जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 191/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 05/02/2008
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 28/02/2008.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 04/09/2009
डॉ.योगेश सोमा कोल्हे,
वय- सज्ञान,धंदा- डॉक्टर,
रा. साधनानगर, मु.पो.वरणगांव,
ता.भुसावळ, जिल्हा जळगांव. ......... तक्रारदार
विरुध्द
1. धनवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत,
(वरणगांव, ता.भुसावळ, जि.जळगांव.)
(नोटीस मॅनेजर यांचेवर बजाविण्यात यावी.)
2. चेअरमन- धनवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.
वरणगांव, श्री.दिलीप बोदडे वकील.
3. व्हा.चेअरमन- धनवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.
वरणगांव, श्री.सुभाष त्रंबक कोलते.
4. मनोहर एकनाथ सराफ.
5. सुशिलकुमार बळीराम जंगले.
6. कैलास बाबुराव मराठे.
7. सुकलाल बुधो धनगर.
8. दिनकर गणसाराम माळी.
9. अनिल पुरुषोत्तम माळी.
10. सुधाकर बळीराम जावळे.
11. प्रभाकर रामचंद्र भंगाळे.
12. सौ.इंदूमती भास्कर झोपे.
13. सौ.मनिनी रमेश मांडगवणे.
14. ए.एल.आव्हाड.
15. संजीव लक्ष्मण कोलते.
16. विक्रम देशमुख.
सर्व 2 ते 16 यांचा पत्ता धनवर्धिनी ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्यादीत, वरणगांव, ता.भुसावळ,
जि.जळगांव. .......... सामनेवाला
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 04/09/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदारतर्फे श्री.अमित जी.चोरडीया वकील हजर
सामनेवाला क्रं.1,2,4,5,7,8,9,10,11 व 13 तर्फे
किशोर आर.पाटील वकील हजर.
सामनेवाला क्र.3 तर्फे महेशचंद्र द.तिवारी वकील हजर.
सामनेवाला क्र. 16 स्वतः
सामनेवाला क्र. 12 तर्फे हेमंत अ.भंगाळे वकील हजर.
सामनेवाला क्र. 14 स्वतः
सामनेवाला क्र. 6 व 15 एकतर्फा.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. सदरील सामनेवाला यांचे जळगाव जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी शाखा आहेत. वेगवेगळया प्रकारच्या ठेवी स्विकारणे, त्यावर व्याजदेणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. सामनेवाला ही एक नामांकीत पतसंस्था असल्याने इतर ठेवीदारांप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | पावती क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | 6204 | 06/09/2007 | 17,781/- | 05/12/2007 |
2 | 6174 | 06/09/2007 | 17,781/- | 05/12/2007 |
3 | 6173 | 06/09/2007 | 17,781/- | 05/12/2007 |
4 | 6351 | 07/02/2007 | 17,453/- | 10/11/2007 |
5 | 6246 | 07/02/2007 | 17,453/- | 10/11/2007 |
6 | बचत खाते क्र.1639 | | 18,129/- | |
7 | 5051 | 18/04/2007 | 25,180/- | 03/06/2007 |
8 | 6039 | 28/02/2007 | 15,000/- | 15/04/2007 |
9 | 6038 | 28/02/2007 | 15,000/- | 15/04/2007 |
10 | 5643 | 30/10/2007 | 20,218/- | 16/12/2007 |
11 | बचत खाते क्र.179/1 | | 19,551/- | |
तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्या मुदत ठेव पावत्यांची मुदत संपलेली असल्याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने, तक्रारदार हे त्यांची मुदत ठेवीची रक्कम व बचत खात्यावरील रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. तक्रारदार यांना सामनेवाला क्र. 1 यांचे मॅनेजर विजय शामराव चौधरी व सामनेवाला क्र. 3,4,8,10,11 यांच्या मिळकतीचे खालीलप्रमाणे उतारे प्राप्त झालेले आहेत.
1) सामनेवाला क्र. 1 यांचे मॅनेजर श्री.विजय शामराव चौधरी यांचे मालकीचा प्लॉट मौजे वरणगांव, ता.भुसावळ येथील भू-मापन क्र.837/1 मधील प्लॉट नं.21, क्षेत्र 200 चौ.मी.
2) सामनेवाला क्र. 3 श्री.सुभाष त्रंबक कोलते यांच्या मालकीची शेतजमीन मौजे वरणगांव, ता.भुसावळ येथील भू-मापन क्र.192 मधील शेत मिळकत, क्षेत्र 1 हे.38 आर.
3) सामनेवाला क्र. 3 श्री.सुभाष त्रंबक कोलते यांच्या मालकीची शेतजमीन मौजे वरणगांव,(लवकी परिसर), ता.भुसावळ येथील भू-मापन क्र.182 मधील शेत मिळकत क्षेत्र 1 हे.29 आर.
4) सामनेवाला क्र. 4 श्री.मनोहर एकनाथ सराफ यांच्या मालकीचा प्लॉट मौजे वरणगांव, ता.भुसावळ येथील भू-मापन क्र.5अ/1 मधील प्लॉट नं.18, क्षेत्र 225 चौ.मी.
5) सामनेवाला क्र. 4 श्री.मनोहर एकनाथ सराफ यांच्या मालकीचा प्लॉट मौजे वरणगांव, ता.भुसावळ येथील भू-मापन क्र.5अ/1 मधील प्लॉट नं.19, क्षेत्र 225 चौ.मी.
6) सामनेवाला क्र. 8 श्री.दिनकर गणसाराम माळी यांचे मालकीचा प्लॉट मौजे वरणगांव, ता.भुसावळ येथील भू-मापन क्र.793 मधील प्लॉट नं.35, क्षेत्र 330 चौ.मी.
7) सामनेवाला क्र. 10 श्री.सुधाकर बळीराम जावळे यांच्या मालकीची शेत मिळकत मौजे वरणगांव, ता.भुसावळ येथील भू-मापन क्र.419 मधील शेत मिळकत, क्षेत्र 1 हे.35 आर.
8) सामनेवाला क्र. 10 श्री.सुधाकर बळीराम जावळे यांच्या मालकीची शेत मिळकत मौजे वरणगांव, ता.भुसावळ येथील भू-मापन क्र.199 मधील शेत मिळकत क्षेत्र 1 हे.80 आर.
9) सामनेवाला क्र.11 श्री.प्रभाकर रामचंद्र भंगाळे यांच्या मालकीची शेतजमीन मौजे वरणगांव, ता.भुसावळ येथील भू-मापन क्र.675,उपवभिाग भू-मापन उपविभाग क्र.1 मधील शेत मिळकत क्षेत्र 2 हे.40 आर.
येणेप्रमाणे तक्रारदार यांना सदर मिळकतीचे उतारे प्राप्त झालेले आहेत. तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून वरील मुदत ठेवीची रक्कम घेणे असल्याने सामनेवाला हे आपल्या मिळकती त्वरीत विल्हेवाट लावण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती तक्रारदार यांना मिळालेली आहे. सामनेवाला हे तक्रारदार यांना रक्कम मिळू नये व त्यात अडचणी याव्यात म्हणून सामनेवाला सदरील कृत्य करीत आहेत. सामनेवाला यांनी वरील मिळकतीची विक्री केल्यास तक्रारदार यांना मे. न्यायमंचाचे हुकूमाप्रमाणे मुदत ठेवीची रक्कम वसूल करणे असंभव होईल म्हणून तक्रारदार यांनी सदरील तक्रारीअर्जासोबत तुर्तातुर्त मनाई हुकूमाचाही अर्ज दाखल केलेला आहे. म्हणून तक्रारदार यांनी मे. न्यायमंचास विनंती केली आहे की, तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून वरील वर्णन केलेल्या मुदत ठेवीच्या रक्कमा व्याजासह परत मिळाव्यात तसेच सामनेवाला क्रं.1,3,4,8,10 व 11 यांनी अथवा त्यांचे तर्फे अन्य कोणीही वरील मिळकती विकू नये अथवा त्या अन्य त-हेने तबदील करु नये असा त्यांचेविरुध्द निरंतर मनाई हुकूम देण्यात यावा व ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकामी तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करण्यात आल्यानंतर, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. त्याप्रमाणे सामनेवाला क्रं. 1,2,3,4,5,7,8,9,10,11,12,13 व 16 यांनी तक्रारीत हजर होऊन लेखी म्हणणे सादर केलेले आहे. तसेच सामनेवाला क्र. 6,14 ते 16 हे मंचाची नोटीस प्राप्त होऊन देखील गैरहजर राहील्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले.
3. सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. महाराष्ट्र उपभोक्ता अधिनियम 1986 चे कलम 2 अ (डी) उपभोक्ता या संज्ञेमध्ये दिलेल्या वर्णनानुसार सहकारी संस्थेचा गुंतवणूकदार हा संस्थेचा उपभोक्ता /ग्राहक नसतो. सहकारी संस्थेच्या नियमानुसार संस्थेचा ठेवीदार हा संस्थेचा सभासद असतो व सभासद हा संस्थेचा भागधारक व मालक असतो. तक्रारदाराने संस्थेत रक्कमेची गुंतवणूक करतांना संस्थेच्या संचालक मंडळात कोण संचालक आहेत तसेच ते ठेवीबाबत रक्कमेचा विनियोग कसा करणार आहेत याची माहिती घेतली नाही. सामनेवाला क्र. 3 हे महाराष्ट्र शासनाचे सार्वजनीक बांधकाम खात्यात अभियंता म्हणुन कार्यरत असुन सन 1998 पासून ते नाशिक येथे कार्यरत असल्याने त्यांना संस्थेच्या मिटींग ला वैयक्तीक हजर राहता येणे शक्य नसल्याने त्यांनी दि.28/12/2000 रोजी राजीनामा दिलेला आहे. सबब सामनेवाला यांचेकडे कोणतेही पद नसल्याने व ते शासकीय सेवेत असल्याने त्यांचा संस्थेशी कोणताही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग आला नाही. सबब यदाकदाचित जर काही कायदेशीर जबाबदारी आलीच तर ती चेअरमन व इतर संचालक मंडळाची आहे. सामनेवाला क्र. 3 यांचे मौजे वरणगांव येथील मिळकत गट नंबर 192 व 182 या शेत मिळकतीचा संस्थेशी काहीएक संबंध नाही तसेच सदर मिळकत ही सामनेवाला क्र. 3 यांचे वडीलोपार्जीत मिळकत आहे आणि त्यावर त्यांचे व त्यांचे कुटूंबीयांचे व सदस्यांचे कायदेशीर हितसंबंध असल्याने सदरच्या मिळकतीवर कोणत्याही प्रकारचा बोजा व जोखी कायदेशीरपणे लावता येत नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजुर करावा, सामनेवाला क्र. 3 ची मौजे वरणगांव येथील मिळकत क्र.192 व 182 वरील एक्स 6 वरील आदेश रद्य करण्यात यावा, सामनेवाला क्र. 3 यांना तक्रार अर्जातुन वगळण्यात यावे अशी विनंती सामनेवाला क्र. 3 यांनी केली आहे.
4. सामनेवाला क्र, 1,2,8,9,10,11 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सामनेवाला हे धनवर्धीनी पतसंस्थेत मॅनेजर असुन सामनेवाला क्र. 2 हे दि.3/6/2007 पर्यंत चेअरमन तर इतर सामनेवाला हे संचालक होते. दि.3/6/2007 पर्यंत संस्थेचा कारभार हा सुरळीतपणे व नियमानुसार सुरु होता. तथापी संस्थेच्या काही संचालकांनी अचानक राजीनामा दिल्याने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांनी त्यांचेकडील दि.5/6/2007 चे आदेश क्र.यु.आर.बी.2/धनवर्धिनी प्रशासक/77 (अ)/सन 07 अन्वये धनवर्धीनी पतसंस्थेचे संचालक मंडळ निष्प्रभावीत करुन संस्थेवर श्री.एस.ए.सोनवणे, श्री.एस.के.ओस्तवाल आणि श्री.पी.बी.पाटील यांची त्रिसदसीय प्रशासक मंडळ म्हणुन नियुक्ती केली आहे त्या दिवसापासुन संस्थेच्या कामकाजावर प्रशासक मंडळाचे नियंत्रण आहे. सबब दि.3/6/2007 पासून सदरहु सामनेवाला यांचा धनवर्धीनी पतसंस्थेशी काहीएक संबंध राहीलेला नाही. तसेच तक्रारदाराच्या ठेवीची देय दिनांक अद्याप पुर्ण झालेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी व तक्रारदाराकडुन खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
5. सामनेवाला क्र. 14 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सामनेवाला क्र. 14 यांचा प्रशासकीय अध्यक्ष कामकाजाचा कालावधी दि.8/1/2008 ते दि.25/1/2008 असा आहे त्यानंतर दि.2/1/2009 पावेतो खात्याच्या अन्य अधिका-यांनी संस्थेचे प्रशासक म्हणुन कामकाज पाहीलेले आहे संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणुक प्रक्रिया पुर्ण झालेली असुन दि.3/1/2009 पासुन संस्थेचे संचालक मंडळ संस्थेचे कामकाज पाहत आहे. सबब सहारूयक निबंधक सहकारी संस्था, जामनेर सामनेवाला क्र. 14 यांचे नांव या दाव्यातून वगळण्यात यावे अशी विनंती सामनेवाला क्र. 14 यांनी केली आहे.
6. सामनेवाला क्र. 16 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराने दाखल केलेंल्या तक्रारीमध्ये सामनेवाला क्रमांक 2 ते 13 हे संचालक मंडळ कार्यरत होते परंतू त्यांनी दि.3/6/2007 रोजी दिलेल्या राजीनाम्यामुळे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांनी त्यांचेकडील दि.5/6/2007 रोजीचे आदेश क्र.यु.आर.बी.2/धनवर्धीनी प्रशासक/77(अ) सन 2007 नुसार संस्थेची व्यवस्थापक समिती निष्प्रभावीत करुन संस्थेचा कार्यभार सुरळीत चालावा या हेतुने संस्थेवर दि.5/6/2007 रोजी प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सदर सामनेवाला यांचा प्रशासक पदाव्यतिरिक्त कोणताही संबंध संस्थेशी राहीलेला नाही. त्यानंतर दि.31/7/2008 रोजी पुर्वी नियुक्त प्रशासक मंडळ रद्य करुन नवीन प्रशासक नेमले असल्याने व त्यात सामनेवाला समाविष्ठ नसल्याने सामनेवाला यांचा संस्थेशी काहीएक संबंध राहीलेला नाही. सामनेवाला यांना नाहक त्रास देण्याचे हेतुने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारीकामी सामील केलें आहे. सबब सामनेवाला विरुध्द असलेला तक्रार अर्ज नामंजुर करण्यात यावा व या सामनेवाला यास तक्रारदाराकडुन कॉम्पेनसेटरी कॉस्ट दाखल रक्कम रु.10,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती सामनेवाला क्र. 16 यांनी केली आहे.
7. सामनेवाला क्र. 12 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक नाहीत तसेच सामनेवाला हे धनवर्धिनी बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे आजरोजी संचालक नाहीत त्यामुळे सामनेवाला यांना तक्रारदाराचे ठेवी बाबत काहीएक कल्पना नाही. सामनेवाला क्र. 12 यांनी संस्थेच्या संचालक पदाचा दि.3/6/2007 रोजी राजीनामा दिलेला असुन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांनी दि.5/6/2007 रोजी आदेश पारीत करुन संस्थेची व्यवस्थापक समिती निष्प्रभावीत करुन प्रशासक मंडळ नियुक्त केलें असुन सामनेवाला क्र. 12 यांचा संस्थेशी काहीएक संबंध राहीलेला नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह रद्य करण्यात यावा व सामनेवाला क्र. 12 यांना तक्रार अर्जातुन वगळण्यात यावे तसेच नुकसान भरपाई दाखल तक्रारदाराकडुन रु.10,000/- मिळावेत अशी विनंती सामनेवाला क्र. 12 यांनी केली आहे.
8. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1)
प्रमाणे ग्राहक आहे काय ? .......होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
9. मुद्या क्रमांक 1 तक्रारदार यांनी तक्रारीत निशाणी 3 अंतर्गत दाखल केलेल्या पावतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी काही रक्कम सामनेवाला यांचे पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवलेली आहेत. सबब सदरील कागदपत्रावरुन दिसून येते की, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1) ड नुसार ग्राहक आहे.
10. मुद्या क्रमांक 2 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याआधी ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे हा ग्राहकाचा वाद आहे. सदरील मुदत ठेवीची रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे तसेच सदरील तक्रार दाखल केल्यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्यांचे शपथपत्रा दाखल केल्यानंतरही सदरील रक्कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्या सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्यांची ठेव रक्कम व्याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्कम मागणेस हक्कदार आहे.
तक्रारदार यांची ठेवीची रक्कम परतफेड करण्याची हमी दिल्यानंतर व त्याची मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम देण्याची वसुली अभावी सामनेवाला यांनी टाळाटाळ केलेली आहे, जेणेकरुन तक्रारदार संस्थेने नाईलाजाने सदरहू तक्रार दाखल करुन सामनेवाला यांचेकडून ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकरीता विनंती केलेली आहे. कारण त्यांची रक्कम मिळणेस धोका निर्माण झाला आहे. म्हणून सदरहू तक्रारीत तक्रारदार यांना निशाणी 6 प्रमाणे दरम्यानचे हुकूमासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर तत्कालीन मंचाने दिनांक 05.02.2008 ला अंतरिम आदेश होणेसाठी सामनेवाला क्रं.1,3,4,8,10 व 11 यांना नोटीस काढण्यात आली होती जेणेकरुन सामनेवाला क्रं. 1,3,4,8,10 व 11 ची मालमत्ता (अर्जाप्रमाणे ) '' जशीची तशी '' का ठेवण्यात येऊ नये असा आदेश पारीत केला आहे. त्याकरीता सदरील सामनेवाला यांनी खुलासा दाखल करावयाचा होता. तथापी सामनेवाला हे प्रस्तुतकामी हजर होऊन म्हणणे दाखल करेपावेतो तत्कालीन अध्यक्ष यांनी नि.क्र. 6 वर जैसे थे चे आदेश पारीत केलेले होते.
तक्रारदाराची तक्रार, सोबत जोडलेले दस्तऐवज, सामनेवाला यांनी दाखल केलेला खुलासा व उभयतांचा युक्तीवाद यांचे विद्यमान न्यायमंचाने अवलोकन केले असता न्यायाच्या दृष्टीने सामनेवाला क्र. 1 ते 16 यांच्यापैकी सामनेवाला क्र. 3 ते 12 यांनी संस्थेचे चेअरमन व मॅनेजर यांच्याकडे राजीनामे सादर केलेले आहेत व त्यांच्यावर त्यांनी मंजुरीही दिलेली आहे व सदर राजीनामे हे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांच्याकडुन मंजुर करण्यात आलेले आहेत तसेच त्याच्या कॉपीजही पुराव्याकामी दाखल केलेल्या आहेत म्हणुन विद्यमान न्यायमंच हे सामनेवाला क्र. 3 ते 12 यांना या तक्रारीतुन वगळण्याचे निर्णयाप्रत आले आहे व सामनेवाला क्र.1,2,13 ते 16 यांना याकामी जबाबदार धरीत आहे. तक्रारदाराची रक्कम वसुलीकामी सामनेवाला क्र. 1,2,13 ते 16 हे जबाबदार राहतील. तसेच या आदेशान्वये सामनेवाला क्रमांक 3 ते 12 यांचे विरुध्द झालेले नि.क्र.6 खालील आदेश या आदेशान्वये रद्य करण्यात येत आहेत. सबब मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं. 1,2,13 ते 16 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांची उपरोक्त आदेश कलम 1 मध्ये नमुद मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमा त्या त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे. 5 टक्के व्याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
तसेच सामनेवाला क्र. 1,2,13 ते 16 यांना असे निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास त्यांचे बचत खाते क्रमांक 1639 व 179/1 वर शिल्लक असलेली रक्कम बचत खात्यावरील प्रचलीत व्याजदरानुसार तक्रारदारास अदा करावी.
( क ) सामनेवाला क्रं. 1,2,13 ते 16 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 2000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं. 1,2,13 ते 16 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं. 1,2,13 ते 16 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) सामनेवाला क्रं. 1 च्या तक्रारीत व निशाणी 6 मध्ये आणि तक्रारीत म्हटल्याप्रमाणे मालमत्ता मंचाचे आदेशाप्रमाणे जप्त करण्यात येते म्हणून सामनेवाला यांनी वरील मालमत्ता किंवा त्याचे कोणत्यही हिश्याचा व्यवहार करु नये आणि वरील मालमत्तेचा कोणालाही कोणत्याही प्रकारे विक्री,गहाण,दान, बक्षीस,ताबा व अन्य मार्गाने तबदील करु नये. सदर आदेश सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या इतर तक्रारीतील आदेशाप्रमाणे पूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपर्यंत सामनेवाला यांचेवर बंधनकारक राहील.
( फ ) सामनेवाला क्र. 3 ते 12 यांनी सामनेवाला संस्थेच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिलेला असल्याने व तो जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांनी मंजुर केलेला असल्याने सामनेवाला क्र. 3 ते 12 यांना प्रस्तुत तक्रारीतुन वगळण्यात येते सबब त्यांचेविरुध्द तत्कालीन न्यायमंचाने नि.क्र.6 खालील पारीत केलेले आदेश रद्य करण्यात येतात.
( फ ) सदरील तक्रारीच्या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्यास सामनेवाला क्रं. 1,2,13 ते 16 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.
( ग ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 04/09/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव