निकाल
(घोषित दि. 04.02.2017 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार याचे असे म्हणणे आहे की, गणपती नेत्रालय मार्फत मोतीबिंदूची तपासणी व ऑपरेशनसाठी कॅम्प नियोजीत करण्यात आला होता. त्या कॅम्पमध्ये तक्रारदार याने त्याच्या डोळयांची तपासणी करुन घेतली, त्यावेळी डॉक्टरांनी त्याच्या उजव्या डोळयाच्या मोतीबिंदुचे ऑपरेशन करावे लागेल असे सुचविले. कॅम्पमध्ये दिलेल्या सल्ल्यानुसार तक्रारदाराचे दि.31.12.2012 रोजी मोतीबिंदूचे ऑपरेशन गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात करण्यात आले. त्यानंतर आठ दिवसांनी तक्रारदार यास काहीही दिसू शकले नाही त्यामुळे तो तपासणीसाठी गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात गेला. त्यावेळी गैरअर्जदार यांनी त्याच्या डोळयात थोडा कचरा राहिल्यामुळे त्याचे पुन्हा ऑपरेशन करणे आवश्यक आहे असे सांगितले. दि.04.05.2013 रोजी तक्रारदार याचे दुसरे ऑपरेशन करण्यात आले. तरीही त्याच्या डोळयास व्यवस्थित दिसत नव्हते. म्हणून तक्रारदार परत गैरअर्जदार यांच्याकडे गेला. तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गैरअर्जदार यांनी हळु हळु दिसू लागेल असे सांगितले. परंतू काही दिवसानंतर तक्रारदारास दिसणे बंद झाले त्यामुळे तक्रारदार परत डोळयांच्या तपासणीकरता गैरअर्जदार यांचेकडे गेला, त्यावेळी गैरअर्जदार यांनी त्याचे डोळयाच्या पडद्याचे ऑपरेशन करणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार याचे डोळयाचे तिसरे ऑपरेशन दि.26.06.2014 रोजी करण्यात आले. त्यानंतरही तक्रारदार याचे डोळयास काहीही दिसू शकले नाही. तक्रारदार याचा असा आरोप आहे की, त्याच्या डोळयाचे ऑपरेशन गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात व्यवस्थित करण्यात आले नाही, सदर ऑपरेशन शिकाऊ उमेदवारांनी केले. वरील कारणास्तव तक्रारदार याने हा तक्रार अर्ज नुकसान भरपाई मिळावी म्हणून दाखल केला आहे.
तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत डिस्चार्ज समरीची झेरॉक्स प्रत व गणपती नेत्रालय यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. त्यानंतर पुढील कालावधीत वेळोवेळी त्याने काही आवश्यक कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र.1 हजर झाले. त्यांनी वकीलामार्फत त्यांची कैफियत दाखल केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार याचे डोळयावर दि.31.12.2012, 04.05.2013 आणि 26.06.2014 रोजी शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्या योग्य प्रकारे व कोणतीही फीस न घेता विनामुल्य करण्यात आल्या. सदर शस्त्रक्रिया यशस्वीरितीने करण्यात आल्या. तक्रारदाराच्या डोळयांची शस्त्रक्रिया डॉ.अभिजीत गोरे यांनी केली तो गुणवत्ताधारक व अनुभवी डॉक्टर आहे. तक्रारदार याने त्याच्या डोळयाची दि.09.05.2013 रोजी शस्त्रक्रिया केल्याबददलचा उल्लेख एम.आर. 35602 मध्ये असल्याचा संदर्भ दिलेला आहे. परंतू प्रत्यक्षात दि.09.05.2013 रोजी तक्रारदारावर कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाही तसेच त्याबाबत कोणताही लेखी पुरावा ग्राहक मंचासमोर दाखल नाही. तक्रारदार जेव्हा सर्वप्रथम गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात डोळयांच्या तपासणीकरता आला त्यावेळी तो दोन्ही डोळयासाठी मागील पाच वर्षापासून चष्मा वापरत होता. दि.30.12.2012 रोजी त्यांच्या दोन्ही डोळयांना मोतीबिंदू झाला असे सांगण्यात आले. त्यांच्या उजव्या डोळयाच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन दि.31.12.2012 रोजी करण्यात आले. दि.04.05.2013 रोजी त्याच्या उजव्या डोळयाचा पडदा सरकला असे दिसून आले. त्यामुळे Sceral Buckle ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर दि.26.06.2014 रोजी त्याच्या उजव्या डोळयावर Yag Caps लेसर ट्रीटमेंट करण्यात आली. वेळोवेळी तक्रारदार याच्या डोळयांची तपासणी केली असता त्याच्या उजव्या डोळयाची दृष्टी 6/45 पासून 6/21 पर्यंत वाढली होती व डाव्या डोळयाची दृष्टी 6/60 पासून 6/6 पर्यंत वाढली होती. पुढील तपासणीकरता तक्रारदार हा थांबायला तयार नव्हता. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांचा या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी विनंती गैरअर्जदार क्र.1 यांनी केलेली आहे.
गैरअर्जदार क्र.2 हे ग्राहक मंचासमोर हजर झाले. त्यांनी सविस्तर लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदाराची तक्रार चुक आहे. प्रतिवादीकडून तक्रारदार यांना दिलेल्या सेवेत कोणत्याही प्रकारची कमतरता झालेली नाही. तक्रारदार याने जे.जे.हॉस्पीटल मुंबई येथील ज्या डॉक्टरांनी तक्रारदारावर झालेल्या शस्त्रक्रियाबाबत शिकाऊ डॉक्टरांचा निष्काळजीपणा असल्याबाबत उल्लेख केला आहे. त्या डॉक्टरांचे नाव तसेच त्याचे लेखी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. तक्रारदार यांच्या उजव्या डोळयाच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन दि.31.12.2012 रोजी करण्यात आले. दि.04.05.2013 रोजी केलेल्या तपासणीत तक्रारदाराच्या उजव्या डोळयाचा पडदा सरकलेला दिसून आला. त्यामुळे उजव्या डोळयाचे Sceral Buckle ऑपरेशन करण्यात आले त्यावेळी तक्रारदार यास उजव्या डोळयासाठी परत विशेष प्रकारचे ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला, परंतू त्या प्रकारच्या ऑपरेशन करता तक्रारदार तयार नव्हता. त्यानंतर दि.26.06.2014 रोजी तक्रारदाराच्या उजव्या डोळयावर Yag Caps लेसर ट्रीटमेंट करण्यात आली. नंतर वेळोवेळी तक्रारदार याच्या डोळयांची तपासणी केल्यावर त्याची दृष्टी सुधारत होती असे दिसले. परंतू पुढील तपासणीकरता थांबण्यास तक्रारदार तयार नव्हता. गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांच्या सेवेत कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही अथवा त्यांच्या सेवेत त्रुटी नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी विनंती गैरअर्जदार क्र.2 यांनी केलेली आहे.
तक्रारदार याने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ त्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्यांचे लेखी जबाबाचे पुष्टयर्थ त्यांचे शपथपत्र सादर केलेले आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या बचावाकरता गणपती नेत्रालय मधील सर्व संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींचा संच पान क्र.1 ते 79 नुसार दाखल केलेला आहे.
आम्ही तक्रारदाराचा तक्रार अर्ज व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या लेखी जबाबाचे काळजीपूर्वक वाचन केले. तक्रारदार यांचा युक्तीवाद तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या वकीलाचा युक्तीवाद सविस्तर ऐकला. तसेच ग्राहक मंचासमोर असलेल्या सर्व कागदपत्रांचे परीक्षण केले. त्यावरुन आमचे असे मत झाले आहे की, तक्रारदार याने विनामुल्य शिबीरात त्याच्या डोळयाचे ऑपरेशन गैरअर्जदार यांच्या दवाखान्यामार्फत करुन घेतले, तसेच त्याच्या डोळयांची तपासणी व शस्त्रक्रिया सुध्दा विनामुल्य करुन घेतलेली आहे. त्यामुळे तक्रारदार हा गैरअर्जदार यांचेकडून वैद्यकीय निष्काळजीपणा या कारणास्तव कोणतीही नुकसान भरपाई मिळविणेस पात्र नाही. कारण तक्रारदाराकडून सेवेचे शुल्क घेण्यात न आल्यामुळे ग्राहक व सेवा पुरविणारा हे नातेच उत्पन्न होत नाही. या मुद्यावर गैरअर्जदार यांचे वकीलांनी 2014 एन.सी.जे. 738 हया राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या निकालपत्राची प्रत सादर केली आहे.आमच्या मताने सदर निकालपत्रामधील महत्वाची निरीक्षणे आमच्यासमोर चर्चेत असलेल्या प्रकरणास लागू होत आहेत.
तक्रारदार याने त्याचे तक्रार अर्जामध्ये त्याच्या डोळयांची तीन वेळा शस्त्रक्रिया केली होती असे कोठेही स्पष्ट शब्दात लिहीलेले नाही. तसेच कोणकोणत्या तारखांना त्याच्या शस्त्रक्रिया झाल्या, त्या प्रत्येक शस्त्रक्रियेचे काय स्वरुप होते या बददलही तक्रार अर्जात स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला दिसत नाही.
तक्रारदाराचा दुसरा गंभीर स्वरुपाचा आरोप असा आहे की, गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात शिकाऊ डॉक्टरांच्या मार्फत तक्रारदाराच्या डोळयांची शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच सदर शस्त्रक्रिया करतांना वैद्यकीय निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा करण्यात आला असे तक्रारदार यास जे.जे.हॉस्पीटल मुंबई येथील डॉक्टरांनी सांगितल्याबददलचा आरोप आहे. परंतू जे.जे.हॉस्पीटल मधील सदर डॉक्टरांचे नाव व गाव यांचा उल्लेख तक्रार अर्जात नाही. तसेच सदर डॉक्टराकडून त्या मुद्यावर सविस्तर प्रमाणपत्र घेऊन ते ग्राहक मंचासमोर दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर आरोपावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे योग्य नाही. अशा परिस्थितीत आमचे असे मत आहे की, तक्रारदार याने गैरअर्जदार यांचे विरुध्द केलेला कोणताही आरोप योग्यरितीने सिध्द झालेला नाही. शिवाय त्याच्या डोळयाचे ऑपरेशन विनामुल्य झाल्यामुळे ग्राहक व सेवा पुरविणारा हे नातेच तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये उत्पन्न होत नाही. या सर्व कारणास्तव तक्रारदार याची कोणतीही मागणी मान्य करता येणार नाही. म्हणून आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना.