निकालपत्र (दि.27.01.2016) द्वाराः- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे
1 वि.प. यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 अन्वये सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदारांना प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीसीचा आदेश झाला. दि.24.03.2014 रोजी तक्रारदारांनी मा.मंचात पुरशिस दाखल करुन, वि.प.क्र.1 यांना प्रस्तुत कामातून कमी केलेले आहे. त्यानुसार, निशाणी क्र.1 वर तक्रारदारांनी दुरुस्ती केलेली आहे. वि.प.क्र.2 यांना नोटीस लागु होऊन देखील प्रस्तुत कामी म्हणणे दाखल केलेले नाही. सबब, वि.प.क्र.2 यांचेविरुध्द नो से चा आदेश पारीत करणेत येत आहे. दि.09.10.2014 रोजी तक्रारीमधील मजकूर आणि तक्रारी सोबतचे कागदपत्रामधील मजकुर हाच तक्रारदार यांचा युक्तीवाद समजणेत यावा अशी पुरसीस दाखल केलेली आहे. प्रस्तुतची प्रकरणात गुणदोषावर खालीलप्रमाणे निकाल पारीत करणेत येतो.
तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
3 तक्रारदार हे आपले कौटुंबिक उपजिविकेकरीता सोने-चांदीचे दागिने अथवा वस्तु तयार करुन विक्री करणेचा व्यवसाय करतात. सर्व तक्रारदार एकाच भागातील आहेत. वि.प.क्र.1 हे पार्सल देवाण-घेवाण म्हणजेच व वेगवेगळया ग्राहकांची वेगवेगळी पार्सल निर्देशित पत्त्यावर सुरक्षित पोहचवण्याचे काम करतात, त्याकरीता ते पार्सलचे प्रमाणात ग्राहकाकडून चार्जेस स्विकारतात. वि.प.क्र.2 हे सेंट्रल रेल्वेचे अधिकृत परवानाधारक पार्सल वाहक आहेत. तर वि.क्र.3 हे भारतीय रेल्वेचे कोल्हापूर स्टेशनमधील अधिकारी आहेत. दि.12.10.2009 रोजी तक्रारदारांनी चांदीच्या पैंजण, वाटया, ग्लास, गाय-वासरु मुर्ती पार्सल सर्व्हिसव्दारे पाठविणेचे ठरविले. त्यामुळे 52.762 कि.ग्रॅम, 4.445 कि.ग्रॅम आणि 3.820 कि.ग्रॅम वजनाचे चांदीच्या वस्तु अशा वस्तुचे पार्सल वि.प.क्र.1 यांचेकडे मुंबई येथे पोहचविणेकरीता वि.प.क्र.1 यांचे कोल्हापूर येथील पत्त्यावर सुपुर्द केले. सदरची तक्रारदारांची चांदी मालाची पार्सल सुरक्षित मुंबई येथे पोहचविणेकरीता पार्सलचे प्रमाणात चार्जेस वि.प.क्र.1 यांना तक्रारदारांनी अदा केले. वि.प.क्र.1 हे सदरची पार्सले मुंबई येथे भारतीय रेल्वे म्हणजेच वि.प.क्र.3 यांचेमार्फत पाठवणार होते. परंतु वि.प.क्र.3 यांचेकडून पार्सले वाहून नेणेचा अधिकृत परवाना वि.प.क्र.2 यांचेकडे होता. कारण वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.3 यांचेकडील अधिकृत लिज होल्डर होते म्हणून वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारांचेकडून स्विकारलेली चांदी मालाची तीन पार्सले वि.प.क्र.2 यांचेकडे सोपविली. वि.प.क्र.2 यांनी सदरची पार्सले वि.प.क्र.3 यांच्या मालवाहक बोगीमध्ये वि.प.क्र.3 यांच्या अधिका-यांच्या ताब्यात दिली. अशा प्रकारे सर्व वि.प.यांनी तक्रारदारांची चांदी मालाची पार्सले मुंबई येथे सुरक्षित पोहचविणेकरीता त्यांचे ताब्यात घेतली. दुसरे दिवशी तक्रारदारांची चांदी मालाची सदरची पार्सले मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहचली नसून ती कोल्हापूर-मुंबई प्रवासामध्ये गहाळ अथवा चोरीस गेल्याचे तक्रारदारांना समजले. त्यानंतर तक्रारदारांनी संबंधीत पोलिसांकडे पार्सलबाबत फिर्याद दिली. परंतु तक्रारदारांना पार्सले मिळून आली नाहीत. तक्रारदारांच्या सदर पार्सलमधील चांदी वस्तुची एकूण किंमत रक्कम रु.10,30,500/- इतकी होती. तक्रारदारांनी सदरची पार्सले सुरक्षित मुंबई येथे पाठविणेकरीता दिली होती. सदरची पार्सले सुरक्षित मुंबई येथे पोहोच करणेच्या सेवेकरीता वि.प.यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.3,450/- इतके सेवा शुल्क ही आकारले होते. परंतु वि.प.चे कर्मचा-यांचे निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे तक्रारदारांची रक्कम रु.10,30,500/- इतक्या किंमतीच्या चांदी मालाची पार्सले गहाळ झाली. त्यामुळे तक्रारदारांना भयंकर आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास झाला. तक्रारदार हे नुकसानभरपाईची मागणी केली होती. परंतु वि.प.यांनी नुकसानभरपाईची रक्कम देण्याचे टाळाटाळ केल्यामुळे सदरची तक्रार या मंचात दाखल करावी लागली. तक्रारदारांचे पार्सलमधील चांदी मालाची एकूण किंमत रक्कम रु.10,30,500/-, वि.प.यांनी चांदी मालाची पार्सले गहाळ केल्यामुळे तक्रारदारांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाचे भरपाईकरीता रक्कम रु.3,00,000/-, तक्रारदारांना मुंबई येथे चौकशी करीता वेळोवेळी जावे लागलेल्या प्रवास खर्चाची रक्कम रु.25,000/- व सदर तक्रारीची टायपिंग, झेरॉक्स, पोस्टेज, कोर्ट फी, वकील फी सह खर्चाची रक्कम रु.25,000/- अशी एकूण रक्कम रु.13,80,500/- वि.प.यांचेकडून तक्रारदारास मिळावेत अशी विनंती सदरहू मंचास केलेली आहे.
4 तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण पाच कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अनुक्रमे दि.12.10.2009 रोजी वि.प.नं.1 यांनी तक्रारदारांचा माल स्विकारलेली पावती, दि.24.11.2009 रोजी तक्रारदारांनी दिलेला एफ.आय.आर., दि.09.11.2009 रोजी तक्रारदारांनी वि.प.क्र.3 यांचे मुंबई कार्यालयाकडे दिलेली तक्रार, वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.3 यांच्या कार्यालयात दिलेली तक्रार व तक्रारदारांनी वि.प.क्र.3 यांचे कार्यालयात दिलेली तक्रार, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5 तक्रारदारांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे यांचा विचार करता, प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी दि.12.01.2009 रोजी तक्रारदारांनी चांदीच्या पैंजण, वाटया, ग्लास, गाय-वासरु मुर्ती पार्सल सर्व्हिसव्दारे पाठविणेचे ठरविले. त्यामुळे 52.762 कि.ग्रॅम, 4.445 कि.ग्रॅम आणि 3.820 कि.ग्रॅम वजनाचे चांदीच्या वस्तु मुंबई येथे पोहचविणेकरता वि.प.क्र.1 यांचेकडे सुपुर्द केलेली होते. त्यानुसार, तक्रारदारांनी सदरचे चांदीचे मालाचे पार्सल मुंबईला सुरक्षित पोहचविणेसाठी सदरचे सेवा पोटी वि.प.क्र.1 यांना रक्कम रु.3,450/- इतके सेवा शुल्क दिलेले होते. त्यानुसार तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत सदरच्या पावत्यां दाखल केलेल्या आहेत. यावरुन तक्रारदार हे वि.प.क्र.1 यांचे ग्राहक आहेत हे या पावत्यांवरुन सिध्द होते.
6 तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीमध्ये वि.प.क्र.1 हे सदरची पार्सल वि.प.क्र.3 यांचेमार्फत पाठवणार होते. परंतु वि.प.क्र.3 यांचेकडून पार्सल वाहुन नेणेचा अधिकृत परवाना वि.प.क्र.2 यांचेकडे होता. कारण वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.3 यांचेकडील अधिकृत लिज होल्डर होते म्हणून वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांचेकडून स्विकारलेली चांदी मालाची पार्सल वि.प.क्र.2 यांचेकडे सोपविली. वि.प.क्र.2 यांनी सदरचे पार्सल वि.प.क्र.3 यांच्या मालवाहक बोगीमध्ये वि.प.क्र.3 यांचे अधिका-याचे ताब्यात दिली. परंतु सदरची पार्सले मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथे पोहचलेली नसून ती कोल्हापूर-मुंबई प्रवासामध्ये गहाळ अथवा चोरीस गेलेल असलेने तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल नुकसानभरपाईपोटी दाखल केलेली आहे. त्या अनुषंगाने, या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलल्या दि.24.11.2009 रोजीचे एफ.आय.आर.ची प्रतिचे अवलोकन केले असता सदर चांदीचे दागिने धर्मेश कार्गोचे मालक सुग्रीव परमार त्यांचे नोकर जितू, संत कुमार यांचेकडे मुंबई येथे पाठविणे कामी विश्वासाने सोपविले. सुग्रीव परमार यांने नवयुग रेल सर्व्हिसेसचे सब कॉन्ट्रक्टर संजय औंदकर त्यांचेकडे काम करणारे सुधाकर, सागर, नदीम, पुजारी, विजय माळी व इतर कामगार यांचेकडे मु्ंबई येथे पाठविणेकामी विश्वासाने सोपविले असून वरील नमुद इसमांनी दि.12.10.2009 रोजी 7 वाजणेच्या दरम्यान कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी टर्मिनल दरम्यान विश्वासाने सोपविलेल्या दागिन्यांचा अपहार केला आहे असे नमुद आहे.
7 प्रस्तुत कामी तक्रारदारांनी दि.24.03.2014 रोजी वि.प.क्र.1 यांना सदर तक्रारीतून कमी केलेले आहे. परंतु एफ.आय.आर.वरुन वि.प.क्र.1 यांचेकडे कुरिअर लायसन नसल्याने त्यांनी वि.प.क्र.2 हे नवयुग रेल सर्व्हिसेस, कोल्हापूरचे सब कॉन्ट्रक्टर, लीज होल्डर यांचेकडे व त्यांचेकडे काम करणा-या कामगारांकडे सदरचे चांदीचे पार्सल दिल्याचे नमुद केलेले आहे. सदर कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेकडे कुरियर लायन्सेस आहे किंवा नाही ही बाब जाणून घेणेची जबाबदारी तक्रारदारांचेवर होती. तक्रारदारांनी वि.प.क्र.2 व 3 यांचेकडे सदरचे चांदीचे पार्सल दिल्याचे अनुषंगाने कोणतेही कागदपत्रे अथवा शुल्क भरल्याची पावती या कामी दाखल केलेली नाही. रेल्वेचे नियमानुसार पार्सल म्हणून पाठविलेल्या वस्तुंचे मुल्यांकन करणे आवश्यक असते. त्यानुसार तक्रारदारांनी सदरचे चांदीचे वस्तुचे मुल्यांकनबाबत अथवा त्या अनुषंगाने इतर कागदोपत्री पुरावा दाखल करणेची जबाबदारी तक्रारदारांची होती. तथापि सदरचा पुरावा तक्रारदारांनी मंचात दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीमध्ये वि.प.यांचे कर्मचा-यांचे निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे सदरची चांदीची मालाची पार्सल गहाळ झालेचे कथन केले आहे. त्या अनुषंगाने, तक्रारदाराने एफ.आय.आर.दाखल केलेला आहे. परंतु त्या अनुषंगाने investigation अथवा Enquiry याबाबत कोणतीही माहिती अथवा अहवाल (Report) या मंचात दाखल केलेली नाही.
8 हे मंच प्रस्तुत प्रकरणी पुढील न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे.
III (2010) CTJ 241(NC)
V.B.Tyagi …Petitioner
Versus
South Central Railway …Respondent
Carter alleged to have stolen money and Jewllery during train journey not covered under sec.100 of Railway Act. -Even otherwise loss report is not proved.-No merit in revision – complaint not maintainable.
-Sec.100 of Railway Act, 1989 regards as under-
“A Railway Admn. Shall not be responsible for the loss, destruction, damage, deterioration or non-delivery or any luggage unless a railway servant has booked the luggage and given a receipt therefore and in case of a luggage which is carried by the passenger in his charge, unless it is also proved that the loss, destruction, damage or deterioration was due to the negligence or misconduct on its part or on the part of any of its servant.”
9 वरील न्यायनिवाडयाचे अवलोकन करता, तक्रारदारांनी प्रस्तुत कामी वि.प.क्र.2 यांचेकडे सदर चांदीचे वस्तुचे मुल्यांकन केलेबाबत पावती अथवा इतर कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार हे वि.प.क्र.1 यांचे ग्राहक आहेत परंतु तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांना प्रस्तुत कामातून कमी केलेले आहे. केवळ वि.प.क्र.2 व 3 यांचे कर्मचारीचे निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे सदरची चांदीचे पार्सल गहाळ झालेचे तक्रारदारांनी तक्रारीमध्ये कथन केले आहे तथापि सदरची बाब तक्रारदार हे पुराव्यानिशी सिध्द करु शकलेले नाहीत. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीतील कथने शाबीत केलेली नाहीत. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार हे वि.प.क्र.2 व 3 यांचे ग्राहक आहेत हे तक्रारदार पुराव्यानिशी शाबीत करु शकलेले नाहीत त्याकारणाने वि.प.क्र.2 व 3 यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली असे म्हणता येणार नाही. त्या कारणाने तक्रारदार हे कोणतीही नुकसानभरपाई मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.