जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/146 प्रकरण दाखल तारीख - 01/07/2009 प्रकरण निकाल तारीख – 12/08/2009 समक्ष – मा.श्री.सतीश सामते - प्र.अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या सयद अन्वर पि.सयद यासीन, वय वर्षे 42, व्यवसाय सुतार, अर्जदार. रा. हिंगोली नाका, नांदेड. विरुध्द. 1. व्यवस्थापक, फुल्ट्रॉन इंडिया क्रेडीट कं.लि., गैरअर्जदार. लेवल-5 पश्चमी विंग, वकार्ड टॉवर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पुर्व) मुंबई 400051. 2. व्यवस्थापक, फुल्ट्रॉन इंडिया क्रेडीट कं.लि., शाखा कार्यालय, दुसरा मजला, अलीभाई टॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.जी.के.पोपळे. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.दिनकर नागापुरकर. निकालपञ (द्वारा-मा.श्री.सतीश सामते, अध्यक्ष प्र.) गैरअर्जदार फुल्ट्रॉन इंडिया क्रेडीट कं.लि. यांचे सेवेच्या अनुचित प्रकाराबद्यल अर्जदार यांनी आपली तक्रार नोंदविली आहे. याप्रमाणे अर्जदार हे सुतार काम करतात. गैरअर्जदार यांचे एजंट गल्लोगल्ली फिरुन कमी व्याज दाराने कर्ज देतो म्हणुन लहान मोठया व्यवसायीकांना कर्ज घेण्यास परावृत्त करतात. गैरअर्जदाराचे एजंट हे अर्जदाराकडे जुलै 2008 मध्ये आले होते व त्यांनी अर्जदारास रु.41,900/- एक टक्का व्याजाने देण्याचे कबुल केले होते. अर्जदाराने व्यापारात वाढ करण्याच्या उद्येशाने गैरअर्जदाराकडुन रु.41,900/- कर्ज घेतले व गैरअर्जदाराने दि.25/07/2008 ला रु.41,900/- च्या कर्जासाठी म्हणुन रु.37,234/- चा धनादेश अर्जदारास दिला व ते त्यांनी त्यांच्या खात्यात वटविला. या कर्जासाठी अर्जदाराने भाग्यलक्ष्मी बँकेचे 24 धनादेश सही करुन दिले. कर्जाच्या रक्कमे पेक्षा कमी रक्कमेचा धनादेश काही दिला, याची विचारणा केली असता, अप्रत्यक्ष खर्च यातुन वजा केले, असे सांगितले आहे. यानंतर याचा हप्ता रु.2,905/- असे 24 हप्ते ठरविले त्याबाबत नऊ हप्ते गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे भरले आहेत व यानंतर गैरअर्जदारास व्याज किती, मुळ रक्कम किती कापत होते? याची विचारण केली असता, रु.36,000/- अजुन भरण्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर जबरदस्ती वसुलीसाठी ठेवलेल्या मानसामार्फत मारहान करण्याची धमकी दिली. शेवटी दि.22/06/2009 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांनी काही आडदांड प्रवृत्तीचे दोन माणसे पाठविली व जबरदस्तीने अर्जदाराच्या घरात घुसून शिवीगाळ केली व रक्कमेची मागणी केली व हिशोब सांगितला नाही. अर्जदाराची तयारी एक टक्का व्याजाने रक्कम देण्याची आहे, असा आदेश करावा तसेच मानसिक त्रासापोटी रु.10,000/- दावा खर्चापोटी रु.1,000/- द्यावे म्हणुन ही तक्रार नोंदविली आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहेत. त्यांनी अर्जदाराची तक्रार ही धांदात खोटी आहे, असे म्हटले आहे. तसेच गैरअर्जदाराचे एजंट गल्लोगल्ली फिरुन कमी व्याजाने पैसे व्यवसायासाठी देण्यात येतात हे अर्जदाराचे म्हणणे अमान्य केले आहे. गैरअर्जदार कंपनी पत वाटप करणारी लिमीटेड कंपनी आहे. अर्जदार हे स्वतःहुन त्यांचेकडे आले होते, व्यवसाय वाढविण्यासाठी त्याला पैशाची गरज होती त्यासाठी गैरअर्जदार यांनी कुठलीही सेक्युरिटी न घेता अर्जदार यांना कर्ज म्हणुन रु.42,000/- दिले होते व त्या पोटी त्यांना रु.2,905/- प्रती महीना याप्रमाणे 24 धनादेश गैरअर्जदारांना दिले होते. रु.42,000/- चे कर्ज मंजुर करतांना गैरअर्जदारांनी धनादेशद्वारे रु.37,234/- अर्जदारांना दिले. धनादेश त्यांच्या खात्यात वटविले, कर्ज मंजुरीसाठी लागणारे प्रोसेसिंग चार्जेस, इन्श्युरन्स व कागदपत्रांचा खर्च म्हणुन कर्जाच्या रक्कमेतुन अर्जदाराच्या संमतीने रक्कम कापुन घेतली. अर्जदाराने सुरवातीस नऊ महिने त्यांना त्यांचे पैसे भरले व ती गैरअर्जदारांनी घेतली, आता अर्जदार मी रक्कम भरण्यास असमर्थ आहे, असे म्हणत आहेत. अर्जदारांना तोंडी कुठेही एक टक्का व्याज लावतो असे सांगितले नाही. फक्त लेखी करारानाम्यातुन कर्जावर 33 टक्के द.सा.द.शे. व्याज आकारण्यात येईल हे स्पष्ट केलेले होते. व त्या करारनाम्यावर अर्जदाराने स्वच्छेने सही केलेली आहे. गैरअर्जदाराचे माणसे व गुंड असण्याचा प्रश्नच नाही. अर्जदार हे केवळ राहीलेले पैसे भरण्याचे टाळण्याच्या उद्येशाने बिनबुडाचे आरोप करीत आहे. 24 धनादेश हे अर्जदाराने स्वतःचे मर्जीने सही करुन दिले आहे. गैरअर्जदाराने कुठलीही जबरदस्ती केलेली नाही. सबब अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले कागदपत्र बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदारांच्या सेवेतील अनुचित प्रकार अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी आपल्या तक्रारीत केलेले कथन हे तोंडी आहे. कर्जावर एक टक्का व्याज आकारण्याबद्यल कुठलाही लेखी पुरावा त्यांनी दाखल केलेला नाही व गैरअर्जदारांनी आपल्या सफाईत प्रस्ताव दाखल केलेला आहे, हा पुर्ण प्रस्ताव इंग्रजीत भरले असतांना अर्जदारांनी त्यावर इंग्रजीत सही केलेली आहे. या शिवाय गैरअर्जदारांनी करारनामा दाखल केलेला आहे. दोघांतील करारनामाप्रमाणे दि.10/07/2008 रोजीच्या करारावर अर्जदाराचे इंग्रजीत सही आहे. यात कर्जाचे रु.42,000/- त्यावर 33 टक्के व्याज असा उल्लेख केला असुन कागदपत्रांचा खर्च रु.1,000/- व प्रोसेसिंग चार्जेस म्हणुन रु.260/- दर्शविला आहे तसेच कर्जाच्या परतफेड ही समान 24 हप्त्यात करावयाची आहे, असा उल्लेख केलेला आहे व गैरअर्जदारांनी आपल्या लेखी म्हणण्यात देखील कर्ज व विम्याचे प्रिमीअम हे कापुन घेऊन रु.37,234/- चा धनादेश अर्जदारास दिला आहे व यानंतर करारनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे प्रती महीना रु.2,905/- याप्रमाणे 24 धनादेश अर्जदारांनी गैरअर्जदारांना दिले हे अर्जदार स्वतःच कबुल केले आहे परंतु त्यावर त्यांनी रिपेमेंट शेडयुलवर सही देखील केली आहे. याप्रमाणे अर्जदारांनी रु.2,905/- चे नऊ हप्ते देखील भरले आहेत व नऊ महिन्याच्या नंतर अचानक अर्जदारांना काय व्याज लावले काय हिशोब आहे हे विचारण्याची गरज का पडली हा प्रश्न उदभवतो. हिशोब किती सरळसरळ आहे रु.2,905/- चे 24 धनादेश म्हणजे 24 हप्ते याचे एकुण रक्कम रु.69,720/- होतात एवढी रक्कम अर्जदारास करारनाम्याप्रमाणे भरणे आहे. या पेक्षा वेगळा हिशोब नाही व जर अर्जदार धनादेश बाऊन्स झाला तर करारनाम्याप्रमाणे त्यावर दंडनिय व्याज 4 टक्के दंडाची देण्याचा उल्लेख आहे हे 4 टक्केची रक्कम गैरअर्जदारांनी कुठेही लावल्याचे दिसुन येत नाही. गैरअर्जदार कंपनी ही लिमीटेड कंपनी आहे व विनाकारण त्यांना कर्ज दिले म्हणुन व्याजाचा दर हा जास्त लावला आहे. व्याजाचा दर जास्त लावला असेल तर अर्जदार यांनी करारनाम्यावर सही करुन ते मान्य केले आहे. त्यामुळे आता व्याजाचा दर कमी करा असे म्हणता येणार नाही. अर्जदार यांचे तक्रारीत तथ्य आढळुन येत नाही तसेच अर्जदाराने हप्ते भरल्याची काही पावत्या दाखल केले आहे, या तीन्ही पावत्या रु.2,905/- चे आहेत. यत कुठेही दंडनिय व्याज लावल्याचे दिसत नाही व त्यांचे भाग्यलक्ष्मी बँकेचे खात्यातुन धनादेश वटविले आहेत तेंव्हा नऊ महिन्यानंतर गैरअर्जदारांनी फसविले असे म्हणता येणार नाही. अर्जदाराने असाही उल्लेख केला आहे की, गैरअर्जदारांनी त्यांच्या गुंड मानसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहान करण्याची धमकी दिली, एवढा प्रकार घडला असतांना अर्जदार गप्प राहीले व त्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही व पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली नाही. तसे केले असते तर तो पुरावा ठरला असता म्हणुन अर्जदाराच्या तक्रारीत सत्यता आढळुन येत नाही. त्यामुळे गैरअर्जदारांनी त्यांचे सेवेत कुठेही अनुचीत प्रकार केला हे अर्जदार सिध्द करु शकले नाही. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश. 1. अर्जदाराची तक्रार नामंजुर करण्यात येते. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा.
(श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) सदस्या अध्यक्ष प्र. गो.प.निलमवार.लघूलेखक. |