Maharashtra

Bhandara

CC/19/107

KRUSHNAJI SOMAJI MOTGHARE - Complainant(s)

Versus

DIRECTOR A.N.S.DRILING AND MINING TRADERS PVT.LTD - Opp.Party(s)

MR.N.K. GAJBHIYE

29 Jan 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/107
( Date of Filing : 15 Oct 2019 )
 
1. KRUSHNAJI SOMAJI MOTGHARE
VIRALI KHANDAR TAH PAUNI
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. DIRECTOR A.N.S.DRILING AND MINING TRADERS PVT.LTD
PLOT NO 2 SHIVSHAKTI NAGAR POLICE STATION AMARAWATI WADI
NAGPUR
MAHARASHTRA
2. PRO. TULSHIDAS BHURE A.N.S.DRILING AND MINING TRADERS PVT.LTD
POT NO 3 MAHATMA PHULE COLONY NEAR GULMOHAR HOTEL BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
3. ENDRAJIT TIGHARE
BANK REPRESENTATIVE AXIS BANK WARATHI ROAD
BHANDARA
MAHARASHTRA
4. MANAGER AXIS BANK
AXIS BANK WARATHI ROAD BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 29 Jan 2021
Final Order / Judgement

                                                                     (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी – मा.अध्‍यक्ष)

                                                                                  (पारित दि.-29 जानेवारी, 2021)                  

 

01.    तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत विरुध्‍दपक्ष  क्रं 1 ते 4 यांचे विरुध्‍द दोषपूर्ण सेवे संबधात नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी जिल्‍हा  ग्राहक आयोगा समोर दाखल केलेली आहे-

02.   तक्रारीचा संक्षीप्‍त आशय असा आहे की-

          तक्रारकर्ता हा उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून शेती करतो. त्‍याने शेताचे कामकाजा करीता ट्रॅक्‍टर खरेदी करण्‍यासाठी विरुध्‍दपक्ष क्रं 2 ची भेट घेतली असता वि.प.क्रं 2 याने त्‍याला सबसिडीवर ट्रॅक्‍टर मिळवून देण्‍याची हमी दिली. तक्रारकर्त्‍याने Escart Farmtrac Tractor Model-“Atom-26” विकत घेण्‍याचा विचार केला. विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने तक्रारकर्त्‍याची आई श्रीमती मालतीबाई सोमाजी मोटघरे हिचे नावाने लेटर हेडवर नविन ट्रॅक्‍टर विकत घेण्‍याचा करारनामा केला. दिनांक-29.06.2019 रोजीचे तक्रारकर्ता आणि वि.प.क्रं 2 यांचे सौद्दा प्रमाणे ट्रॅक्‍टर व ट्राली रुपये-5,50,000/- एवढया किमती मध्‍ये विक्री करण्‍याचा सौद्दा झाला. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 ला रुपये-40,000/- नगदी दिले व दिनांक-25.07.2019 पर्यंत रुपये-60,000/- देण्‍याचे ठरले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने ट्रॅक्‍टर सोबत नांगर घेण्‍यासाठी रुपये-11,000/-नगदी विरुध्‍दपक्ष क्रं 2 ला दिले परंतु त्‍याची पावती विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने दिली नाही. विहित मुदतीत रुपये-60,000/- तक्रारकर्त्‍याने जमा केले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने तक्रारकर्त्‍यास काही सोन्‍याचे दागीने आहेत का म्‍हणून विचारणा केली असता, तक्रारकर्त्‍याने 12 ग्रॅम सोन्‍याची चेन असल्‍याचे सांगितले, तेंव्‍हा विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने रुपये-37000/- ट्रॅक्‍टरच्‍या किस्‍तीमध्‍ये जमा करतो असे म्‍हणून सदर सोन्‍याची चेन स्‍वतःजवळ ठेवून घेतली.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, उर्वरीत रकमे करीता विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने त्‍याला कर्ज मिळवून देण्‍याचे आश्‍वासन दिले. त्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 3 ला पाचारण केले असता,  विरुध्‍दपक्ष क्रं 3 याने तक्रारकर्त्‍यास 8.30 टक्‍के किंवा 9.48 द.सा.द.शे. प्रमाणे व्‍याज लागेल असे सांगून व्‍याजाचा हप्‍ता व रक्‍कम लिहून दिला परंतु जेंव्‍हा कर्ज मंजूर होऊन तक्रारकर्त्‍यास बँके मार्फत कर्ज करारनाम्‍याची प्रत पोस्‍टाव्‍दारे प्राप्‍त झाली तेंव्‍हा मात्र वेगळीच परिस्थिती आढळून आली व विरुध्‍दपक्ष क्रं 4 बँकेनी त्‍यास रुपये-4,28,259/- कर्ज मंजूर करुन त्‍यावर व्‍याजाचा दर 15.50 टक्‍के एवढा आकारला होता, हे पाहून त्‍याला आश्‍चर्याचा धक्‍का बसला. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 3 व 4 यांनी त्‍याची लुबाडणूक, फसवणूक करुन दोषपूर्ण सेवा दिली.

       तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने त्‍यास दिनांक-02.07.2019 रोजी फक्‍त ट्रॅक्‍टर दिला परंतु त्‍यासोबत ट्राली दिली नाही व ती दोन-तीन दिवसानी पाठविण्‍यात येईल असे सांगून त्‍याच्‍या को-या डिलेव्‍हरी फॉर्मवर सहया घेतल्‍यात तसेच तक्रारकर्त्‍या कडून प्राप्‍त रकमेचा सुध्‍दा त्‍यावर उल्‍लेख केला नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी त्‍याला ट्रॅक्‍टर दिला परंतु त्‍या ट्रॅक्‍टरची पासिंग सुध्‍दा करुन दिली नाही परिणामी त्‍याला ट्राली व पासिंग शिवाय सदर ट्रॅक्‍टरचा उपभोग न घेता आल्‍याने त्‍याचे रुपये-60,000/- एवढया रकमेचे आर्थिक नुकसान झाले. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी त्‍याची आर्थिक लुबाडणूक करुन दोषपूर्ण सेवा दिली. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचेकडे सोने गहाण ठेवण्‍याचा परवाना नसताना विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने तक्रारकर्त्‍याची सोन्‍याची चेन हडपण्‍याचे दृष्‍टीने ठेवून घेतली. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी त्‍याची आई नामे श्रीमती मालतीबाई सोमाजी मोटघरे हिचे नावाने कर्ज करारनामा तयार केला परंतु त्‍यावर त्‍याचे आईची सही किंवा आंगठा घेतलेला नाही. त्‍याच बरोबर विरुध्‍दपक्ष क्रं 3 व 4 यांनी प्रथमतः व्‍याजा वरील व्‍याजाचा दर त्‍याला कमी सांगितला व नंतर व्‍याजाचा दर जास्‍त लावून त्‍याची आर्थिक फसवणूक केली. परिणामी त्‍याला आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, म्‍हणून त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 4 यांना वकीलांचे मार्फतीने दिनांक-23.09.2019 रोजी रजि.नोटीस पाठविली असता विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी नोटीस घेण्‍यास नकार दिला. विरुध्‍दपक्ष क्रं 3 व 4 यांनी नोटीस स्विकारली व नंतर त्‍याला फोनवर धमकाविण्‍याचा प्रयत्‍न केला. म्‍हणून शेवटी त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 4 यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द पुढील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

प्रार्थनाः-

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍या कडून सदरचा ट्रॅक्‍टर परत घ्‍यावा व तक्रारकर्त्‍याने भरलेली रक्‍कम व त्‍याची सोन्‍याची चेन त्‍याला परत करावी असे आदेशित व्‍हावे. विरुध्‍दपक्ष क्रं 3 व 4 यांनी तक्रारकर्त्‍याचे कर्ज प्रकरण रद्द करुन त्‍याला त्रृणमुक्‍त करावे असे आदेशित व्‍हावे.                                 
  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना असे आदेशित व्‍हावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे मागणी प्रमाणे 5/7 ची ट्रॅक्‍टर व ट्राली त्‍याला देण्‍यात यावी तसेच सदर ट्रॅक्‍टर व ट्रॉलीचे आर.टी.ओ.‍ पासिंग करुन देण्‍याचे वि.प.क्रं 1 व 2 यांना आदेशित व्‍हावे.
  2. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे दोषपूर्ण सेवेमुळे आर्थिक नुकसानीपोटी रुपये-60,000/- व शारिरीक व मानसिक त्रासा पोटी रुपये-50,000/- नुकसान भरपाई विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचे कडून तक्रारकर्त्‍यास अदा करण्‍याचे आदेशित व्‍हावे.
  3. विरुध्‍दपक्ष क्रं 3 व क्रं 4 यांना आदेशित व्‍हावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यावर कर्जापोटी आकारलेला व्‍याजाचा दर 15.50 टक्‍के कमी करुन तो लेखी दिल्‍या प्रमाणे 8.30 किंवा 9.48 टक्‍के इतका करण्‍यात यावा.
  4. प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 4 यांचेकडून मिळावा. या शिवाय योग्‍य ती दाद त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

03.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी एकत्रित लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात तक्रारकर्ता हा त्‍यांचा ग्राहक असल्‍याची बाब मान्‍य केली परंतु ट्रॅक्‍टरवर सबसिडी मिळवून देण्‍याची हमी घेतल्‍याची बाब नामंजूर केली. त्‍याच बरोबर तक्रारकर्त्‍याने दिनांक-05.07.2019 रोजी नांगर घेण्‍यासाठी विरुध्‍दपक्ष क्रं 2 यास नगदी रुपये-11,000/- दिलेत ही बाब नामंजूर केली. तसेच तक्रारकर्ता मुदतीत रुपये-60,000/- देऊ न शकल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 याचे सांगण्‍या प्रमाणे ट्रॅक्‍टरच्‍या किस्‍तीमध्‍ये रुपये-37,000/- जमा करतो असे सांगून तक्रारकर्त्‍याची सोन्‍याची चेन विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने ठेऊन घेतली या बाबी नामंजूर केल्‍यात. तक्रारकर्त्‍याने दिनांक-01.07.2019 रोजी चांगला महूर्त असल्‍याचे सांगून ट्रॅक्‍टर आर.टी.ओ.पासिंग होण्‍यापूर्वीच पूजेसाठी जबरदस्‍तीने नेला व तेंव्‍हा पासून आज पावेतो ट्रॅक्‍टर आणून दिला नाही असे नमुद केले, ते आजही पासिंग करुन देण्‍यास तयार आहेत. पासिंग न होण्‍यासाठी तक्रारकर्ता स्‍वतः जबाबदार आहे.

       विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी पुढे असे नमुद केले की, त्‍यांचे कडून ट्रॅक्‍टर खरेदी करण्‍यासाठी डाऊन पेमेंट म्‍हणून रुपये-1,00,000/-एवढी रक्‍कम तक्रारकर्त्‍यास जमा करावयाची होती परंतु त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचेकडे फक्‍त रुपये-40,000/- जमा केले. उर्वरीत रक्‍कम रुपये-60,000/- देणे जमली नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 कडे रुपये-37,000/- एवढया रकमेचा सोन्‍याचा गोफ (चेन) दिला व म्‍हणाला की, उर्वरीत रक्‍कम जेंव्‍हा देईल तेंव्‍हा माझी सोन्‍याची चेन घेऊन जाईल. तक्रारकर्त्‍याची आई श्रीमती मालतीबाई सोमाजी मोटघरे ट्रॅक्‍टर विकत घेणार असल्‍याने त्‍यांचे नावे सौद्दा कशाप्रकारे होईल म्‍हणून कच्‍चा तयार करण्‍यात आला होता. तक्रारकर्त्‍याची दिनांक-23.09.2019 रोजीची नोटीस विरुध्‍दपक्ष क्रं 1 यास मिळली नाही कारण अपूर्ण पत्‍ता असून ऑफीस बंद असल्‍याने नोटीस परत गेली.

      आपले विशेष कथनात विरुध्‍दपक्ष क्रं  1 व 2 यांनी असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 हा स्‍कॉर्ट कंपनीचा डिलर असून ट्रॅक्‍टर विक्री व त्‍याचे सुटे भाग विक्रीचा त्‍याचा व्‍यवसाय असून भंडारा येथे शाखा आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे भंडारा येथील शाखे मधून एक ट्रॅक्‍टर स्‍कार्ट 26 अॅटम रुपये-5,50,000/- एवढया किमती मध्‍ये विकत घेण्‍याचे ठरविले, त्‍यासाठी रुपये-1,00,000/- डाऊन पेमेंट भरावयाचे होते परंतु तक्रारकर्त्‍या जवळ तेवढी रक्‍कम नसल्‍याने त्‍याने फक्‍त रुपये-40,000/-एवढी रक्‍कम भरली आणि उर्वरीत रक्‍कमेच्‍या सुरक्षीततेपोटी रुपये-37,000/-एवढया रकमेची सोन्‍याची चेन आणून दिली, त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याने असे सांगितले होते की, जेंव्‍हा तो ट्रॅक्‍टर स्‍कॉर्ट 26 अॅटमची संपूर्ण रक्‍कम अदा करेल त्‍यावेळेस हिशोब करताना हया सोन्‍याचे चेनची रक्‍कम रुपये-37,000/-ट्रॅक्‍टरच्‍या किमती मध्‍ये धरण्‍यात यावी, त्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 1 याने ही रक्‍कम ट्रॅक्‍टरच्‍या किमती मध्‍ये हिशोबात धरली. आज पावेतो तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2  यांचेकडे फॉयनान्‍स कंपनीव्‍दारे रुपये-4,20,679/- आणि डाऊन पेमेंटपोटी नगदी भरलेली रक्‍कम रुपये-40,000/- आणि सोन्‍याचे चेनची किम्‍मत रुपये-37,000/- अशा रकमा भरलेल्‍या आहेत, त्‍यापैकी नगदी रक्‍कम रुपये-40,000/- आणि सोन्‍याचे चेनची किम्‍मत रुपये-37,000/- अशा दोन पावत्‍या तक्रारकर्त्‍यास दिलेल्‍या आहेत.

       विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याने दिनांक-01.07.2019 रोजीचा चांगला महूर्त आहे असे सांगून जबरदस्‍तीने ट्रॅक्‍टर आपल्‍या घरी नेला व पूजा झाल्‍या नंतर एक दोन दिवसात परत आणून देतो असे सांगितले होते परंतु आज पावेतो ट्रॅक्‍टर पासींग करीता आणून दिला नाही आणि त्‍यासाठी तक्रारकर्ता स्‍वतःच जबाबदार आहे. तक्रारकर्त्‍याचे आईने प्रथम ट्रॅक्‍टरचा सौद्दा तिचे नावे केला होता परंतु नंतर तक्रारकर्त्‍याने त्‍याचे नावाने ट्रॅक्‍टर विकत घेतला व संपूर्ण कागदपत्र व सौद्देपत्र त्‍याने आपले नावे करुन अटी व शर्ती वर सुध्‍दा सहया केल्‍यात. तक्रारकर्त्‍याने विनाकारण पैसा उकळण्‍याचे दृष्‍टीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचे विरुध्‍द तक्रार केली असल्‍याने तक्रार दंडासह खारीज करण्‍याची विनंती केली.

 

 04. विरुध्‍दपक्ष क्रं 4 याने लेखी उत्‍तर दाखल केले. त्‍यांनी तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी प्रमाणे त्‍यांचा ग्राहक होत नसल्‍याचे नमुद केले. सदर कर्ज प्रकरणात विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने, विरुध्‍दपक्ष क्रं 3 यास कर्ज मंजूर करण्‍यासाठी बोलाविले होते या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 4 ला माहिती नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे कडून फार्म ट्रॅक अॅटॉम-26 हा ट्रॅक्‍टर खरेदी करण्‍यासाठी दिनांक-29.08.2019 रोजी रुपये-4,28,259/- एवढया रकमेचे कर्ज घेतले होते. तक्रारकर्त्‍यास 60 अर्धवार्षिक ई.एम.आय. दिनांक-05.02.2020 पासून ते दिनांक-05.08.2024 या कालावधी मध्‍ये भरावयाचे होते. तक्रारकर्त्‍यास प्रत्‍येक सहा महिन्‍याने कर्जाचा हप्‍ता विरुध्‍दपक्ष क्रं 4 चे शाखेत भरावयाचा आहे. सदर कर्जावर व्‍याजाचा दर 9.48 टक्‍के फ्लॅट रेट म्‍हणजे 15.50 टक्‍के इंटरेस्‍ट रेट रिडयुसिंग असा आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 3 याने तक्रारकर्त्‍यास 8.30 टक्‍के किंवा 9.48 टक्‍के द.सा.द.शे. या प्रमाणे व्‍याज लागेल म्‍हणून लोनची किश्‍त व रक्‍कम समजावून सांगून लिहून दिले होते या बाबीची विरुध्‍दपक्ष क्रं 4 ला कोणतीही माहिती नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 4 याने तक्रारकर्त्‍यास जास्‍त व्‍याज दराने कर्ज मंजूर केले व त्‍याची आर्थिक लुबाडणूक करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब नामंजूर केली. तसेच कर्ज प्रकरण मंजूर करते वेळी व्‍याजाचा दर 9.48 टक्‍के फ्लॅट दर 15.50 टक्‍के इंटरेस्‍ट रेट रिडयुसिंग) असे तक्रारकर्त्‍यास सांगितले होते व ही बाब तक्रारकर्त्‍याने मान्‍य केली होती या बाबी नामंजूर केल्‍यात. प्रथम व्‍याजाचा दर कमी सांगितला व नंतर जास्‍त लावला ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 4 याला वकीलांचे मार्फतीने दिनांक-23.09.2019 रोजी नोटीस पाठविली होती हे मान्‍य आहे आणि त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 4 याने तक्रारकर्त्‍याला कर्जावरील व्‍याज दर 9.48 टक्‍के फ्लॅट रेट (15.50 टक्‍के इंटरेस्‍ट रेट रिडयुसिंग) हे दोन्‍ही एकच असल्‍या बाबत सविस्‍तर सांगून त्‍याचे समाधान केले होते. 9.48 टक्‍के फ्लॅट रेट म्‍हणजे 15.50 टक्‍के इंटरेस्‍ट रेट रिडयुसिंग वार्षिक लावल्‍याने तक्रारकर्त्‍याचे कुठलेही आर्थिक नुकसान झालेले नाही. फ्लॅट रेट व इंटरेस्‍ट रेट  रिडयुसिंग यामधील फरक न कळल्‍याने तक्रारकर्त्‍याने गैरसमजुतीतून प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍याचे कर्ज प्रकरण रद्द करुन त्‍याला त्रृणमुक्‍त करण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही.  कर्जावरील व्‍याज दर 9.48 टक्‍के फ्लॅट रेट म्‍हणजे 15.50 टक्‍के इंटरेस्‍ट रेट रिडयुसिंग वार्षिक असल्‍या कारणाने त्‍यामध्‍ये बदल करण्‍याचा आदेश देण्‍याची आवश्‍यकता नाही. त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार तक्रारकर्त्‍यावर खर्च बसवून खारीज करावी  असे नमुद केले.

       

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 यास जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली असता ती नोटीस दिनांक-19.11.2019 रोजी मिळाल्‍या बाबत पोस्‍टाचा ट्रॅक रिपोर्ट अभिलेखावर दाखल आहे. विरुध्‍दपक्ष क्र 3 यास जिल्‍हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळूनही तो उपस्थित न झाल्‍यामुळे वि.प.क्रं 3 विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात दिनांक-04.02.2020 रोजी पारीत केला.

06.    तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज यादी नुसार विरुध्‍दपक्षांना पाठविलेल्‍या नोटीसची प्रत, रजि. पोस्‍टाच्‍या पावत्‍या, सौद्देपत्र,  डिलेव्‍हरी चालान, वि.प.क्रं 3 ने दिलेला दर, सोन्‍याची चेन ठेवल्‍याची पावती, परत आलेले नोटीसचे पॉकीट प्रत, रजि. पोच प्रत अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तसेच वेलकम लेटर, लोन अॅग्रीमेन्‍टच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे तक्रारीलाच पुराव्‍याचे शपथपत्र समजावे अशी पुरसिस दाखल केली.

07.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी एकत्रित लेखी उत्‍तर दाखल केले. सोबत विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचे सौद्देपत्राची प्रत, नियम व अटी दसतऐवज प्रत, हमीपत्र अशा दसतऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तरालाच पुराव्‍याचे शपथपत्र समजावे अशी पुरसिस दाखल केली तसेच लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तक्रारकर्त्‍याचे जॉब कॉर्डची प्रत दाखल केली.

08.   विरुध्‍दपक्ष क्रं 4 याने लेखी उत्‍तर दाखल केले. सोबत दस्‍तऐवज यादी नुसार तक्रारकतर्याने ट्रॅक्‍टर साठी कर्ज मिळण्‍यासाठी केलेला अर्ज, ट्रॅक्‍टर कर्जावर तक्रारकतर्याने केलेली सही, विरुध्‍दपक्ष क्रं 1 याने तक्रारकर्त्‍याला दिलेले ट्रॅक्‍टरचे कोटेशन, तक्रारकर्त्‍यास फार्म ट्रॅक्‍टर दिल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष क्रं 3 याने तपासणी करुन दिलेला अहवाल, तक्रारकर्त्‍याचे कर्ज परतफेडीचे शेडयुलची प्रत, तक्रारकर्त्‍याचा ट्रॅक्‍टरचे कर्जा बाबत खाते उता-याची प्रत अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे.

09.   मौखीक युक्‍तीवादाचे वेळी तक्रारकर्ता स्‍वतः उपस्थित असल्‍याने त्‍याचा मौखीक युक्‍तीवाद ऐकला. विरुध्‍दपक्ष मौखीक युक्‍तीवादाचे वेळी अनुपस्थित होते.

10.  तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचे एकत्रीत लेखी उत्‍तर तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 4 चे लेखी उत्‍तर  आणि उभय पक्षां तर्फे अभिलेखावर दाखल केलेले दस्‍तऐवज यावरुन सदर प्रकरणा मध्‍ये न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

01

तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्षा कडून दोषपूर्ण सेवा मिळाल्‍याची बाब सिध्‍द होते काय

-होय-

 

 

02

तक्रारकर्त्‍यास मिळालेल्‍या दोषपूर्ण सेवे संबधात  कोण  विरुध्‍दपक्ष जबाबदार आहे.

-होय- विरुध्‍दपक्ष क्रं 1  व 2

03

विरुध्‍दपक्ष क्रं 3 व 4 यांनी तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय

-नाही-

04

काय आदेश

अंतीम आदेशा नुसार

                                                                     ::कारणे व मिमांसा::

 

मुद्दा क्रं 1 व 2

11.  तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 हे अनुक्रमे ए.एन.एस.ड्रीलींग अॅन्‍ड मायईनींग ट्रेडर्स प्रायव्‍हेट लिमिटेड या फर्मचे अनुक्रमे नागपूर येथील डायरेक्‍टर आणि भंडारा येथील प्रोप्रायटर आहेत व ही बाब त्‍यांनी लेखी उत्‍तरात नाकारलेली नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचे मार्फतीने तक्रारकर्त्‍यास वादातील ट्रॅक्‍टर विक्री केलेला आहे. थोडक्‍यात विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना यापुढे प्रकरणात “ट्रॅक्‍टर विक्रेता” असे संबोधण्‍यात येईल.

12.    तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 3 व 4 हे एक्‍सीस बँकेचे अनुक्रमे भंडारा येथील बँक प्रतिनिधी आणि भंडारा शाखेतील शाखा व्‍यवस्‍थापक आहेत व ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 4 यांनी लेखी उत्‍तरात नाकारलेली नाही.

13.    तक्रारकर्त्‍याने तक्रारी मध्‍ये एका भागात विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 ट्रॅक्‍टर विक्रेता आणि  दुस-या भागात विरुध्‍दपक्ष क्रं 3 व 4 बँके विरुध्‍द आरोप केलेले आहेत, त्‍यामुळे प्रथम विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 ट्रॅक्‍टर विक्रेता यांचे विरुध्‍द केलेल्‍या आरोपांचा विचार करण्‍यात येतो.

प्रथम भाग- ट्रॅक्‍टर संबधातील आरोपां बाबत-

14.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 ट्रॅक्‍टर विक्रेता यांचे विरुध्‍द खालील आरोप केलेले व त्‍याचे स्‍पष्‍टीकरण खालील प्रमाणे आहे-

(01) नांगर विकत घेण्‍यासाठी दिलेल्‍या पैशा बाबत- तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे  विरुध्‍दपक्ष क्रं 2 याला नांगर विकत घेण्‍यासाठी दिनांक-05.07.2019 रोजी नगदी रुपये-11,000/- दिलेत परंतु त्‍याची पावती विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने दिली नाही. ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 2 याने लेखी उत्‍तरात नाकारलेली आहे. तक्रारकर्त्‍याने सदर रुपये-11,000/- दिल्‍या बाबतचा कोणताही सक्षम पुरावा जसे पावती ईत्‍यादी दाखल केलेली नसल्‍याने सदर रक्‍कम रुपये-11000/- दिल्‍या बाबतची बाब सिध्‍द होत नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने आपले तक्रारीतील मागणी संबधाने केलेल्‍या प्रार्थनेमध्‍ये नागंर बाबत कोणतीही विनंती केलेली नाही त्‍यामुळे नांगर बाबत कोणताही आदेश देणे योग्‍य होणार नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

(02) ट्रॅक्‍टरची ट्राली न दिल्‍या बाबत- तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 ट्रॅक्‍टर विक्रेता यांचे कडून ट्रॅक्‍टर विकत घेण्‍याचा सौद्दा केला होता. सदर ट्रॅक्‍टरचे सौद्देपत्र अभिलेखावर दाखल आहे. सदर सौद्देपत्र दिनांक-29.06.2019 रोजीचे असून त्‍यामध्‍ये पार्टी क्रं 1  ए.एन.एस.डी. अॅन्‍ड मायनिंग ट्रेडर्स भंडारा तुलशीदास भुरे आणि पार्टी क्रं 2 मालतीबाई सोमाजी मोटघरे यांचे नावे असून  त्‍यामध्‍ये अॅटम ट्रॅक्‍टर 26 एच,पी. व ट्रॉली हायड्रोलीक एकूण रुपये-5,50,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा सौद्दा ठरला होता, त्‍यापैकी तक्रारकर्त्‍याने दिनांक-29.06.2019 रोजी रुपये-40,000/- नगदी दिलेत व ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी मान्‍य केलेली आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 ट्रॅक्‍टर विक्रेत्‍याने तक्रारकर्त्‍याचे नावे दिलेल्‍या डिलेव्‍हरी चालानची प्रत अभिलेखावर दाखल आहे त्‍या डिलेव्‍हरी चालानचा क्रं 075 असा असून त्‍यामध्‍ये ट्रॅक्‍टर दिल्‍या बाबत उल्‍लेख असून त्‍याचा इंजीन क्रं ए-22664 असा आहे तयावर तक्रारकर्त्‍याची सही सुध्‍दा आहे परंतु डिलरची सही नाही. सदर चालानवर तक्रारकर्त्‍यास ट्रॅक्‍टरची ट्राली दिल्‍या बाबत कोणताही उल्‍लेख नमुद नाही. यावरुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 ट्रॅक्‍टर विक्रेता यांनी तक्रारकर्त्‍यास ट्राली दिली नसल्‍याची बाब सिध्‍द होते. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी अशी ट्रॅक्‍टरची ट्राली तक्रारकर्त्‍यास दिल्‍या बाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही तसेच लेखी उत्‍तरा मध्‍ये सुध्‍दा याबाबत कोणतेही विधान केलेले नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी आपले लेखी युक्‍तीवादातील परिच्‍छेद क्रं 8 मध्‍ये असे नमुद केलेले आहे की, गैरअर्जदार यांनी दाखल केलेले हमीपत्रानुसार आजही ट्रॅक्‍टर आर.टी.ओ.पासिंग करुन देण्‍यास तयार आहे. ट्राली विकली नाही तर ट्राली आर.टी.ओ.पासिंग करुन देण्‍याचा प्रश्‍न निर्माण होत नाही”  मात्र दिनांक-29.06.2019 रोजीचे सौद्देपत्राचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये पार्टी क्रं 1  ए.एन.एस.डी. अॅन्‍ड मायनिंग ट्रेडर्स भंडारा तुलशीदास भुरे आणि पार्टी क्रं 2 मालतीबाई सोमाजी मोटघरे यांची नावे असून  त्‍यामध्‍ये अॅटम ट्रॅक्‍टर 26 एच,पी. व ट्रॉली हायड्रोलीक एकूण रुपये-5,50,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा सौद्दा झाला असे नमुद आहे. या दस्‍तऐवजी पुराव्‍या वरुन तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 चे लेखी युक्‍तीवादा प्रमाणे तक्रारकर्त्‍यास करारा प्रमाणे आज पर्यंत ट्रॅक्‍टरची ट्राली मिळाली नाही ही बाब सिध्‍द होते असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

(03) तक्रारकर्त्‍याचे रुपये-37,000/- एवढया किमतीचे सोन्‍याचे चेन बाबत- तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, त्‍याला ट्रॅक्‍टरचे डाऊनपेमेंट पोटी विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विक्रेता यांचेकडे रुपये-1,00,000/- भरावयाचे होते, त्‍यापैकी त्‍याने रुपये-40,000/- नगदी दिलेत व ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी मान्‍य केलेली आहे. तक्रारर्त्‍याने उर्वरीत रुपये-60,000/- रकमेच्‍या सुरक्षेपोटी विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचेकडे सोन्‍याची चेन पावती क्रं 279 अनुसार दिनांक-13.07.2019 रोजी जमा केलेली असून त्‍याची किम्‍मत पावतीवर रुपये-37,000/- नमुद आहे आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी लेखी उत्‍तरात सदरची बाब मान्‍य केलेली आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची रुपये-37,000/- एवढया रकमेची चेन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचेकडे जमा आहे ही बाब सदर पावती वरुन  सिध्‍द होते.

(04) तक्रारकर्त्‍याने ट्रॅक्‍टरचे किमतीपोटी विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचेकडे जमा केलेल्‍या रकमां बाबत- तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2  यांचेकडे फॉयनान्‍स कंपनीव्‍दारे रुपये-4,20,679/- आणि डाऊन पेमेंटपोटी नगदी भरलेली रक्‍कम रुपये-40,000/- आणि सोन्‍याचे चेनची किम्‍मत रुपये-37,000/- अशा रकमा भरलयाची बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी लेखी उत्‍तरात मान्‍य केलेली आहे आणि याप्रमाणे एकूण रक्‍कम रुपये-4,97,679/- एवढी येते. तर विरुध्‍दपक्ष क्रं 4 वित्‍तीय कंपनीने तक्रारकर्त्‍यास ट्रॅक्‍टर विकत घेण्‍यासाठी कर्ज रुपये-4,28,259/- दिल्‍याचे लेखी उत्‍तरात नमुद केलेले आहे. सदर वित्‍तीय कंपनीने मंजूर केलेली कर्जाची रक्‍कम ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विक्रेता यास देण्‍यात येते. या प्रमाणे हिशोब विचारात घेतल्‍यास कर्जाव्‍दारे मिळालेली रक्‍कम रुपये-4,28,259/- अधिक नगदी भरलेली रक्‍कम रुपये-40,000/- आणि सोन्‍याचे चेनची किम्‍मत रुपये-37000/- असे मिळून एकूण रक्‍कम रुपये-5,05,259/- अशी येते. तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विक्रेता यांचे मध्‍ये अॅटम ट्रॅक्‍टर 26 एच,पी. व ट्रॉली हायड्रोलीक एकूण रुपये-5,50,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा सौद्दा ठरला होता, त्‍यापैकी तक्रारकर्त्‍याने एकूण रुपये-5,05,259/- रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचेकडे जमा केल्‍याची बाब सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याकडे अद्दापही ट्रॅक्‍टर व ट्रॉलीपोटी रुपये-44,741/- देणे निघते परंतु त्‍यापैकी ट्रॉली तक्रारकर्त्‍याला अद्दाप पर्यंत विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विक्रेता याने पुरविलेली नसल्‍याची बाब सिध्‍द झालेली आहे.

(05) ट्रॅक्‍टरचे आर.टी.ओ.पासिंग अद्दाप पर्यंत करुन न दिल्‍या बाबत-तक्रारकर्त्‍याचे आरोपा प्रमाणे त्‍याने विकत घेतलेल्‍या ट्रॅक्‍टरचे आर.टी.ओ.पासिंग अद्दाप पर्यंत विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विक्रेता यांनी करुन दिलेले नाही. तक्रारकर्त्‍याचे ट्रॅक्‍टरचे आर.टी.ओ.पासिंग अद्दाप पर्यंत झाले नसल्‍याची बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विक्रेता यांनी लेखी उत्‍तरात मान्‍य केलेली आहे तसेच विरुदपक्ष क्रं 1 व 2 आजही ट्रॅक्‍टरचे आर.टी.ओ.पासिंग करुन देण्‍यास तयार असल्‍याचे मान्‍य केलेले आहे.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विक्रेता यांचे लेखी उत्‍तरा प्रमाणे तक्रारकर्त्‍याने दिनांक-01.07.2019 रोजीचा चांगला महूर्त आहे असे सांगून जबरदस्‍तीने ट्रॅक्‍टर आपल्‍या घरी नेला व पूजा झाल्‍या नंतर एक दोन दिवसात परत आणून देतो असे सांगितले होते परंतु आज पावेतो ट्रॅक्‍टर पासींग करीता आणून दिला नाही आणि त्‍यासाठी तक्रारकर्ता स्‍वतःच जबाबदार असल्‍याचे नमुद केलेले आहे परंतु आपले कथनाचे समर्थनार्थ विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 ट्रॅक्‍टर विक्रेता यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. अशापरिस्थितीत तक्रारकर्त्‍याचे कथन की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 ट्रॅक्‍टर विक्रेता यांनी त्‍याने विकत घेतलेल्‍या ट्रॅक्‍टरचे आज पर्यंत आर.टी.ओ.पासिंग न झाल्‍यामुळे तो आज पर्यंत ट्रॅक्‍टरचा उपभोग घेऊ शकला नाही व त्‍यामुळे त्‍याचे आर्थिक नुकसान झाले या कथनात जिल्‍हा ग्राहक आयोगास तथ्‍य दिसून येते, त्‍यामुळे तक्रारकर्ता हा  वि.प.क्रं 1 व 2 विक्रेता यांचे कडून ट्रॅक्‍टरचे आर.टी.ओ.पासिंग करुन मिळण्‍यास आणि आर्थिक नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे,  यावरुन मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी नोंदवित आहोत.

दुसरा भाग विरुध्‍दपक्ष क्रं 3 व 4 बँके कडून घेतलेल्‍या कर्जा बाबत.

       तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष अॅक्‍सीस बँकेने पहिल्‍यांदा कमी दर सांगून नंतर जास्‍त व्‍याज दराने आकारणी केल्‍याचा आरोप केलेला आहे-

15. तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील आरोपा प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 3 याने तक्रारकर्त्‍यास 8.30 टक्‍के किंवा 9.48 द.सा.द.शे. प्रमाणे व्‍याज लागेल असे सांगून व्‍याजाचा हप्‍ता व रक्‍कम लिहून दिली परंतु जेंव्‍हा कर्ज मंजूर होऊन बँके मार्फत कर्ज करारनाम्‍याची प्रत पोस्‍टाव्‍दारे प्राप्‍त झाली तेंव्‍हा मात्र वेगळीच परिस्थिती आढळून आली व विरुध्‍दपक्ष क्रं 4 बँकेनी त्‍यास रुपये-4,28,259/- कर्ज मंजूर करुन त्‍यावर व्‍याजाचा दर 15.50 टक्‍के एवढा आकारला होता, हे पाहून त्‍याला आश्‍चर्याचा धक्‍का बसला. याउलट  विरुध्‍दपक्ष बँके तर्फे विरुध्‍दपक्ष क्रं 4 याने तक्रारकर्त्‍याला कर्जावरील व्‍याज दर 9.48 टक्‍के फ्लॅट रेट (15.50 टक्‍के इंटरेस्‍ट रेट रिडयुसिंग) हे दोन्‍ही एकच असल्‍या बाबत नमुद करुन 9.48 टक्‍के फ्लॅट रेट म्‍हणजे 15.50 टक्‍के इंटरेस्‍ट रेट रिडयुसिंग वार्षिक असल्‍याने तक्रारकर्त्‍याचे कुठलेही आर्थिक नुकसान झालेले नाही. फ्लॅट रेट व इंटरेस्‍ट रेट रिडयुसिंग यामधील फरक न कळल्‍याने तक्रारकर्त्‍याने गैरसमजुतीतून प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असल्‍याचे नमुद केले.

   या आरोपां बाबत आम्‍ही ट्रॅक्‍टर लोन संबधात तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष एक्‍सीस बँक यांचे मध्‍ये जो ट्रॅक्‍टर खरेदी बाबत कर्ज करारनामा झाला होता त्‍याचे अवलोकन केले. सदर कर्ज करारनाम्‍या मध्‍ये पुढील प्रमाणे नमुद आहे-

Loan Account No.-                     LNR004804440524

Name-                                        Krishna Somaji  Motghare

Amount Sanctioned-                  Rs-4,28,259/-

Rate of Interest-                         15.50%

Tenure-                                      60 Months

Repayment of Schedule –          Half yearly

Installment Amount-                   Rs.-70,000/-

Total Installments-                     10

     सदर कर्ज करारनाम्‍यावर तक्रारकर्त्‍याने सहया केलेल्‍या असून त्‍यावर दोन साक्षीदारांच्‍या सहया सुध्‍दा आहेत.

तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 4 अॅक्‍सीस बँके तर्फे कर्ज पतफेडीचे जे शेडयुल दाखल केलेले आहे त्‍याचे अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे करण्‍यात आले, त्‍यामध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे.

05/02/2020 To 05/02/2023

 Total 07 Installments -                        Each Installment Rs.-70,000/-

05/08/2023-                                          Installment Amt Rs.-50,000/-

05/02/2024-                                          Installment Amt Rs.-35,000/-

05/08/2024 –                                         Installment Amt Rs.-25,013/-

 

Total Installment Amount                     Rs.-600,013/-

Principal Amount-                                Rs-4,28,259/-

Total Interest Amount-                         Rs.-1,71,754/-

 

       सदर कर्ज परतफेडीचे शेडयुल वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍यास एकूण रुपये-4,28,259/- एवढे कर्ज मंजूर करुन दिले होते आणि त्‍याचे मोबदल्‍यात तक्रारकर्त्‍यास एकूण व्‍याज रुपये-1,71,754/- भरावयाचे होते. मूळ कर्जाची मुद्दल रक्‍कम रुपये’-4,28,259/- अधिक कर्जाचे व्‍याजाची एकूण
रक्‍कम रुपये-1,71,754/- असे मिळून विहित कालावधीत तक्रारकर्त्‍यास कर्जाची मुद्दल व व्‍याज असे एकूण रुपये-600ए013/- एवढी रक्‍कम परतफेड करावयाची आहे. सदर परतफेडीचे शेडयुल वरुन असेही दिसून येते की, व्‍याजाची रक्‍कम प्रत्‍येक कर्ज परतफेडीचे हप्‍त्‍या नंतर कमी-कमी होत आहे (Interest Amount is reducing) जसे प्रथम हप्‍त्‍यास व्‍याजाची रक्‍कम    रुपये-29502/- दुसरा सहामाही हप्‍ता रुपये-30052/-, तिसरा सहामाही हप्‍ता रुपये-26956/- चौथा सहामाही हप्‍ता रुपये-23620/- पाचवा सहामाही हप्‍ता रुपये-20025/- सहावा सहामाही हप्‍ता रुपये-16152/-, सातवा सहामाही हप्‍ता रुपये-11979/- आठवा सहामाही हप्‍ता रुपये-7482/-, नववा सहामाही हप्‍ता रुपये-4187/- आणि दहावा सहामाही हप्‍ता रुपये-1799/- अशा व्‍याजाच्‍या रकमा नमुद आहेत. यावरुन असे दिसून येते की, जशी जशी कर्जाचे हप्‍त्‍याचे रकमेची परतफेड होईल त्‍यानुसार व्‍याजाची रक्‍कम कमी कमी होत जाईल असे दिसून येते.

      तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 3 याने प्रथम त्‍याला व्‍याजाचे रकमे बाबत कच्‍चा हिशोब दिला व त्‍यानंतर कर्ज करारा मध्‍ये वेगळा जास्‍त व्‍याजाचा दर दर्शविला. परंतु या आरोपा संदर्भात महत्‍वाचा दस्‍तऐवज हा मूळ कर्ज करार असून सदर कर्ज करारावर तक्रारकर्त्‍याने व दोन साक्षीदारांनी स्‍वाक्ष-या केलेल्‍या आहेत आणि कर्ज कराराचे अनुपालन करणे तक्रारकर्त्‍यावर बंधनकारक आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. कर्ज कराराचे बाहेर जाऊन जर अतिरिक्‍त रक्‍कम तक्रारकर्त्‍या कडून वसुल केली तर त्‍याची आर्थिक लुबाडणूक झाली असे म्‍हणता येईल परंतु तसे काहीही या प्रकरणात झालेले दिसून येत नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा आरोप की त्‍याचे कडून विरुध्‍दपक्ष क्रं 3 व 4 बँकेनी जास्‍त व्‍याजाची रक्‍कम आकारली यामध्‍ये काहीही तथ्‍य जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 3 चे उत्‍तर नकारार्थी नोंदवित आहोत.

     बँक आणि संबधित ग्राहक  यांचे मध्‍ये कर्ज मंजूर करते वेळी करार करण्‍यात येतो आणि तो करार संबधित बँक आणि ग्राहकावर बंधनकारक असतो.

    भारतीय करार कायदयाचे कलम-171 नुसार झालेला करार आणि त्‍यातील अटी व शर्ती या कर्ज घेणारा आणि बँक दोघांवर बंधनकारक असतात. आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष एक्‍सीस बँके मध्‍ये ट्रॅक्‍टरचे कर्जा बाबत करार झालेला असून त्‍यावर तक्रारकर्त्‍याने स्‍वाक्ष-या केलेल्‍या आहेत त्‍यामुळे त्‍यामधील अटी व शर्तीचे अनुपालन करणे त्‍याचेवर बंधनकारक आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

16.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करता आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-

                                                       :: अंतिम आदेश ::

01)   तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष ए.एन.एस.ड्रीलींग अॅन्‍ड माईनींग ट्रेडर्स प्रायव्‍हेट लिमिटेड मुख्‍य कार्यालय वाडी, नागपूर ही फर्म आणि सदर फर्मचा विरुध्‍दपक्ष क्रं-1) डायरेक्‍टर आणि सदर फर्मचा प्रोप्रायटर श्री तुळशीदास भूरे यांचे विरुध्‍द  वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

02)  विरुध्‍दपक्ष ए.एन.एस.ड्रीलींग अॅन्‍ड माईनींग ट्रेडर्स प्रायव्‍हेट लिमिटेड मुख्‍य कार्यालय वाडी, नागपूर ही फर्म आणि सदर फर्मचा विरुध्‍दपक्ष क्रं-1) डायरेक्‍टर आणि प्रोप्रायटर श्री तुळशीदास भूरे  यांना आदेशित करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याने ट्रॅक्‍टर व ट्रालीपोटी कर्ज स्‍वरुपात रुपये-4,28,259/- तसेच नगदी रुपये-40,000/- आणि सोन्‍याच्‍या चेनची किम्‍मत रुपये-37000/- असे मिळून एकूण  रुपये-5,05,259/- एवढी रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विक्रेता यांचेकडे जमा  केल्‍याने व ट्रॅक्‍टर  ट्रॉलीची एकूण किम्‍मत रुपये-5,50,000/- एवढी असल्‍याने  उर्वरीत रक्‍कम  रुपये-44,741/- तक्रारकर्त्‍या कडून स्विकारुन दिनांक-29.06.2019 रोजीचे सौद्देपत्रा प्रमाणे 5/7 ची हायड्रोलीक ट्राली तक्रारकर्त्‍यास द्दावी व त्‍या संबधीचे सर्व दस्‍तऐवज तक्रारकर्त्‍यास पुरवावेत. (त.क.च्‍या सोन्‍याचे चेनची किम्‍मत रुपये-37000/- हिशोबात धरुन तक्रारकर्त्‍यास वि.प.क्रं 1 व 2 यांना द्दावयाच्‍या उर्वरत रकमेचा हिशोब काढलेला आहे)

03)  वर नमुद  हिशोबा व्‍यतिरिक्‍त जर तक्रारकर्त्‍यास त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचेकडे कर्जाचे रकमेच्‍या डाऊन पेमेंटपोटी जी सोन्‍याची चेन जमा केलेली आहे ती  हवी असल्‍यास  सोन्‍याची चेनची हिशोबात धरलेली किम्‍मत रुपये-37000/- (अक्षरी रुपये सदोतीस हजार फक्‍त) एवढी रक्‍कम त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचेकडे जमा करावी आणि त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी त्‍याला सोन्‍याची चेन परत करावी आणि अशी सोन्‍याची चेन मिळाल्‍याची खात्री झाल्‍या बाबत तक्रारकर्त्‍या कडून लेखी लिहून घ्‍यावे.

04)  विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 ट्रॅक्‍टर विक्रेता आणि फर्म यांना असेही आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी डिलेव्‍हरी चालान क्रं-075 अनुसार तक्रारकर्त्‍यास  विक्री केलेला ट्रॅक्‍टर Escart Farmtrac Tractor Model-“Atom-26” इंजीन क्रं-ए-22664 चेसीस क्रं-TO 5246128MH चे आणि ट्रालीचे आर.टी.ओ.पासिंग नियमा नुसार आर.टी.ओ. कार्यालयातून करुन द्दावे व त्‍या संबधीचे सर्व दस्‍तऐवज तक्रारकर्त्‍यास पुरवावेत.

05)  विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 ट्रॅक्‍टर विक्रेता आणि फर्म यांना असेही आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या आर्थिक नुकसानी बाबत रुपये-30,000/-(अक्षरी रुपये तीस हजार फक्‍त) तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बाबत रुपये-15,000/-(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्‍त)  आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) अशा नुकसान भरपाईच्‍या रकमा तक्रारकर्त्‍यास अदा कराव्‍यात.

06) विरुध्‍दपक्ष क्रं 3 एक्‍सीस बँक तर्फे प्रतिनिधी श्री इंद्रजित तिघरे आणि विरुध्‍दपक्ष क्रं-4 एक्‍सीस बँके तर्फे व्‍यवस्‍थापक यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

07)  तक्रारकर्त्‍याने त्‍याचे कर्जाचे प्रकरणा संबधात केलेल्‍या मागण्‍या या नामंजूर करण्‍यात येतात. तक्रारकर्त्‍याने कर्ज प्रकरणात झालेल्‍या करारा प्रमाणे नियमित कर्ज परतफेडीच्‍या रकमा विरुध्‍दपक्ष एक्‍सीस बँके मध्‍ये विहित मुदतीत भराव्‍यात.

08)  सदर आदेशाचे अनुपालन ए.एन.एस.ड्रीलींग अॅन्‍ड मायनींग ट्रेडस प्रा.लि. नागपूर ही फर्म आणि सदर फर्मचा डायरेकटर व प्रोप्रायटर    श्री तुळशीदास भूरे यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

09)  प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी.

10)  उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त संच त्‍यांना-त्‍यांना परत करवेत.

 

 

दिनांकः- 29/01/2021.

ठिकाणः- भंडारा.

                    

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.