::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 18.04.2017 )
आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार
1. तक्रारदार यांनी सदरहु तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये, विरुध्दपक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच विरुध्दपक्षाने दाखल केलेला न्यायनिवाडा यांचे काळजीपुर्वक अवलेाकन मंचाने करुन खालील प्रमाणे निर्णय पारीत केला,
सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर न झाल्याने, त्यांचे विरुध्द सदर प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश मंचाने दि. 11/11/2016 रोजी पारीत केले होते.
तक्रारकर्ते व विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांना मान्य असलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्ते यांनी दि. 5/3/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 3 निर्मित मोबाईल, विरुध्दपक्ष क्र.1 कडून खरेदी केला होता. सदर मोबाईल दि. 27/7/2016 रोजी तक्रारकर्ते, विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दुरुस्तीला घेवून गेले होते, या बद्दलही उभय पक्षात वाद दिसत नाही, म्हणून अशा परिस्थितीत तक्रारकर्ते विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचे ग्राहक आहेत, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, जुन 2016 मध्ये सदर मोबाईल फोन आपोआपच हॅन्ग होण्यास सुरुवात झाली व तो बंद पडत होता. या बाबत तोंडी तक्रार विरुध्दपक्ष क्र. 2 कडे केली असता, त्यांनी तो बॅटरी बदलून परत केला. परंतु त्यानंतर देखील मोबाईल हॅन्ग होणे, आपोआप बंद पडणे सुरुच होते. मात्र दि. 25/7/2016 पासून सदर मोबाईल पुर्णपणे बंद पडला, म्हणून विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दुरुस्ती करिता दि. 27/7/2016 रोजी घेऊन गेले असता, मोबाईल वॉरंटी कालावधीत असून सुध्दा, विरुध्दपक्ष क्र. 2 ने सदर मोबाईलच्या दुरुस्तीकरिता खर्च रु. 6500/- मागीतले व वॉरंटी कार्डमध्ये आश्वस्त केल्याप्रमाणे सेवा पुरविली नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांच्याशी संपर्क साधुन तक्रार केली असता, त्यांनी 24 तासाच्या आंत तक्रारदाराची तक्रार दुर करण्यात येईल अथवा मोबाईल बदलुन दिल्या जाईल, असे सांगितले, परंतु त्यानंतर कायदेशिर नोटीस पाठवून व सदरची नोटीस विरुध्दपक्षांना प्राप्त होवूनही त्यांनी तक्रारीचे निराकरण केले नाही, म्हणून प्रार्थनेनुसार तक्रार मंजुर करावी, अशी विनंती केली.
यावर, विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांचा युक्तीवाद असा आहे की, सदर मोबाईल सोबत वॉरंटी कार्ड देण्यात आले होते, त्यावरील अटी व शर्ती जसेच्या तश्या उभय पक्षांवर बंधनकारक आहे, त्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 3 विरुध्द कोणताही वाद फक्त दिल्ली येथील कोर्टात किंवा मंचात चालु शकतो, म्हणून तक्रार प्रतिपालनीय नाही. तसेच सदर मोबाईल हा दि. 5/3/2016 ला विकत घेतला होता, तेंव्हापासून जुन 2016 पर्यंत त्यात कोणताही बिघाड झाला नाही, तो तक्रारकर्त्याने विनातक्रार वापरला, म्हणून निर्मीती दोष असल्याचा प्रश्न नाही. दुरुस्ती करिता मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 2 कडे घेवून आल्यानंतर वॉरंटी कार्डप्रमाणे तक्रारदारास विनामुल्य सेवा दिली आहे. जेंव्हा दि. 27/7/2016 रोजी मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दुरुस्तीला आणला, तेंव्हा सदर मोबाईल हॅन्डसेटचा OCTA (Combination of three layers comprising of 1) Glass, 2) Touch Pad, 3) LED Display हे फिजीकल डॅमेज झाले होते. फिजीकल डॅमेजसाठी वॉरंटीच्या अटी शर्तीनुसार विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांची कोणतीही जबाबदारी येत नाही. तक्रारकर्ते यांना ही बाब सांगीतली होती. तक्रारकर्ते यांनी मोबाईल फिजीकल डॅमेज नाही, हे दर्शविणारा तज्ञांचा अहवाल रेकॉर्डवर दाखल केला नाही. तक्रारकर्ते यांनी सदर मोबाईल मंचासमोर आणावा जेणेकरुन ही बाब दिसेल की, मोबईल फिजीकली डॅमेज झाला आहे.
विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनी खालील न्यायनिवाडा दाखल केला.
2016 (2) CPR 541 (NC)
Om Prakash Khulshrestha V/s. Prop. Madhu Radios and Others
अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद मंचाने ऐकला, विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 चा, या मंचाच्या कार्यक्षेत्राबद्दलचा आक्षेप मंचाला मान्य नाही. मात्र युक्तीवादररदम्यान तक्रारकर्ते यांनी दि. 7/4/2017 रोजी सदर मोबाईल जसाच्या तसा मंचात हजर केला होता. विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी, विरुध्दपक्ष क्र. 2 चे Software Engineer. Swapnil Lakhapati यांना सदर मोबाईलची तपासणी करण्याकरिता मंचात बोलाविले व मंचासमक्ष त्यांनी सदर मोबाईलची Observer या उपकरणाद्वारे तपासणी केली] तेंव्हा मंचाला असे दिसले की, तक्रारकर्त्याच्या सदर मोबाईलचा OCTA (Touch & Display) हा वेगवेगळेपणे उघडत होता, म्हणजे Seperately Open होत होता. उघड्या डोळयाने हा दोष दिसत नव्हता. विरुध्दपक्ष क्र. 2 च्या मते हा Physical Damage आहे. मात्र तक्रारकर्ते यांनी सदर पुरसीसवर कोणताही आक्षेप नोंदविला नाही किंवा विरुध्दार्थी युक्तीवाद केलेला नाही. रेकॉर्डवर दाखल वॉरंटी कार्डवरील अटी शर्तीनुसार, जर मोबर्इल फिजीकली डॅमेज असेल तर तो वॉरंटी मध्ये येणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाची यात सेवा न्युनता सिध्द होत नाही, म्हणून तक्रारकर्ते यांची प्रार्थना मंजुर करता येणार नाही, सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे पारीत केला..
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.