ग्राहक तक्रार क्र. 84/2013
अर्ज दाखल तारीख : 04/05/2013
अर्ज निकाल तारीख: 10/04/2015
कालावधी: 01 वर्षे 11 महिना 06 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सिध्देश्वर शंकर कांबळे,
वय-40 वर्षे, धंदा–काही नाही,
रा.उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद, ....तक्रारदार
वि रु ध्द
1. स्टरलिंग मोटार्स, श्री. दिनेश शेट्टी,
जुना आग्रा रोड नाशिक- 422001 ता. जि. नाशिक.
2. शाखा ऑफिस,
श्री. चंद्रशेखर हिरावत्ती,
स्टरलिंग मोटार्स, कोंडी, जि. सोलापूर.
3. शाखा अधिकारी, श्री. वाघमारे,
बँक ऑफ इंडिया, शाखा शिवाजी चौक,
उस्मानाबाद. ....विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.आर.आर.शिंदे,
विरुध्द पक्षकारा क्र.1 व 2 : नो से आदेश पारीत.
विरुध्द पक्षकारा क्र.3 तर्फे विधीज्ञ : श्री.डी.आर.कुलकर्णी.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
अ) विरुध्द पक्षकार (विप) क्र.3 कडून कर्ज घेऊन विप क्र.1 व 2 यांचेकडून मालवाहू वाहन घेतांना विप यांनी फसवणूक करुन दुसरेच मॉडेल गळयात मारुन जास्त पैसे उकळले म्हणून नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक्रारकर्ता (तक) यांनी ही तक्रार केलेली आहे.
1. तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे.
तक हा सुशिक्षीत बेकार असल्यामुळे चरीतार्थ चालवण्यासाठी मालवाहू वाहन घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे कर्ज मागणीचा अर्ज केला तो त्यांनी विप क्र.3 कडे पाठवला. वाहन वितरक यांचे सोलापूर कार्यालय म्हणजेच विप क्र.2 यांचेकडे जाऊन तक ने टा.टा.एल.पी.टी.1615/42 या वाहनाचे कोटेशन मागितले विप क्र.2 यांनी ्या े टी कार्यालय म्हणजेच पित्याप्रमाणे वाहनाची किंमत तसेच इन्शूरंन्स आर.टी.ओ. टॅक्स इत्यादींसह रु.12,70,961/- सांगितली व तसे कोटेशन दिले. विप क्र.3 यांनी सदर वाहन खरेदीसाठी तक ला कर्ज रु.15,70,000/- मंजूर केले. त्यापैकी रु.9,82,961/- चा डि.डि./ चेक दिला. वाहनाची बॅाडी बांधण्यासाठी रु.2,00,000/- दिले. तसेच अॅडव्हान्स म्हणून रु.70,000/- दिले. अशा प्रकारे विप क्र. 3 यांनी कर्ज रक्कम रु.12,52,961/- दिलेली आहे. तक ने विप क्र.2 ला रु.2,25,000/- रोख दिले.
2. विप क्र.3 यांनी वाहन खरेदीसाठी रु.9,18,064/- एवढी रक्कम दयायला पाहिजे होती मात्र विप क्र.3 ने विप क्र.2 सोलापूर विक्रेता व विप क्र.1 नाशिक विक्रेता यांचेशी संगनमत करुन तक ची फसवणूक करण्याच्या उददेशाने रु.64,897/- इतक्या जादा रकमेचा डि.डि./चेक दिला. विप क्र.3 ने कर्ज रु.15,70,000/- मंजूर करुन फक्त रु.12,52,961/- अदा केले व रु.31,7039/- अदा केलेले नाहीत.
3. तक ने प्रथम विप क्र.2 कडे दि.03/10/2012 रोजी रु.1,65,000/- जमा केले. त्यानंतर दि.10/11/2012 रोजी रु.87,000/- जमा केले. तक हा सातवीपर्यंत शिकलेला आहे त्यास इंग्रजी वाचता लिहता येत नाही. तक ने एल.पी.टी. 1613/42 हे वाहन घेण्यासाठी पैसे जमा केले होते. मात्र विप क्र.2 ने पावतीमध्ये एल.पी.टी. 1616/42 हे वाहन घेण्यासाठी चे म्हणून पैसे जमा केले. विप क्र.3 कडील डि.डि. सुध्दा एल.पी.टी. 1613/42 ऐवजी1616/42 या वाहनासाठी घेतला. वाहन घेतल्यानंतर आर.टी.ओ. ऑफिसमध्ये नोंदणीसाठी नेल्यानंतर तक ला चुकीचे मॉडेल दिल्याबद्दल समजले. कारण वाहन दि.30/11/2012 रोजी मिळाले तरी बॅाडी बिल्डींग झाल्यावर दि.05/02/2013 रोजी नोंदणीसाठी आर.टी.ओ. ऑफीसमध्ये नेण्यात आले. त्या नंतर फसवणूक उघड झाल्यामुळे तक ने विप क्र.2 ची भेट घेतली. विप क्र.2 ने अधीक घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे कबूल केले. त्या नंतर दि.22/02/2013 रोजी विप क्र.2 यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अशा प्रकारे सेवेत त्रुटी केली आहे व वाहनाची अधीकची किंमत रु.1,30,597/- तक कडून वसूल केली आहे. विप यांनी तक ला एल.पी.टी. 1613/42 हे वाहन दयावे व फरकाची रक्कम रु.1,30,597/- दयावी तसेच मानसिक व आर्थिक त्रासाठी रु.1,00,000/- दयावे म्हणून ही तक्रार दि.04/05/2013 रोजी दाखल करण्यात आली आहे.
4. तक्रारदाराने तक्रारीसोबत दि.28/08/2012 चे एलपीटी 1613/42 चे कोटेशन हजर केले आहे. दि.28/11/2011 चे एल.पी.टी.1616/42 चे कोटेशन हजर केले आहे. दि.10/11/2012 ची रु.87,000/- ची पावती हजर केली आहे. दि.03/10/2012 ची रु.1,65,000/- ची पावती हजर केली आहे. दि.10/11/2012 चा रु.9,82,961/- च्या डि.डि.ची प्रत हजर केली आहे. त्याबद्दलचे विप क्र.3 चे पत्र हजर केले आहे. दि.30/11/2012 चे टॅक्स इन्व्हाईस हजर केले आहे. विप ला दिलेल्या नोटिसीच्या प्रती हजर केलेल्या आहेत.
ब) विप क्र.1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले नाही.
क) 1. विप क्र.3 यांनी दि.10/03/2014 रोजी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. जिल्हा उदयोग केंद्र आवश्यक पक्षकार असल्याचे म्हंटलेले आहे. तक ने कर्ज परतफेड टाळण्याच्या हेतूने ही तक्रार दिली असे म्हंटले आहे. तक ने जरुर बाबींची पुर्तता केली नाही असे म्हंटलेले आहे. तक ला टाटा एल.पी.टी.1613/42 हे वाहन घ्यायचे होते. हे नाकबूल आहे. विप क्र.3 ने रु.15,70,000/- कर्ज मंजूर केले व शेवटी रु.3,17,049/- वितरीत करायचे राहून गेले हे नाकबूल केले आहे. तक ला इंग्रजी येत नसल्यामुळे त्याची फसवणूक केली हे नाकबूल केले आहे. फसवणूक झाल्याचे आर.टी.ओ. पासींगच्या वेळी तक ला समजले हे नाकबूल केले आहे. कर्ज प्रकरणातील सर्व नोंदणी वेळोवेळी घेण्यात आल्या असे विप ने म्हंटलेले आहे. तक ने चुकीची तक्रार दिली ती रद्द होण्यास पात्र आहे असे या विप ने म्हंटलेले आहे.
ड) तक ची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहे.
मुद्दे उत्तरे.
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
2) तक अनूतोषास पात्र आहे काय ? नाही
3) आदेश कोणता शेवटी दिल्याप्रमाणे
इ) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
1) तक ने म्हंटलेले आहे की त्याला एल.पी.टी. 1613/42 हे वाहन घ्यायचे असल्यामुळे विप क्र.2 कडे कोटेशन मागितले. विप क्र. 2 ने 28/08/2012 रोजी वाहनाची किंमत इन्शूरंन्स व आर.टी.ओ. टॅक्स मिळून रु.12,70,961/- सांगितली व तसे कोटेशन दिले. सदरचे कोटेशन तक ने हजर केलेले आहे. त्यात वाहनाची किंमत रु.12,16,461/- दाखवली आहे. तक ने विप क्र. 2 चे दि.28/11/2011 चे एल.पी.टी.1616/42 चे कोटेशन हजर केले आहे. वाहनाची किंमत रु.11,03,564/-, + इन्शूरन्स रु.28,500/- + आर.टी.ओ. रु.10,000/- असे एकूण रु.11,42,064/- चे कोटेशन आहे. हे कोटेशन दुस-या कोटेशनच्या सुमारे नऊ महिने आधी घेतले आहे.
2) विप क्र. 2 ने दिलेले वाहनाचे दि.30/11/2012 चे टॅक्स इन्व्हाईस तक ने हजर केले ते एल.पी.टी. 1616/42 चे आहे. त्यामध्ये वाहनाची किंमत रु.11,09,787/- + टॅक्स (व्हॅट) रु.1,38,723/- (12.5 टक्के दराने) = रु.12,48,510/- चे टॅक्स इन्व्हाईस आहे. दि.03/10/2012 ची पावती असे दाखवते की तक ने चेक क्र.25,676/- रु.165,000/- चा एल.पी.टी.1616/42 वाहनाचे बुकिंगसाठी दिला. दि.10/11/2012 ची पावती असे दाखविते की चेक क्र.25687 रु.87,000/- चा एल.पी.टी. 1616/42 वाहनाचे खरेदीपोटी दिला. म्हणजे एकूण रु.2,52,000/- तो पर्यंत देण्यात आले. विप क्र.3 चे दि.10/11/2012 चे पत्र व सोबत डि.डि.ची प्रत असे दाखवते की डि.डी. क्र.843104 रु.9,82,961/- चा विप क्र.2 ला पाठवला होता. ती रक्कम मिसळून एकूण रु.12,34,961/- विप क्र. 2 ला पोहोचल्याचे दिसते. हया उलट टॅक्स इन्व्हाईसची रक्कम रु.12,48,510/- होते.
3) तक चे म्हणण्याप्रमाणे त्याला एल.पी.टी. 1616/42 हे वाहन घ्यायचे नव्हते. विप क्र.3 चे डि.डि. मध्ये एकूण रु.64,897/- विप क्र.2 ला जास्त देण्यात आले. तसेच एकूण वाहनाच्या किंमती पोटी रु.1,30,597/- विप क्र.2 ला जास्त देण्यात आले आहेत. तक चे म्हणणे आहे की त्याचे शिक्षण सातवीपर्यत झाले आहे व त्यास इंग्रजी लिहता वाचता येत नाही. वस्तुत: शाळेमध्ये इयत्ता पाचवीपासून इंग्रजी शिकवले जाते. इंग्रजी अक्षरे व आकडे अल्पशिक्षीत माणसास समजतात. याउलट तक ने तक्रारीवर इंग्रजीत सही केली आहे. त्यामुळे पावत्यांवरील तसेच टॅक्स इन्हाईसवरील वाहनाचे मॉडेल तक ला वाचता आले नाही हा बचाव स्विकारार्ह नाही.
4) तक ने म्हंटले आहे की विप क्र.3 ने त्याला रु.15,7000/- कर्ज मंजूर केले जे प्रकरण कर्ज मंजूरीसाठी दिले होते त्याची प्रत तक ने हजर केली नाही. कर्ज मंजूरीचे पत्र हजर केलेले नाही. जर एल.पी.टी. 1613/42 चे कोटेशनची रक्कम रु.12,70,961/- होती तर केवळ रु.12,34,961/- विप क्र.2 ला का दिले याचा खुलासा होत नाही. हे खरे आहे की मॉडेल 1616/42 चे हजर केलेले कोटेशन दि.28/11/2011 चे असून मॉडेल 1613/42 चे कोटेशन दि.28/08/2012 चे आहे. मात्र 1613/42 चे दि.28/11/2011 चे तसेच 1616/42 दि.28/08/2012 चे कोटेशन तक ने हजर करणे जरुर होते. दोन्ही मॉडेलमध्ये नक्की काय फरक आहे हे सूध्दा स्पष्ट करणे जरुर होते.
5) वर चर्चा केल्याप्रमाणे मॉडेल 1616/42 हे अधीकचे मॉडेल दिसून येते. साहजिकच त्याची किंमत जास्त असणार. तक चे म्हणण्याप्रमाणे अधीकची किंमत रु.1,30,597/- त्याचेकडून घेण्यात आली. विप क्र. 3 ही राष्ट्रीयकृत बँक असून तक च्या मागणीशिवाय एवढे जादा रकमेचे कर्ज देणे शक्य नाही. त्यामुळेच तक ने कर्ज मंजूरीचे पत्र हजर न केल्याचे दिसून येते. तक ला मॉडेल बदलल्याचे आर.टी.ओ. ऑफिसमध्ये समजले हे मुळीच पटणारे नाही. आतासुध्दा दोन मॉडेलमध्ये काय फरक आहे हे स्पष्ट करण्याची तक ची तयारी नाही. या पार्श्व भुमीवर विप क्र.3 चे म्हणणे आहे की कर्ज फेड चुकवण्यासाठी तक ने ही तक्रारी दिलेले आहे.
6) तक चे म्हणणे आहे की बँकेने मंजूर केलेल्या कर्जापैकी रु.3,17,039/- अदा न केल्यामुळे तक च्या खात्यात जमा करणे जरुर आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की जे मंजूर केले ते कर्ज असून त्यावर व्याज दयावे लागणार आहे. तक च्या बचत खात्यात सदरची रक्कम जमा केली तर दयाव्या लागणा-या व्याजामुळे तो तोटयाचा व्यवहार होणार आहे. तसेच कर्जाची रक्कम विनाकारण बचत खात्यात जमा करता येणार नाही. तक ने फरकाची रक्कम रु.1,30,597/- मागितली कारण त्याचे म्हणण्याप्रमाणे तेवढी अधीक रक्कम त्याला दयावी लागली. तसेच तक ने वाहन बदलून एल.पी.टी. 1613/42 मॉडेल दयावे अशी मागणी केली आहे. मात्र त्याची फसवणूक झाली हे शाबीत करण्यास तक अपयशी ठरला. प्रथम पासून सर्व पावत्यांवर मॉडेल 1616/42 ची नोंद आहे. केवळ दोन कोटेशनचा आधार घेऊन तक ला अशी फसवणूक शाबीत करता येणार नाही. त्याचे काय नुकसान झाले हे पण शाबीत करता आले नाही. त्यामुळे विप यांनी फसवणूक केली अगर तक अनूतोषास पात्र आहे असे आमचे मत नाही म्हणून मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार रद्द करण्यात येते
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.