द्वारा-सौ.मोहिनी जयंत भिलकर, सदस्या–
अर्जदार श्री. राजकुमार रामभाऊजी फुंडे यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,...................
1 अर्जदार यांनी दि. 15.03.07 रोजी गैरअर्जदार यांचेकडून रु.3650/- चा नोकिया मोबाईल हॅन्डसेट खरेदी केला. मोबाईल नोकीया 6030 चा MIL 359351002474025 आणि बॅटरी नं. 0670400417535/0023010503932 असा आहे.
2 अर्जदार यांच्या मोबाईल मध्ये दि. 25.03.07 रोजी बिघाड झाला. स्क्रीन लाईट बंद होवून हॅन्डसेट बंद पडला. त्यामुळे मोबाईलचा वापर करता येत नव्हता. अर्जदार यांनी दि. 25.03.07 रोजी गैरअर्जदार यांचेशी संपर्क साधून मोबाईल काम करीत नसल्याचे सांगितले. गैरअर्जदार यांनी तीन दिवसांत मोबाईल बदलून देण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यानंतर गैरअर्जदार यांनी मोबाईलची दुरुस्ती किंवा बदलून देण्याचे नाकारले.
3 अर्जदार हे बिल्डींग मटेरीयल सप्लायचा व्यवसाय करतात त्यामुळे लोकांसोबत संबंध ठेवण्यासाठी मोबाईलचा वापर आवश्यक आहे. अर्जदार हे विनंती करतात की, त्यांचा मोबाईल हॅन्डसेट हा गैरअर्जदार यांनी बदलून द्यावा. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना रु.50,000/- झालेल्या नुकसान भरपाईबद्दल व शारीरिक, मानसिक त्रासासाठी द्यावेत.
4 गैरअर्जदार हे ग्राहक तक्रारीचा नोटीस मिळाल्यापासून आदरणीय मंचात हजर झालेले नाहीत व ग्राहक तक्रारीचे उत्तर सुध्दा दिलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांचे विरोधात प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 11.10.07 रोजी पारित करण्यात आला.
कारणे व निष्कर्ष
5 अर्जदार यांनी तक्रारी सोबत दाखल केलेले मोबाईलचे दि. 15.03.07 रोजीचे बिलावरुन अर्जदार यांनी मोबाईल घेतल्याचे दिसून येते. अर्जदार यांनी दि. 7.5.07 रोजी गैरअर्जदार यांना वकिला मार्फत नोटीस पाठविला त्यात अर्जदार यांनी मोबाईलची दुरुस्ती किंवा मोबाईल बदलून देण्याचे सांगितले परंतु गैरअर्जदार यांनी कोणतीही कारवाई केली नाही यावरुन गैरअर्जदार यांच्या सेवेत न्यूनता आहे असे दिसून येते. तसेच गैरअर्जदार हे आदरणीय मंचात हजर झालेले नाहीत व ग्राहक तक्रारीचे उत्तर सुध्दा दिलेले नाही.
6 अर्जदार हे ग्राहक तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून मंचात हजर झालेले नाहीत. अर्जदार यांना दि. 18.10.07 रोजी मोबाईल वारंटी संबंधात काही कागदपत्रे असल्यास मंचात दाखल करण्याचा आदेश करण्यात आला. परंतु अर्जदार यांनी कोणतीच कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्यामुळे मोबाईल बदलून देण्याची मागणी मान्य करता येवू शकत नाही.
असे तथ्य व परिस्थिती असतांना खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1 गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना मोबाईलच्या दुरुस्तीचा खर्च म्हणून रु.500/- व ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.500/- द्यावेत.
2 वरील आदेशाचे पालन गै.अ. यांनी आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाचे आत करावे. अन्यथा गै.अ.हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 27 प्रमाणे दंडाहर्य कारवाईस पात्र ठरतील.