नि.42
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1846/2009
तक्रार नोंद तारीख : 06/08/2009
तक्रार दाखल तारीख : 13/08/2009
निकाल तारीख : 13/06/2013
----------------------------------------------
1. इस्माईल इब्राहिम नदाफ,
2. सौ इर्शादबी इस्माईल नदाफ
दोघेही रा.इसापूरे गल्ली, मिरज, जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली
शाखा आष्टा
2. श्री नामदेव गणपती मोहिते, संचालक, चेअरमन
रा.गणेशकृपा, हरीपूर रोड, सांगली
3. श्री भोपाल किसन आवळेकर, संचालक
रा.मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
4. श्री गणपतराव शामराव पाचुंदे, संचालक
रा.पत्रकारनगर, सांगली
5. श्री अशोक दशरथ मोहिते, संचालक
रा.मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
6. श्री राजाराम मारुती सुर्यवंशी, संचालक
रा.मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
7. सलीम आब्बास पन्हाळकर, संचालक
पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
8. श्री राजकुमार सदोरामल चूघ, संचालक
रा.लोंढे कॉलनी, मिरज जि.सांगली
9. श्री अरुण धुंडाप्पा कोरे, संचालक
रा.पत्रकारनगर, सांगली
10. सौ आक्काताई विजय पाटील, संचालिका
रा.मुजावर प्लॉट, सांगली
11. सौ सुवर्णा गजानन फाकडे, संचालिका
रा.मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
12. श्रीमती शकुंतला आप्पासाहेब पाटील, संचालिका
रा.वसंतदादा क्रिडामंडळ जवळ, कोल्हापूर रोड, सांगली
13. श्रीमती वंदना बाबासो बावधनकर, संचालिका
रा.मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
14. सौ शशिकला अरुण पोळ, संचालिका
रा.प्रशिक चौक, सांगली
15. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
मुख्य शाखा सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड आर.एम.शिंदे
जाबदारक्र.8 तर्फे : अॅड ए.आर.देशमुख
जाबदारक्र.1 ते 7 व 9 ते 15 : एकतर्फा
- नि का ल प त्र –
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. सदरची तक्रार, तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रारदाराने दाखल केलेली असून जाबदार क्र.1 ते 15 यांचेकडून दामदुप्पट ठेव पावत्यांची देय रक्कम व्याजासह वसूल करुन मिळण्याची विनंती केली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदारांनी जाबदार क्र.1 या पतसंस्थेत दामदुप्पट ठेव योजनेमध्ये पावती क्र. 10607, 10608, व 7545 याद्वारे रक्कम रु.7,500/-, 7500/-, व 25,000/- तसेच त्यांच्या सेव्हिंग्ज खात्यामधील रक्क्म रु.54,102/- अशा रकमा गुंतविल्या होत्या. ठेवपावत्यांची मुदत संपल्यानंतर सदर देय रकमा जाबदारकडून तक्रारदारांनी मागितल्या. तथापि जाबदार सदर रकमा देण्यास टाळाटाळ करीत असून त्यायोगे त्यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिलेली आहे. म्हणून तक्रारदारास प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल करण्याचे कारण उद्भवलेले आहे. अशा कथनांवरुन तक्रारदारांनी जाबदार क्र.1 ते 15 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तरित्या रक्कम रु.96,942/- अधिक व्याज व शारिरिक, आर्थिक मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- ची नुकसान भरपाई व अर्जाचा संपूर्ण खर्च वसूल करुन मागितला आहे.
3. तक्रारदाराने आपले कथनांचे पुष्ठयर्थ नि.3 ला शपथपत्र दाखल करुन, नि.5 च्या फेरिस्तसोबत एकूण 7 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सदर कामी जाबदार क्र.8 वगळता इतर कोणीही जाबदार हजर झालेले नाहीत. त्यांनी लेखी कैफियत दाखल केलेली नाही. तथापि जाबदार क्र.8 यांनी आपली कैफियत नि.10 ला दाखल केली आहे. जाबदारांनी आपल्या कैफियतीत तक्रारीतील सर्व मजकूर नाकारला असून, ते जाबदार क्र.1 संस्थेचे संचालक नाहीत व त्यास तक्रारदारांनी निष्कारण पक्षकार केलेले आहे असे कथन केले आहे. जाबदार क्र.8 यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी जाबदार क्र.1 संस्थेच्या संचालक पदाचा दि.13/2/2007 रोजी राजीनामा दिलेला असून तेव्हापासून त्यांचे जाबदार क्र.1 संस्थेशी असलेले नाते संपुष्टात आलेले आहे असे कथन केले आहे. त्यांचेमध्ये व तक्रारदारामध्ये ग्राहक व सेवा देणारे असे कोणतेही नाते निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळे प्रस्तुतची तक्रार त्यांचेविरुध्द खारीज करण्यास पात्र आहे असे म्हणणे मांडले आहे. अशा कथनांवरुन जाबदार क्र.8 यांनी सदरची तक्रार तक्रारदारावर कॉम्पेन्सेटरी कॉस्ट रक्कम रु.5,000/- ची बसवून खारीज करावी अशी मागणी केली आहे.
5. जाबदार क्र.8 यांनी आपल्या लेखी कैफियतीचे पुष्ठयर्थ नि.11 ला शपथपत्र दाखल केलेले असून नि.13 सोबत त्यांनी दिलेला संचालक पदाचा राजीनामा दि.13/2/2007 ची प्रत दाखल केली आहे तसेच सांगली येथील सहकार न्यायालयात महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम 95(4) ने दाखल केलेल्या तूर्तातूर्त ताकीद अर्जाची प्रत तसेच त्या अर्जावर पारीत करण्यात आलेल्या मनाई हुकुमाची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
6. प्रस्तुत प्रकरणामध्ये कोणाही पक्षकाराने तोंडी पुरावा दिलेला नाही. तक्रारदारतर्फे त्यांचे विद्वान वकीलांनी आपला लेखी युक्तिवाद सादर केलेला आहे व तक्रारदाराने तोंडी पुरावा देणेचा नाही अशी पुरसिस देखील नि.41 ला दाखल केलेली आहे. जाबदार क्र.7 यांचेतर्फे कोणीही हजर झालेले नाही.
7. प्रस्तुत प्रकरणात आमच्या निष्कर्षाकरिता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे ग्राहक होतात काय ? होय.
2. जाबदार क्र.1 ते 15 यांनी त्यांना दूषीत सेवा दिली हे तक्रारदाराने
शाबीत केले आहे काय ? होय.
3. तक्रारदारास मागितल्याप्रमाणे रक्कम मिळण्यास ते पात्र आहेत काय ? होय.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
8. आमच्या वरील निष्कर्षाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- कारणे-
मुद्दा क्र.1 ते 4
9. वर नमूद केलेल्या परिस्थितीत प्रस्तुत तक्रारअर्जास जाबदारतर्फे विशेष विरोध झालेला दिसत नाही. जाबदार क्र.8 ने जरी आपली लेखी कैफियत दाखल केलेली असली तरी तक्रारदार कथन करतात, त्याप्रमाणे जाबदार पतसंस्थेमध्ये तक्रारदारांनी आपल्या रकमा दामदुप्पट मुदत ठेव योजनेमध्ये आणि बचत खात्यात गुंतविलेल्या होत्या ही बाब अमान्य केलेली नाही. तसेच मुदतीनंतर तक्रारदारांनी सदर रकमा जाबदारकडून मागितल्या व त्या जाबदारांनी त्यास दिलेल्या नाहीत हे कथन देखील जाबदार क्र.8 ने स्पष्टपणे नाकबूल केलेले नाही. सदर व्यवहाराचे कालावधीत तो जाबदार क्र.1 या पतसंस्थेचा संचालक होता ही बाब देखील जाबदार क्र.8 यांनी अमान्य केली नाही. किंबहुना त्याचे म्हणणेप्रमाणे, वर नमूद केलेल्या दि.13/2/2007 या तारखेपासून त्याने संचालक पदाचा राजीनामा दिलेला असल्याने त्याचा संस्थेशी संबंध राहिलेला नाही असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की, तो सदर जाबदार क्र.1 पतसंस्थेचा संचालक होता ही बाब जाबदार क्र.8 यांनी अमान्य केलेली नाही. प्रस्तुत प्रकरणातील एकूण वस्तुस्थिती बघता, तक्रारदार व जाबदार क्र.1 ते 15 यांचा ग्राहक होतो व जाबदार क्र.1 ते 15 हे त्याचे सेवा देणारे होतात हे स्पष्ट होते. सबब वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
10. तक्रारदाराने आपल्या तक्रारअर्जात आणि त्यासोबत जोडलेल्या शपथपत्रात हे स्पष्टपणे नमूद केले आहे की, दामदुप्पट मुदत ठेवपावतीच्या मुदतीनंतर त्याने सदर मुदत ठेवपावतीच्या देय रकमेची व्याजासह मागणी केली तसेच जाबदार क्र.1 संस्थेतील त्यांच्या बचत खात्यात असणा-या रकमेची जाबदारकडून मागणी केली तथापि जाबदारांनी ती परत करण्यास टाळाटाळ केली. जाबदार क्र.8 वगळता इतर सर्व जाबदारांनी आपली लेखी कैफियत सादर न केल्याने तक्रारअर्जातील सर्व कथन त्यांनी मान्य केले आहे असे कायद्याचे गृहितकावरुन गृहित धरावे लागेल. वर नमूद केल्याप्रमाणे जाबदार क्र.8 यांनी सदर कथनाचा इन्कार केला नाही त्यामुळे तक्रारदाराचे वरील सर्व कथन हे शाबीत झाले आहे असेच गृहित धरावे लागेल. त्यामुळे तक्रारदारास जाबदार क्र.1 ते 15 यांनी दूषित सेवा दिली होती हे स्पष्टपणे शाबीत होत आहे. त्याकरिता आम्ही मुद्दा क्र.2 चे उत्तर देखील होकारार्थी दिलेले आहे.
11. ज्याअर्थी तक्रारदाराची देय असणारी रक्कम जाबदारांनी दिलेली नाही, त्याअर्थी त्या सर्व रकमा तक्रारदारास वसूल करुन मिळणेचा अधिकार प्राप्त झाला आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केलेल्या सर्व मुदत ठेव पावत्यांच्या आणि बचत खात्याच्या प्रती मंचासमोर दाखल केल्या आहेत. मुदत ठेव पावतीची मुदत संपून बराच कालावधी उलटून गेला आहे. त्या रकमा आपल्या जवळ ठेवण्याचे आणि तक्रारदारास परत न करण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण जाबदारांना दिसत नाही. त्यामुळे तक्रारअर्जात मागणी केलेल्या सर्व रकमा जाबदारकडून व्याजासह वसूल करुन मिळणेचा अधिकार तक्रारदारांना प्राप्त होतो. त्यामुळे मुद्दा क्र. 3 व 4 चे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल आणि तसे ते आम्ही दिले आहे.
12. जाबदार क्र.1 या पतसंस्थेचे जाबदार क्र.2 ते 14 हे चेअरमन, व्हाईस चेअरमन, आणि संचालक आहेत किंवा होते ही बाब जाबदारांनी नाकारली नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये जरी जाबदार क्र.8 यांनी संचालक पदाचा राजीनामा दिलेला दिसतो, तरीही तो राजीनामा दाव्यातील व्यवहारानंतर दिलेला आहे, त्यामुळे त्यास आपण जबाबदार नाही असा बचाव घेता येणार नाही. सर्व संचालक व संस्थेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन हे वैयक्तिक व संयुक्तरित्या जाबदार क्र.1 व 15 पतसंस्थेसह तक्रारदारास त्याने मागितलेल्या रकमा देण्यास जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे. जाबदार क्र.2 ते 14 यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही. त्यामुळे तक्रारदारास त्यांनी मागितलेल्या रकमा व्याजासह जाबदार क्र.1 ते 15 कडून वैयक्तिक व संयुक्तरित्या वसूल करुन मिळण्याचा हक्क आहे. सबब, वर नमूद केलेल्या मुद्दा क्र. 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे. सबब, आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श -
1. तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.1 ते 15 यांनी संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास रक्कम रु.96,942/- + तक्रार दाखल तारखेपासून रक्कम परत तक्रारदारास अदा करेपावेतो त्यावर द.सा.द.शे.8.5% दराने व्याज द्यावे.
3. तसेच जाबदार क्र.1 ते 15 यांनी संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- द्यावेत.
4. तसेच जाबदार क्र.1 ते 15 यांनी संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.1,000/- द्यावेत.
5. वरील सर्व रकमा प्रस्तुत आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत तक्रारदारास देण्यात याव्यात अन्यथा त्या तारखेपासून पूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.8.5% दराने व्याज तक्रारदारास जाबदार क्र.1 ते 15 यांनी द्यावे.
6. जाबदार क्र.1 ते 15 यांनी विहीत मुदतीत रकमा न दिल्यास तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 किंवा 27 खाली प्रकरण दाखल करण्याची मुभा राहील.
सांगली
दि. 13/06/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष