निकालपत्र प्रेरणा रा.काळुंखे कुलकर्णी, सदस्या यांनी पारीत केले
नि का ल प त्र
पारित दि.19/03/2015
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.स.कायदा’) च्या कलम 12 नुसार सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांचे म्हणणे थोडक्यात असे की, त्यांनी दि.24/4/2013 रोजी पुण्याला जाण्यासाठी सामनेवाल्यांच्या नाशिक रोड येथील बुकींग ऑफीसमध्ये लोने टी.आर. 8292 या लक्झरी बसचे सिट क्र.21 व 22 असे दोन सिट्स आरक्षीत केले होते. त्यासाठी रु.400/- मात्र त्यांनी सामनेवाल्यांना अदा केले होते. उपरोक्त लक्झरी बस नियोजीत वेळेपेक्षा उशिराने नाशिक रोड येथे पोहोचली. सदर बसमधील सामनेवाल्याच्या प्रतिनीधीस त्यांनी आरक्षीत केलेले तिकीट दाखवून बसमध्ये प्रवेश करण्याची अनुमती मागितली असता, सामनेवाल्यांच्या प्रतिनीधींने सदर सिट्स इतर प्रवाशांना पुर्वीच आरक्षीत करुन दिले असल्याचे सांगितले. त्याबाबत सामनेवाल्यांच्या प्रतिनीधींने दिलगीरी व्यक्त करुन पर्यायी व्यवस्था म्हणून सिट क्र.34 व 35 उपलब्ध असल्याचे सांगून बसमध्ये प्रवेश करण्याची अनुमती दिली.
3. तक्रारदार यांचे असेही म्हणणे आहे की, तक्रारदार व त्यांची आई सिट क्र.34 व 35 जवळ गेले असता त्या सिटवर इतर प्रवाशी बसलेले होते. त्याबाबत त्यांनी पुन्हा सामनेवाल्यांच्या प्रतिनीधीला विचारणा केली असता तुम्हाला बसायचे असेल तर बसा नाही तर उतरुन घ्या, असे उत्तर देऊन अपमानीत केले. परंतु बस सुरु झालेली असल्याने त्यांना गैरसोय सहन करावी लागली. ब-याच वेळ उभे राहील्यानंतर सामनेवाल्यांच्या प्रतिनीधीने बसच्या शेवटच्या रांगेतील सीट उपलब्ध करुन दिले. त्यांच्या आईची वैद्यकिय अडचण असतांनाही दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना व त्यांच्या आईला शेवटच्या सिटवर बसून जिकीरीचा प्रवास करावा लागला. त्यांच्या आईला बी.पी.चा व कंबरदुखीचा त्रास असल्याने जिकीरीच्या प्रवासामुळे त्यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच वैद्यकिय उपचार घ्यावे लागले. त्यासाठी डॉक्टरांची फी रु.500/- व औषधाचा खर्च रु.1779/- इतका खर्च करावा लागला. सामनेवाल्यांनी केलेल्या सेवेतील कमतरतेमुळे झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्यांनी दि.7/10/2013 रोजी वकीलांमार्फत सामनेवाल्यांना नोटीस पाठवली. परंतु सदरची नोटीस सामनेवाल्यांना मिळूनही त्यांनी नोटीस प्रमाणे पुर्तता केली नाही. त्यामुळे सामनेवाल्यांनी केलेल्या सेवेतील कमतरतेमुळे झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व अर्जाचा खर्च रु.5000/- सामनेवाल्यांकडून मिळावा, अशा मागण्या तक्रारदारांनी मंचाकडे केलेल्या आहेत.
3. तक्रारदार यांनी तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ दस्तऐवज यादी नि.4 लगत सामनेवाल्यांची डेली बस रिसीट, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, मेडीकल बील, सामनेवाल्यांना पाठविलेली नोटीस, पोहोच पावती इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाला नोटीस मिळूनही मंचात हजर न झाल्याने त्यांच्या विरुध्द प्रस्तूत तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्यात आला.
5. तक्रारदारांचे वकील अॅड.गायकवाड यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
6. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
- सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा
देण्यात कमतरता केली काय? होय.
- आदेशाबाबत काय? अंतिम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
7. तक्रारदार यांनी दि.24/4/2013 रोजी पुण्याला जाण्यासाठी सामनेवाल्यांच्या लक्झरी बसचे सिट क्र.21 व 22 असे दोन सिट्स आरक्षीत केले. त्यासाठी रु.400/- मात्र त्यांनी सामनेवाल्यांना अदा केले. लक्झरी बस नियोजीत वेळेपेक्षा उशिराने नाशिक रोड येथे पोहोचली. सदर बसमधील सामनेवाल्याच्या प्रतिनीधीस त्यांनी आरक्षीत केलेले तिकीट दाखवून बसमध्ये प्रवेश करण्याची अनुमती मागितली असता सामनेवाल्यांच्या प्रतिनीधीने सदर सिट्स इतर प्रवाशांना पुर्वीच आरक्षीत करुन दिले असल्याचे सांगितले. त्याबाबत सामनेवाल्यांच्या प्रतिनीधींने दिलगीरी व्यक्त करुन पर्यायी व्यवस्था म्हणून सिट क्र.34 व 35 उपलब्ध असल्याचे सांगून बसमध्ये प्रवेश करण्याची अनुमती दिली. त्यानुसार तक्रारदार व त्यांची आई सिट क्र.34 व 35 जवळ गेले असता त्या सिटवर इतर प्रवाशी बसलेले होते. त्याबाबत तक्रारदार यांनी पुन्हा सामनेवाल्यांच्या प्रतिनीधीला विचारणा केली असता, तुम्हाला बसायचे असेल तर बसा नाही तर उतरुन घ्या, असे उत्तर देऊन तक्रारदारांचा अवमान केला. परंतु बस सुरु झालेली असल्याने तक्रारदारांना गैरसोय सहन करावी लागली. ब-याच वेळ उभे राहील्यानंतर सामनेवाल्यांच्या प्रतिनीधीने बसच्या शेवटच्या रांगेतील सीट उपलब्ध करुन दिले. त्यांच्या आईची वैद्यकिय अडचण असतांनाही दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना व त्यांच्या आईला शेवटच्या सिटवर बसून जिकीरीचा प्रवास करावा लागला. त्यांच्या आईला बी.पी.चा व कंबरदुखीचा त्रास असल्याने जिकीरीच्या प्रवासामुळे त्यांना मोठया प्रमाणात शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला, तसेच तक्रारदाराच्या आईला वैद्यकिय उपचार घ्यावे लागलेत, असे तक्रारदार यांनी शपथेवर कथन केलेले आहे. तक्रारदारांच्या वरील कथनास सामनेवाल्यांनी हजर होवून आव्हानित केलेले नसल्याने सामनेवाल्यास तक्रारदाराची तक्रार मान्य असल्याचा प्रतिकूल निष्कर्ष काढण्यास आम्हास वाव आहे. तक्रारदारांनी नि.4 लगत दाखल केलेले दस्तऐवज तक्रारदारांच्या वरील कथनास पुष्टी देणारे आहेत. सबब सामनेवाल्यांनी पुर्वीच आरक्षीत केलेले सिट्स तक्रारदार यांना देवून व तक्रारदाराची गैरसोय करुन सेवेत कमतरता केलेली आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.3 बाबतः
8. मुद्दा क्र. 1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, सामनेवाला यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरतेमुळे तक्रारदार व त्यांच्या आईला प्रवासादरम्यान गैरसोय सहन करुन जिकीरीचा प्रवास करावा लागला. सदर गैरसोईमुळे तक्रारदार यांच्या आईला वैद्यकीय उपचार घेवून शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला, ही बाब तक्रारदार यांनी शपथेवर कथन केलेली आहे. वैद्यकिय उपचार केल्याबाबत तक्रारदार यांनी नि.4 लगत डॉक्टराचे प्रिस्क्रिप्शन व औषधांचे बील दाखल केलेले आहे. परिणामी तक्रारदार झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचा खर्च रु.3000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्ज खर्चापोटी रक्कम रु.3000/- अदा करावेत.
2. उभय पक्षास निकालाच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक.
दिनांकः20/3/2015