जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1454/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-29/11/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 11/10/2013.
मनोज बालाजी कुलकर्णी,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.दिनदयाल नगर, भुसावळ,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. रविंद्र साहेबराव शिंदे,
प्रोप्रा.धनश्री गॅस एजन्सी,भुसावळ.
2. टेरोटरी मॅनेजर,
भारत पेट्रोलीयम कॉर्पोरेशन लि,
प्लॉट नं.27, एम.आय.डी.सी.एरिया,जळगांव,
एल.पी.जी.टेरिटोरी.
3. दि.न्यु इंडीया इंन्शुरन्स कंपनी,
बद्री प्लॉट, जामनेर रोड, रोटे बिल्डींग,
भुसावळ,जि.जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.आर.बी.कुलकर्णी वकील.
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 तर्फे श्री.आर.डी.बर्डे वकील.
विरुध्द पक्ष क्र. 3 एकतर्फा.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक,सदस्याः खराब, फॉल्टी तसेच नादुरुस्त सिलेंडर स्फोटात झालेली नुकसान भरपाई मिळणेकामी तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार हा विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा उपभोक्ता क्र.6276 अन्वये ग्राहक असुन एस व्ही क्र.30114338090 दि.11/8/2011 नुसार सिलेंडर एकुण दोन नग जमा राशी रु.900 अधीक 1250/- नुसार गॅस कनेक्शन घेतलेले असुन ते ग्राहकांना लागणारे गॅस सिलेंडर शेगडी इत्यादी सामान पुरवितात. तसेच विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडुन अपघात विमा घेतलेला असुन ते विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक व त्रयस्थ इसमासाठी विमा संरक्षणाचे कार्य करतात. तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडुन घेतलेल्या गॅस चे सिलेंडर हे खराब, नादुरुस्त व फॉल्टी असल्याने त्याचा दि.6/6/2010 रोजी सकाळी 9.45 वाजता फुटल्याने स्फोट होऊन त्यात तक्रारदाराचे घरास आग लागुन सदर आगीत ब्लॅक अण्ड व्हाईट टी.व्ही, ओनीडा कंपनीचा जुना वापरता, एल जी कंपनीचा छोटा फ्रीज, त्यामधील वस्तु, लाकडी पलंग, एक पत्री कुलर, डीव्हीडी, एक मिक्सर, एक नोकीया कंपनीचा मोबाईल क्र.9657763077 , लोखंडी पेटीतील सामान, 60/- रु रोख, एक सोन्याची 5 ग्रॅमची अंगठी, कुटूंबातील सर्व लोकांचे कपडे लत्ते, सोन्याचे दागीने, दोन तोळयाचे मंगळसुत्र, कानातील रिंग्ज, ग.स.सोसायटीतुन रु.65,000/- चे घेतलेले कर्ज रक्कम, घर बांधणीचे सर्व कागदपत्रे इत्यादी जळुन अंदाजे रक्कम रु.5,00,000/- चे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने आग विझवली व पोलीस स्टेशनला माहिती देऊन घटनास्थळ पंचनामा केला. तसेच सदर घटनेत दयाराम शिंदे नावाचा इसम भाजून तरफडुन मरण पावला व तक्रारदाराचे घराची संपुर्ण राखरांगोळी झाली. विरुध्द पक्षास सदर नुकसान भरपाईची मागणी केली असता त्यांनी काहीएक नुकसान भरपाई न दिल्याने तक्रारदारास रस्त्यावर येण्याची वेळ आली. सबब विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 कडुन रक्कम रु.5,00,000/- नुकसानी, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/-, कोर्ट खर्च रु.10,000/-, अशी एकुण रक्कम रु.5,20,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावी तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 कडुन तक्रारदारास फुटलेल्या दोन हंडया, शेगडी, रेग्युलेटर देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी या मंचाची नोटीस मिळुनही याकामी हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदार यांनी याकामी रविंद्र साहेबराव शिंदे यांना प्रतिवादी केलेले असल्याने तक्रार रद्य होण्यास पात्र आहे. तक्रारदार हा रविंद्र साहेबराव शिंदे यांचा ग्राहक नाही. तक्रारदाराने धनश्री गॅस कंपनीला प्रतिवादी केलेले नाही म्हणुन सदरचा अर्ज रद्य करावा. विरुध्द पक्ष क्र. 1 गॅस एजन्सीचे मुख्य वितरक विरुध्द पक्ष क्र. 2 आहेत. विरुध्द पक्ष क्र. 1 च्या रेकॉर्डनुसार तक्रारदाराचा ग्राहक क्र.6376 असुन त्याचा एस.व्ही.क्र.3011438090 असुन त्याची तारीख 11/08/2001 अशी आहे. सबब तक्रारदाराने तक्रार अर्जात दिलेला एस.व्ही.क्रमांक चुकीचा असुन तो विरुध्द पक्षास मान्य नाही. तक्रारदाराने ग्राहक क्रमांक नोंद करतांना त्याचा पत्ता चक्रधर नगर,भुसावळ असा दिलेला होता व त्या पत्यावर गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आले होते. तक्रारदारास देण्यात आलेल्या एस.व्ही मधील अट क्र. 4 नुसार गॅस कनेक्शन व त्याचे साहित्य अन्य ठिकाणी स्थलांतर करतांना व तत्पुर्वी विरुध्द पक्ष क्र. 1व 2 ची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे अन्यथा सदरचे गॅस कनेक्शन व साहित्य वितरकास परत करणे बंधनकारक आहे. सबब तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचेतील करार अट क्र.11 नुसार गॅस कनेक्शन व उपकरण स्थलांतर केल्यास व त्यातुन नुकसान झाल्यास विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 हे जबाबदार नसतात. सदरचा करार हा दि.11/08/2001 रोजी झालेला असुन त्यावर तक्रारदाराची स्वाक्षरी आहे. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे. तक्रारदाराचे घरी स्वयंपाकाचे गॅस मुळे कोणताही स्फोट झालेलेला नाही सदर साहीत्य व यंत्रणेत कोणताही दोष नव्हता. उलटपक्षी तक्रारदाराचे घरी लागलेल्या आगीमुळे नुकसान झालेले असावे ते तक्रारदाराने स्पष्टपणे शाबीत करावे. याउलट तक्रारदाराचे घरी लागलेल्या आगीमुळे विरुध्द पक्ष क्र. 2 चे मालकीचे गॅस सिलेंडर व रेग्युलेटरचा स्फोट होऊन विरुध्द पक्ष क्र. 2 चे आर्थिक नुकसान झालेले आहे त्यास तक्रारदार हा जबाबदार आहे. एवढेच नव्हे तर तक्रारदाराच्या घरास लागलेल्या आगीमुळे लिलाबाई दयाराम शिंदे यांच्या घरास आग लागुन त्यात दयाराम शिंदे अपघाती मयत झाला त्यास देखील तक्रारदार जबाबदार आहे. तक्रारदाराने घरात जळालेल्या वस्तु हया त्याच्या मालकीच्या असल्याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. तसेच सदर साहित्याची किंमत रु.5,00,000/- होती हे म्हणणेही खोटे आहे. याकामी दि.न्यु इंडीया एशोरन्स कंपनी यांना आवश्यक प्रतिवादी म्हणुन सामील करणे गरजेचे होते कारण विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी विमा कंपनीकडुन एल.पी.जी.डिलर्स मल्टी पेरिल पॉलीसी क्र.160703/46/09/22/00000026 घेतलेली असुन त्यानुसार तक्रारदाराने पुर्तता करुन शाबीत केल्यास त्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळु शकते. सदर विमा कंपनीने अपघात जागेचे मुल्यांकन, नुकसान भरपाईची आकारणी तज्ञ इसमामार्फत अथवा सर्व्हेअर मार्फत केलेली असुन त्यानुसार तक्रारदाराने आवश्यक ती पुर्तता न केल्याने सदर अर्ज रद्य होण्यास पात्र आहे. सबब वरील सर्व कारणांचा विचार होऊन तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह रद्य करण्यात यावा व कोर्ट खर्च नुकसानी दाखल रक्कम रु.15,000/- तक्रारदाराकडुन मिळावेत अशी विनंती विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, तसेच उभयतांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे काय? होय.
2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? असल्यास कोणी ? होय.,विरुध्द पक्ष क्र.3 यांनी
3) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
6. मुद्या क्र.1 - तक्रारदार यांनी उपभोक्ता क्रमांक 6276, एस.व्ही.क्र.30114338090 अन्वये विरुध्द पक्ष क्र.2 कंपनीचे अधिकृत डिलर यांचेकडुन घरगुती वापराचे गॅस कनेक्शन घेतले होते., त्याबाबत तक्रारदाराने गॅस ग्राहकाची पुस्तीका क्रमांक 4493298 नि.क्र.3 लगत दाखल केलेली आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी याकामी हजर होऊन त्यांनी त्यांचे ग्राहकांकरिता एल.पी.जी.डिलर्स मल्टी पेरिल पॉलीसी क्र.160703/46/09/22/00000026 घेतलेली असल्याचे कथन लेखी म्हणण्यातुन केलेले आहे. उपरोक्त विवेचनाचा विचार करता तक्रारदार हा विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचा ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हा मंच आलेला आहे. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र. 2 - तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 कडुन घेतलेले गॅस कनेक्शन वरील सिलेंडर हे खराब नादुरुस्त व फॉल्टी दिल्यामुळे त्याचा दि.6/6/2010 रोजी स्फोट होऊन त्यात तक्रारदाराचे कौंटूंबीक साहित्याची राखरांगोळी झाली व तक्रारदाराचे अपरिमीत नुकसान झाले., सदरची नुकसान भरपाई मिळणेकामी तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केला आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी याकामी हजर होऊन लेखी म्हणण्यातुन तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. त्यात प्रामुख्याने तक्रारदाराने त्याचा निवासस्थानाचा पत्ता बदलल्याची माहिती विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना दिलेली नसल्याने व त्यांची परवानगी न घेतल्याने तक्रारदारास देण्यात आलेल्या एस.व्ही मधील अट क्र. 4 चा भंग झालेला आहे असे कथन केलेले आहे. तथापी तक्रारदारास बदललेल्या पत्यावर विरुध्द पक्ष क्र. 1 कडुन सिलेंडरचा पुरवठा होत होता त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना तक्रारदाराचे बदललेल्या पत्याबाबत माहिती होती त्यामुळे याकामी एस.व्ही.क्र.4 मधील अटीचा भंग झाला असे म्हणता येणार नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी लेखी म्हणणे व युक्तीवादातुन तक्रारदाराचे घरी स्वयंपाकाचे गॅस मुळे कोणताही स्फोट झालेलेला नाही सदर साहीत्य व यंत्रणेत कोणताही दोष नव्हता. उलटपक्षी तक्रारदाराचे घरी लागलेल्या आगीमुळे नुकसान झालेले असावे ते तक्रारदाराने स्पष्टपणे शाबीत करावे असे नमुद केले. याबाबतीत तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत नि.क्र.3 लगत घटनास्थळ पंचनामाची छायाप्रत दाखल केली आहे. सदर घटनास्थळ पंचनामा चे अवलोकन करता गॅस हंडीचा स्फोट होऊन त्यात तक्रारदाराचे घरातील घरगुती सामान जळुन नुकसान झाल्याचे नमुद आहे. तसेच सदर स्फोटात श्री.दयाराम श्रीपत शिंदे व श्री.मनोज कुलकर्णी यांचे रहाते घरास दि.6/6/2010 रोजी लागलेली आग भुसावळ नगरपरिषदेच्या फायर फायटर वाहन क्रमांक एम.एच.19/एम 9160 ने आग विझवली असल्याचा दाखला नि.क्र.3 लगत दाखल आहे. तक्रारदाराचे घरी लागलेल्या आगीचा पंचनामा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी देखील केलेला असुन सदर पंचनाम्याची छायाप्रत नि.क्र.3 लगत दाखल आहे. या सर्व कागदोपत्री पुराव्यावरुन तक्रारदाराच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात त्याचे घरगुती सामान जळुन नुकसान झाले असल्याचे तक्रारदाराचे तक्रारीतील कथन तक्रारदाराने शाबीत केलेले असल्याने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचेकडुन पुरवठा करण्यात आलेले सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात तक्रारदाराचे नुकसान झाल्याचे निष्कर्षाप्रत हा मंच येत आहे. सदरकामी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी लेखी म्हणणे व युक्तीवादातुन त्यांनी विमा कंपनीकडुन म्हणजे विरुध्द पक्ष क्र. 3 कडुन एल.पी.जी.डिलर्स मल्टी पेरिल पॉलीसी क्र.160703/46/09/22/00000026 घेतलेली असुन त्यानुसार तक्रारदाराने पुर्तता करुन शाबीत केल्यास त्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळु शकते. सदर विमा कंपनीने अपघात जागेचे मुल्यांकन, नुकसान भरपाईची आकारणी तज्ञ इसमामार्फत अथवा सर्व्हेअर मार्फत केलेली असुन त्यानुसार तक्रारदाराने आवश्यक ती पुर्तता न केल्याने त्यात रक्कम मिळु शकलेली नाही असेही प्रतिपादन या मंचासमोर केले. या तक्रारीकामी या मंचाने विरुध्द पक्ष क्र. 3 विमा कंपनीस नोटीस काढुन म्हणणे मांडणेसाठी कळविल्यानंतर विरुध्द पक्ष क्र. 3 हे या मंचाची नोटीस मिळुन याकामी गैरहजर राहीले व त्यांनी कोणत्याही स्वरुपाचे म्हणणे याकामी न मांडल्याने विरुध्द पक्ष क्र. 3 विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फा चालविण्यात आली. तक्रारदाराचे घरातील सामानाचे गॅस सिलेंडर स्फोटात नुकसान होऊनही सदरकामी विरुध्द पक्ष क्र. 3 विमा कंपनीने सर्व्हेअर मार्फत नुकसानीचे मुल्यांकन करुनही तक्रारदारास नुकसान भरपाई रक्कम मिळणेपासुन वंचित ठेवुन नाहक त्रास देऊन सेवेत त्रृटी केल्याचे निष्कर्षाप्रत हा मंच येत आहे. तक्रारदाराची गॅस सिलेंडर स्फोटात झालेली नुकसानी रक्कम देण्यास विरुध्द पक्ष क्र. 3 विमा कंपनी जबाबदार असल्याचे निष्कर्षास्तव आम्ही मुद्या क्र. 2 चे उत्तर विरुध्द पक्ष क्र. 3 करिता होकारार्थी देत आहोत.
8. मुद्या क्र. 3 - विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 कडुन रक्कम रु.5,00,000/- नुकसानी, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/-, कोर्ट खर्च रु.10,000/-, अशी एकुण रक्कम रु.5,20,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावी तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 कडुन तक्रारदारास फुटलेल्या दोन हंडया, शेगडी, रेग्युलेटर देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे. तक्रारदाराने रक्कम रु.5,00,000/- नुकसानी दाखल मागीतले जरी असले तरी त्याकामी एवढया रक्कमेचे नुकसानी दाखल योग्य ते कागदोपत्री पुरावा सोबत दिलेले नाही. तथापी तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत नि.क्र.3 लगत घटनास्थळ पंचनामा ची छायाप्रत दाखल केली असुन तिचे बारकाईने अवलोकन करता सदर आगीत तक्रारदाराचे ओनीडा कंपनीचा ब्लॅक अण्ड व्हाईट टी व्ही, एल जी कंपनीचा छोटा फ्रीज, त्यामधील वस्तु, लाकडी पलंग, एक पत्री कुलर, डि व्ही डी, एक मिक्सर, एक नोकीया कंपनीचा मोबाईल, एकाचा नंबर माहिती नाही, लोखंडी पेटी व त्यातील सामान, पानटपरीमधील सामान व 15,000/- रोख, लाकडी स्टुल व इतर संसार उपयोगी वस्तु असे जळुन खाक होऊन सुमारे रु.75,000/- चे नुकसान झाले असल्याचे नमुद आहे तथापी आमचे मते नुकसान भरपाई रक्कम निश्चित करतांना तक्रारदाराचे घर संपुर्ण जळालेले आहे. कपडे वगैरे जळुन घरातील संपुर्ण चिजवस्तुंचे नुकसान झाले आहे, उदा.गहु, ज्वारी, पिठ इतर संसारउपयोगी साहित्याची राखरांगोळी झालेली आहे., या सर्व बाबींचा गांर्भीयाने विचार करता आमचे मते तक्रारदार हा नुकसानी दाखल रक्कम रु.95,000/- तक्रार दाखल तारखेपासुन द.सा.द.शे.8 टक्के व्याजासह विरुध्द पक्ष क्र. 3 विमा कंपनीकडुन मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. विरुध्द पक्ष क्र. 3 विमा कंपनीकडुन तक्रारदार हा मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे. तक्रारदाराने तक्रार अर्जातुन फुटलेल्या दोन हंडया, शेगडी व रेग्युलेटर मिळणेबाबत विनंती केली आहे. तक्रारदाराचे घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात त्याचे झालेले नुकसानी पाहता तक्रारदार हा विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडुन दोन गॅस सिलेंडर, शेगडी व रेग्युलेटर आहे त्या गॅस क्रमांकावर विनाशुल्क मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सबब वरील विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) विरुध्द पक्ष क्र.3 दि.न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनी लि. यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास नुकसानी दाखल रक्कम रु.95,000/-(अक्षरी रक्कम रु.पंच्याणऊ हजार मात्र ) दि.29/11/2010 पासुन द.सा.द.शे.8 टक्के व्याजासह या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
( क ) विरुध्द पक्ष 3 दि.न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनी लि. यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, त्रासापोटी रक्कम रुपये 10,000/- (अक्षरी रक्कम रु.दहा हजार मात्र ) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/-(अक्षरी रक्कम रु.पाच हजार मात्र) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
( ड ) विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना असे निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास त्याचे उपभोक्ता क्रमांक 6276 वरील गॅस कनेक्शन पुर्ववत चालु करुन त्यास सदर कनेक्शन वरील दोन गॅस सिलेंडर, रेग्युलेटर व शेगडी निशुल्क स्वरुपात या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 11/10/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.