(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष)
01. तक्रारकर्ता यांनी उभय विरुध्दपक्षां विरुध्द दोषपूर्ण टेबल बदलवून मिळावा तसेच अन्य अनुषंगिक मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम 12 अंतर्गत प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. यातील विरुध्दपक्ष क्रं 1 ईरोज जनरल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे मालक व डायरेक्टर आहेत व ते सदर कंपनी मार्फतीने फर्नीचर साहिल्याचे उत्पादन करतात. विरुध्दपक्ष क्रं 1, विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे मार्फतीने त्यांचे व्दारा निर्मित फर्नीचर साहित्य विक्रीचे शोरुम उपरोक्त पत्त्यावर चालवित असून विरुध्दपक्ष क्रं 2 हे सदर शोरुमचे प्रबंधक आहेत.
तक्रारकर्ता यांनी पुढे असे नमुद केले की, ते दिनांक-22.07.2018 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे शोरुम मध्ये गेले असता विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी त्यांचे व्दारा विक्री होणारे फर्निचर साहित्य हे गुणवत्तेचे असून काही साहित्यावर गॅरन्टी वॉरन्टी असल्याचे सांगितले. विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे कथनावर विश्वास ठेऊन तक्रारकर्ता यांनी त्यांचे शोरुम मधून मुलांचे अभ्यासा करीता टेबल मॉडेल क्रं- एस.डी.-22 किम्मत रुपये-6900/- मध्ये विकत घेतला. विरुध्दपक्ष क्रं 2यांनी तक्रारकर्ता यांना बिल क्रं 84009, दिनांक-22.07.2018 रोजीचे दिले. विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी असे सांगितले की, सदर टेबल गुणवत्तापूर्ण असून त्यावर सनमायकाची कोटींग आहे आणि जर सदर टेबल मध्ये कोणत्याही प्रकारची खराबी आली तर सदर टेबल बदलवून मिळेल असे सांगितले. तक्रारकर्ता यांनी टेबल विकत घेतल्या नंतर आठ दिवसा नंतर म्हणजे दिनांक-28.07.2018 रोजी सदर टेबलच्या ड्रावरच्या वरच्या कप्प्याचा दरवाजा निघाला असता असे दिसून आले की, सदर टेबलला सनमायका कोटींग नसून ते पेपर कोटींग आहे, त्यावेळी तक्रारकर्ता यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारकर्ता यांनी दुसरेच दिवशीविरुदपक्ष क्रं 2 यांना दुरध्वनी वरुन माहितीदिली असता त्यांनी श्री अतुल कुंजेकर नावाच्या व्यक्तीस तक्रारकर्ता यांचे कडे पाठविले. सदर व्यक्तीने टेबल बघून त्यांचे व्हीजीट बुक मध्ये तक्रारकर्ता यांना सदर टेबल रिप्लेस करुन पाहिजे असे लिहून दिले. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी अनेकदा विरुदपक्ष क्रं 2 यांचे सोबत संपर्क केला असता प्रत्येक वेळी विरुध्दपक्ष क्रं 1 यांना विचारुन टेबल बदलवून देण्याचे आश्वासन दिले परंतु पुर्तता केली नाही. शेवटी तक्रारकर्ता यांची पत्नी नामे सौ. भगवती करांजेकर हया दिनांक-.5.09.2018 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेशी दुरध्वनी वरुन बोलल्या असता विरुदपक्ष क्रं 2 यांनी सदर टेबल रिप्लेसमेंट म्हणून मंजूर झालेला आहे व शुक्रवारला नविन टेबल येत आहे असे सांगितले परंतु त्यानंतर टेबल आला नाही म्हणून पुन्हा त्यांचे पत्नीने दिनांक-27.09.2018 रोजी वि.प.क्रं 2 यांना दुरध्वनी केला असता त्यांनी सदर टेबल बदलवून देण्यास नकार दिला. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी वकीलांचे मार्फतीने दिनांक-10.10.2018 रोजी विरुध्दपक्षांना कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीस विरुध्दपक्षांना प्राप्त होऊनही कोणताही प्रतिसाद दिला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षांनी दोषपूर्ण सेवा दिली म्हणून शेवटी तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील मागण्या केल्यात-
- तक्रारकर्ता यांनी दिनांक-22.07.2018 रोजी विरुध्दपक्षा कडून एकूण किम्मत रुपये-6900/- मध्ये खरेदी केलेला एक टेबलमॉडेल क्रं-एस.डी.-22 विरुध्दपक्षांनी बदलवून देण्याचे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-25,000/- विरुदपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे कडून देण्याचे आदेशित व्हावे.
3. प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-25,000/- विरुध्दपक्षां कडून देण्याचे आदेशित व्हावे.
4. या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्ता यांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. प्रस्तुत तक्रारी मध्ये यामधील दोन्ही विरुध्दपक्षांना जिल्हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीसेस पाठविण्यात आल्यात. विरुध्दपक्ष क्रं 1 व विरुध्दपक्ष क्रं 2 यांना जिल्हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस तामील होऊनही विरुध्दपक्ष क्रं 1 व विरुध्दपक्ष क्रं 2 गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे प्रकरणात अनुक्रमे दिनांक-22.01.2021 रोजी आणि दिनांक-17.03.2022 रोजी पारीत करण्यात आला.
04. तक्रारकर्ता यांनी तक्रारी सोबत विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे कडून दिनांक-22.07.2018 रोजी टेबल किम्मत रुपये-6900/- मध्ये खरेदी केल्याचे बिल क्रं-84009 ची प्रत, सदर टेबलच्या छायाचित्रांच्या प्रती, दोन्ही विरुध्दपक्षांना अधिवक्ता यांचे मार्फतीने दिनांक-10.10.2018 रोजी पाठविलेल्या कायदेशीर नोटीसची प्रत, रजि. पोस्टाच्या पावत्या व पोच च्या प्रती दाखल केल्यात. तसेच तक्रारकर्ता यांनी पुराव्या दाखल प्रतिज्ञालेख दाखल केला. तक्रारकर्ता यांचे तर्फे वकील श्री एस.एस. लांबट यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
05. तक्रारकर्ता यांची तक्रार, शपथे वरील पुरावा तसेच प्रकरणात तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले दस्तऐवज आणि त्यांचे अधिवक्ता श्री लांबट यांचा मौखीक युक्तीवाद यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | वि.प.क्रं 1 निर्मित टेबल मॉडेल क्रं-एस.डी.-22 आणि विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे शोरुम मधून दिनांक-22.07.2018 रोजी रुपये-6900/- मध्ये तक्रारकर्ता यांना विक्री केलेला स्टडी टेबल हा दोषपूर्ण असल्याची बाब सिध्द होते काय | -होय- |
2 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
-कारणे व मिमांसा-
06. तक्रारकर्ता यांनी वि.प.क्रं 1 निर्मित स्टडी टेबल मॉडेल क्रं-एस.डी.-22 विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे शोरुम मधून दिनांक-22.07.2018 रोजी रुपये-6900/- मध्ये खरेदी केल्या बाबतचे बिलाची प्रत पुराव्यार्थ अभिलेखावर दाखल केली. तक्रारकर्ता यांचे तक्रारी प्रमाणे टेबल विकत घेताना विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी टेबल गुणवत्तापूर्ण असून त्यावर सनमायकाची कोटींग आहे आणि कोणत्याही प्रकारची खराबी आली तर टेबल बदलवून देण्याची मौखीक हमी दिली होती. टेबल विकत घेतल्या नंतर आठ दिवसा नंतर म्हणजे दिनांक-28.07.2018 रोजी सदर टेबलच्या ड्रावरच्या वरच्या कप्प्याचा दरवाजा निघाला असता सदर टेबलला सनमायका कोटींग नसून ते पेपर कोटींग असल्याचे लक्षात आले. दुसरेच दिवशी विरुदपक्ष क्रं 2 यांना दुरध्वनी वरुन माहिती दिली असता त्यांनी श्री अतुल कुंजेकर नावाच्या व्यक्तीस तक्रारकर्ता यांचे कडे पाठविले. सदर व्यक्तीने टेबल बघून त्यांचे व्हीजीट बुक मध्ये सदर टेबल रिप्लेस करुन पाहिजे असे लिहून दिले. तक्रारकर्ता यांची पत्नी नामे सौ. भगवती करांजेकर हयांनी दिनांक-05.09.2018 रोजी आणि दिनांक-27.09.2018 रोजी वि.प.क्रं 2 यांचेशी दुरध्वनी संपर्क केला असता त्यांनी सदर टेबल बदलवून देण्यास नकार दिला.त्यानंतर तक्रारकर्ता यांनी वकीलांचे मार्फतीने दिनांक-10.10.2018 रोजी विरुध्दपक्षांना कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीस विरुध्दपक्षांना प्राप्त होऊनही कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारकर्ता यांनी सदर टेबलच्या छायाचित्रांच्या प्रती, दोन्ही विरुध्दपक्षांना अधिवक्ता यांचे मार्फतीने दिनांक-10.10.2018 रोजी पाठविलेल्या कायदेशीर नोटीसची प्रत, रजि. पोस्टाच्या पावत्या व पोचच्या प्रती दाखल केल्यात. तसेच तक्रारकर्ता यांनी पुराव्या दाखल प्रतिज्ञालेख दाखल केला.
07. प्रस्तुत तक्रारी मध्ये दोन्ही विरुध्दपक्षांना रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या नोटीस तामील होऊनही ते जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाहीत. तसेच तक्रारकर्ता यांनी दोन्ही विरुध्दपक्षां विरुध्द केलेले आरोप खोडून काढले नाहीत. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता यांची तक्रार उपलब्ध दस्तऐवजी पुराव्या वरुन गुणवत्तेवर निकाली काढण्यात येत आहे. सदर टेबलच्या छायाचित्रा वरुन तक्रारकर्ता यांचे आरोपा प्रमाणे सदर वादातील टेबलच्या ड्रावरच्या वरच्या कप्प्याचा दरवाजा निघून तो वेगळा झाल्याचे दिसून येते, त्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्षां विरुध्द केलेल्या आरोपां मध्ये पुराव्यानिशी तथ्य दिसून येते. तक्रारकर्ता हे व्यवसायाने डॉक्टर असून उच्चशिक्षीत आहेत, त्यांना विरुध्दपक्षां विरुध्द विनाकारण तक्रार करण्याचे कोणतेही प्रयोजन दिसून येत नाही. दिनांक-22.07.2018 रोजी टेबल विकत घेतल्या नंतर लगेच आठ दिवसांनी म्हणजे दिनांक-28.07.2018 रोजी त्या टेबलचा वरच्या कप्प्याचा दरवाजा निघणे याचा अर्थ असा होतो की, सदर टेबल गुणवत्तापूर्ण नसून त्यामध्ये नक्कीच उत्पादकीय दोष आहे ही बाब सिध्द होते कारण त्या टेबलची निर्मिती उच्च दर्जाचे साहित्याने झालेली नाही. तक्रारकर्ता यांना वेळोवेळी दोषपूर्ण टेबल बदलवून देण्याचे विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता यांनी देऊन शेवट पर्यंत दोषपूर्ण टेबल बदलवून दिलेला नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी वकीलांचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने पाठविलेलया नोटीसेस दोन्ही विरुदध्दपक्षांना प्राप्त होऊनही त्यांनी कोणतीही तसदी घेतली नाही, ईतकेच नव्हे तर, नोटीसला साधे उत्तर सुध्दा दिले नाही. शेवटी तक्रारकर्ता यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल केल्या नंतर जिल्हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळूनही दोन्ही विरुध्दपक्ष हे जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाहीत तसेच तक्रारकर्ता यांनी त्यांचेवर केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. अशाप्रकारे दोन्ही विरुध्दपक्षांनी तक्रारकर्ता यांना दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्ता यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रं1 निर्मित आणि विरुध्दपक्ष क्रं 2 चे शोरुमव्दारे खरेदी केलेला स्टडी टेबल विरुध्दपक्षांनी बदलवून त्या ऐवजी नविन स्टडी टेबल दयावा अथवा तक्रारकर्ता यांचे कडून सदर स्टडी टेबलचे किमती पोटी विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी घेतलेली रक्कम रुपये-6900/- खरेदी दिनांक-22.07.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षांना आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल. तसेच तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-3000/- आणि नोटीस व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
08 उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन जिल्हा ग्राहक आयोग प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:: अंतीम आदेश ::
- तक्रारकर्ता श्री सचिन वल्द रामभाऊ कारंजेकर यांची , विरुध्दपक्ष क्रं 1 डॉयरेक्टर/मालक ईरोज जनरल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर या स्टडी टेबल निर्माता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 प्रबंधक, ईरोज जनरल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड शोरुम भंडारा या स्टडी टेबल विक्रेता यांचे विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 डॉयरेक्टर/मालक ईरोज जनरल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर या स्टडी टेबल निर्माता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 प्रबंधक, ईरोज जनरल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड शोरुम भंडारा या स्टडी टेबल विक्रेता यांना आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रं-2 यांचे शोरुम मधून दिनांक-22.07.2018 रोजीचे बिल क्रं-84009 अनुसार खरेदी केलेला दोषपूर्ण स्टडी टेबल मॉडेल एस.डी.-22 एकूण किम्मत रुपये-6900/- बदलवून त्याऐवजी आणखी कोणतेही अतिरिक्त शुल्क तक्रारकर्ता यांचे कडून न घेता त्याच मॉडेलचा गुणवत्तापूर्ण व कोणताही दोष नसलेला नविन स्टडी टेबल घरपोच पोहचवून दयावा आणि त्यावर नव्याने वॉरन्टीचे दसतऐवज व नविन बिल दयावे तसेच जुना टेबल विरुध्दपक्षांनी स्वखर्चाने तक्रारकर्ता यांचे घरुन घेऊन जावा.
किंवा
विरुध्दपक्ष क्रं 1 डॉयरेक्टर/मालक ईरोज जनरल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर या स्टडी टेबल निर्माता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 प्रबंधक, ईरोज जनरल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड शोरुम भंडारा या स्टडी टेबल विक्रेता यांना आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्ता यांचे कडून सदर स्टडी टेबलचे किमती पोटी विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी घेतलेली रक्कम रुपये-6900/-(अक्षरी रुपये सहा हजार नऊशे फक्त) तक्रारकर्ता यांना परत करावी आणि सदर किमतीचे रकमेवर खरेदी दिनांक-22.07.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रारकर्ता यांना दयावे.
3 . तक्रारकर्ता यांना जिल्हा ग्राहक आयोगाचे अंतीम आदेशातील अक्रं 2 प्रमाणे नविन टेबल पाहिजे कि त्याएवेजी अंतीम आदेशातील अक्रं 3 अनुसार टेबलची विरुध्दपक्षांना दिलेली किम्मत आदेशित व्याजासह पाहिजे या बाबतचे अधिकार हे तक्रारकर्ता यांना राहतील, त्यानुसार तक्रारकर्ता यांनी निकालपत्राची प्रथम प्रमाणित मिळाल्यावर त्याप्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 यांना लेखी कळवावे व लेखी कळविल्या बाबत विरुध्दपक्ष क्रं 2 यांची पोच म्हणून सही घ्यावी आणि तक्रारकर्ता यांनी लेखी दिल्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी त्या प्रमाणे जिल्हा ग्राहक आयोगाचे आदेशा प्रमाणे अनुपालन करावे.
4 विरुध्दपक्ष क्रं 1 डॉयरेक्टर/मालक ईरोज जनरल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर या स्टडी टेबल निर्माता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 प्रबंधक, ईरोज जनरल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड शोरुम भंडारा या स्टडी टेबल विक्रेता यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-3000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) आणि नोटीस व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपयेपाच हजार फक्त) अशा रकमा तक्रारकर्ता यांना दयाव्यात.
5 सदर आदेशाचे अनुपालन यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 डॉयरेक्टर/मालक ईरोज जनरल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर या स्टडी टेबल निर्माता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 प्रबंधक, ईरोज जनरल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड शोरुम भंडारा या स्टडी टेबल विक्रेता यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिरित्याप्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
6. सर्व पक्षकारांना निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
7. सर्व पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्त संच जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.