Dated the 12 Mar 2015
न्यायनिर्णय
द्वारा- श्री.ना.द.कदम...................मा.सदस्य.
1. सामनेवाले ही ठाणे येथील प्रवाशी संस्था आहे. तक्रारदार हे ठाणे येथील रहिवाशी तसेच गोदरेज कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. सामनेवाले यांनी माहे-एप्रिल-2011 मध्ये प्रायोजित काश्मीर – वैष्णवदेवी सहलीमध्ये तक्रारदारांनी पैसे भरुन ही, सामनेवाले यांनी सदर सहल आयोजित केली नाहीच शिवाय, तक्रारदारांचे पैसेही परत केले नाहीत या बाबीवरुन प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदारांच्या तक्रारीमधील कथनानुसार तक्रारदार हे वरिष्ठ व्यवस्थापक यापदावर गोदरेज कंपनीवर कार्यरत असल्याने त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटूंबासमवेत राहण्यास वेळ मिळत नाही, त्यांच्या वाचनामध्ये सामनेवाले यांनी जाहिर केलेला काश्मिर-वैष्णवदेवी हा 10 दिवसांचा सहल कार्यक्रम आला असता त्यांनी सामनेवाले यांचेकडे जाऊन रु.5,000/- रोख स्वरुपात देऊन ता.14.02.2011 रोजी व यानंतर लगेचच ता.15.02.2011 रोजी रु.15,000/- देऊन सहलीचे बुकींग केले. सदर 10 दिवसांची सहल ता.14.04.2011 रोजी सुरु होणार होती, व त्यासाठीच्या एकूण रु.60,000/- पैंकी रु.20,000/- सामनेवाले यांचेकडे जमा केले होते. सदर सहलीचा प्रायोजित कार्यक्रम विचारात घेऊन तक्रारदारांनी अगोदरच रजा मंजुर करुन घेतली होती. सहलीचे बुकींग केल्यानंतर ता.20.03.2011 पासुन तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे प्रायोजित सहली विषयी रोजची चौकशी चालु केली. परंतु सामनेवाले यांनी याबाबत उत्तर देण्याचे टाळले. यानंतर सततच्या पाठपुराव्यानंतर सामनेवाले यांनी सदरील सहल रद्द झाल्याचे सांगितले. तथापि, सामनेवाले यांचेकडे जमा केलेली रक्कम रु.20,000/- अनेकवेळा मागणी करुनही परत केली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु.20,000/- व्याजासह परत मिळावेत, नुकसानभरपाई व तक्रारखर्च अशी एकूण रक्कम रु.51,600/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
3. सामनेवाले यांना मंचामार्फत पाठविलेली तक्रारीची नोटीस त्यांना ता.27.04.2012 रोजी प्राप्त होऊनही त्यांनी कैफीयत दाखल केली नाही. त्यामुळे ता.03.07.2012 रोजीच्या आदेशान्वये प्रस्तुत तक्रार एकतर्फा चालविण्यात आली.
4. तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला, तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, त्यासोबतची कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. तक्रारदारांना ता.13.02.2015 रोजी तोंडी युक्तीवाद करण्याची संधी दिली होती, तथापि, तक्रारदार सदर दिवशी गैरहजर राहिल्याने, तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रा आधारे प्रकरणातील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.
अ. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तसेच तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनावरुन असे दिसुन येते की, तक्रारदारांनी ता.14.02.2011 रोजी टुर रजिस्ट्रेशन फॉर्म नं.1839 भरुन, तक्रारदार, त्यांची पत्नी व मुलगी या तीन व्यक्तींसाठी ता.14.04.2011 रोजीच्या प्रायोजित काश्मीर – वैष्णवीदेवी या सहलीसाठी बुकींग केले. ता.14.02.2011 रोजी रु.5,000/- (पावती क्रमांक-238) ता.15.02.2011 रोजी पावती क्रमांक-239 अन्वये रु.15,000/- सामनेवाले यांचेकडे बुकींग रक्कम म्हणून जमा केले. टुर रजिस्ट्रेशन फॉर्म क्रमांक-1839 मध्ये सहल तारीख-10.02.2011 अशी नमुद केली असलीतरी, सदर फॉर्मच्या तळभागात ता.14.04.2011 असे नमुद केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार यांनी नमुद केल्याप्रमाणे सहल ता.14.04.2011 पासुन सुरु होणार होती.
ब. सामनेवाले यांना तक्रारीची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी कैफीयत दाखल न केल्याने, तक्रारदारांची तक्रारीमधील सर्व कथने अबाधित राहतात. तक्रारदार यांच्या कथनानुसार, बुकींग रक्कम ता.14.02.2011 व ता.15.02.2011 रोजी अदा केल्यानंतर आयोजित सहल ता.14.04.2011 पासुन सुरु होणार, त्यानुसार रजा सुध्दा अगोदरच मंजुर करुन घेतली होती. परंतु सामनेवाले यांचेकडे सातत्याने विचारणा केल्यानंतर, सहल रद्द झाल्याची बाब तक्रारदारांना माहे-एप्रिल मध्ये सामनेवाले यांनी सांगितली. त्यामुळे त्यांचे अनाठायी नुकसान झाले.
यासंदर्भात तक्रारदारांनी त्यांच्या रजेच्या संदर्भात पुरावा दाखल केलेला नसला तरी, सामनेवाले यांनी सहल रद्द झाल्याची बाब अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तक्रारदारांना सांगितली नसल्याने, तक्रारदारांना सहली करीता रजा घेणे ही बाब क्रमप्राप्त आहे. रजा मंजुर झाल्यानंतर सहल रद्द झाल्याचे सांगितल्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाल्याचे तक्रारदाराचे कथन योग्य वाटते.
क. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या बुकींग प्रोसिजर मधील क्लॉज-8 मध्ये नमुद केल्यानुसार, जर सहल संघटकाने सहल रद्द केल्यास संपुर्ण बुकींग रक्कम परत करण्यात येईल. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदारांच्या कथनानुसार सामनेवाले यांनी सहल रद्द झाल्याचे माहे-एप्रिल मध्ये तक्रारदारांना सांगितले. सामनेवाले यांनी सहल रद्द केल्यामुळे, उपरोक्त
नमुद क्लॉज-8 प्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांची संपुर्ण बुकींग रक्कम परत देण्यास जबाबदार आहेत असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-384/2011 मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी स्वतः प्रायोजित सहल रद्द केल्यानंतर, बुकींग रक्कम परत न करुन सेवा
सुविधा पुरविण्यामध्ये कसुर केल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची सहल बुकींग रक्कम रु.20,000/- तक्रार दाखल
ता.05.10.2011 पासुन 6 टक्के व्याजासह तक्रारदारांना ता.11.04.2015 रोजी किंवा
तत्पुर्वी अदा करावी. आदेश पुर्ती विहीत मुदतीमध्ये न केल्यास ता.12.04.2015 पासुन
दरसाल दर शेकडा 9 टक्के व्याजासह रक्कम अदा करावी.
4. मानसिक, शारिरीक, आर्थिक व न्यायिक त्रासाबद्दल सामनेवाले यांनी रक्कम रु.20,000/-
(अक्षरी रुपये वीस हजार मात्र) तक्रारदारांना ता.11.04.2015 रोजी किंवा तत्पुर्वी अदा
करावेत. विहीत मुदतीत आदेश पुर्ती न केल्यास ता.12.04.2015 पासुन, आदेश पुर्ती
होईपर्यंत दरसाल दर शेकडा 6 टक्के व्याजासह रक्कम अदा करावी.
5. आदेशाची पुर्तता केल्याबद्दल / न केल्याबद्दल उभयपक्षकारांनी शपथपत्र ता.27.04.2015
रोजी मंचामध्ये दाखल करावे.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.12.03.2015