ग्राहक तक्रार क्र. 236/2015
दाखल तारीख : 29/06/2015
निकाल तारीख : 21/10/2015
कालावधी: 0 वर्षे 03 महिने 22 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सहदेव प्रभू हराळे,
वय - 37 वर्ष, धंदा – वकीली व शेती,
रा.अंबरे कोठा, उस्मानाबाद.
ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. दिपक बाबुराव धोंगडे,
वय-50 वर्षे, धंदा – व्यापार,
रा. मलबा हॉस्पिटलसमोर, लोखंड दुकान तुळापूर,
ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.प ससयससव्यवस्थापक
..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधिज्ञ : एकतर्फा.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
तक्रारकर्ता (तक) यांने विरुध्द पक्षकार (विप) ची कार विकत घेतांना संपूर्ण किंमत दिली मात्र विप ने करारामध्ये सुरवातीच्या भागात अर्धवट किंमत मिळाल्याचे नमूद करुन फसवणुक केली व तक च्या हक्कात रजिष्ट्रेशन करुन दिले नाही. म्हणून तक ने हि तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
1) तक हा उस्मानाबाद येथील वकील व शेती व्यवसायिक आहे. विप चे मालकीचे टाटा इंडिगो कार एमएच 22 एच 1503 विप ने तक ला विकण्याचे कबूल केले दि.16/12/2014 रोजी सकाळी 10 वाजता विप आपला चालक विवेक देशमूख याचेसह तक च्या घरी होता. तक चा भाऊ महादेव हजर होता. विप ने तक ला गाडी रु.1,34,000/- देण्याचे कबूल केले. तक ने विमा काढण्याचे ठरले. आरटीओ ऑफिसमध्ये हस्तांतरण करुन देण्याचे तसेच खर्च करण्याचे विप ने कबूल केले. दि.29/12/2014 रोजी गाडीचे हस्तांतारण करुन देण्याचे विप ने कबूल केले. विवेक देशमूख यांनी रु.100 चा स्टॅम्प पेपर आणला. तक ने विप ला रु.1,34,000/- दिले. खरेदी खताचा मजकूर लिहून आणलेला होता. तक सही करण्यापुर्वी करार वाचत असता विप ने माझ्यावर विश्वास नाही का असे विचारुन तक ला करार वाचू दिला नाही.
2) तक ने वाचले होते की विप ने रु.1,34,000/- मिळाल्याचे लिहून दिले होते. विप ने तक ला खरेदी करार दिला तसेच गाडी तक चे ताब्यात दिली. विप ने करारात असे नमूद केले आहे की त्याला रु.1,00,000/- रोख मिळाले व रु.34,000/- दि.29/12/2014 रोजी देण्याचे ठरले आहे असा मजकूर बनावट व खोटा आहे व कपटीपणे समाविष्ट करुन तक ची फसवणुक केली आहे. तक ने त्याबद्दल पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. तसेच न्यायालयात खटला भरलेला आहे. दि.29/12/2014 रोजी तक ने विप ला गाडी हस्तांतरीत करुन देण्याबद्दल सांगितले असता त्याने कशी तरी वेळ निभावून नेली. त्यानंतरही विप ने टाळाटाळ चालूच ठेवली. दि.02/03/2015 रोजी पुन्हा त्याने टाळाटाळ केली. तक ने विप ला दि.04/03/2015 रोजी नोटीस पाठवली. विप ने खोटे उत्तर देऊन तक कडून रु.34,000/- ची मागणी केली. तक ने आर.टी.ओ कडे दि.12/03/2015 रोजी अर्ज देऊन इतर कोणाच्या हक्कात गाडी हस्तांतरीत करु नये म्हणून अर्ज दिला.
3) तक ची या व्यवहारामुळे बदनामी झालेली आहे त्याला मानसिक व शरीरिक व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागले त्या पेाटी तकला विप कडून रु.50,000/- मिळणे जरुर आहे त्याचप्रमाणे विप ने तक चे हक्कात गाडी हस्तांतरीत करुन द्यावी म्हणून आदेश होणे जरुर आहे. त्यासाठी तक ने हि तक्रार दि.29/07/2015 रोजी दाखल केलेली आहे.
4) तक्रारीसोबत तक ने खरेदी खत दि.16/12/2014 चे आरसी बुक, नोटीस दि.04/03/2015 ची, उत्तर दि.20/03/2015 चे आरटीओ कडे दिला अर्ज, पोलिसाकडे दिलेला अर्ज, न्यायालयात दाखल केलेली फिर्याद, इत्यादी कागदपत्र दाखल केली आहे.
5) विप याला नोटीस पाठवली असता त्याने ती स्विकारली नाही. त्यामुळे तक्रार विप विरुध्द एकतर्फा चाललेली आहे.
6) तक ची तक्रार त्यांने दिलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्याचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
2) तक अनुतोशास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
7) आर. सी. बुकाप्रमाणे गाडी क्र.एमएच 22 एच 1503 चा विप हा खरेदीने मालक झालेला होता. त्याची नोंद दि.11/12/2012 रोजी झालेली आहे. विप ने पाठवलेल्या नोटीस उत्तराचे अवलोकन केले असता हे स्पष्ट होते की विप ने तक ला हि गाडी दि.16/12/2014 रोजी रु.1,34,000/- ला विकण्याचे कबूल केले होते. विप चे म्हणणे आहे की तक ने त्याला फक्त रु.1,00,000/- दिले. व गाडीचा ताबा घेतला. तक ने विप ला रु.34,000/- दि.29/12/2014 रोजी देण्याचे होते.
8) जो करार हजर केला आहे तो प्रिंटेड आहे. पहिल्या पानावर असे लिहिले आहे की तक ने विप ला रु.1,00,000/- दिले आहेत. दुस-या पानावर प्रथम लिहिले आहे की उर्वरित रु.34,000/- तक विप ला दि.29/12/014 रोजी देईल. त्या दिवशी विप गाडी तक चे नावे करुन देईल. पुढे नमूद आहे की विप ला रु.1,34,000/- मिळाले आहेत हि रक्कम अक्षरी लिहिली आहे. रकमेची तक्रार राहिली नाही. असे नमूद केलेले आहे.
9) या पॅरेग्राफच्या शेवटी अक्षरी रु.1,34,000/- मिळाल्याचे नमूद आहे. तक ने प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे की विप ने त्याला करार वाचून न देता सही करायला लावली. तक ने रु.1,34,000/- मिळाल्याबद्दल मजकूर वाचून सही केल्याचे दिसते. आता विप ने मंचात हजर राहून तक चे म्हणणे नाकारलेले नाही. विप यांनी तक चे फसवणुक केली व लबाडीने आणखी रु.34,000/- येणे असल्याचे करारात नमूद केले व गाडीचे हस्तांतरण करुन देण्याचे टाळले व सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
1) तक ची तक्रार अंशता: मंजूर करण्यात येते.
2) विप यांनी एक महिन्याच्या आत तक चे हक्कात गाडीचे हस्तांतरण करुन द्यावे.
3) विप यांनी तक ला मानसिक त्रासाबद्दल रु.10,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावे
4) विप यांनी तक ला तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
5) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.