सामनेवाले यांचेविरुध्द दाखल केली आहे. सामनेवाले हे टुर्स अरेंज करणारी कंपनी असुन श्री.राणे हे त्याचे डायरेक्टर असल्याचे तक्रारदार यांनी नमुद केले आहे. सन-डिसेंबर-2012 मध्ये तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या टुर्स कंपनीतर्फे ता.15 ते 18 मे-2013 या काळात दुबई येथे जाण्यासाठी सामनेवाले यांना प्रत्येकी रु.20,000/- अधिक रु.618/- सर्व्हिस टॅक्स असे, प्रत्येकी रु.20,618/- सामनेवाले यांना डीडी/चेकव्दारे भरले. त्याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पावत्या दिल्या, तक्रारदाराकडून अनेकवेळा व्हिसासाठी फोटो मागविण्यात आले, परंतु दुबई टुर बाबत काहीच कारवाई करण्यात आली नाही. तक्रारदार यांनी अनेकवेळा सामनेवाले यांचे कार्यालयात संपर्क केल्यावर सामनेवाले यांनी सदर टूर रद्द करण्यात आल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले व सामनेवाले यांनी स्थानिक वृत्तपत्रात दिलेले निवेदन व तक्रारदारांचे पैसे ऑक्टोंबर-2013 पर्यंत परत करण्यात येतील असे आश्वासन तक्रारदार यांना ई-मेलव्दारे सामनेवाले यांनी दिले. अदयापपर्यंत सदर निवेदनाप्रमाणे किंवा कार्यालयातुन सांगण्यात आल्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना, त्यांनी सामनेवाले यांना भरलेली टुर्सची रक्कम परत केली नाही त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. सामनेवाले यांना तक्रारदार यांनी ता.06.06.2015 रोजीच्या दैंनिक महाराष्ट्र जनमुद्रा प्रहार हया वृत्तपत्रातुन जाहिर प्रगटनाव्दारे सुनावणीची नोटीस देऊनही सामनेवाले यांनी सुनावणीस गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आले.
2. त्यानंतर तक्रारदार यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले व लेखी युक्तीवाद दाखल करावयाचा नसल्याची पुरसीस दिली. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकून प्रकरण अंतिम आदेशासाठी नेमण्यात आले.
3. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून त्यांनी सदर टुरसाठी भरलेले पैसे प्रत्येकी 20,618 X 10 =2,61,080/- हया रकमेवर ता.05.12.2012 ते ता.05.06.2014 पर्यंतचे 10 टक्के प्रमाणे होणारे व्याज रु.39,162/- व प्रत्येक तक्रारदारांची सामनेवाले यांना दिलेली वर नमुद रक्कम सामनेवाले यांचेकडून परत मागितली आहे, तसेच मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई प्रत्येकी रु.10,000/-, दाव्यासाठी इतर खर्च रु.5,000/- (प्रत्येकी) सामनेवाले यांचेकडून मागितली आहे.
मुद्दे निष्कर्ष
अ. तक्रारदार प्रती सामनेवाले यांनी सदोषपुर्ण सेवा दिली
आहे का ?..................................................................................होय.
ब. तक्रारीत काय आदेश ?...........................................तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
4.कारण मिमांसा (प्रश्न-अ व प्रश्न-ब)
अ. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडेक दुबई टुरसाठी चौकशी केल्यावर सामनेवाले यांनी त्यांना त्याबाबतच्या अटी व शर्ती नमुद केलेले सॅफरॉन इन्टरनॅशनल हॉलिडेज प्रा.लि., यांच्या लेटरहेडवर छापलेले पत्रक, टुरचे दरपत्रक दिले. त्यानुसार तारीख-15 ते 18 मे-2013 (3 रात्री 4 दिवस) साठी तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे दुबई टुरसाठी बुकींग केली, त्यात विमान प्रवास खर्चही समाविष्ट होता. प्रत्येक तक्रारदार यांनी सामनेवाले यांना प्रत्येकी रु.20,618/- (20,000 + 618 सर्व्हिस टॅक्स) पोटी अदा केले, व टुर बुक केली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्याबाबत दिलेल्या पावत्या (Ehc-B), तक्रारदार यांच्या बँक खात्याचा उतारा इत्यादी अभिलेखात उपलबध आहे. (Ehc-C) त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून व्हिसासाठी फोटो मागविण्यात आले. तक्रारदार यांनी अनेकवेळा सामनेवाले यांना त्यासाठी तक्रारदारांचे फोटो रत्नागिरी येथील कार्यालयात पाठवले. परंतु ते नाकारण्यात आले. तक्रारदार यांना पुन्हा पुन्हा सामनेवाले यांना फोटो पाठविण्यासाठी वेळ, त्रास, खर्च सहन करावा लागला. सामनेवाले यांच्या दुबई येथील टुरला जाण्यासाठी त्यांच्या पी.पी.एफ.मधुन पैसे काढले, त्यांनी परदेशी प्रवासासाठी हौसेने खरेदी केली, सामनेवाले यांनी टूरबाबत निश्चित काय आयोजन केले याची स्पष्ट कल्पना तक्रारदार यांना दिली नसल्यामुळे तक्रारादार यांना नातेवाईकां बरोबरचे त्याकाळात इतर कोणतेही कार्यक्रम ठरविता आले नाहीत. सामनेवाले हयांनी काहीही कारण न देता सदर टुर रद्द केली व त्याबाबत तक्रारदार यांना काहीही आगाऊ सुचना दिल्या नाहीत. तक्रारदार यांनी याबाबत सामनेवाले यांच्या ऑफीसमधील कर्मचा-यांना फोन करुन विचारणा केली, पंरतु त्यांना काहीही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर तक्रारदार नं.4 यांनी ऑक्टोंबर-2013 मध्ये पुन्हा सामनेवाले यांच्या ऑफीस कर्मचा-यांना फोन केला असता त्यांनी सामनेवाले यांनी दुबई टुर रद्द केली असुन त्याबाबत रत्नागिरी येथील वृत्तपत्रात सामनेवाले यांचे डायरेक्टर,श्री.शशिकांत राणे यांनी निवेदन दिल्याचे सांगितले. सदर निवेदनामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांचे व इतर टुरिस्टकडून टुरबाबत स्विकारलेले पैसे ऑक्टोंबर-2013 पर्यंत परत करण्याचे आश्वासन देऊनही सामनेवाले यांनी अदयाप परत केले नाहीत. त्यामुळे सदर टुरबाबत लेखी माहिती न देणे, ठरलेल्या वेळेस सहलीचे आयोजन न करणे, पेपरमधील निवेदनानुसार तक्रारदारांचे पैसे देण्याबाबत श्री.शशिकांत राणे, डायरेक्टर यांनी पालन न करणे इत्यादी बाबींमुळे सामनेवाले यांनी तक्रारदार प्रती सदोषपुर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते व तसे जाहिर करण्यात येते व तक्रारदारांकडून घेतलेले टुरबाबतचे पैसे (ता.05.12.2012 ते ता.05.06.2014 या कालावधीसाठी) 8 टक्के व्याजासह सामनेवाले यांनी तक्रारदार यांना परत दयावी.
सदर तक्रारीतील तक्रारदार नं.1 ते 6 हे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी सदर टुरसाठी त्यांच्याकडील जमापुंजी पी.पी.एफ. मधुन पैसे काढून सामनेवाले यांना भरले त्याबाबत मिळणा-या 8 टक्के व्याजासही तक्रारदारांना मुकावे लागले. टुरसाठी सर्व तक्रारदार यांनी त्यांचे वैयक्तिक कार्यक्रम रद्दकरुन सामनेवाले यांच्या टुरवर जाण्यासाठी कपडे, इतर आवश्यक वस्तुंची खरेदी केली, तो खर्च देखील वाया गेला तसेच दुबई टुरवर जाण्यासाठी तक्रारदार नं.8 यांनी 15 दिवसांसाठी घेतलेली सुट्टी वाया गेली, त्यांच्या मुलांची नाराजी पत्करावी लागली. या गोष्टींमुळे तक्रारदार यांना जो मानसिक त्रास झाला त्याबाबत प्रत्येक तक्रारदार खालील अंतिम आदेशात नमुद केल्याप्रमाणे मानसिक त्रासाची नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहेत. तसेच त्यांना ग्राहक मंचात सामनेवाले विरुध्द तक्रार दाखल करावी लागल्याने झालेल्या न्यायिक खर्चाबाबतची नुकसानभरपाई देखील मिळण्यास पात्र आहेत.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
- आदेश -
1. तक्रारदार यांची तक्रार क्रमांक-345/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी प्रत्येक तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दिलेल्या रकमेवर
ता.05.12.2012 ते ता.05.06.2014 पर्यंत दरसाल दर शेकडा 8 टक्के दराने होणारे
व्याज व मुद्दल रक्कम प्रत्येकी रु.20,618/- (अक्षरी रुपये वीस हजार सहाशे अठरा)
तक्रारदारांना परत करावी.
4. मानसिक त्रासापोटी प्रत्येक तक्रारदारास सामनेवाले यांनी रक्कम रु.5,000/- (अक्षरी
रुपये पाच हजार) व न्यायिक खर्चापोटी प्रत्येकी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रुपये तीन
हजार) तक्रारदारास दयावेत. (तक्रारदार क्रमांक-9 व 10 वयाने अज्ञान असल्याने त्यांना
दयावयाची रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदार नं.7 यांना सुपूर्द करावी)
5. वर नमुद आदेशाचे पालन सामनेवाले यांनी आदेश पारित तारखेपासुन एक महिन्याचे
आंत करावे.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
7. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.05.01.2016
जरवा/